News Flash

औषधविक्रेता नव्हे, आरोग्यमित्र!

अडचण सांगितली व झापड येणे हा साइड इफेक्ट नसलेल्या दुसऱ्या अ‍ॅण्टी अ‍ॅलर्जिक गोळ्या सुचविल्या.

अन्न व औषधी प्रशासनातील काही चांगल्या अधिकाऱ्यांमुळे राज्यात औषधांच्या दुकानात फार्मसिस्ट नेमण्यात आले. रुग्णसेवेच्या अनेकविध पैलूंमुळे, पांढऱ्या कोटातील फार्मसिस्ट हा परदेशात केवळ औषधविक्रेता नाही तर एक प्रिय आरोग्यमित्र आहे. दुसरीकडे, आता राज्यातही इंटरनेट-आधारित औषधविक्री परवाने द्यावेत का, यावर २८ सप्टेंबपर्यंत सूचना, हरकती मागवून निर्णयही लवकरच होईल. या पाश्र्वभूमीवर,
२५ सप्टेबरच्या ‘आंतरराष्ट्रीय फार्मसिस्ट दिना’च्या निमित्ताने हे टिपण..
दक्षिण मुंबईतील केमिस्टचे दुकान. फार्मसिस्टकडे रुग्ण डॉक्टरांची चिठ्ठी देतो. फार्मसिस्ट महिलेला रुग्णाकडे बघताक्षणीच तो एस. टी.मध्ये वगैरे असावा असा त्याचा पोशाख बघून वाटते. ती त्याची अधिक विचारपूस करते तेव्हा तो एस. टी. ड्रायव्हर आहे, खूप सर्दी, शिंकासाठी डॉक्टरांकडे गेला होता व आता गोळ्या घेऊन डय़ुटीवर जाणार असल्याचे तिला समजते. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या अ‍ॅण्टी अ‍ॅलर्जिक गोळ्यांनी प्रचंड झापड, झोप येऊ शकते व पुढे काय संभाव्य धोके त्यामुळे निर्माण होऊ शकतात हे तिच्या त्वरित लक्षात आले. तिने रुग्णास विनंती करून डॉक्टरांना फोन केला. अडचण सांगितली व झापड येणे हा साइड इफेक्ट नसलेल्या दुसऱ्या अ‍ॅण्टी अ‍ॅलर्जिक गोळ्या सुचविल्या. डॉक्टरांनी त्वरित मान्य केले व संभाव्य अपघाताचा धोका टळला.
ग्रामीण महाराष्ट्रातील मेडिकलचे दुकान. सकाळी सकाळीच एक रुग्ण डावा हात दुखतोय, पेनकिलर द्या अशी मागणी घेऊन येतो. फार्मसिस्ट त्याला इतर काय त्रास, लक्षणे आहेत विचारतो. त्याला दुकानात आत घेऊन १० मिनिटे बसू देतो व नंतर त्याचा रक्तदाब तपासतो. २००/१०० असा वाढलेला रक्तदाब आढळतो. फार्मसिस्ट त्याची समजूत घालून त्याला नजीकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवितो. या रुग्णाला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे निदान होऊन योग्य औषधोपचार चालू होतो.
मधुमेहाची औषधे नियमित घेणारा रुग्ण बरेच दिवसांनी आपल्या नेहमीच्या केमिस्टकडे येतो. त्याच्याशी बातचीत करताना फार्मसिस्टच्या लक्षात येते की, रुग्णाची मध्यंतरी सर्जरी झाली व हॉस्पिटलमधून घरी जाताना इन्सुलिन बदलून दिले आहे. मात्र घरी आल्यापासून गेल्या आठवडाभरात ३/४ वेळा चक्कर आली. साखर कमी झाली. फार्मसिस्ट रुग्णाला त्याचे नवीन इन्सुलिन व सिरिंज दाखवण्यास घेऊन येण्याची विनंती करतो. ते पाहिल्यानंतर तात्काळ फार्मसिस्टला लगेच दुखणे लक्षात येते. पूर्वीच्या ४० युनिट इन्सुलिनऐवजी रुग्णास आता १०० युनिट इन्सुलिन घेण्यास सांगितले होते, पण रुग्ण इंजेक्शनसाठी सिरिंज मात्र ४० चीच वापरत होता. इन्सुलिनच्या प्रकाराप्रमाणेच सिरिंजही वापरावी लागते. हा रुग्ण चुकीची सिरिंज वापरत होता व त्यामुळे ‘हायपोग्लायसेमिया’ (रक्तशर्करा कमी होणे) होऊन चक्कर येत होती व कदाचित बेशुद्धी, कोमा अशी अवस्थाही होऊ शकली असती.
ठाणे जिल्ह्य़ातील दाट लोकवस्तीतील केमिस्टचे दुकान. खोकल्याचे सिरप वारंवार मागण्यास येणारा रुग्ण. काही दिवस फार्मसिस्ट त्याचे निरीक्षण करीत होता. वारंवार खोकला, अधूनमधून ताप, घटणारे वजन. त्याने रुग्णाला समजावून व त्याचा फॉलोअप करून शासनाच्या थुंकी तपासणी केंद्रात पाठवले. क्षयरोगाचे निदान झाले व रुग्णाचे आठ महिन्यांचे मोफत उपचार फार्मसिस्टने दुकानात केले. अशा अनेक केसेस रुग्णस्नेही, तत्पर व तज्ज्ञ फार्मसिस्टच्या. आज यांची आवर्जून आठवण काढण्याचे कारण म्हणजे जागतिक फार्मसिस्ट दिन. गेल्या काही वर्षांपासून २५ सप्टेंबर हा दिवस जगभर फार्मसिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर्स डे, इंजिनीअर्स डेसारखा तो आपल्या परिचयाचा नसेलही. अर्थात यात आश्चर्य काहीच नाही, कारण मुळात फार्मसिस्टचीच ओळख समाजाला फारशी नाही.
