News Flash

कर्जबुडव्यांना प्रसिद्धीचा उपाय जुनाच..

स्टेट बॅंकेने कर्ज न फेडणाऱ्या आपल्या थकबाकीदारांना धडा शिकविण्यासाठी त्यांची छायाचित्रे व पत्ते वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करण्याचे आता ठरवले आहे. मात्र असाच निर्णय एका सरकारी बॅंकेच्या

| March 17, 2013 12:03 pm

स्टेट बॅंकेने कर्ज न फेडणाऱ्या आपल्या थकबाकीदारांना धडा शिकविण्यासाठी त्यांची छायाचित्रे व पत्ते वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करण्याचे आता ठरवले आहे. मात्र असाच निर्णय एका सरकारी बॅंकेच्या व्यवस्थापकाने ३५ वर्षांपूर्वी घेतला होता. तेव्हा त्याला वेडा ठरवण्यात आले,  पण हा वेडेपणा न ठरता बॅंकेची हजारो रुपयांची कर्जवसुली लगेच झाली.
स्टेट बँक थकबाकीदार कर्जदारांचे फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध करणार असल्या संदर्भातील बातमी (लोकसत्ता दि. ११ मार्च) वाचली, अन माझे मन ३०-३५ वष्रे मागे गेले. तेव्हा मार्च १९७६ मध्ये माझी वडूथ (आरळे) या सातारा रोडवरील बँक ऑफ इण्डियाच्या शाखेत व्यवस्थापक म्हणून बदली झाली. त्या वेळेस मी असाच निर्णय मोठय़ा धाडसाने व कल्पक बुद्धीने घेतला होता व अमलातही आणला होता.
माझ्या आधीच्या मॅनेजरने, फक्त रोजचे काम सांभाळत तीन-चार वष्रे (नुसतीच मौजमजा करीत) शाखा कशीबशी चालवली होती व कर्ज विभाग व इतर महत्त्वाची बरीच कामे मोठय़ा प्रमाणावर तुंबून ठेवलेली होती. त्यात भरीस भर म्हणून की काय आमच्याच बँकेच्या फलटण शाखेने, नदीपलीकडील आरळे गावात चार-पाच वर्षांपूर्वी वाटलेली २५-३०  साबुदाणा पीक कर्जाची थकीत खाती आमच्या शाखेत वर्ग केलेली होती. चार-पाच वर्षांपूर्वी दिलेली ती पीक कर्जे, पीक शेतातच नीट न आल्याने पूर्णपणे थकीत होती व थकबाकीदार शेतकरी काही केल्या कर्जाची परतफेड करत नव्हते. काही जणांवर तर त्यासाठी वसुलीचे दावेही सातारा कोर्टात दाखल केलेले होते. वडूथ व आरळे या दोन्ही गावांमधून कृष्णा नदी वाहते. कृष्णा-काठ असल्याने जमीन सुपीक होती व शेतकरीही कष्टाळू असल्याने उस, हळद, द्राक्षे, आले अशी नगदी पिके घेऊन भरपूर उत्पन्न मिळवत होते. परंतु आमचे हे साबुदाण्याचे पीक कर्ज थकबाकीदार शेतकरी जंग जंग पछाडूनही, बँकेचे पसे भरत नव्हते. शेतीतून भरपूर उत्पन्न मिळवूनही त्यांच्यापकी अनेकांची बँकेचे कर्ज परत करण्याची वृत्ती नव्हती, हे माझ्या दोन वर्षांच्या काळात लक्षात आले. हे थकबाकीदार ऊस गेट केन म्हणून भुइंज कारखान्याला घालत होते व गावातीलच एक बडे प्रस्थ, कारखान्याचे अध्यक्ष असल्याने, त्यांच्या संगनमताने (बँकेची वसुली न होऊ देता) कारखान्यातून पसे परस्पर घेऊन जात होते व आमची थकबाकी तशीच लटकलेली असे.  
दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतरही हे शेतकरी दाद देत नाहीत हे पाहून, ऑगस्ट १९७८ मध्ये मी एक युक्ती करायचे ठरविले. गणेश चतुर्थी जवळ आलेली. मी आमच्या बँकेचे सातारचे शालगर वकील यांचा सल्ला घेतला. सातारच्या ‘दै. ऐक्य’चे संपादक सुरेश पळणीटकर यांच्याशी चर्चा करून,  गणेश चतुर्थीच्याच दिवशी, आरळे गावातील साबुदाणा पीक कर्जदार थकबाकीदारांना आवाहनपर एक जाहिरात प्रसिद्ध केली. १० ते १५ ओळींच्या त्या आवाहनामध्ये बँकेने दिलेलेल कर्ज न फेडण्याची त्यांची वृत्ती, बँकेने वेळोवेळी वसुलीसाठी केलेले  प्रयत्न, इतर नगदी पिके घेत हेच शेतकरी कसे शेतीतून उत्पन्न मिळवत आहेत, पण आमच्या बँकेला वाटाण्याच्या अक्षता कसे लावीत आहेत, ऊस गेट केन म्हणून भुइंज कारखान्यातून उसाचे पसे (बँकेची वसुली टाळून परस्पर कसे नेत आहेत) इ.इ. सर्व वर्णन करून शेवटी  -‘आज गणेश चतुर्थीच्या दिवशी तो विघ्नहर्ता गणराया तुम्हाला सद्बुद्धी देवो व तुम्ही बँकेचे थकीत कर्ज लवकर फेडण्याची सुबुद्धी तुम्हाला देवो’, अशी जाहीर  प्रार्थना मी त्यात केली होती. त्यात शेवटी त्या सर्व कर्जदारांची थकबाकीसह यादीही प्रसिद्ध केली होती. जाहिरातीत शेवटी माझे नाव व बँक ऑफ इंडिया, वडूथ शाखा असा उल्लेखही केला होत.  
