News Flash

आठवणींतले दादासाहेब…

नारायणराव तांबट यांचा जन्म १९०८ चा. वयाच्या १८ व्या वर्षी घराबाहेर पडले आणि फाळके यांच्या कंपनीत असिस्टंट स्टोअर-कीपर म्हणून लागले

|| प्रकाश मगदूम

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या मौखिक इतिहास प्रकल्पाअंतर्गत ऐंशीच्या दशकात सिनेसृष्टीतील पहिल्या पिढीतील कलावंतांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यात भारतीय सिनेसृष्टीची पायाभरणी करणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या ‘सिनेमा कारखान्यात’ काम केलेल्या कलावंतांचाही समावेश होता. या कलावंतांच्या मुलाखतींतून दादासाहेब फाळके यांच्या मनस्वी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उमजतात, ते असे…

काही महिन्यांपूर्वी सर्व जग जेव्हा करोनाच्या भयंकर रोगाला तोंड देत होते, तेव्हा एके दिवशी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या विभागामध्ये मला काही ध्वनिफिती (ऑडिओ कॅसेट्स) नजरेस पडल्या. कित्येक वर्षे हा विभाग समर्थपणे सांभाळणाऱ्या आरती कारखानीस यांना मी त्याविषयी विचारले, तेव्हा उत्तर ऐकून चकित व्हायची पाळी माझी होती. कारण या सर्व ध्वनिफितींमध्ये भारतीय सिनेसृष्टीत काम केलेल्या काही अगदी जुन्या कलावंतांचे अनुभव रेकॉर्ड केलेले होते. हे सर्व रेकॉर्डिंग ऐंशीच्या दशकात झालेले होते. आम्ही मग ते त्वरित डिजिटाइज करण्याचा निर्णय घेतला. मराठी, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्रजी भाषेतील ४० हून अधिक कलावंतांचे हे अनुभवकथन म्हणजे भारतीय चित्रपट उद्योगाच्या सुरुवातीच्या काळाची बोलती कहाणीच होती. जवळपास आठ हजार मिनिटांचे हे रेकॉर्डिंग हा खूप महत्त्वाचा आणि अनेक दुर्मीळ बाबी समोर आणणारा ठेवा आहे असे आमच्या लक्षात आले.

दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ १९१३ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटाद्वारे रोवली. एका ध्यासाने झपाटले जाऊन त्यांनी केवळ सुरुवातच केली नाही, तर शंभराहून अधिक मूकपट निर्माण करून या उद्योगाची मजबूत पायाभरणी केली.  हे सर्व नाशिकसारख्या एका छोट्या गावामध्ये करत असताना फाळकेंनी आपल्या परिसरातील अनेक छोट्या-मोठ्या लोकांना कलावंत बनवले. सुरुवातीच्या काळात समाजातील हेटाळणी सहन करून चित्रपट माध्यमाला प्रतिष्ठा द्यायचा प्रयत्न केला. बारा बलुतेदार वर्गातून आलेली ही मंडळी बरीचशी परिस्थितीमुळे या उद्योगाकडे वळली होती. परंतु या लोकांकडे अंगभूत कौशल्य होते. या कलागुणांचा फाळके यांनी यथोचित उपयोग तर करून घेतलाच, पण त्याच वेळी त्यांना प्रोत्साहनही दिले. त्यामुळेच बोलपटांचे आगमन झाल्यानंतरही मूकपटामध्ये प्रावीण्य मिळवलेली ही कलावंत मंडळी टिकून राहिली; फाळके यांच्या ‘सिनेमा कारखान्यात’ मिळालेल्या अनुभवाचा उपयोग करून कित्येक वर्षे त्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन घडवले.

