टप्पा १: ऑर्कुट ते फेसबुक
इंटरनेट बाल्यावस्थेत असताना एक असाही काळ होता, जेव्हा ‘हॉटमेल’ आयडी सांगताना  तंत्रश्रीमंत असल्याचा अभिमान प्रत्येकाला असायचा. मग एक असाही काळ आला, ज्यात ‘ऑर्कुट’वर नसणे हे तरुणाईतल्या मागासपणाचे लक्षण बनले. पुढे जीमेलसेवांच्या निष्णात वापरकर्त्यांनी लवकरच आधीच्या सेवांना आवडीने विस्मृतिकप्प्यांत ढकलले. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप, टेलिग्राम ते मिक्सिटपर्यंतच्या सोशल नेटवर्किंगच्या स्थित्यंतरात दर टप्प्यामध्ये अधिक अद्ययावततेच्या सोसापोटी सोशल ‘नेटवर्कर्स’चे आधीच्या माध्यमांवरील प्रेम आणि व्यसन विस्मृतीत अशा पद्धतीने जाऊ लागले, की त्याचेच एक ‘विस्मृती नेटवर्क’ तयार झाले. ‘सोशल नेटवर्किंग’मध्ये किमान दशकाचा अनुभव असलेले सारेच या ‘विस्मृती नेटवर्क’चे सदस्य आहोत, यावर कुणाचेच दुमत नसेल..
गुगलने २००४ मध्ये ऑर्कुट भारतात सुरू केले तेव्हा त्याची बरीच क्रेझ सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचा वापर करणाऱ्यांमध्ये होती, अर्थात फरक एवढाच की, त्या काळात सोशल नेटवर्किंगचे ते बालपण होते, आता हे क्षेत्र वयात आले आहे. त्याचबरोबर त्यांचा वापर करणाऱ्यांची जाणही वाढते आहे. त्या वेळी गुगलचे कर्मचारी ऑर्कुट ब्युयुकोकटेन यांनी हे सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ  फ्रेंडस्टर या संकेतस्थळाशी स्पर्धा करण्यासाठी तयार केले होते. त्यांचेच नाव या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाला देण्यात आले होते. त्या काळात भारत व ब्राझील या दोन देशांत ऑर्कुटचा वापर जास्त प्रमाणात होता. पण याच काळात मायस्पेस या संकेतस्थळाचे वापरकर्तेही कमी झाले होते. त्या वेळी भारत, अमेरिका व ब्राझील यांच्यासह अनेक देशांतील लोक ऑर्कुटकडून फेसबुककडे का वळले असावेत, तर त्याचे उत्तर फेसबुकच्या काही वैशिष्टय़ांत तर ऑर्कुटच्या वैगुण्यात शोधता येत होते. फेसबुक जेव्हा मार्क झकरबर्ग व त्याच्या सहकाऱ्यांनी सुरू केले, तेव्हा त्यांना ते इतक्या अल्पावधीत लोकप्रिय होईल असे वाटले नव्हते. ऑर्कुटने गेम डेव्हलपर्स व इतर संकेतस्थळांशी मैत्रीचा हात पुढे करून विविधता आणली नाही हे त्याचे मागे पडण्याचे एक प्रमुख कारण होते. ऑर्कुट, बेबो, मायस्पेस ही पूर्वीची सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे मागे पडली, कारण ती केवळ ईमेल व चॅट या अगोदरच अस्तित्वात असलेल्या संदेशवहन प्रारूपांचे विस्तारित रूप होते त्यामुळे त्याचे नावीन्य तरुण वापरकर्त्यांना फार काळ खिळवून ठेवू शकले नाही. नंतर जी सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे आली, त्यात न्यूज फीड सुविधेने बराच वेगळेपणा आणला, कारण त्यात वापरकर्त्यांस अनुकूल दृष्टिकोन ठेवण्याऐवजी नेटवर्क केंद्रित दृष्टिकोन ठेवला होता. त्यामुळे तरुण पिढी त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी सतत संपर्कात राहू लागले, हा संवादाचा विस्तार हे फेसबुकच्या यशाचे गमक होते. गेमिंगमुळेही त्याची लोकप्रियता वाढली. झिंगाच्या फार्मव्हिलेपासून अनेक गेम त्यात समाविष्ट झाले. त्यामुळे फावल्या वेळात त्याचा करमणुकीसाठी वापरही होत गेला. अनेक वृत्तपत्रांनी त्यांचा मजकूर वाचकांना फेसबुक मित्रांशी शेअर करण्याची परवानगी दिली. ऑर्कुटला हे जमले नाही, त्यांनी नवीन गेम विकसित केले नाहीत किंबहुना ते मोठय़ा संकेतस्थळांशी मैत्री करू शकले नाहीत. तरुण पिढी मायस्पेस सोडून जाण्याचे कारण हिप हॉप संगीत किंवा विशिष्ट