-अनय जोगळेकर

पण मराठीची पाटी कोरीच!

महत्त्वाच्या सर्व ई-रिटेल संकेतस्थळांवर लाखो उत्पादनं, त्याची वर्णनं आणि ग्राहकांकडून होणारी त्यांची परीक्षणं ते त्यांची डेबिट-क्रेडिट कार्डाद्वारे करण्यात येणारी खरेदी इतपत जवळपास सर्व व्यवहार पूर्णपणे इंग्रजीत होतो. या सर्व संकेतस्थळांवर भारतीय भाषा नावापुरत्या असूनदेखील कोणाचे काही अडले नाही. शिक्षण क्षेत्रात आपण मराठीची हरलेली लढाई लढतोय ही भावना गेली अनेक र्वष विविध व्यासपीठांवर व्यक्त होत आहे. आता तीच गोष्ट व्यापार-उदिमाच्या क्षेत्रात खरी ठरू लागली आहे की काय?

औद्योगिक उत्पादन वाढीच्या निर्देशांकाची धिमी गती, शेअर बाजारात होत असलेली घसरण आणि आवर्षणग्रस्त कृषी क्षेत्र अशी पाश्र्वभूमी असूनदेखील भारतातील ई-रिटेल क्षेत्रातील कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्यात दिवाळी साजरी केली. २०१४ साली सुमारे २९,००० कोटी रुपयांच्या सामानाची विक्री करणाऱ्या या कंपन्या या वर्षी हाच आकडा नवरात्री ते दिवाळी या महिनाभराच्या कालावधीत पार करतील असा अंदाज आहे. फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि स्नॅपडील या आघाडीच्या कंपन्यांच्या उलाढालीत या वर्षी ३ ते ४ पट वाढ झाली आहे. गुगलच्या आकडेवारीनुसार या वर्षी भारतीय ई-रिटेल कंपन्या ७५,००० कोटी रुपये मूल्याच्या सामानाची विक्री करणार असून २०२० सालापर्यंत हे क्षेत्र ४ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे.

अत्यंत आशादायक वाटणाऱ्या या घटनांकडे मी दुसऱ्या एका चष्म्यातून पाहिले असता मला जाणवले की, २-४ वर्षांपूर्वीपर्यंत जो व्यापार मुख्यत्वे ऑफलाइन म्हणजे प्रत्यक्ष दुकानांतून होत होता तो आता झपाटय़ाने इंटरनेटच्या छत्रछायेखाली येऊ लागला आहे. नक्की आकडेवारी उपलब्ध नाही.. कदाचित कधी होणारही नाही; पण ढोबळ अंदाजाने आपण म्हणू शकतो की, देशात सर्वाधिक सधन नेटकर असणाऱ्या महाराष्ट्रातील लोक किमान ७,५०० कोटी रुपये मूल्याच्या वस्तूंची/ सेवांची खरेदी इंटरनेटवर करतील. म्हणजेच ऑफलाइन असताना जी खरेदी-विक्री मराठी आणि थोडय़ाफार प्रमाणावर िहदी आणि गुजरातीत होत होती ती आता जवळपास पूर्णपणे इंग्रजीच्या कह्य़ात गेली आहे. असे म्हणायचे कारण की, महत्त्वाच्या सर्व ई-रिटेल संकेतस्थळांवर लाखो उत्पादनं, त्याची वर्णनं आणि ग्राहकांकडून होणारी त्यांची परीक्षणं ते त्यांची डेबिट-क्रेडिट कार्डाद्वारे करण्यात येणारी खरेदी इतपत जवळपास सर्व व्यवहार पूर्णपणे इंग्रजीत होतो.

या वस्तू घरी घेऊन आलेल्या कुरिअर कंपनीच्या माणसांशी आपण ‘कुठे सही करू?’ असे जे काही बोलतो; तेवढेच काय ते मराठी यात उरले आहे. विशेष म्हणजे या सर्व संकेतस्थळांवर भारतीय भाषा नावापुरत्या असूनदेखील कोणाचे काही अडले नाही. मला मराठीत नसल्यामुळे अमुक एक गोष्ट विकत घेता आली नाही अशी तक्रार कोणी केल्याचे ऐकिवात नाही. सगळे कसे सुरळीत पार पडले. शिक्षण क्षेत्रात आपण मराठीची हरलेली लढाई लढतोय ही भावना गेली अनेक र्वष विविध व्यासपीठांवर व्यक्त होत आहे. आता तीच गोष्ट व्यापार-उदिमाच्या क्षेत्रात खरी ठरू लागली आहे की काय या काळजीने मला ग्रासले.