चित्रपट संग्रहालयाच्या अनेक कार्यांपैकी एक प्रमुख काम म्हणजे- भारतीय चित्रपटाच्या इतिहासावर संशोधनाला चालना देणे आणि त्याद्वारे चित्रपट उद्योगाच्या विविध बाबींवर प्रकाश टाकून तो रसिकांसमोर आणणे. गेली अनेक वर्षे या संशोधन कामाचा एक भाग म्हणजे जुन्या कलावंतांच्या मुलाखती घेऊन त्यांचे अनुभव संग्रहित करणे. त्यातील महत्त्वाचे आव्हान म्हणजे, अशा कलावंतांची आठवण-क्षमता शाबूत असतानाच हे करणे आवश्यक ठरते. कारण तेव्हाच त्यांचे अनुभव ते व्यवस्थित सांगू शकतात. त्याचबरोबर मुलाखतकारही तितकाच माहीतगार असावा लागतो, जेणेकरून अधूनमधून जुन्या काळच्या घडामोडी अचूक सांगून या वृद्ध कलावंतांच्या आठवणीला चालना मिळेल. मराठीमध्ये हे काम ज्येष्ठ कलावंत आणि चित्रपट-अभ्यासक बापू वाटवे यांनी बिनचूक केले.  तब्बल २७ मराठी कलावंतांच्या मुलाखती संग्रहालयाच्या मौखिक इतिहास प्रकल्पात (ओरल हिस्टरी प्रोजेक्ट) समाविष्ट आहेत. त्यांपैकी बहुतांश मुलाखती ऐंशीच्या दशकात बापू वाटवे यांनी घेतल्या आहेत.

सहदेवराव तपकिरे, बाबूराव पाटील, गणपतराव तांबट, हरिभाऊ लोणारे, नारायण तांबट, वसंत शिंदे, मंदाकिनी आठवले, दादा साळवी, झुंझारराव पवार, चंद्रकांत गोखले, रघुनंदन भदाणे, गणपतराव बोद्रे, विष्णुपंत जोग, नानासाहेब साठे, सूर्यकांत मांढरे, शरद तळवलकर, नानासाहेब पोंक्षे, शाहू मोडक, विवेक… अशा महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कलावंत मंडळींनी आपापले अनेक अनुभव या मुलाखतींद्वारे व्यक्त केले आहेत. या कलावंतांना कलेची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. त्यांच्या घरचे पारंपरिक व्यवसाय शेती, सुतारकाम, केशकर्तन, पैलवानकी, कुंभारकाम, विटा बनवणे आणि अगरबत्ती विकणे असे होते. नाटक व चित्रपट कलेचा दूरान्वयेही संबंध या मंडळींचा आला नव्हता. दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट कंपनीमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र या बलुतेदार मंडळींचे आयुष्यच बदलून गेले.

