अमेरिकेच्या अध्यक्षपदी ओबामा यांची फेरनिवड झाल्यामुळे जगात काय फरक पडणार, याचा अंदाज घेताना जगातील प्रमुख देशांच्या वृत्तपत्रांचे अग्रलेख पाहिल्यास दुसरी बाजू दिसते.. या प्रत्येक देशाचे आंतराष्ट्रीय प्रश्न या ना त्या प्रकारे अमेरिकेशी संबंधित आहेत, त्यामुळे आपण काय करायचे, हे ओबामांनी ठरवावे अशी त्यांची अपेक्षा आहे.. अशा काही अग्रलेखांचे, ‘लोकसत्ता’ने केलेले हे सारसंकलन..
चीन आणि अमेरिका या महत्त्वाच्या देशांमधील सत्ता पुढील चार वर्षांत कशा असतील, याचे चित्र गेल्या आठवडय़ात स्पष्ट झाले. यापैकी चीनचे नवे सत्ताधीश पुढील दशकावर प्रभाव टाकतील असाच सर्व विश्लेषकांचा आणि जगभरच्या प्रसारमाध्यमांचा अंदाज असला, तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि विशेषत आंतरराष्ट्रीय संघर्षांच्या पटावर चीन काय करणार आहे, याबद्दल फारसे अंदाज बांधले गेलेले नाहीत. याचे एक कारण म्हणजे चीनच्या नव्या डेंग यांच्याच आंतरराष्ट्रीय धोरणाचा आदर्श ठेवला जाईल, असे घोषित करून लष्करी संघर्षांपेक्षा आर्थिक बळ जगभर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. शिवाय दुसरे कारण म्हणजे, आंतरराष्ट्रीय सत्ताकांक्षेसाठी चीन नेमके काय करणार, हे स्पष्ट होणे जवळपास अशक्य दिसते आणि त्या देशाकडून अन्य देशांनी काही अपेक्षा ठेवाव्यात, अशी परिस्थिती तर कधीच नव्हती आणि आजही नाही. अशा वेळी, जग पुढल्या काही वर्षांत कसे असणार याचा अदमास घेण्यासाठी अमेरिकेतील ओबामा यांची फेरनिवड, हे निरनिराळय़ा देशांतील विश्लेषक आणि प्रसारमाध्यमे यांच्यासाठी मोठेच निमित्त ठरले. देशोदेशीच्या प्रसारमाध्यमांपैकी विशेषत  दैनिक वृत्तपत्रांनी ओबामांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी (अग्रलेखांमधून) नमूद केलेल्या अपेक्षा पाहिल्यास, जग कसे असणार याचा अंदाज मिळण्याऐवजी आपापल्या देशांचे प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेने राजी असले पाहिजे हा आग्रहच अधिक दिसतो. तरीही अशा दैनिकांचे एकत्रित दर्शन घेतल्यास अमेरिकेच्या भरवशावर जगातले कोणते संघर्ष वाढू किंवा कमी होऊ शकतात, याची चुणूक दिसते. जगातील प्रत्येक संघर्षांशी अमेरिकेचा कसा संबंध आहे, याचा नकाशाही उलगडतो.
इराण हा अमेरिकेपुढे सध्याचा मोठा विषय असल्याचे मानले जाते. याविषयी इस्रायलमधून निघणाऱ्या ‘हारेट्झ’च्या संपादकीयात ‘ओबामांमुळे इराणशी चर्चा झाली आणि ती थेट व गंभीर असली’ तरच प्रश्न सुटू शकेल, असे म्हटले आहे. ‘थेट आणि गंभीर’ म्हणजे काय, हे हारेट्झने सांगितलेले नाही. मात्र, पॅलेस्टिनींशी इस्रायलची चर्चा पूर्णत थांबली आहे, अगदी गोठूनच गेली आहे; त्यामुळे ओबामांनी या प्रदेशात अधिक लक्ष घालणे आवश्यक आहे, अशीही ‘हारेट्झ’ची अपेक्षा आहे. ‘जेरुसलेम पोस्ट’ या दुसऱ्या आणि अधिक कडव्या यहुदी दैनिकाने मात्र, ‘काहीही झाले, तरी यहुदीराष्ट्र आणि अमेरिका यांच्यातील संबंध दृढच राहणार’ अशी ग्वाही ओबामांच्या निवडीआधीच अग्रलेखातून दिली होती. अमेरिकेतील यहुदी मंडळी हे संबंध दृढ राखण्याची जबाबदारी निभावतच असतात, अशा प्रशंसेआडून या दैनिकाने, अपेक्षांचे ओझे ओबामांऐवजी यहुदी अमेरिकनांवर टाकले आहे.
