04 March 2021

News Flash

मृत्युदंडालाच मृत्युदंड हवा

महात्मा गांधी म्हणत की ‘डोळ्यासाठी डोळा हा जर न्याय असेल

‘लोकसत्ता- ब्लॉग बेंचर्स’ या स्पध्रेत ‘दुर्बलांपुढेच दबंग’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या ओमकार माने या विद्यार्थ्यांने मांडलेले विचार.
महात्मा गांधी म्हणत की ‘डोळ्यासाठी डोळा हा जर न्याय असेल, तर सारे जगच आंधळे होऊन जाईल’ या विधानाचा मृत्युदंडाच्या शिक्षेच्या संदर्भात गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. मृत्युदंड ही अगदी प्राचीन काळापासून वेगवेगळ्या स्वरूपात चालत आलेली शिक्षा आहे. शिक्षेच्या तरतुदीमुळे ‘कायद्याचा धाक’ निर्माण व्हावा, गुन्हेगारीला आळा बसावा, अशी शुद्ध भावना त्यामागे असते; परंतु न्याययंत्रणा सदोष असल्यास निरपराधांना गमवाव्या लागणाऱ्या जिवाची दखल घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ९९ गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होऊ नये, असे भारतीय न्यायव्यवस्थेचे बोधवाक्य आहे; पण पूर्वग्रह वा भावना अतिरेकातून एका गुन्ह्य़ासाठी दुसरा तितकाच वा कमी गंभीर गुन्हा करणे म्हणजे गुन्ह्य़ात सामील होण्यासारखेच आहे. सूड उगवणे म्हणजे न्याय होऊ शकत नाही.
खून, सूड यापेक्षा मानवता मोठी असते. आज अमेरिकेसारख्या देशातही फासावर जाणाऱ्या सात जणांसोबत एक व्यक्ती ही निर्दोष असते. अमेरिकेत १३ टक्के असणाऱ्या आफ्रिकन लोकांची गुन्हेगारीतील संख्या सुमारे ५० टक्के इतकी आहे. भारतातही हीच स्थिती आहे. मागास वा धार्मिक अल्पसंख्याकांची गुन्हेगारीतील संख्या चिंताजनक आहे. काही धर्माध आणि साम्यवादी राष्ट्रांमध्ये हे वास्तव अधिकच ज्वलंत बनते. श्रीमंताला एक आणि गरिबाला दुसरा असा न्याय काय कामाचा? मृत्युदंड हा अमानवी आहे. मानवी मूल्यांवर आधारित बनलेल्या संस्कृतीला त्यामुळे काळिमा फासला जातो, असा युक्तिवाद विरोधक मांडतात, तर गुन्हा करून स्वत:च्या घरात वास्तव्य न करता बिनभाडय़ाच्या खोलीत राहून फुकट जेवण खाण्यात गुन्हेगार धन्यता मानतील, असा युक्तिवाद समर्थक मांडतात. हत्या करणारे, बलात्कारी, जिवंत जाळणे अशी कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा जरूर व्हायला हवी; पण फाशीमुळे गुन्हे कमी होतात, हे वास्तवात तरी अनुभवास येत नाही. कारण जिथे राम आहेत तिथे रावणसुद्धा असणारच. रामरायांनी सुटका केली तरी अग्निपरीक्षा मात्र द्यावीच लागते. त्यामुळे गुन्हेगारी कमी करण्यासाठी पर्यायी अस्त्रांचा शोध घ्यायला हवा. गेल्या काही वर्षांत सामाजिक कार्यकत्रे,मानवी हक्कांचे पुरस्कत्रे मृत्युदंडाविरुद्ध सातत्याने भूमिका सातत्याने मांडत आहेत. जे दहशतवादी मरण गृहीत धरूनच अस्थिरता माजवत असतात. त्यांना फाशीने काय फरक पडणार? उलट पुरावेच नष्ट करण्यासाठी बलात्कारी नराधम पीडितेचा खून करण्याचाही प्रयत्न करतात. यामुळे क्रौर्य वाढतच जाईल. कसाबला फाशी दिल्यानंतर देशात तयार झालेले उत्सवी वातावरण हे भारतीय समाजमनाचे वास्तव आहे. सामान्य माणूस हा कठोर शिक्षेचा समर्थक असतो; पण न्यायालयीन चौकशीच्या नाटकात अडकवून अमेरिकेसारखा देश जेव्हा सद्दाम हुसेनला फाशी देतात, तेव्हा या कायद्याचा दुरूपयोग लक्षात येतो. यासाठी फाशीच्या शिक्षेचा पुनर्वचिार व्हायला हवा.
आज जवळपास १४० देशांनी फाशीला बंदी घातली आहे आणि ही संख्या वाढत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. विचाराला विचारानेच जिंकता येते आणि अंधश्रद्धेला श्रद्धेनेच हरवता येते हे लक्षात घ्यायला हवे. गुन्हेगारांना शिक्षा देताना त्या मार्गाने जाऊ इच्छिणाऱ्यांना धडा मिळावा, सामाजिक स्वास्थ्य लाभावे याचा विचार व्हायला हवा. ‘गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाश करायला हवा, गुन्हेगारांचा नव्हे’, बरेच गुन्हे सामाजिक, आíथक असमतोलातून जन्म घेतात. त्यामुळे फांद्या तोडण्यापेक्षा मुळावरच घाव घालायला हवा. गांधीजींच्या हत्येनंतर देवदास गांधी नथुराम गोडसेला भेटायला गेले असता म्हणाले होते की आज जर बापू असते तर तुम्हाला माफ केले असते, पण गांधीजींचे तत्त्वज्ञान मानणाऱ्या भारतीयांचा मताग्रह मात्र वेगळाच आहे. शिक्षा देण्याचा उद्देश असतो की सुधारणा व्हावी, पण एका चुकीसाठी दुसरी चूक करून सुधारणा होऊ शकते? नाही. न्यायाधीशसुद्धा मनुष्यच असतो,चुका होऊ शकतात पण त्यामुळे एखाद्याला जीवनालाच मुकावे लागू नये. कल्याणकारी राज्याची कल्पना करत असताना नागरिकांचे संरक्षण करणे हे व्यवस्थेचे कर्तव्य आहे, त्यांचा बळी घेणे नव्हे. अपराध करणाऱ्यांमध्ये सुधार करून त्याला सभ्य नागरिक बनविण्यासाठी मृत्युदंडाच्या शिक्षेवर घाव घालणे आवश्यक आहे. जगाला सत्य, अिहसा, मानवतेचे धडे देणारा प्राचीन सभ्यता लाभलेल्या भारताने मृत्युदंडाला तात्काळ मृत्युदंड द्यायला हवा.
( रुपारेल महाविद्यालय, माटुंगा )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 2:05 am

Web Title: omkar mane loksatta blog benchers winners
Next Stories
1 ओमकार माने व रुची मांडवे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते
2 ‘जुगाड संस्कृतीचा अंत?’ अग्रलेखावर व्यक्त व्हा
3 ‘जुगाड संस्कृतीचा अंत?’ अग्रलेखावर व्यक्त व्हा!
Just Now!
X