या विविध कलावंतांच्या मुलाखतींतून दादासाहेब फाळके यांच्या मनस्वी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सामोरे येतात. नाशिकच्या सहदेवराव तपकिरे यांनी वयाच्या आठव्या वर्षी फाळकेंच्या फिल्म कंपनीत प्रवेश केला. वर्ष होते १९१७. फाळके यांच्या ‘कालियामर्दन’ चित्रपटाची तयारी सुरू होती. त्यांच्या कन्या मंदाकिनी यांनी साकारलेल्या अजरामर बालकृष्णाच्या भूमिकेबरोबर आवश्यक असणाऱ्या गोपगड्यांसाठी लहान मुले हवी आहेत, अशी जाहिरात वर्तमानपत्रात दिली होती. तपकिरे यांचे वडील आर्य समाजाचे कार्यकर्ते असल्यामुळे प्रागतिक आणि सुधारक विचाराचे होते. त्यांनी आपली दोन्ही लहान मुले फाळके यांच्याकडे पाठवली. लहान सहदेवाला पाहता क्षणी दादासाहेबांना ते आवडून गेले आणि दोघांनाही प्रत्येकी दहा रुपये महिना पगारावर ठेवून घेतले. सहदेवराव सांगतात की, ‘‘कालियामर्दन मूकपटाचे रोज जे काही शूटिंग व्हायचे ते दोन दिवसांनंतर पडद्यावर सर्वांनी मिळून पाहायचे अशी व्यवस्था असायची. दादासाहेब चित्रपट क्षेत्रातील जवळपास सर्वच अंगांमध्ये पारंगत असले, तरी सहकाऱ्यांच्या सूचनाही विचारात घेत असत आणि योग्य वाटल्यास त्यांचा समावेशही करत असत.’’ सहदेवराव यांच्यावर फाळके यांचा विशेष स्नेह असल्यामुळे त्यांना फाळके यांनी आपल्या घरीच ठेवून घेतले. अशा रीतीने सहदेवराव फाळकेंच्या कुटुंबाचाच भाग झाले. लौकिकार्थाने सहदेवरावांचे शिक्षण झाले नसले, तरी चित्रपट धंद्याच्या बारीकसारीक गोष्टी त्यांना फाळकेंकडून शिकायला मिळाल्या. याच दरम्यान त्यांना जाणीव झाली की,मुख्य भूमिका करण्यास आवश्यक अशी शरीरयष्टी आणि इतर गोष्टी त्यांच्याकडे नाहीत. त्यातच रंगभूषा कलेमध्ये त्यांना रस निर्माण झाला होता, म्हणून फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही कला शिकण्यास सुरुवात केली. सहदेवराव सांगतात त्याप्रमाणे, तुकारामांची पगडी कशी असावी, शिवाजी महाराजांची दाढी कशी ठेवावी, माणूस कोणत्या प्रकृतीचा आहे- त्याचे नाक, कान, डोळे जसे आहेत त्यानुसार काय मेकअप हवा, अशा सगळ्या बारीकसारीक खुब्या फाळके यांनी त्यांना शिकवल्या. फाळके यांच्या ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’पासून सुरू झालेला एका मराठमोळ्या कलावंताचा हा प्रवास दक्षिणेतील एस. एस. वासन यांच्या प्रख्यात ‘जेमिनी स्टुडिओ’पर्यंत गेला आणि २५ वर्षे सहदेवरावांनी आपल्या हस्तकौशल्याची जादू दाखवून तेथे तमिळ, तेलुगू आणि हिंदी कलावंतांचे चेहरे रंगवले. फाळकेंनी बिंबवलेला स्वाभिमान तपकिरे यांनी शेवटपर्यंत टिकवला आणि निवृत्तीनंतर नाशिकमध्ये स्थायिक झाल्यानंतर वृद्ध कलावंतांसाठी असलेल्या सरकारी मदत योजनेकरिता याचना करण्याचे नाकारले. असे केल्यास त्यांच्या गुरूंचा, म्हणजेच फाळकेंचा अपमान होईल, अशी भावना तपकिरे यांनी त्यांच्या मुलाखतीत व्यक्त केली.

