दयानंद लिपारे, कोल्हापूर

जगभर करोनाचे संक्रमण वाढू लागले तशी त्याने आपल्या देशातही दहशत निर्माण केली. सारे जीवन ठप्प झाले. दैनंदिन व्यवहार, उद्योग-व्यवसायाची चाके बंद पडली. एकीकडे करोनाविरुद्धची लढाई सुरू होती, त्यातून जीव वाचवण्याची धडपड सुरू होती, तर दुसरीकडे आहे तो रोजगार-उद्योग वाचवण्याचे आव्हानही होते. या विचित्र संघर्षांतही काही उद्योग-व्यवसायांनी समर्थपणे तोंड देत या आपत्तीवर केवळ मात केली नाही, तर त्यातून नवनव्या संधी निर्माण करत नवी दिशा शोधली. कोल्हापुरातील ‘इचलकरंजी गारमेंट क्लस्टर’ हा महिलांकडून चालवला जाणारा प्रकल्प या आपत्तीचे संधीत रूपांतर करणारा ठरला. व्यवसाय करतानाच सामाजिक भान ठेवणारा उद्योग अशीही या प्रकल्पाची ओळख आज बनली आहे.

केंद्र शासनाच्या साहाय्याने कोल्हापूर जिल्ह्यात ‘इचलकरंजी गारमेंट क्लस्टर’ हा उद्योग पाच वर्षांपूर्वी आकारास आला. या उद्योगात ७५ टक्के काम स्त्रियांकडून केले जाते. करोनाचे संकट जसजसे गंभीर बनले तशी या उद्योगापुढेही संकटांची मालिका उभी राहिली. यात काम करणाऱ्या स्त्रियांच्या रोजगारापासून ते त्यांनी तयार केलेल्या कापडाच्या ग्राहकांपर्यंत सर्वच पातळ्यांवर नवे प्रश्न उभे ठाकले. परंतु अशा परिस्थितीतही या उद्योगाने आपले व्यवसाय चक्र अबाधित ठेवलेच, शिवाय काळाची गरज ओळखून आपल्या उत्पादनाची दिशाही त्यांनी बदलली. इचलकरंजी येथील गारमेंट क्लस्टर प्रकल्पाचे संस्थापक, आमदार प्रकाश आवाडे व स्वप्नील आवाडे यांनी या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचे ठरवले. त्यादृष्टीने योग्य ते नियोजन केले. तयार कपडय़ांऐवजी या काळात सर्वाधिक मागणी असलेल्या वैद्यकीय कपडय़ांकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. अ‍ॅप्रन, मुखपट्टय़ा या गोष्टींना करोनाकाळात मोठी मागणी निर्माण झाली. हा विचार करून कंपनीने आपले सगळे लक्ष या दोन गोष्टींच्या निर्मितीवर केंद्रित केले. यातून वैद्यकीय सेवेचे आणि व्यावसायिक आविष्काराचे नवे विश्व आकारास आले.

या प्रकल्पात तीनशेवर महिला काम करतात, तर तितक्याच महिला घरून काम करतात. पूरक काम करणाऱ्या महिलांची संख्याही पाचशे आहे. एकूण ११०० महिला या उद्योगाशी जोडल्या गेलेल्या आहेत. करोनाचे सर्व नियम पाळत या महिलांनी हा उद्योग करोनाकाळात सुरू ठेवला. करोनामुळे सामाजिक अंतर, ग्रामीण भागात गावबंदी, टाळेबंदी यामुळे अनेक महिलांना कामावर येणे शक्य नव्हते. त्यांनी घरून काम करणे सुरू केले. प्रत्यक्ष कंपनीत येणाऱ्या महिलांनी सामाजिक अंतराचे भान ठेवून आणि करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करत वेगाने उत्पादन सुरू केले. या साऱ्या महिलांनी संकटाची पर्वा न करता या राष्ट्रीय कार्यात स्वत:ला झोकून दिले. करोनाविरुद्धच्या लढाईसाठी त्या करत असलेल्या मदतीमुळे शासनही त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि पाहता पाहता मोठे काम उभे राहिले. सामाजिक कार्याचा हा विस्तार होण्यास काही व्यापाऱ्यांनी आपल्याकडील कापड देऊन मदत केली. वैद्यकीय उपचारांच्या वेळी लागणारे पावणेदोन लाख अ‍ॅप्रन आणि सुमारे साडेपाच लाख मुखपट्टय़ांची या प्रकल्पातून निर्मिती करण्यात आली. विशेष म्हणजे व्यापारी गणिते लक्षात घेऊन अशा अडचणीत आपले खिसे भरण्याऐवजी या समूहाने उत्पादित साहित्य सामाजिक बांधिलकीचे भान राखत मोफत पुरवले. महाराष्ट्रातील सरकारी वैद्यकीय सेवा, गोवा राज्य, आशा, अंगणवाडी, पोलीस, रुग्णालय, नगरपालिका कर्मचारी यांना या मुखपट्टय़ा आणि आवश्यक अ‍ॅप्रनचे मोफत वाटप करण्यात आले. याकरता कंपनीला पदरमोड करावी लागली. परंतु करोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून त्यांचा हा सहभाग होता. या सामाजिक कामातून कंपनीची पत इतकी वाढली, की त्यांना अनेक मोठय़ा कंपन्यांची ऑर्डर मिळाली आणि महिलांनी चालवलेल्या या प्रकल्पाने नवी भरारी घेतली. संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा हा अनुभव गारमेंट चालक आणि कर्मचारी दोघांसाठीही आव्हानात्मक, तितकाच आनंददायी होता, असे प्रकल्पाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे व वैशाली आवाडे सांगतात.

करोना संकट अवतरले त्यावेळी उद्योग चालू ठेवायचा की बंद करायचा, अशा दोलायमान स्थितीत असलेल्या व्यवस्थापनाने आणि इथे काम करणाऱ्या महिलांनी खंबीरपणे पावले टाकून करोना संकटावर तर मात केलीच, शिवाय त्यातूनच भरारी घेत आपला व्यवसायही शिखरावर नेला. आज करोनामुळे सर्व उद्योगांत मरगळ आलेली असताना ‘इचलकरंजी गारमेंट क्लस्टर’च्या या महिलांकडून संचालित उद्योगाला मात्र पुढील काही महिन्यांसाठी पुरेल एवढे काम मिळाले आहे.