हे सर्व करीत असताना मी पूर्णपणे माझ्या स्वतंत्र विचाराने व बुद्धीने काम केले. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सांगितले नाही वा त्यांची परवानगी विचारली नाही. कर्ज विभागातील अत्यंत महत्त्वाची कामे तसेच दोन-तीन वर्षांपूर्वीच्या इतर पीक-कर्जाच्या सात-आठशे खात्यांतील वसुली हीही कामे चालू होती. कर्जाचे नूतनीकरण वगरे सगळीच कामे मी जिद्दीने पूर्ण करीत होतो. त्यात मी हा प्रकार केला. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर, माझे वरिष्ठ व इतर बँकेतील अधिकारी माझ्यावरच भडकले. ‘तू बँकेच्या गोपनीयतेचा भंग केलास’, ‘आता शेतकरी बँकेवर अब्रूनुकसानीचा दावा करतील,’ असा धाक मला दाखवू लगले. काही जण (माझे कौतुक सोडाच निदान माझ्या पाठीशी ठाम उभे राहायचे सोडून) मलाच ‘वेडा’ म्हणू लागले. परंतु मी आधीच आमच्या वकिलांचा सल्ला घेतला होता. ‘जे सत्य आहे, ते प्रकाशात आणले वा छापले व त्याचा बोभाटा केला, तर कोणीही बँकेविरुद्ध किंवा तुमच्याविरुद्ध अब्रूनुकसानीच दावा लावू शकत नाही. समजा एखाद्याने खटला भरला तरी तो फेटाळला जाणार,’ हे मला शालगर वकिलांनी सांगितले होते. त्यामुळे मी बिनधास्त होतो. या सगळ्या टीकेला ‘माझे मी बघून घेईन, तुम्ही काळजी करू नका,’ असे म्हणून उडवून लावले.
महत्त्वाची  गोष्ट म्हणजे, मला वेडा, मूर्ख म्हणणारेच नंतर वेडे- अगदी महामूर्ख-  ठरले.  कोणाही शेतकऱ्याने कुठलाही दावा माझ्या किंवा बँकेविरुद्ध लावला नाही. उलट त्यापकी पाच-सात शेतकऱ्यांनी, दहा-पंधरा  दिवसांमध्ये बँकेची थकबाकी बँकेत येऊन भरली व आपली थकीत कर्ज खाती पूर्णपणे बंद केली. पुढे इतर काही शेतकऱ्यांनीही आपली थकबाकी भरून खाती बंद केली . जे कर्जदार बँकेची डोकेदुखी ठरले होते, ज्या थकबाकीच्या मोठमोठय़ा रकमेच्या बुडीत कर्ज खात्यांच्या वसुलीची सुतराम आशा नव्हती (बँकेतील वरिष्ठांनीसुद्धा सोडली होती.) त्या अत्यंत अवघड ठरलेल्या खात्यांमध्ये बँकेची पूर्ण वसुली झाली.  गमतीचा भाग हा की, त्यानंतर मी त्या शाखेमध्ये जानेवारी १९८० पर्यंत होतो. पण मला नावे ठेवणाऱ्या व वेडा म्हणणाऱ्या आमच्या बँकेतील इतर शाखेतील माझे अधिकारी वा आमचे रिजनल मॅनेजर यांपैकी कोणीही माझे, इतकी जुनी बुडीत कर्जे वसूल केली म्हणून साधे दोन शब्दांचे अभिनंदन केले नाही की वरिष्ठांकडून पाठ थोपटली गेली नाही. सगळेच जण मळलेल्या वाटेवरून फक्त पाटय़ा टाकणारेच होते. जी गोष्ट मी तीस-पस्तीस वर्षांपूर्वी धाडसाने केली, राबवली व यशस्वी केली, तीच गोष्ट स्टेट बँकेच्या वरिष्ठांना आता २०१३ मध्ये सुचतेय. (आमच्या बँकेतील अशा वागणुकीलाच कंटाळून मी २००० साली स्वेच्छानिवृत्ती घेतली.) वरपासून-खालपर्यंत- सगळेच नुसते कागदी घोडे नाचवणार. धडाडी, स्वत: निर्णय घेण्याच्या नावाने नुसती बोंब. म्हणूनच बँकांची थकबाकी लाखो कोटींच्या घरात गेली आहे.  सर्वसामान्यांच्या अब्जावधी रुपयांच्या ठेवींचे वाटोळे होत आहे. एक आनंद व समाधान की जे मी तीस-पस्तीस वर्षांपूर्वी केले तो मूर्खपणा नव्हता. तर एक क्रांतिकारी निर्णय होता, ज्याची कॉपी आता मोठमोठय़ा बँकांमधील ढुड्ढाचार्य करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:03 pm

Web Title: old idea of loan defaulter publicity in newspaper to recover loan amount
Next Stories
1 संमती वय, कायदा आणि समाज
2 अ‘ज्ञाना’चा आनंद!
3 वाद पदवी आणि पात्रतेचा
Just Now!
X