पण ही काळजी केवळ ई-कॉमर्स संकेतस्थळांपुरती मर्यादित नाही. आमच्या पिढीतील अनेकजण हॉटेल, टॅक्सी, विमान-रेल्वे तिकिटं, विमा, भांडवली बाजारातील गुंतवणूक, इ. शक्य असलेल्या सर्वच गोष्टींसाठी या सेवा पुरवणाऱ्या विविध संकेतस्थळांचा आणि अ‍ॅपचा वापर करत आहेत. म्हणजेच पूर्वी मुख्यत्वे भारतीय भाषांतून होणाऱ्या अनेक गोष्टी आज झपाटय़ाने इंग्रजीकडे जात आहेत. मी ट्रिप अ‍ॅडवायझर (३१्रस्र्ं५्रि२१.्रल्ल) या लोकप्रिय संकेतस्थळावर नियमितपणे पर्यटनस्थळं आणि हॉटेलबद्दल परीक्षण लिहीत असतो. नेटवरील मराठीच्या दुष्काळाची जाणीव झाल्यावर मी कुतूहलाने या संकेतस्थळावर तपासले असता आढळले की, अगदी गणपतीपुळे, तारकर्ली, ताडोबा ते अजिंठा-वेरुळ अशा महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची प्रत्येकी २०० ते १२०० परीक्षणं आहेत. पण सगळीच्या सगळी इंग्रजीत आहेत.

मी मराठीत शोधून बघितले असता लक्षात आले की, एकही ‘सर्च’ यशस्वी होत नाही. मग आपणच सुरुवात करू या म्हणत मी नुकत्याच भेट दिलेल्या कर्नाटक किनाऱ्यावरील चार ठिकाणांची परीक्षणं मराठीत लिहिली. साधारणत: २४ ते ४८ तासांत ही परीक्षणं तपासून प्रसिद्ध केली जातात. पण या खेपेस या संकेतस्थळाच्या संपादक मंडळाने मराठीत लिहिलेली माझी सर्व परीक्षणं ‘डीलीट’ करून टाकली. या प्रकाराबद्दल चौकशी केली असता त्यांचे उत्तर आले की, या संकेतस्थळावर तुम्ही इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन ते अगदी हिब्रू, फिनिश, हंगेरियन, सर्बयिन अशा निवडक भाषांमध्येच परीक्षणं लिहू शकता. भारतात कार्यालय असूनही आजच्या तारखेला ट्रिप अ‍ॅडवायझरच्या यादीत एकाही भारतीय भाषेचा समावेश नाही. यादीतील अनेक भाषा केवळ ५० लाख ते १ कोटी लोकांच्या मातृभाषा आहेत.

अनेक भारतीय भाषा या भाषांपेक्षा किमान १० पट जास्त लोकांकडून बोलल्या जातात. पण यातील एकाही भाषेला ट्रिप अ‍ॅडवायझरसारख्या अनेक प्रसिद्ध संकेतस्थळांवर स्थान नसूनही त्याची साधी दखलही आपण आजवर घेतली नाही. आज प्रवासाएवढीच इंटरनेटशी जोडली गेलेली गोष्ट म्हणजे मोबाइल फोन आणि तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणांची खरेदी. हल्ली अगदी निमशहरी भागातील किंवा मध्यमशिक्षित लोकही मोबाइल घेण्यापूर्वी इंटरनेटवर त्यांचे परीक्षण वाचतात. दोन-चार मॉडेलची एकमेकांशी तुलना करतात आणि मगच विकत घेतात. मराठी वर्तमानपत्रांमध्ये ही परीक्षणं प्रसिद्ध होत असली तरी जेव्हा मी यू-टय़ूबवर शोधले तेव्हा ‘नेट भेट’सारख्या एखाद-दोन संस्था/ लोकांखेरीज असे व्हिडीओ प्रसिद्ध केल्याचे आणि त्यात व्हिडीओपेक्षा फोटोंचे सादरीकरण जास्त आढळले.

आज जवळपास सर्वच लहान-मोठय़ा वर्तमानपत्रांची तसेच टीव्ही वाहिन्यांची ई-आवृत्ती असून त्यावरून दररोज मोठय़ा प्रमाणावर मजकूर-माहिती मायाजालात जाते. आघाडीच्या मराठी माध्यमांच्या फेसबुक पेजला ५ ते १० लाख लोकांनी लाइक केले असून आणि त्यांच्या बातम्यांवर बऱ्यापकी वाचक प्रतिक्रिया येतात. आज व्हॉट्सअ‍ॅपवर मराठीतील विनोद, कविता आणि किस्से प्रचंड धुमाकूळ घालत असले तरी नेटवरील मराठी ही लोक-चळवळ होण्यापासून अनेक कोस दूर आहे. आज सुमारे २५ कोटींच्या घरात असलेली भारतीय नेटकरांची संख्या पुढील २ वर्षांत ५० कोटींच्या वर जाईल असा अंदाज आहे. या हिशोबाने ५ कोटींहून अधिक मराठी माणसं ऑनलाइन येणार असली तरी परिस्थिती जैसे थे राहिल्यास मराठीचा इंटरनेटवरील ठसा वाढणे तर दूरच, तो क्षीण होण्याचीच जास्त शक्यता आहे.