आवडी असलेल्या लोकांच्या ताब्यात ते गेले होते. तुलनेने फेसबुकही कॉलेज युवकांना आकर्षित करणारे होते. ग्राफिकचा अभाव, तुलनेने वाचता येणार नाहीत इतके वाईट प्रोफाइल पेजेस, मोबाइलवर उपलब्धता नसणे यामुळे अनेक सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे मागे पडली. असे असले तरी एक सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ सोडून दुसरीकडे जाण्याची वापरकर्त्यांची सवय ही तेच ते वापरण्यापेक्षा नवीन, आपल्याला हवे ते देणारे संकेतस्थळ वापरावे या हेतूनेच निर्माण होते यात शंका नाही. ऑर्कुटचा चेहरामोहरा आकर्षित करणारा नव्हता, जो फेसबुकच्या फेसने दाखवला, फेसबुकमध्ये जास्त अ‍ॅप्स (उपयोजने) होती, वापरकर्त्यांशी मैत्री साधणारी अशी ही उपयोजने (अ‍ॅप्स) होती. फेसबुकवर छायाचित्र लोड व्हायला जेवढा वेळ लागतो त्याच्या दुप्पट वेळ ऑर्कुटवर छायाचित्र लोड व्हायला लागत असे, ऑर्कुटपेक्षा फेसबुक वेगवान आहे. विशेष म्हणजे फेसबुकने नेहमी काळाबरोबर राहण्याचा प्रयत्न करताना नेहमी तंत्रसाधनात बदल केले. हाय फाइव्ह, इबिबो, मायस्पेस, लिंकडइन ही सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे पूर्णपणे संपली, असे म्हणता येणार नाही. फेसबुकवर आता व्यक्तिगतता उरली नाही, त्यामुळे तरुण वर्ग व्हॉट्सअप,  टेलिग्राम अशा अ‍ॅपसकडे वळला आहे, त्याचे कारण आईवडिलांचाच ससेमिरा चुकवणे हे
आहेच, शिवाय गॉसिपिंग करता येते. छायाचित्रे, व्हिडीओ सगळे शेअर करता येते त्यामुळे एक पर्याय नवीन पुढे आला आहे व त्यांनी तो बऱ्यापैकी स्वीकारला आहे.
टप्पा २:  अ‍ॅप्स श्रीमंतांचा काळ
द ग्लोबल सोशल मीडिया इम्पॅक्ट स्टडी या अहवालानुसार फेसबुकवाले आता काही अ‍ॅप्स वापरतात, याशिवाय ते ट्विटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम यांचा वापर करतात. खरे तर वापराच्या दृष्टीने अवघड असूनही आई-वडिलांचा ससेमिरा चुकवण्यासाठी तेही अ‍ॅप्स व सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे वापरत आहेत. यातील टेलिग्राम हे व्हॉट्सअ‍ॅपसारखेच पण त्यापेक्षा वेगळे अ‍ॅप असून त्यातून संदेश व फोटो व्हॉट्सअ‍ॅपपेक्षा वेगाने एकमेकांना पाठवता येतात. रशियाच्या निकोलाय व पावेल डय़ुरोवबंधूंनी २००६ मध्येच ते शोधले होते फक्त ते आता आपल्याला कळले किंवा अनेकांना माहीत असेल. त्याचे वैशिष्टय़ म्हणजे त्याचे एन्क्रिप्शन फार चांगले असल्यामुळे कुणी तुमचे संदेश चोरून बघू शकत नाही. त्यात फेरफार करू शकत नाही, सेन्सॉरशिप लादू शकत नाही. सध्या भारतात या व्यतिरिक्त बीबीएम, हाइक, व्हायबर, निंबूझ या सेवा आहेत. आता मिक्सिट या दक्षिण आफ्रिकी अ‍ॅपने या बाजारपेठेत प्रवेश केला असून त्यांना २०१५ पर्यंत १ कोटी वापरकर्ते मिळवायचे आहेत. मिक्सिट खरे तर २००५ मधले असून ते २ जी सेवेवरही चालू शकते. अनेक शाळकरी मुलांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही फेसबुक हे ट्विटर व इन्स्टाग्रामपेक्षा वापरायला सोपे आहेत. माध्यम संशोधकांच्या मते तरुण मुलांनी किंवा मुलींनी फेसबुक वापरणे सोडून देण्याचे कारण हे आईनेच फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली तर काय करायचे, हे आहे. तरुण मुले व मुली यांची एक ठरावीक वृत्ती असते त्यानुसार आपल्या आयुष्यात कुणी डोकावू नये असे त्यांना वाटत असते. मुले आता परिचित मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. जास्त लोकांशी संपर्कात राहायचे असेल तर ट्विटरचा वापर करतात. फेसबुक हे आता वडीलधाऱ्या मंडळींसाठी उरले आहे.