इराणमधील ‘काहयान’ या कडव्या इस्लामी दैनिकाने अगदी उलट भूमिका घेऊन, ‘ओबामा दुर्बळच आहेत. ते आव्हाने स्वीकारणार नाहीत. पॅलेस्टिनींचा प्रश्न त्यांनी भिजत ठेवलेला आहेच. शिवाय, जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी आरंभलेली ‘गुन्हेमालिका’ ओबामाही सुरूच ठेवणार’ अशी भाषा केली आहे.. ही प्रतिक्रिया इराणच्या परराष्ट्र प्रवक्त्याच्या प्रतिक्रियेपेक्षाही तिखट आहे! ‘बदल वगैरे घोषणा म्हणून ठीक आहे, पण खरा बदल धोरण व दृष्टिकोनात झाला पाहिजे’ असे इराणी प्रवक्त्याने म्हटले होते.
पाकिस्तानच्या ‘डॉन’ने ‘आपला देश इतका महत्त्वाचा आहे की कुणाला त्याकडे दुर्लक्ष करताच येऊ नये’ अशी सुरुवात करून ओबामांच्या परराष्ट्र धोरणात रास्त बदल होतील का, अशी शंका व्यक्त केली आहे. ड्रोनहल्ले सुरूच राहण्याची भीती त्या देशाला वाटत असली, तरी ‘डॉन’च्या अग्रलेखात तसा सूर नाही. ‘कैरोत केलेले भाषणच ओबामांनी पुन्हा वाचावे. आणि मग इस्रायलच्या युद्धखोरीकडे पाहावे’ असा सल्ला डॉनने दिला आहे. पाकिस्तानच्याच ‘जंग’ने मात्र जरा नमते घेत ‘दहशतवादी गटांना पाकिस्तान मदत करतो, अशा शंकेनेच अमेरिका आपल्या देशाकडे पाहाते’ असे म्हटले आहे. त्याच दमात, अफगाण पेच संपवण्याची जबाबदारी ओबामांवर असल्याची आठवण ‘जंग’ देतो आणि ‘सहा अब्ज डॉलरचा खर्च अमेरिकी निवडणुकीत होतो.. मग इतक्या खर्चाचे मोल ओळखून राज्यकर्त्यांनी वागायला नको?’ असा सवाल (खास अमेरिकेसाठी!) केला आहे.
अफगाणिस्तानातूनही ‘डेली आउटलुक’ नावाचे इंग्रजी दैनिक निघते! त्याची वेब आवृत्ती तरी धड आहे.. संपादक डॉ. हुसेन यासा यांनी ओबामांच्या विजयाचे स्वागत केलेच आहे आणि अफगाणिस्तानात शांतता नांदवण्याची, राज्यकर्त्यांत स्वयंपूर्णता बाणवण्याची जबाबदारी अमेरिकेवर असल्याचे  सर्वानाच कसे वाटते, याचा पाढा वाचला आहे.
संयुक्त अरब अमिरातींतून निघणाऱ्या आणि बहुदेशी- बहुवंशी वाचक असलेल्या ‘खलीज टाइम्स’ने संयत भूमिकाच घेऊन ‘भारत आणि चीन या उभरत्या सत्तांशी ओबामा कसे वागतात, त्यांच्या आकांक्षांवर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. रोम्नी आले असते, तर या सत्तांशी वागण्याचे जे गाडे रुळांवर आले आहे, ते घसरलेच असते’ अशी स्पष्टोक्ती केली आहे. ‘मध्यपूर्वेत इराकच्याच प्रश्नाकडे ओबामांना पाहावे लागेल’ अशा शब्दांत या पत्राने, इराकमधील शांतता-प्रस्थापनेचे काम अपुरे असल्याचे सूचित केले आहे.
