भिन्न लिंगभावांना समानता असावी, यासाठी तेजल शाह आपल्या कलाकृतींमधून विधायक प्रयत्न करतात. त्यांच्या कला व्यवहारातून स्त्रीवादी भूमिकेची व्याप्ती वाढतेच; पण शोषण, हिंसा यांसारखे विषयही नव्या संदर्भात समोर येतात.. समकालीन भारतीय कलेवर प्रभाव टाकणाऱ्या स्त्रिया रूढ समजांनाही आव्हानं देताहेत.. 

मुंबईला छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाच्या आवारात असलेल्या कुमारस्वामी हॉलमध्ये काही वर्षांपूर्वी मोठं प्रदर्शन भरलं होतं. त्यात एक व्हिडीओ होता, तेजल शाह यांचा परफॉर्मन्स ‘फीड/किल’. यात तेजल आणि एक स्त्री साथीदार मेकअप करून उठावदार कपडे परिधान केलेल्या होत्या. त्यांच्या आजूबाजूला खाद्यपदार्थ आणि पेयांची रेलचेल दिसते. तेजल तिथे काही न करता बसलेल्या आहेत आणि त्यांची साथीदार त्यांना खाण्याचे पदार्थ आणि पेय भरवतेय. कधी प्रेमाने, तर कधी जबरदस्तीने. यात फळांचे रस आहेत, केक, चॉकोलेट्स आहेत, न शिजवलेल्या भाज्या आहेत. कुठलाही विरोध न करता तेजल तोंडात कोंबलेले पदार्थ खात राहतात. चॉकोलेट किंवा गाजरासारख्या पदार्थाचा उपभोग घेण्याच्या कृतीतून कामुकता आणि प्रत्यक्ष संभोग यांच्या सीमारेषेवरच्या भावना दिसतात. त्यात कामभावना आहे, हिंसा आहे, वर्चस्व आहे आणि लैंगिक हिंसेला बळी जाणं आहे. कधी कधी ते लैंगिक वर्चस्वाचं सगळ्यात भीषण रूप म्हणजे बलात्काराच्या जवळ जाणारंही वाटतं. यातही वर्चस्वाचं हे नातं कुठल्या सामाजिक-सांस्कृतिक रचनांमुळे तयार होतं आणि टिकून राहतं यातली गुंतागुंत हा परफॉर्मन्स टिपण्याचा प्रयत्न करतो.

मूळच्या छत्तीसगढच्या असलेल्या तेजल व्हिडीओ, फोटोग्राफी, परफॉर्मन्स, इन्स्टलेशन यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांत काम करतात. आज एकीकडे लिंगभाव तटस्थता अंगी बाणवली जावी असं मत असताना दुसरीकडे लैंगिक अस्मिता हा चच्रेचा मुद्दा झाला आहे. अस्मिता, कला आणि राजकारण यांचा मेळ घालत लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर या अस्मिताबद्दल तेजल काम करतात. ‘व्हॉट आर यू?’ किंवा ‘तू काय आहेस?’ हा या संदर्भात कायम विचारला जाणारा प्रश्न. त्या प्रश्नातच त्यांची लैंगिक अस्मिता काय आहे हा छुपा प्रश्न असतो. कारण त्यांची ओळख ही त्यांच्या लैंगिक अस्मितेवरून समाज ठरवत असतो. उदाहरणार्थ, त्यांची हिजडय़ांबरोबर केलेली फोटोमालिका. त्यांना ‘इतर’ किंवा ‘वेगळं’ मानलं जाणं याचा अनुभव त्या यातून मांडतात. यातून लिंगभाव म्हणजे काय, ते कसं ठरतं, कोण ठरवतं असे प्रश्न त्या प्रेक्षकांसमोर उभे करतात. ‘व्हॉट आर यू?’मध्ये सामाजिक स्थानामुळे हिजडय़ांना दाबून ठेवाव्या लागलेल्या त्यांच्या फँटसी येतात. यात ते वेगवेगळ्या भूमिका निभावतात. या फोटोंचे विषयही त्यांच्याबरोबर झालेल्या चच्रेतून ठरत गेले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नटी असो किंवा भुरळ पाडणारी क्लिओपात्रा असो किंवा राजा रविवर्माच्या चित्रातील कृष्णाचे लाड करणारी यशोदा असो. यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट आहे ती म्हणजे या फँटसी या सर्वसामान्यांच्या आहेत. अर्थातच, त्या एका विशिष्ट वर्चस्ववादी विचारसरणीने बांधलेल्या आहेत, घडवलेल्या आहेत. त्याच फँटसी या हिजडय़ांच्या मनोविश्वाचाही ठाव घेताना इथे दिसतात. त्यात परंपरा, इतिहास, भावना, मिथकं या सगळ्याची सरमिसळ होताना दिसते.

