कोणत्याही क्षेत्रात बदल घडत असतात. मग परिचारिका क्षेत्र त्याला अपवाद कसे ठरणार? मात्र परिचारिका क्षेत्रातील स्थित्यंतर हे दोन्ही टोकांना होत आहे. एकीकडे सुपरस्पेशालिटी रुग्णालयात परिचारिकांना सेवाक्षेत्रासाठी तयार करण्यासाठी बोलण्या-वागण्याचे धडे देण्यात येत आहेत, तर दुसरीकडे सरकारी उदासीन कारभारात दोन संघटना परिचारिकांचा गणवेश कसा असावा यावर १६ वर्षे भांडताहेत..

भारत हा गरिबांचा श्रीमंत देश आहे, असे म्हटले जाते. ही गरिबी-श्रीमंती केवळ आíथक नाही, तर बौद्धिक, नतिक पातळीवरही सर्व क्षेत्रांत पाहायला मिळते. अशील दिसला की त्याच्यामागे लाळघोटेपणा करत िहडणारे काळे डगल्यातील वकील दिसतात, त्याच वेळी एका सुनावणीसाठी काही लाखांत बिदागी घेणारे वकीलही आहेत. नेमकी हीच स्थिती सध्या परिचारिका क्षेत्रात दिसत आहे. सेवाव्रत म्हणून पाहिले जाणाऱ्या या क्षेत्रात एकीकडे विशेष प्रशिक्षण देणे, सफाईदार सेवा देण्याचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे परिचारिकांचा तुटवडा भासत आहे. एकीकडे देशाच्या विविध भागांतून नìसग करून आलेल्या परिचारिकांना सेवाक्षेत्राचे धडे देण्यात येत आहेत, तर दुसरीकडे गणवेशाचा रंग कसा असावा याचा खल गेली १६ वष्रे सुरू आहे.
आपल्या आरोग्यसेवांचा भार हा नेहमीच सरकारी रुग्णालयांवर राहिला आहे. मात्र गेल्या दशकभरात खासगी रुग्णालय क्षेत्राला दिल्या गेलेल्या प्रोत्साहनामुळे रुग्णालय ही संकल्पनाच वेगळ्या प्रकारे समोर येत आहे. औषधांचा वास आणि वातावरणातील ताण यांच्या आठवणी असल्याने रुग्णालय नकोच.. ही भावना आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. मात्र चकचकीत खोली, भरपूर प्रकाश, मनोरंजनाची सोय, नातेवाईकालाही सोबत राहण्याची सुविधा अशा प्रकारे आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या फाइव्ह स्टार वैद्यकीय सेवांनी ग्राहकसेवेचा उत्तम नमुना सादर केला आहे. या ग्राहकसेवेत रुग्णाच्या समोर जास्तीत जास्त वेळ दिसणारी रुग्णालयाची एक प्रतिमा म्हणजे परिचारिका. रुग्णाशी सतत संबंध येत असल्याने केवळ उत्तम काम करणाऱ्या परिचारिका यासाठी पुरेशा नाहीत, हे या रुग्णालयांनी लक्षात घेतले. यासाठी परिचारिकांच्या अभ्यासक्रमात बदल करणे, त्यांना अधिक व्यावसायिकतेचे धडे देणे गरजेचे असले तरी आपल्याकडच्या सरकारी कारभाराचा अनुभव असलेल्या खासगी बडय़ा रुग्णालयांनी या वाटेला न जाता स्वत:चेच वेगळे प्रशिक्षण आखून घेतले. त्यामुळे मुंबईतील फाइव्ह स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्ये परिचारिकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते.
देशाच्या विविध भागांत शिक्षण घेतलेल्या परिचारिका आमच्याकडे येतात. काही अनुभवी असतात, तर काहींची ही पहिलीच नोकरी असते. या सगळ्यांना एकाच पातळीवर आणून रुग्णालयांच्या नियमांची, येथील सुविधांची, त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांची माहिती करून दिली जाते. यापुढचे प्रशिक्षण असते ते वैद्यकीय क्षेत्रातील बदलत्या गोष्टींचे. आताचे आजार, त्यांच्यावरील नवीन उपचार पद्धती, त्यासाठी आलेले अद्ययावत तंत्रज्ञान यासोबतच विशिष्ट विभागासाठी लागणारे म्हणजे हृदयरोगावरील उपचारांसाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी लागणारे तंत्र परिचारिकांना शिकवले जाते. प्रत्येक विभागासाठी खास प्रशिक्षण दिलेल्या परिचारिका असतात. प्रत्येक रुग्णालयानुसार एका महिन्यापासून एका वर्षांपर्यंत हे प्रशिक्षण चालते. परिचारिका अभ्यासक्रमात नेमके काय शिकवले यापेक्षाही व्यावहारिकदृष्टय़ा काय गरजेचे आहे त्याचे शिक्षण या काळात होते; पण या तंत्रशिक्षणापेक्षाही रुग्णालयाचा भार असतो तो संवाद कौशल्यांवर.