बारावीनंतर फार्मसीची पदविका, पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला व्यावसायिक म्हणजे फार्मसिस्ट. औषधाच्या निर्मितीपासून रुग्णाने त्याचा विनियोग करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात फार्मसिस्टची भूमिका मोलाची. संशोधन, उत्पादन, शिक्षण, औषध नियंत्रण, मार्केटिंग अशी अनेक क्षेत्रे फार्मसिस्टना खुली; पण समाजासमोर येणारा फार्मसिस्ट म्हणजे औषध दुकान (केमिस्ट, मेडिकल रिटेल/ कम्युनिटी फार्मसी) व हॉस्पिटलमधील. फार्मसिस्ट ही संज्ञा आपण वापरतो तेव्हा सहसा समाजाभिमुख फार्मसिस्ट अभिप्रेत असतो.
फार पूर्वीच्या काळी फार्मसीच्या दुकानात औषधे बनवली जायची. आधुनिक काळात मात्र सारी औषधे तयार स्वरूपात दुकानात येतात, पण म्हणून रुग्णाने औषध मागितले व फार्मसिस्टने ते दिले, पैशाचा व्यवहार झाला इतकी त्रोटक भूमिका फार्मसिस्टची अपेक्षित नाही. जरी औषधपुरवठा हा फार्मसिस्टच्या कामाचा मुख्य गाभा असला तरी जगातील फार थोडे देशवगळता सर्वत्र फार्मसिस्टची भूमिका अत्यंत विस्तारित झाली आहे. प्रीस्क्रिप्शनची तपासणी, औषधविषयक समुपदेशन, आरोग्य चाचण्या, औषध आंतरक्रिया/ दुष्परिणामांवर नजर ठेवणे, रुग्णाच्या घरी जाऊन मार्गदर्शन, काही औषधे सुचवणे, लसीकरणापासून ते व्यसनमुक्तीपर्यंत विविध उपक्रम राबविणे अशी रुग्णसेवेच्या अनेकविध पैलूंनी फार्मसिस्टची भूमिका अगदी समृद्ध झाली आहे. पांढऱ्या कोटातील हसतमुख औषधतज्ज्ञ फार्मसिस्ट हा परदेशातील लोकांसाठी केवळ औषधविक्रेता नाही तर एक प्रिय आरोग्यमित्र आहे. फार्मसिस्ट अशा प्रकारे घडायला तेथील अनुकूल परिस्थितीची अर्थातच साथ आहे. व्यवसायाभिमुख शिक्षण, उत्तम आर्थिक मोबदला, औषधविषयक धोरणे व कायद्यांची कडक अंमलबजावणी, फार्मसिस्टसाठी उजळणी पाठय़क्रम, आरोग्य साक्षर जागरूक ग्राहक, आरोग्यविषयास प्राधान्य देणारे संवेदनशील राज्यकर्ते अशा अनेक घटकांमुळे फार्मसिस्टची भूमिका स्थापित होऊ शकली. नेमक्या या सर्वच आघाडय़ांवर आपण कमी पडलो.
फार्मसिस्ट ‘हेल्थ केअर प्रोफेशनल’ व औषध व्यवसाय ‘हेल्थ केअर प्रोफेशनल’ असा होऊ शकला नाही. औषधे ही इतर वस्तूंसारखीच एक वस्तू (ूे्िर३८) व कुणीही करावा हा व्यवसाय असे त्याचे स्वरूप राहिले. औषधे ही आरोग्याशी थेट निगडित आहेत, हा अत्यंत जबाबदारीचा व कायद्याने नियंत्रित (१ीॠ४’ं३ी ि& २स्र्ी्रूं’्र२ी)ि व्यवसाय आहे, केवळ धंदा-व्यापार नव्हे, हे संबंधित घटकांमध्ये रुजले नाही व रुजवलेही नाही. धंदा म्हटला की स्पर्धा, नफ्यासाठी चढाओढ ओघाने आलीच. तब्बल १९४० च्या दशकांत केलेले औषधविषयक कायदे कधी पूर्णतया पाळले जातील याची वाट आज २०१५ सालीही आपण बघतो आहोत. या कायद्यांचे उल्लंघन कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण भारतातच दिसते व ते आपल्या अंगवळणी पडले. ‘जेथे फार्मसी, तेथे फार्मसिस्ट’ असे काही आपल्याला जमले नाही. काही राज्यांत तर दुकानात फार्मसिस्ट औषधालाही मिळत नाही. औषधांची विक्री फार्मसिस्टशिवाय सर्रास चालते. तुलनेने महाराष्ट्रातील परिस्थिती चांगली आहे. गेल्या काही वर्षांत बरीच जागरूकता आली आहे. प्रशासनाचे प्रयत्न सातत्याने चालू आहेत. अर्थात अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