तेजल म्हणतात, ‘‘भारतात क्वीअर स्त्रियांना उघडपणे वावरता येणं अवघड, मुख्यत: सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून. घर, नोकरी, नातेवाईक आणि मित्रांबरोबरचे संबंध सगळंच पणाला लागू शकतं. आणि हे जगभरातल्या स्त्रियांच्या बाबतीत थोडय़ाफार प्रमाणात खरं आहे. त्यामुळे आपण स्वत:ची व्यक्तिचित्रं काढतो, स्वतचे किंवा आपल्या जोडीदारांचे फोटो घेतो, आपलं रोजचं जगणं त्यात टिपत राहतो, पण हे सगळं आपल्या निकटच्या लोकांबरोबर शेअर करतो आणि आपल्या खासगी अवकाशापुरतं मर्यादित राहतं.’’ या मर्यादा लांघून क्वीअर असणाऱ्यांच्या आयुष्याचं प्रतििबब ज्यात उमटलं आहे अशी कला आणि प्रतिमा लोकांपर्यंत कशा पोहोचतील, या विचारातून ‘क्वीअर विमेन टेक अ हॉलिडे’ या प्रकल्पाची सुरुवात झाली. यात त्या जगभरातल्या क्वीअर स्त्रियांकडून त्यांचं सुट्टीतलं जगणं, माणसं, वस्तू टिपणं, ते साठवून ठेवणं, पुस्तकरूपात प्रकाशित करणं या हेतूने हा प्रकल्प चालू आहे. ही एकमेकांबरोबरच्या संवादातून घडणारी प्रक्रिया आहे. याच धर्तीवर, ‘बॅक टू फ्रंट’ आणि ‘अनफìलग’ या दोन फोटोमालिका सुरुवातीला त्यांनी केल्या. त्यात तेजलने ट्रान्सजेंडर असलेल्या त्यांच्या मित्रमंडळींची छायाचित्रं काढली. हे फोटो बहुतेकदा रात्रीच्या वेळी काढलेले दिसतात त्याचं मुख्य कारण म्हणजे क्रॉस-ड्रेस करणं हे आपल्याकडे निषिद्ध मानलं गेलं आहे. यात बरेच जण पहिल्यांदाच मोकळेपणाने आपल्याला हवे तसे पोशाख घालून सार्वजनिक ठिकाणी आले होते. तेजल या फोटो मालिकेतून आणि त्यांच्या बरोबरच्या संवादातून त्यांचं भावविश्व जगासमोर आणतात. या फोटोमालिकांचा सर्वात महत्त्वाचा पलू म्हणजे साथीदारांबरोबरच्या मत्रीच्या नात्यातून ही प्रक्रिया सहजपणे घडून येते.

