सुमारे ८०० वर्षांच्या संघर्षमय इतिहासाची साक्ष देणारी आणि अनेक मानवनिर्मित संकटे झेललेली पॅरिसमधील जागतिक वारसा वास्तू गेल्या आठवडय़ात आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ज्वाळांनी वेढलेले ‘नोत्र दाम’ चर्चचे संग्रहालय पाहून जग हळहळले.

एकटय़ा फ्रान्सचाच नव्हे, युरोप-अमेरिकेचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या या संग्रहालयाने युद्धे आणि महायुद्धेही अनुभवली. त्यांचा दाह सोसला. परंतु त्याचा फ्रेंच गॉथिक शैलीतील बांधकामाचा तटून उभा राहिला. ए-ाा पाऊंड, अर्नेस्ट हेमिंगवे यांच्यासह अनेक दिग्गज साहित्यिक याच वास्तूच्या सावलीत फ्रेंच संस्कृतीचे प्रतीक बनले. प्रसिद्ध फ्रेंच साहित्यिक व्हिक्टर ह्य़ूगो यांनी ‘नोत्र दाम’वर हंचबॅक ऑफ नोत्र दाम ही कादंबरी (१८३१) लिहून त्याच्या जतनाकडे लक्ष वेधले. हा सगळा इतिहास आगीच्या निमित्ताने ‘बीबीसी’च्या ऑनलाइन आवृत्तीत प्रसिद्ध करण्यात आला आहे.

‘नोत्र दाम’ला लागलेल्या आगीच्या ज्वाळा गगनाला भिडल्या असतानाच त्याच्या पुनर्बाधणीसाठी देणग्या जाहीर होऊ लागल्या. त्या जाहीर करण्याची स्पर्धाच अब्जाधीशांमध्ये सुरू झाली. काही तासांत एक अब्ज डॉलर्स जमा झाले. परंतु अब्जाधीशांच्या देणग्यांवरून वादही उद्भवला आहे. याबाबतचा वृत्तांत ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘यूएसए टुडे’सह अनेक वृत्तपत्रांनी ठळकपणे प्रसिद्ध केला आहे. त्यात फ्रान्समधील ‘यलो व्हेस्ट’ चळवळीचे प्रमुख इनग्रिड लिव्हावसिअर आणि कामगारनेते फिलीप मार्टिनेझ यांच्याबरोबरच अन्य नेत्यांच्या आक्षेपांचे दाखले देण्यात आले आहेत. ‘ते जर ‘नोत्र दाम’साठी अब्जावधी डॉलर देऊ  शकत असतील तर सामाजिक संकटात मदत करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत, असे कारण त्यांनी देऊ  नये,’ हे मार्टिनेझ यांचे म्हणने ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केले आहे. कर वाचवण्यासाठी उद्योगपती देणग्या देतायत, त्यांनी प्रथम कर भरावा, अशी मागणी काही जण करीत आहेत. परंतु आपण कर वाचवण्यासाठी देणग्या देत नसल्याचे काही उद्योगपतींनी स्पष्ट केले आहे. त्याची नोंदही या वृत्तांतात घेण्यात आली आहे. काहींनी पॅरिसमधल्या गरिबांच्या उत्थानासाठी आणि बेघरांना घरे बांधून देण्यासाठीही मदतीची मागणी केली आहे. तर गरिबांना मदत आणि ‘नोत्र दाम’ची पुनर्बाधणी यांची तुलना होऊ  शकत नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. अशा दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न या वृत्तांतांमध्ये केला आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ‘नोत्र दाम’ची पुनर्बाधणी पाच वर्षांत करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या राजकीय विरोधकांनीही हे काम २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी पूर्ण करण्याची मागणी केली आहे. परंतु या कामाला दशकभरही लागू शकते, असे वास्तुशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर आतापर्यंत जमा झालेल्या सुमारे एक अब्ज डॉलरच्या देणग्या त्यासाठी पुरेशा नाहीत. त्यासाठी दोन-तीन अब्ज डॉलर लागणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. शिवाय या वास्तूची पुनर्बाधणी करताना आधुनिकता आणि सांस्कृतिक वारसा यांच्यातील संतुलन साधण्याचा प्रश्न हाही वादाचा मुद्दा बनला असल्याकडे ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने लक्ष वेधले आहे. परंतु सध्या वादापेक्षा वास्तूच्या सौंदर्याचे किती आणि कुठे नुकसान झाले आहे, याचा आढावा घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

‘नोत्र दाम’च्या आगीमागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सरकारी यंत्रणा करीत आहेत. आग लावण्यात आली की लागली, याचा शोध सुरू असतानाच कर्मठ ख्रिस्ती माध्यमांनी आणि शेकडो संकेतस्थळांनी दुसऱ्या टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी आगीला ‘दैवी कोप’ म्हटले आहे. सध्या ‘नोत्र दाम’चा दैवी न्याय, अशा एका सार्वत्रिक कर्मठ प्रतिक्रियेची चलती आहे. काहींनी हे दहशतवादी कृत्य असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. या सर्व प्रतिक्रियांचे विश्लेषण करण्याचा आणि त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न वॉशिंग्टन पोस्टने लेखात केला आहे.

‘नोत्र दाम’ हानीच्या सर्वेक्षणास आणखी आठवडाभर लागण्याची शक्यता आहे. परंतु जसजशी सर्वेक्षणाची माहिती बाहेर येत आहे, तसतसे कॅथलिक नागरिक, कला इतिहासप्रेमी आणि मधुमक्षीकाप्रेमींचे चेहरे उजळत आहेत. त्यांच्या मनातील भावना एबीसी न्यूज आणि बीबीसीच्या ऑनलाइन वृत्तांतात टिपण्यात आल्या आहेत. ‘नोत्र दाम’मधील कलावास्तूच्या हानीचे प्रमाण कमी आहे. मधमाशांच्या वसाहतीही वाचल्या आहेत. एवढय़ा मोठय़ा आगीतूनही ‘नोत्र दाम’चे चिमुकले रहिवासी बचावले आहेत. आगीत सुमारे दोन लाख मधमाशा नष्ट झाल्याचे प्राथमिक वृत्त होते, परंतु त्यांची गुणगुण कानांना सुखावत आहे, असे ‘बीबीसी’च्या वृत्तांतात म्हटले आहे. त्यांचा जीव वाचणं हा एक चमत्कारच असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

संकलन- सिद्धार्थ ताराबाई