नारायणराव तांबट यांचा जन्म १९०८ चा. वयाच्या १८ व्या वर्षी घराबाहेर पडले आणि फाळके यांच्या कंपनीत असिस्टंट स्टोअर-कीपर म्हणून लागले. घरचा व्यवसाय भांडी घडवण्याचा, पण त्यात त्यांना रस नव्हता. आवड होती ती कलेच्या क्षेत्रात काम करण्याची. फाळके यांचे पुत्र नीलकंठ त्यांचे वर्गमित्र. कविता-नाटक याची आवड असल्यामुळे आणि आपल्या मनाविरुद्ध ‘सिनेमा लाइन’मध्ये गेल्यामुळे वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. तांबट मुलाखतीत सांगतात त्याप्रमाणे, ‘‘स्टुडिओत सर्व जण जे मिळेल ते काम करायचे. लहान-मोठा असा कोणताही भेदभाव तिथे नसायचा आणि पडेल ती कामे सर्वांना करायला लागायची. अगदी दादासाहेब स्वत: जातीने फावडे घेऊन गवत कापायला लागायचे.’’ फाळके बनवत असलेले मुख्यत: सर्व मूकपट पौराणिक असायचे. त्यामुळे अशा अनेक सिनेमांत तांबट यांनी मॉब सीनमध्ये कामे केली. सिनेमात गेले म्हणून समाजानेही त्यांना बहिष्कृत केले. पण फाळकेंच्या तालमीत तयार झाले असल्यामुळे त्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केले. ‘‘समाजाच्या मागे लागून त्यांचे ऐकत बसलो तर समाज काही आपले जीवन घडवणार नाही. आपल्यालाच आपले आयुष्य घडवायचे आहे,’’ अशी भावना ते व्यक्त करतात. तांबट सांगतात त्याप्रमाणे, ‘‘फाळके लहरी स्वभावाचे होते, परंतु अतिशय कर्तबगार आणि सुंदर कलाकार होते. त्यांच्याकडे कल्पकता होती. चुकतचुकत शिकायची जिद्द होती. कारण अशा शिकण्यातूनच भारतीय चित्रपटसृष्टीची जडणघडण होत होती. फायदा-नुकसान याची पर्वा न करता चित्रपट धंद्याला प्रगत कसे करायचे, हाच एक ध्यास त्यांच्या मनी सतत होता.’’ तांबट सांगतात, ‘‘ट्रिक सीन करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक ते करत असत. समोरचा माणूस आपल्या मताप्रमाणे काम करत नसेल, तर प्रेमाने सांगून किंवा अन्य मार्गाने काम करवून घेण्याची त्यांची हातोटी होती.’’ फाळके यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये नारायणराव तांबट त्यांना आवर्जून भेटायला जायचे. ‘‘फाळके शेवटपर्यंत आशावादी होते आणि त्यांच्यामध्ये अजिबात नैराश्य नव्हते,’’ अशी आठवणही तांबट सांगतात.

नाशिकचेच बाबूराव पाटील फाळकेंचे चिरंजीव नीलकंठ यांचे वर्गमित्र. वडील लाकडाचे व्यापारी. वय लहान असूनसुद्धा व्यायामामुळे तब्येत कमावलेली होती. त्यामुळे फाळके यांच्या ‘कालियामर्दन’मध्ये लंगोटी नेसून गवळ्याच्या वेशात गोपगडी म्हणून नाचायचे काम त्यांनी केले. लहानपणी बाबूरावांनी फाळकेंचे ऐश्वर्य पाहिले होते. ते मुलाखतीत सांगतात, ‘‘फाळके यांच्या घरी जेवणासाठी सगळी चांदीची भांडी असायची. वेळेचे त्यांना फार महत्त्व होते आणि याबाबतीत कोणी चुकारपणा केला तर त्याची हयगय नसायची.’’ ‘सीता’मध्ये बाबूरावांनी रामाची आणि नंतर प्रख्यात साहित्यिक म्हणून प्रसिद्ध झालेले ज्ञानपीठ विजेते वि. वा. शिरवाडकर यांनी लक्ष्मणाची भूमिका केली होती. काही काळानंतर घरच्या परिस्थितीमुळे बाबूरावांना सिनेमा व्यवसाय सोडावा लागला. त्या वेळी फाळके यांनी दिलेला ‘‘खूप काम कर आणि पराजयाला घाबरू नको’’ हा कानमंत्र बाबूरावांनी आयुष्यभर जपला आणि चिवड्याच्या व्यवसायात खूप नाव कमावले.

