18 November 2019

News Flash

तोच खेळ पुन्हा!

हे विधानवजा भाकीत आहे ‘ऑरलॅण्डो सेंटिनल’ या वृत्तपत्राच्या अग्रलेखातील.

(संग्रहित छायाचित्र)

‘अनागोंदी, बालिश आरोप, बढाया, भ्रष्टाचार आणि मुख्य म्हणजे खोटारडेपणाने कळस गाठला आहे. देशाने ट्रम्प यांना फार तर आणखी दीड वर्ष सहन केले पाहिजे, पण त्यानंतरची चार वर्षे हा त्रास सोसण्याची गरज नाही!’

हे विधानवजा भाकीत आहे ‘ऑरलॅण्डो सेंटिनल’ या वृत्तपत्राच्या अग्रलेखातील. फ्लोरिडातील ऑरलॅण्डो शहरातूनच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग मंगळवारी फुंकले. त्याच्या आदल्या दिवशी प्रसिद्ध झालेला ‘सेंटिनल’चा हा अग्रलेख म्हणजे अमेरिका आणि ब्रिटनमधील अनेक वृत्तपत्रांसाठी मोठी ‘बातमी’ होती. ती त्यांनी प्रसिद्धही केली. काही वृत्तपत्रांनी ‘सेंटिनल’च्या या नव्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. याचे कारण हे वृत्तपत्र काही अपवाद वगळता, गेली सत्तरेक वर्षे रिपब्लिकनांची पाठराखण करीत आले आहे आणि ‘रिपब्लिकन उमेदवारांना मतदान करा’ असे आवाहन करीत आले आहे. पण वाचाळवीर ट्रम्प यांनी खोटारडेपणाचा कळस गाठल्याचे ‘सेंटिनल’च्या संपादकीय मंडळाचे मत झाले आणि ‘ट्रम्प जाणार हे निश्चित’ असे भाकीतच अग्रलेखात करण्यात आले. ट्रम्प यांचा ‘सत्यावरील यशस्वी हल्ला’ आणि त्यानंतर ‘सभ्यतेविरुद्ध त्यांनी पुकारलेले युद्ध’ ही त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीची सर्वात मोठी हानी आहे, अशा धाडसी विधानाबरोबरच- ‘ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जगातील स्थानाला धक्का लावला आहे. ते करार मोडतात, मित्रांवरच हल्ला करतात आणि शत्रूंना मात्र आलिंगन देतात’ अशी टीका ‘सेंटिनल’ने केली आहे.

गेल्या निवडणुकीत फ्लोरिडानेच ट्रम्प यांचा मार्ग सुकर केला होता. तेथील मते त्यांच्या विजयात निर्णायक ठरली होती. त्यामुळे २०२० च्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात त्यांनी ऑरलॅण्डोतून करणे अपेक्षितच होते. समर्थकांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा माध्यमांवर आगपाखड केली, विरोधकांवर हल्ला चढवला आणि अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याच्या म्युलर चौकशी अहवालाची खिल्ली उडवली. त्यांनी आणखी एक गोष्ट केली, ती म्हणजे ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या आपल्या आधीच्या घोषणेत किंचित बदल केला आणि समर्थकांना ‘कीप अमेरिका ग्रेट’ असे आवाहन केले. म्हणजे ‘अमेरिकेला पुन्हा महान बनवा’ या आवाहनाची जागा यावेळी ‘अमेरिकेचे महानपण अबाधित ठेवा’ या सादेनेच घेतली. तुम्हाला आणि आपल्या देशाला उद्ध्वस्त करण्याचा डेमॉक्रॅट्सचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ट्रम्प यांच्या पहिल्याच प्रचार भाषणातील खोटेपणाचा पर्दाफाश ब्रिटनच्या ‘इंडिपेंडन्ट’ने ‘फॅक्ट चेकिंग : द बिगेस्ट फॉल्सहूड इन डोनाल्ड ट्रम्प्स रिइलेक्शन कॅम्पेन लॉन्च’ या लेखात केला आहे. खोटे बोलावे पण रेटून बोलावे, की ते लोकांना खरे वाटते. ट्रम्प यांनी तसेच केले. ट्रम्प यांचे उद्घाटनाचे प्रचारभाषण म्हणजे त्यांनी अध्यक्षीय कारकीर्दीत रेटून केलेली खोटी वक्तव्ये आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांचीच पुनरावृत्ती होती, असे भाष्य या वृत्तपत्राने केले आहे. ट्रम्प यांच्या भाषणात व्यापाराविषयीचे खोटे आकडे, स्थलांतरितांविषयीचे कधीच सिद्ध होऊ न शकणारे दावे, संशयास्पद आर्थिक आकडेवारी, अध्यक्ष म्हणून आपण यंव केले आणि त्यंव केल्याच्या अतिशयोक्तीपूर्ण बढाया या पलीकडे काहीही नव्हते, अशी टीकाही या लेखात केली आहे. ट्रम्प यांच्या खोटारडेपणाची आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांची दहा हजारांहून अधिक उदाहरणे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने एप्रिलमध्ये प्रसिद्ध केली होती. त्याचा आधार या लेखाला आहे.

ट्रम्प यांचे पहिल्या प्रचारभाषणाचे थेट प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांनी केले. ‘फॉक्स न्यूज’ने सुमारे ८० मिनिटांच्या भाषणाचे प्रक्षेपण केले. ‘सीएनएन’ने मात्र दहा मिनिटांपेक्षा कमी वेळ दिला, तर ‘एमएसएनबीसी’ वाहिनीने ट्रम्प यांना पूर्णपणे दुर्लक्षिले. दक्षिण फ्लोरिडातून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सन सेंटिनल’ने वाचकांच्या पत्राद्वारे याची दखल घेतली आहे. ‘एमएसएनबीसी’ या ‘फेकन्यूज’साठी प्रसिद्ध असलेल्या वाहिनीला ट्रम्प यांच्या पहिल्या प्रचारसभेत ‘बातमी’ दिसली नाही, अशी टीका एका वाचकाने केली आहे. या प्रचारसभेत ट्रम्प समर्थकांनी सुमारे २५० लाख डॉलर्स जमवले. हा निधी सत्कारणी लागावा, अशी अपेक्षा व्यक्त करत दुसरा वाचक म्हणतो, ‘ट्रम्प जिंकणारच आहेत, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना असेल तर निधी जमवण्यात आणि प्रचारावर खर्च करण्यात काय अर्थ! हा निधी बेघरांना घरे आणि भुकेल्यांना अन्नदान करण्यासाठी खर्च करावा!’

संकलन : सिद्धार्थ ताराबाई

First Published on June 24, 2019 12:05 am

Web Title: orlando sentinel donald trump
Just Now!
X