आफ्रिकेशी ओबामांपुढील प्रश्नांचा फार संबंध नाही. पण केनियातील ‘ग्लोब अँड मेल’मध्ये मुद्दे आणि गुद्दय़ांचे सदर चालवणारे आय लगार्दिन यांनी अमेरिकेच्या आफ्रिकी युद्धखोरीचा आढावाच घेतला आहे.. हे ओबामांनी केले नाही, करणारही नाहीत, पण ओबामा अखेर ‘प्लूटोक्रसी’चे (धनिकांच्या हुकूमशाहीचे) पाईक आहेत, असे तेथे लोकप्रिय असलेल्या या सदरात म्हटले आहे. रशियातील ‘प्रावदा’चे लोकप्रिय सदरलेखक झेवियर लर्मा यांनीही आजचे प्रश्न बाजूला ठेवून अमेरिकेची ‘अनैतिकता व भोगवाद ’ यांचा प्रभाव त्या देशाच्या राजकारणातही दिसतोच, असे म्हटले आहे. या पत्रांनी ओबामांवर अग्रलेख लिहिलेले नाहीत.
जर्मनीसारख्या मोठय़ा युरोपीय देशात एकचएक राष्ट्रव्यापी खपाचे दैनिक नाही. ‘फ्रँकफुर्टर आल्जेमाइन झाय्टुंग’हे तुलनेने अधिक सर्वदूर वाचले जाते. ‘पहिली कारकीर्द पाहून अपेक्षा ठेवण्यात फार अर्थ आहे, हे जगाला उमगावे. अमेरिकी निवडणुकीत यंदा दोन पक्षांतील भेद फार उफाळून आला व प्रवृत्तींचे धृवीकरण होते की काय अशी स्थिती दिसली.. असेच राहिल्यास ओबामांचे अनेक निर्णय लोकानुनयी होतील, हे टाळले पाहिजे’ अशी  चिंता व्यक्त करणाऱ्या या पत्राने इराण आणि चीन हेच अमेरिकेपुढील खरे प्रश्न असल्याचे म्हटले आहे.  तर, दक्षिण चिनी समुद्रातील संघर्ष ही अमेरिकेला पुढील काळात भारी पडू शकणाऱ्या चिनी सत्ताकांक्षेची एक झलक होती, असे ‘बर्लिनेर झायटुंग’चे म्हणणे आहे.
‘चायना डेली’चे संपादकीय छोटे, पण धमकी मोठी आहे. ‘प्रचारदौऱ्यांत चीनविरुद्ध ओबामांनी कितीही राळ उडवलेली असली, तरीही चीनशी अमेरिकेचे संबंध इतपर अधिक प्रौढ व अधिक तर्कशुद्धच राहिले पाहिजेत, अशी काळजी त्यांना घ्यावी लागेल’ असे चीनच्या या अधिकृत मुखपत्राचे म्हणणे आहे.
जपानचा ‘असाही शिम्बून’ चीन व अमेरिकेच्या संबंधांबाबत काही बोलत नाही. पण (दक्षिण चिनी समुद्रातील) सेनकाकू बेटांवर चाललेला क्षेत्रीय संघर्ष सोडवण्यासाठी ओबामांचे चीन-धोरण अधिक स्पष्ट करवून घेणे हे जपान्यांचे काम आहे, याची आठवण हे पत्र देते. ओबामा चीनला बधणार नाहीत, अशी दादवजा मागणी ‘असाही शिम्बून’च्या अग्रलेखात सूचकपणे येते.
 उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया ही दोन शकले नेहमी संघर्षांच्या पवित्र्यात असतात. यापैकी दक्षिण कोरिया अमेरिकेच्या जवळचा; त्यामुळे तेथील ‘कोरिया जुंगांग डेली’ने आता ओबामांनीच उत्तर कोरियाची अण्वस्त्रे कमी करवण्यासाठी दक्षिण-उत्तर चर्चा घडवण्यात पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा ठेवण्यात नवे नाही. सोलमध्येही पुढील महिन्यात सत्तापालट होत असल्याने, प्याँगयाँगशी (उ. कोरियाची राजधानी) मैत्री करण्याची आमची इच्छाही वाढू शकते, अशी आशा ‘जुंगांग डेली’ला वाटते.
या अग्रलेखांतून त्या-त्या देशाचे प्राधान्यक्रम दिसतात आणि जगाच्या आरशात आपले प्रतिबिंब पुन्हा एकवार पाहण्याची संधी मिळालेल्या ओबामांना, या प्राधान्यक्रमांतून उद्भवणाऱ्या संघर्षांमध्ये लक्ष घालावे लागणार, असेही दिसते. अर्थात, तसे न करता ओबामा ‘शांत’च राहिले, तर जगाचे अमेरिकेवरील अवलंबित्व कमी होण्यास फार मदत होईल. त्या स्थितीत इराण नव्हे, पण चीन शिरजोर होऊ शकतो.