या फार्मसी क्षेत्राच्या व्यापारी स्वरूपाच्या पाश्र्वभूमीवर काही अत्यंत सकारात्मक अपवादही बघायला मिळतात. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलनात स्वेच्छेने सहभागी झालेले महाराष्ट्रातील व इतर काही राज्यांतील २००० फार्मसिस्ट हे याचेच मूर्तिमंत उदाहरण. शासनाची टीबीसाठीची डॉट्स प्रणाली दुकानातून राबवून रुग्णांना मोफत औषधे देणे, समुपदेशन अशा अनेक सेवा हे फार्मसिस्ट सामाजिक बांधीलकीच्या भूमिकेतून कोणताही आर्थिक मोबदला न घेता देत आहेत. त्यांच्या या कामाची दखल केंद्र सरकारने व जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली आहे. याखेरीज अनेक फार्मसिस्ट दुकानात कामाच्या आदर्श पद्धती राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. रुग्ण समुपदेशन, काही आरोग्य चाचण्या उपलब्ध करून देत आहेत. नियमांचे काटेकोर पालन करून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात ‘तो राजहंस एक’सारखी त्यांचीही अनेकदा अवस्था होतेच.
इंटरनेट फार्मसी गेल्या काही वर्षांपासून काही देशांत कार्यरत आहेत. अमेरिकेत, युरोपिअन युनियनमध्ये यासंबंधी अत्यंत कडक नियमावली आहे. ग्राहकांनी इंटरनेटवरून औषधे खरेदी करताना काय काळजी घ्यावी, वेबसाइट्सचा सच्चेपणा कसा तपासावा वगैरे बाबतीत ग्राहकांना वारंवार सावध केले जाते व ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रयत्न असतात. त्या देशांमध्ये कायद्यांची कडक अंमलबजावणी असूनही ठं३्रल्लं’ अ२२्रूं३्रंल्ल ऋ इं१२ि ऋ ढँं१ेूं८ (ठअइढ) ने केलेल्या सर्वेक्षणात ९३ टक्केवेबसाइट्स नियमपालन करत नसल्याचे आढळले. मग आपल्याकडे काय होईल? वास्तवातील फार्मसीमध्येच अजून आपण कायद्याची पूर्ण अंमलबजावणी नाही करू शकलो. मग वास्तवातील फार्मसीवर अंकुश ठेवण्याची सक्षमता यंत्रणेकडे नसेल तर जगातील फार्मसीवर आपण कितपत नजर व अंकुश ठेवू शकू आणि या सर्वाच्या पलीकडे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा फार्मसिस्टच्या भूमिकेचा.
भारतात अजूनही न रुजलेली, न फुललेली फार्मसिस्टची भूमिका या व्यवस्थेमध्ये जवळजवळ अदृश्यच होईल का? औषधे ही केवळ एक ग्राहकोपयोगी वस्तू व रुग्ण हा केवळ एक ग्राहक असा मर्यादित विचार करायचा का? एकंदर इंटरनेट फार्मसीसाठी आपला देश परिपक्व आहे का? याचा विचार व्हायला हवा व यावर विचारमंथन झाले पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2015 12:28 am

Web Title: not chemist his health friend
टॅग : Driver,St
Next Stories
1 निराधारांच्या जीवनात आनंदाचे मळे!
2 स्वरगंगेचा अखंड प्रवाह
3 वंचितांचे निकेतन..
Just Now!
X