लिंगभावाचा विचार करताना तेजल त्यांच्या कलाकृतीतून अनेकदा अधिक व्यापक मुद्दय़ांनादेखील आपल्यासमोर आणताना दिसतात. समाजातील शोषण, हिंसा किंवा धर्माध दंगली यातून येणारे जळजळीत अनुभव यांनाही त्या भिडतात. गुजरात दंगलीच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी बनवलेल्या ‘आय लव्ह माय इंडिया’ हा व्हिडीओ किंवा ‘मेमोरिअल’ हे  मल्टिमीडिया इन्स्टलेशनदेखील या संदर्भात महत्त्वाचं ठरतं. एखादं स्मारक ज्या प्रमाणे एखादी व्यक्ती अथवा घटना यांच्या आठवणी जपतं त्याचप्रमाणे हे इन्स्टलेशन घडून गेलेल्या काही घटनांची स्मृती बघणाऱ्याच्या मनात जागवू पाहतं. अशा प्रकारे विविध प्रकारच्या हिंसेला प्रतिसाद देत त्यांनी वेळोवेळी कलाकृती निर्माण केल्या असल्या तरी त्यांचा मुख्य भर हा लिंगभावाचे विविध पलू हाताळणं यावर राहिला आहे. हे मुद्दे भारतातच नव्हे तर सध्या जगभरात चíचले जाताहेत. त्या संदर्भात त्यांची आणखी एक महत्त्वाची कलाकृती आहे ‘ट्रान्स’. हा व्हिडीओ तेजलने मार्को पावलो रोला या ब्राझीलच्या कलाकाराच्या सहयोगातून केला होता. आपलं शरीर हेच परफॉर्मन्ससाठीची साइट बनवून त्यातून लिंगभावाच्या मुद्दय़ांचा शोध घ्यायचा या दोघांचा प्रयत्न होता.

या व्हिडीओत दोन स्क्रीनवर या दोघांच्या प्रतिमा उमटताना दिसतात. त्यात दोघेही दाढी खाजवताहेत, मार्को त्याची खरीखुरी दाढी आणि तेजलची डिंकानी डकवलेली, खोटी दाढी. दाढीच्या वाढलेल्या खुंटांमुळे तेजलचं रूप एखाद्या कोवळ्या पोरग्यासारखं दिसतं. आणि त्यांचं स्त्री असणं हे जवळजवळ कळतच नाही. त्यानंतर दोघेही रेझरने दाढी करतात, आफ्टरशेव लोशन लावतात. हे झाल्यानंतर मग दोघंही चेहऱ्यावर मेकअप चढवतात. त्यानंतर मात्र मार्को जरी स्त्रीसारखा दिसत असला तरी तेजलच्या चेहऱ्यातले स्त्रण भाव उठून दिसतात. मेकअप, केस, पेहराव यांसारख्या बाह्य़ गोष्टींवरून किंवा त्याचे सामाजिक-सांस्कृतिक संकेत झुगारून दिल्यावर आपण एकमेकांकडे कसे पाहतो, कशी मतं ठरवतो याकडे यातून हे दोघं कलाकार आपलं लक्ष वेधू पाहतात.

तेजलच्या कलाव्यवहारातून स्त्रीवादी भूमिकेची व्याप्ती वाढते आहे. स्त्रीवादी कलेचं एकांगी कथन न मांडता त्याचे अनेक पलू त्यात समाविष्ट होत आहेत. त्यात लिंगभाव अस्मितांचे आणि लैंगिकतेचे विविध मुद्दे असतील किंवा शारीरिक वैशिष्टय़ं, मानसिक अवस्था, भावविश्व यातली गुंतागुंत आणि त्यातून उभे राहणारे लिंगभाव या विषयाची जटिलता असेल. त्यांच्या व्यक्तिगत अनुभवातून, साथीदारांचं जगणं टिपण्यातून त्या सामाजिक संकेतांचे अर्थ बदलतात, त्याकडे नव्याने पाहायला आपल्याला भाग पाडतात. त्यांच्या कलाकृती थेट आहेत, त्याचबरोबर आपल्या साचेबंद समजांना आव्हान देणाऱ्याही आहेत. त्यातला थेटपणा अस्वस्थ करतो तसाच आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला तर लावतोच, पण लैंगिकतेबद्दलच्या आपल्या विचारांची पुनर्माडणी करायला भागही पाडतो. तेजलच्याच शब्दात सांगायचं तर, ‘‘हजारो प्रकारच्या लैंगिकता जर असतील तर काय होईल? आणि आपली स्वत:ची लैंगिकता आपणच ठरवू शकलो तर किती बरं होईल.. ती बदलतीही असू शकते किंवा त्याही पुढे जाऊन तसं काहीच ठामपणे ठरवायची गरजच पडली नाही तर..?’’

लेखिका कला समीक्षक आणि समकालीन कलेच्या संशोधक आहेत. ई-मेल :

नूपुर देसाई noopur.casp@gmail.com