वैद्यक हे सेवाक्षेत्र आहे. येथे येणाऱ्या रुग्णाला ग्राहक म्हणून योग्य त्या सेवासुविधा मिळायला हव्यात. त्यातही संवाद योग्य ठेवला, तर ५० टक्के तक्रारी दूर होतात, असा अनुभव आहे. त्यामुळे परिचारिकांचे संवाद कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. चांगली किंवा वाईट बातमी कशी सांगायची, तब्येतीविषयी नेमके कसे सांगायचे, शस्त्रक्रिया, उपचार यांची माहिती, त्यांच्या साइड इफेक्ट्सची कल्पना कशी द्यायची याचे प्रशिक्षण परिचारिकांच्या अभ्यासक्रमात नसते. खरे तर याचीच त्यांना जास्त आवश्यकता पडते. त्यामुळे आम्ही त्यांना त्या प्रकारचे प्रशिक्षण देतो, असे वाशी येथील फोर्टसिच्या परिचारिका विभागाच्या प्रमुखांनी सांगितले. या संवाद कौशल्यांमध्ये सफाईदार इंग्लिशचाही समावेश असतो. वागण्याबोलण्यासोबतच कसे राहायचे याचीही रुग्णालयांची शिस्त असते. पांढरा अ‍ॅप्रन या पारंपरिक गणवेशाला बगल देत हिरव्या आणि निळ्या रंगाच्या छटांमधील ट्राऊझर- शर्ट हा गणवेश बहुतांश रुग्णालयांमध्ये दिसतो.
परिचारिकांची सेवा अर्थातच केवळ रुग्णालयांपुरती मर्यादित राहिलेली नाही. वृद्धांची आणि त्यातही आíथकदृष्टय़ा स्वावलंबी वृद्धांची संख्या वाढायला लागल्यामुळे या ग्राहकांसाठी रुग्णालयांनी विविध सेवा देऊ केल्या आहेत. त्यातलीच एक सेवा म्हणजे घरी येऊन विविध तपासण्या करण्याची. नियमित रक्तदाब, शुगर तपासणी, चाचणीसाठी रक्तघेणे, गरज असल्यास घरी सलाइन लावणे यासह गंभीर आजारी व्यक्तींना घरीच वैद्यकीय सेवा देणे याची जबाबदारी परिचारिकांवर आली आहे. यासाठी परिचारिकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते.
खासगी रुग्णालयांमध्ये नोकरीची संधी वाढल्याने आखाती, युरोपीय देशांत सुरू असलेल्या परिचारिकांचा ओघ आता कमी झाला आहे. एकीकडे अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतीची माहिती देत संवाद कौशल्यावर भर देऊन परिचारिकांना सेवाक्षेत्रासाठी तयार केले जात असताना सरकारी पातळीवरची उदासीनता अधिकच बोचरी ठरते. राज्यात बीएस्सी नìसगच्या प्रशिक्षणाच्या जागाही पूर्ण भरल्या जात नाहीतच, शिवाय आरजीएनएम हा बारावीनंतर तीन वर्षे व आरएएनएम हा बारावीनंतर दोन वर्षे करायला लागणाऱ्या अभ्यासक्रमाच्या ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. आरएएनएमसाठी दहावीऐवजी बारावीची मर्यादा वाढवल्याने गेल्या तीन वर्षांत राज्यातील परिचारिका अभ्यासक्रमांची स्थिती अगदीच दयनीय झाली आहे. उच्चशिक्षण घेतलेल्या परिचारिका बाहेर देशात नोकरीसाठी जातात, तर दहावी उत्तीर्ण होऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्याची आवश्यकता असलेल्यांना इंडियन नìसग कौन्सिल परवानगी देत नाही, असे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य डॉ. आनंद हर्डीकर यांनी सांगितले. केंद्राच्या या धोरणामुळे राज्यातील शेकडो नìसग होममध्ये अधिकृत नसलेल्या परिचारिका काम करत आहेत, या वास्तवाकडे त्यांनी लक्ष वेधले.
नìसग होमना अधिकृत परिचारिका परवडत नाहीत, तर सोयीसुविधा मिळत असलेल्या सरकारी रुग्णालयांमधील परिचारिकांची स्थिती आणखी वेगळी आहे. वेतनाच्या पातळीवर कदाचित सरकारी परिचारिका पुढे असतीलही, पण त्यांचा सातत्याने बदलत असलेल्या अद्ययावत जगाशी फारसा संबंध येत नाही. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण, सुविधांचा तुटवडा, रुग्ण व नातेवाईकांची मानसिकता यामुळे त्या मेटाकुटीला आलेल्या असतात. त्यातच बदल्या, प्रशासनाची प्रत्येक बाबतीतील दिरंगाई याचा ताण घेऊन काम करत असलेल्या परिचारिकांना गणवेशासारख्या मूलभूत सोयीसाठी गेली १६ वष्रे झगडावे लागत आहे. पटकन खराब न होता, हालचालींसाठी सोपा पडणारा गणवेश द्यावा, एवढीच या परिचारिकांची मागणी आहे. मात्र हा तिढा सुटलेला नाही. एकीकडे ट्राऊझर-शर्टमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय यंत्र शिताफीने हाताळत, सफाईदार इंग्लिशमध्ये बोलत रुग्णांशी संवाद साधणारी परिचारिका, तर दुसरीकडे रुग्णांना तपासता तपासता क्षयरोग, संसर्गजन्य आजारांना बळी पडणारी, मूलभूत सोयींपासून वंचित असणारी सरकारी परिचारिका. दोघीही फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा वारसा सांगणाऱ्या, मात्र दोन टोकांच्या स्थित्यंतरातून जात असलेल्या..
prajakta.kasale@expressindia.com