चीनमध्ये सेन्सॉरशिपची भीती
चीनमध्ये सेन्सॉरशिपचा वरवंटा कम्युनिस्ट राजवट अगदी इमानेइतबारे फिरवत असते. त्यामुळे तेथे फेसबुक, गुगल, ट्विटर या अमेरिकी सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचे काही चालत नाही. त्यावर चीनने देशी पर्याय तयार केले आहेत. वेबो नावाची एक अशी सेवा आहे पण त्यात चीन सरकारने नाक खुपसायला सुरुवात केली तेव्हापासून चीनमध्येही वुई चॅटचा वापर वाढला आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे यात सरकारला फारसा हस्तक्षेप करता येत नाही. वुईचॅट म्हणजे चिनी भाषेत वेक्सिन हे खासगी गप्पा, छायाचित्रे देवाणघेवाण यासाठी प्रसिद्ध आहे. त्यावरचा मजकूर तुमच्या मोबाइलवर कुठलीही सरकारी कात्री न फिरता दिसतो. विशेष म्हणजे चीनमधील शोधपत्रकारिता करणारे ल्युओ चँगपिंग यांनी नोव्हेंबरमध्ये तेथील आर्थिक क्षेत्रातील एक मोठे अधिकारी असलेल्या लिऊ तिएनान यांच्या भ्रष्टाचाराला वुईचॅटवर वाचा फोडली. त्यांनी त्याआधी हे प्रकरण ट्विटरसारख्याच असलेल्या सिना वेबोवर उघड करण्याचा प्रयत्न केला पण त्यात सेन्सॉरशिपची कात्री लागली म्हणून त्यांनी वुईचॅटचा मार्ग निवडला. वुईचॅटचा वापर २७० दशलक्ष लोक करतात. प्रक्षोभक ऑनलाइन चर्चेसाठी ते प्रसिद्ध आहे. चीनमध्ये मायक्रोब्लॉगरने सरकारविरोधात काही लिहिले तर तीन वर्षे तुरुंगात जावे लागते म्हणजे चुकीचा ट्विट केला, खोटी माहिती पसरवली तर तुरुंगाची हवा ठरलेली.
युरोपीय समुदायातील किमान आठ देशात तरुण मुले फेसबुक सोडून दुसरीकडे का जात आहेत याचे संशोधन करण्यात आले आहे. आई-वडिलांनीही फेसबुक कौशल्ये शिकून आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे सुरू केले त्यामुळे मुलांनी त्यांची व्यक्तिगतता जपण्यासाठी फेसबुकचा वापर करणे कमी केले आहे. साधारण सोळा ते अठरा वयोगटातील तरुण-तरुणींचा अभ्यास यात करण्यात आला. एक काळ असा होता की, आई-वडील हे मुलगा किंवा मुलगी फेसबुकवर असेल तर काळजी करीत बसायचे पण आता उलट स्थिती आहे, तुम्ही फेसबुकवर राहा, तुमच्या आयुष्यातील घटना किंवा इतर गोष्टी फेसबुकवर टाकत जा, असे आई-वडीलच सांगत आहेत. याचे कारण म्हणजे आई-वडिलांनी फेसबुक कौशल्ये शिकून घेतली आहेत. त्यांनाही फेसबुक वापरण्याचे फंडे माहीत झाले आहेत. त्यामुळे ते आता फेसबुकचा वापर कुटुंबाशी संपर्क ठेवण्यासाठी करू लागले आहेत. पण त्याचा परिणाम म्हणून फेसबुकवाली तरुण पिढी आता शांतपणे दुसरीकडे वळत आहे.

डॅनियल मिलर, मानववंशशास्त्राचे प्राध्यापक, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन. 
अध्यक्षजनमत व अधिकारी यांच्यातील युद्धक्षेत्र इंटरनेट आहे, त्यामुळे त्यावर सरकारचे नियंत्रण असलेच पाहिजे.
झी जिन पिंग, चीन अध्यक्ष
फेसबुकपुढची आव्हाने पिंटरेस्ट, ट्विटर, स्नॅपचॅट, टेलिग्राम, वुईचॅट, व्हॉट्सअ‍ॅप ही तर आहेतच पण त्यामुळे त्यांच्यापासून युवावर्ग दूर जात आहे. फेसबुक येत्या तीन वर्षांत ८० टक्के वापरकर्ते गमावेल, परंतु फेसबुकने हा अंदाज साफ फेटाळून लावला आहे.
प्रिन्स्टन विद्यापीठातील संशोधन
फेसबुकने १३ ते १७ वयोगटातील ३० लाख वापरकर्ते जानेवारी २०११ ते जानेवारी २०१४ दरम्यान गमावले आहेत.
आयस्ट्रॅटेजी लॅबचा संशोधन अहवाल