दुकानावरील पाटय़ा मराठीत रंगवण्यासाठी अहमहमिका लागलेल्या राजकीय पक्षांना जसे या प्रश्नाचे गांभीर्य नाही, तसेच ते व्हॉट्सअ‍ॅपवर एकाकडून आलेला मराठी मजकूर दुसऱ्याला फॉरवर्ड करण्यात धन्यता मानणाऱ्या नेटकरांनाही नाही. थोडासा दोष इंटरनेटवरील मराठीसाठी तळमळीने काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचाही आहे. गेली अनेक र्वष की-बोर्डला कळफलक म्हणायचे का कळपाट आणि तो इनस्क्रिप्ट हवा का मिश्र अशा मुद्दय़ांवर आम्ही वाद घालत बसलो असताना पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गावखेडय़ांतील इंग्रजी न येणाऱ्या वर्गाला काय सुलभ ठरेल याबद्दल आग्रहाची भूमिका घेताना कुठेतरी त्याहून कितीतरी मोठा वर्ग हा आपल्या ५० ते ७०% कामासाठी भविष्यातही इंग्रजी की-बोर्ड वापरणार आहे आणि जर एकाच की-बोर्डवर मराठी-इंग्रजी या दोन्ही भाषा तितक्याच सुलभतेने वापरता येत नसतील तर तो फक्त इंग्रजी की-बोर्ड वापरणार आहे या कटू वास्तवाची पुरेशी जाणीव आजही आमच्यातील बऱ्याच जणांना झाली नाही.

गेली अनेक र्वष मायक्रोसॉफ्ट, अडोबीसारख्या जागतिक कंपन्यांनी आपली सॉफ्टवेअर्स भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात टाळाटाळ केली. कालांतराने त्यांनी नाखुशीने ज्या सोयी उपलब्ध करून दिल्या त्या इतक्या सुमार होत्या की, त्यापेक्षा इंग्रजीचाच वापर करण्याला अनेकांनी प्राधान्य दिले. गुगल, ट्विटर आणि फेसबुकसारख्या कंपन्यांना प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचायचे असल्याने त्यांनी भारतीय भाषांना महत्त्व दिले असून आपल्या सेवांसाठी अर्धवट का होईना, पण मराठीचा पर्याय दिला आहे. मी स्वत: गेले काही महिने माझ्या अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलची आणि फेसबुकची भाषा मराठी ठेवली आहे. असे करता येते आणि मोबाइलची भाषा जरी मराठी असली तरी त्यावर संपर्क आणि की-बोर्ड इंग्लिशमध्ये व्यवस्थितपणे काम करू शकतो हेच बऱ्याच जणांना माहिती नसते आणि तशी ती निर्माण करण्याची सक्षम व्यवस्था नाही. समाजमाध्यमांनी उपलब्ध केलेल्या मराठी आवृत्तीत अनेक दोष आहेत. पण त्यासाठी त्यांना दोष देऊन चालणार नाही, कारण या कंपन्यांचे बहुतांश संशोधन सिलिकॉन व्हॅलीमध्ये चालते आणि तिथे मोठय़ा संख्येने काम करणाऱ्या भारतीय लोकांना आपापल्या मातृभाषेत अ ते ज्ञ लिहायला सांगितले तर ते न चुकता लिहू शकतील का नाही अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे हे काम लोकसहभागातून करावे लागेल. फेसबुक, ट्विटर आणि अन्य समाजमाध्यमांतील फारसा काही अर्थ नसलेल्या पण सातत्याने वापरल्या जाणाऱ्या शब्दांना लोकप्रिय प्रतिशब्द आपल्याला तयार करावे लागतील.

इंटरनेटवरील मराठीचा टक्का आणि पसारा वाढवायचा तर ती शासन, वर्तमानपत्रे, वाहिन्या, नाटय़-चित्रपट, साहित्य, शिक्षण क्षेत्र आणि आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न केले तरच ती टिकू शकेल. या वर्षी १५ ऑक्टोबर रोजी जसा ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला तसा पुढील वर्षी २७ फेब्रुवारीला म्हणजे जागतिक मराठी भाषा दिनी किंवा मग अन्य कोणत्या दिवशी सगळ्यांनी ठरवून मोबाइल किंवा संगणकावरील आपल्याला सोयीच्या असणाऱ्या की-बोर्डवर किमान एक परिच्छेद – मग तो विनोद, कविता, किस्सा, बातमीवरील प्रतिक्रिया, मोबाइल फोनचे परीक्षण किंवा प्रवास वर्णन.. काहीही असो – मराठीमधून, स्वत: टंकित करून, इंटरनेटच्या माध्यमातून ब्लॉग, संकेतस्थळं किंवा एखाद्या समाजमाध्यमांवर सोडायचा असं जरी ठरवलं तर ती नेटवरील मराठीसाठी सर्वोत्तम भेट ठरेल.
(लेखक राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाचे अशासकीय सदस्य आहेत.)
anay.joglekar@gmail.com