गणपतराव तांबट यांच्या घरचा व्यवसाय पितळी भांडी घडवण्याचा. पण धंद्यात मंदी आल्यामुळे सिनेमाकडे वळले. १९०२ मध्ये जन्मलेल्या गणपतरावांची तब्येत चांगली होती आणि मूकपटाच्या जमान्यात बलदंड लोकांची गरज होती. फाळके यांच्या ‘सेतुबंधन’मध्ये त्यांनी काम केले. दक्षिण भारतात मद्रास (चेन्नई), हम्पी आदी अनेक ठिकाणी जाऊन चित्रीकरण झाल्याचे गणपतराव मुलाखतीत सांगतात. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे बराच भाग वाया गेला आणि तोपर्यंत भांडवल संपले. असे करत सिनेमा पूर्ण व्हायला जवळपास दीड वर्षे लागली. दरम्यान, मूकपटांचा जमाना संपून बोलपटांचे आगमन भारतात झाले. त्यामुळे आवाज सिंक्रोनाइज करण्यासाठी फाळके मुंबईला गेले. गणपतराव सांगतात त्याप्रमाणे, ४० नटांची त्यांची फौज मुंबईला काही महिने राहिली. अर्देशीर इराणी यांच्या ‘इम्पिरियल स्टुडिओ’मध्ये काम चालायचे आणि फावल्या वेळात ही मंडळी चौपाटीवर हिंडायला जायची. पैलवानी शरीरयष्टी असलेले नाशिकचे हे एवढे लोक पाहून मुंबईची जनता तोंडात बोट घालायची! गणपतराव फाळकेंच्या कडक शिस्तीबद्दल एक आठवण सांगतात… एकदा आऊटडोर शूटिंगसाठी पहाटे सीन घ्यायचा होता. ५ वाजता जमण्याचे आदेश होते. त्याप्रमाणे भल्या पहाटे ३ वाजता उठून ही कलाकार मंडळी स्टुडिओमध्ये गेली आणि मेकअप केला. पण तेथून निघून दादासाहेबांच्या बंगल्यावर जायला साडेपाच वाजले. तेथे पोहोचताच वाट पाहात असलेल्या दादासाहेबांनी घड्याळाकडे पाहिले. त्यांचे मुख्य मदतनीस शिंदेमामा यांना झापले. केवळ अर्धा तास उशीर झाला म्हणून शूटिंग रद्द केले.

परंतु फिल्म कंपनी बंद झाल्यानंतर फाळकेंनी तांबट, हरिभाऊ लोणारे आदी मंडळींना शिफारसपत्र दिले. त्यांच्या पत्राला मोल होते व आपल्या सहकाऱ्यांना अन्य कंपनींत कामे मिळावीत अशी त्यांची इच्छा होती. यामुळेच या मंडळींना ‘प्रभात फिल्म कंपनी’त काम मिळाले.

पुण्यात जन्मलेले वसंत कृष्णाजी शिंदे वयाच्या १२ व्या वर्षी- १९२४ मध्ये चित्रपट व्यवसायात आले. वडील घड्याळे दुरुस्त करायचे. प्रभाकर चव्हाण हे फाळके फिल्म कंपनीतील कॅमेरामन होते; त्यांच्या ओळखीमुळे स्टुडिओत लागले. प्रथम पेन्टिंग खात्यात, नंतर सुतार खात्यात. स्टोअर विभाग, एडिटिंग, लॅबोरेटरी अशा जवळपास सर्व विभागांत शिंदे यांनी मुशाफिरी केली. तालमीत जाऊन शरीर कमावलेले असल्यामुळे शिंदेंनी मारुती-गणपती अशी अनेक कामे असंख्य मूकपटांत केली. शिंदे यांच्या आठवणीनुसार, फाळके यांनी सणानुरूप चित्रपट बनवायला सुरुवात केली. प्रत्येक मुख्य सणाअगोदर १५-२० दिवस अखंड शूटिंग करून चित्रपट बनवण्याची एकामागोमाग एक अशी मालिकाच सुरू झाली. म्हणून फाळकेंच्या फिल्म स्टुडिओचे दुसरे नाव ‘कारखाना’ असेही झाले! फाळकेंचा जितका वचक असायचा त्याच्या दहापट प्रेमळपणा त्यांच्यात होता, अशी आठवण शिंदे सांगतात. ते सांगतात, ‘‘फाळके यांचा दुसरा मोठा गुण म्हणजे निव्र्यसनीपणा. नाटक-सिनेमा उद्योगाचे नाव अगोदरच खराब आहे. आपल्यासारख्या लोकांनी सचोटीने वागून ते चांगले कसे होईल हे दाखवायला पाहिजे ही तळमळ फाळकेंना होती. म्हणून जे काम आहे ते सचोटीने करावे. चांगली वर्तणूक ठेवावी, हा त्यांचा दृष्टिकोन होता.’’

