सासवड येथे गेल्या महिन्यात झालेले अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षांच्या बाष्कळ कोटय़ा आणि साहित्यप्रेमींना झालेल्या गैरसोयींमुळे गाजले. त्याच्याच काही दिवस अगोदर कर्नाटकातील मूडबिद्री येथे ‘आळ्वास विश्व नुडिसिरि विरासत’ या नावाने कन्नड साहित्य संमेलन भरले होते. सुमारे दीड लाख कन्नड भाषकांनी या संमेलनास हजेरी लावली होती. भैरप्पा, चंद्रशेखर कम्बार यांच्यासारखे दिग्गज संमेलनाला आल्याने ते प्रचंड यशस्वी झाले. या संमेलनास विशेष आमंत्रित असलेल्या लेखिका डॉ. उमा वि. कुलकर्णी यांनी लिहिलेला वृत्तान्त..
गेली चार-पाच वर्षे कर्नाटकात, उडुपी-मंगळूर या गावांच्या मध्ये असलेल्या मूडबिद्री या गावी भरणाऱ्या ‘आळ्वास नुडिसिरि’ (नुडिसिरि म्हणजे भाषा-श्रीमंती) साहित्य संमेलनाविषयी भैरप्पा, वैदेही, मालिनी मल्ल्या, मोगसाले यांसारख्या कर्नाटकातील साहित्यक्षेत्राशी गंभीररीत्या निगडित असलेल्या मंडळींकडून ऐकत होते. यंदाच्या ‘अळ्वास नुडिसिरि विरासत ’ला हजर राहण्याचा योग आला.
मोहन आळ्वा हे या परिसरातले साहित्य-संस्कृतिप्रेमी आयुर्वेदिक डॉक्टर.  गेली वीस वर्षे संगीत-नृत्याच्या क्षेत्रातील अखिल भारतीय पातळीवरील कलाकारांना बोलावून तीन दिवसांचा ‘आळ्वास विरासत’ हा कार्यक्रम करणारे. दहा वर्षांपूर्वी मूडबिद्रीमध्ये अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलन भरवण्यात आले आणि त्या वेळी संमेलनाची जबाबदारी डॉ. मोहन आळ्वांवर सोपवण्यात आली. ती त्यांनी अत्यंत समर्थपणे पेलली. याच वेळी त्यांच्या मनात आले, कन्नडमधील मोठमोठय़ा लेखकांची आपल्या गावाला पायधूळ लागायची असेल तर आपण इतरांवर का अवलंबून राहायचे? तेव्हापासून त्यांनी दर वर्षी ‘आळ्वास नुडिसिरि’ या नावाने तीन दिवसांचे साहित्य संमेलन भरवायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी बरगुर रामचंद्रप्पा हे बंडाय लेखक अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. दुसऱ्या वर्षी डॉ. भैरप्पांना हा मान देण्यात आला. अशा प्रकारे कन्नड भाषेत मोलाची भर घालणाऱ्या नऊ जणांना
निमंत्रण देऊन हा मान देण्यात आला. या संमेलनासाठी दर वर्षी सुमारे दीड लाख लोक हजेरी लावतात.
यंदाचे ‘नुडिसिरि’चे दहावे आणि ‘विरासत’चे विसावे वर्ष असल्यामुळे दोन्हींचे एकत्रितपणे ‘आळ्वास विश्व नुडिसिरि विरासत’ या नावाने प्रचंड मोठा महोत्सव करण्याचा निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शंभर रुपये भरून सभासद करवून घेण्यात येत होते. या शंभर रुपयांत संमेलनाच्या ठिकाणी चार दिवस राहणे, दररोज एक नाश्ता आणि दोन जेवणे देण्यात येणार होती.  संमेलनाची वीस पानी निमंत्रण पत्रिकाच उत्सुकता वाढवणारी होती. कार्यक्रमांच्या वेळा मिनिटांच्या हिशेबात देण्यात आल्या होत्या. मुख्य म्हणजे त्या वेळा प्रत्येक ठिकाणी पाळण्यात आल्या.