हरिभाऊ लोणारे हेसुद्धा नाशिकचे. घरी वीट बनवण्याची भट्टी होती. पण हरिभाऊ पैलवानकी करायचे. फाळकेंकडे जाण्याअगोदर त्यांनी ‘गजानन फिल्म कंपनी’त काम केले होते. ‘सेतुबंधन’मध्ये मारुतीच्या भूमिकेसाठी फाळकेंनी त्यांना बोलावून घेतले. नाशिकच्या परिसरात चित्रीकरण झाल्याची आठवण ते सांगतात. ‘‘प्रत्येक कलावंताला फाळके स्वत: पहिल्यांदा भूमिका करून दाखवायचे, जेणेकरून त्यांना जसे हवे तसे कलाकारांकडून हालचाली आणि अभिनय व्हावा,’’ अशी आठवणही त्यांनी मुलाखतीत सांगितली आहे.

दादासाहेब फाळके यांची कन्या आणि ‘कालियामर्दन’मधील बालकृष्णाच्या भूमिकेने अजरामर झालेल्या मंदाकिनी आठवले यांची दीर्घ मुलाखत म्हणजे हृदयस्पर्शी आठवणींची मालिकाच आहे. फाळकेंच्या पिता, भारतीय चित्रपट उद्योगाचे प्रणेते अशा अनेक कंगोऱ्यांबद्दल त्या मुलाखतीत व्यक्त झाल्या आहेत. पण त्यांच्या आई सरस्वतीबाई यांच्याबद्दल खूप आठवणी सांगताना त्या हळव्या होतात. चित्रपटासारख्या समाजाच्या हेटाळणीचा विषय असलेल्या ध्यासामागे धावणाऱ्या दादासाहेबांना आपल्या आईने कशी अबोल, पण समर्थ साथ अखेरपर्यंत दिली, याचा भावस्पर्शी उलगडा त्यांच्या मुलाखतीतून होतो.

इतिहासाचा अभ्यास करताना संदर्भांची अनेकानेक साधने धुंडाळावी लागतात. त्यांची पडताळणी करावी लागते. भारतीय सिनेसृष्टीचा भूतकाळ शोधताना अशा साधनांची कमतरता खूप जाणवते. कारण आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी त्या-त्या वेळीच नोंद करून ठेवणे, त्यांचे जतन करून ठेवणे याचे महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये जवळपास नाहीच. अशा वेळी भारतीय सिनेसृष्टीचे जनक मानले गेलेल्या दादासाहेब फाळके यांच्याविषयी त्यांच्याबरोबर काम केलेल्या कलाकारांचे अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दादासाहेब फाळके यांच्या जन्मास ३० एप्रिल रोजी दीडशे वर्षे पूर्ण होत असताना, हा सर्व मौखिक इतिहास चित्रपट रसिकांसाठी खुला होणे ही एक प्रकारे त्या महान कलावंताला मानवंदनाच होय!

(लेखक राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक आहेत.)

prakashmagdum@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 12:02 am

Web Title: oral history of the national film museum dadasaheb in memories akp 94
Next Stories
1 सात दशकांचा धोरणात्मक पेच
2 चाँदनी चौकातून : निर्बंधांचं स्वागत
3 वेगळ्या वाटेनं…
Just Now!
X