एकंदरीत चार मोठी व्यासपीठे आणि करमणुकीच्या कार्यक्रमासाठी इतर पाच व्यासपीठे असणार होती.  पहिल्या दिवशी सुमारे दीड हजार लोककलेतल्या भारतीय कलाकारांच्या पथकांच्या, गावातल्या चौट राजघराण्याच्या वाडय़ापासून आणि ग्रामदेवतेपासून ‘विद्यागिरी’पर्यंत निघणाऱ्या दोन किलोमीटर मिरवणुकीने संमेलनाची सुरुवात झाली. ठरलेल्या वेळी उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू झाला. नऊ पूर्वाध्यक्षांबरोबर यंदाचे अध्यक्ष डॉ. विवेक रै या दहा जणांना (यात भैरप्पा, वैदेही आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी हे लेखकही होते.) मिरवणुकीने व्यासपीठावर सन्मानाने आणण्यात आले. त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. एकूणच संमेलनाचा कंेद्रबिंदू ‘कन्नड मन : तेव्हा, आता आणि नंतर’ हा असल्यामुळे सुरुवातीची तिन्ही भाषणे ‘कन्नड भाषा आणि संस्कृती- काल, आज, उद्या’ कंेद्रभागी ठेवूनच झाली. त्यातही जर्मनी आणि जर्मन भाषेमध्ये कार्यरत असणाऱ्या अध्यक्षीय भाषणात ‘जागतिक पातळीवर कन्नड’ हा मुद्दा गांभीर्याने मांडला गेला. यानंतर दररोज ठरलेल्या वेळी भाषणे होत होती. त्यातून काही मुद्दे समजत होते.
इतर साहित्यिक भाषणांबरोबरच, हे विश्वसंमेलन असल्यामुळे परदेशातील-परप्रांतीय कन्नड भाषेपुढील समस्यांवर अमेरिका आणि दिल्लीतील कार्यकर्त्यांची भाषणे झाली. सगळे तमिळ भाषेशी तुलना करीत बोलत होते. त्यात एक मुद्दा मांडण्यात आला, तमिळ आणि कन्नड या दोन्ही भाषांना ‘क्लासिक भाषा’ म्हणून मान्यता मिळाली असली तरी तमिळ भाषक मंडळी याचा जास्त फायदा करून घेत आहेत, कन्नड भाषकांना कमी पैसे देऊन तोंडाला पाने पुसली जातात. म्हणजेच मराठीलाही केवळ ‘क्लासिक भाषा’ म्हणून मान्यता मिळवून चालणार नाही. त्यानंतरही त्याचे योग्य ते फायदे मिळवण्यासाठी जागरूक राहावे लागेल. तसेच कर्नाटकाबाहेर कन्नड माणसाची ‘भांडखोर’ अशी प्रतिमा का झाली आहे, यावरही ऊहापोह झाला.
दोन गंभीर व्याख्यानांनंतर एका कवीला दहा मिनिटे वेळ दिलेला असे. त्यात तो थोडे बोले, एक-दोन कविता वाचून दाखवे, एखाद्या कवितेवर गायनासह विद्यार्थ्यांकडून नृत्य सादर केले जाई आणि त्याच वेळी एक चित्रकार त्यावर चित्र काढे. सगळं वेळ पाळून! अशा प्रकारे रोज दोन-दोन कवींना संधी मिळे. एक दिवस वेगळे कवी संमेलनही आयोजित करण्यात आले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात कन्नड भाषेला राष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या दोघांचा ५० हजार रुपयांचा पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला. ‘सरस्वती सम्मान’ मिळाल्याबद्दल डॉ. एस. एल. भैरप्पांचा आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. चंद्रशेखर कम्बार यांचा. या दोघांना वीस-वीस मिनिटे बोलण्यासाठी देण्यात आली होती.
संमेलनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी संध्याकाळी कन्नडसाठी कार्य केलेल्या काही जणांना २५ हजार रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  दुसऱ्या दिवशी नव्वदी ओलांडलेल्या, एके काळी कन्नडसाठी झगडून आज विस्मरणात गेलेल्या १५ जणांचे सत्कार करण्यात आले. यात केरळमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ‘कासरगोड’ या गावाचा समावेश कर्नाटकात व्हावा म्हणून (हे केरळमधील ‘बेळगाव’च!) आयुष्यभर झगडणाऱ्या कय्यार किण्णय्या रै या ९७ वर्षांच्या शिक्षक-लेखकाचा, तसेच आयुष्यभर कन्नड भाषेसाठी झगडणाऱ्या पाटील पुट्टप्पा यांचाही समावेश होता. तिसऱ्या दिवशी भारतात आणि भारताबाहेर (कर्नाटकाबाहेर) कन्नडसाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थांचा सत्कार करण्यात आला. त्यात अमेरिका, दुबई, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दिल्ली, मुंबई, पुणे येथे काम करणाऱ्या संघांची माहिती देऊन समावेश करण्यात आला होता. चौथ्या दिवशी समारोपाच्या कार्यक्रमात कन्नडमध्ये लेखन करून कन्नड भाषेसाठी कार्य करीत असलेल्या १५ जणांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे यात माझ्यासारखीचा कन्नड भाषेतील साहित्य मराठीत आणणाऱ्या व्यक्तीचाही ‘कन्नडसाठी कार्य’ केले म्हणून समावेश करण्यात आला होता!
समारोपाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली होते. त्यांना यायला काही मिनिटे उशीर झाला, पण कार्यक्रम वेळेत सुरू झाला आणि मंत्रिमहोदय नंतर त्यात सहभागी झाले. ते आल्यावर त्यांचे एक मिनिटात स्वागत करून कार्यक्रम पुढे सुरू झाला. या वेळीही मोहन आळ्वा आणि विवेक रै यांचे समारोपाचे भाषण, वीरप्पा मोईलींचे भाषण आणि पुरस्कार घेणाऱ्यांच्या वतीने दोघांची दोन-दोन मिनिटांची मनोगते झाली. दररोज संध्याकाळी विविध मंचावर भारतभरातून आलेल्या कलाकारांचे करमणुकीचे कार्यक्रम असत. त्यात नाटकेही होती. गिरीश कर्नाडांचे ‘तुघलक’ आणि ‘मित्तबैलु यमनक्का’ या तुळू कादंबरीवर आधारित कन्नड नाटक. तुळू समाजात प्रचलित असलेल्या मातृसत्ताक पद्धतीतील एका सशक्त स्त्रीचे, यमुनाक्काचे चित्रण असलेल्या या नाटकाचे सादरीकरण बंगळुरूच्या एका संस्थेने केले होते.
शिवाय इतरही नव्या पुस्तकांच्या स्टॉल आणि प्रदर्शनांबरोबर जुन्या-नव्या दुर्मीळ पुस्तकांची प्रदर्शनेही पाहिली. फोटो प्रदर्शनात आणि मूर्ती प्रदर्शनात त्या भागात प्रचलित असलेल्या कंबळ, नागमंडल आणि भूताराधना यांसारख्या पारंपरिक विषयांचा समावेश होता. त्यामुळे कल्कुडा, जुमादी, बोम्मय्या वगैरे ‘भूत’दैवतांचे ‘प्रत्यक्ष दर्शन’ झाले!
साडेसहाला व्याख्याने संपली की अनोख्या दीपोत्सवामुळे वातावरण स्वर्गीय होत होते. समुद्रकिनारा काही किलोमीटरवरच असल्यामुळे संध्याकाळच्या वातावरणात सुखद गारवा होता. करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी खुला रंगमंच असल्यामुळे सगळाच प्रकार आल्हाददायक होता. या संमेलनासाठी एकूण २० कोटी रुपये खर्च झाले असेही समजले.
या सर्व कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीच एक गालबोट लागले. बरगूर रामचंद्रप्पा या बंडाय लेखकाने ‘देशात एवढी गरिबी असताना साहित्य संमेलनासाठी एवढा खर्च करायचं काय कारण?’ म्हणत निषेध व्यक्त केला. ‘साहित्याचा शेतीशी काय संबंध? इतर क्षेत्रांशी काय संबंध?’ असे प्रश्न उपस्थित केले. पण पुढील सर्वच वक्त्यांनी त्याचा आपापल्या भाषणातून समाचार घेतला. तसेच वृत्तपत्रांमधूनही ‘गरिबांचा एवढा कळवळा असणाऱ्यांनी सरकारी बसची व्यवस्था असताना बंगळुरू-मंगळूर विमानाचा लाभ का घेतला,’ असा प्रश्न उपस्थित करून प्रस्तुत लेखकाला विमानाचे दहा हजार रुपये परत करायला लावले.
मोहन आळ्वा या टीकेमुळे नाराज झाले. समारोपाच्या भाषणात त्यांनी ती व्यथा व्यक्त केली. पण सगळय़ाच वक्त्यांनी त्यांना समजावले, ‘आम्हा साहित्यिकांना आणि कलावंतांना सुमारे दहा लाख लोकांपर्यंत पोचण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही सगळे तर ‘आळ्वास विश्व नुडिसिरि विरासत’चे ऋणीच राहू आणि याचा आस्वाद घेणारेही ऋणीच राहतील! जिथे १५ हजार तरुण विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून चारही दिवस कान-डोळे उघडे ठेवून वावरताहेत, अशा संमेलनात आम्ही आलो नसतो तर ते पाप घडले असते!’,  आम्हीही हीच भावना घेऊन माघारी परतलो. साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात असे काही भव्य-दिव्य स्वप्न कुणी पाहू शकते,  राजकारणी आणि सेलिब्रिटींच्या कुबडय़ांशिवाय तडीस नेऊ शकते ही केवळ दंतकथा किंवा अंधश्रद्धा नाही, याचा अनुभव नाही तर कसा आला असता..  एक खुलासा : वीरप्पा मोईलीही लेखक आहेत. त्यांच्या नावावर ‘रामायणा’वरील एक खंडकाव्यही आहे!