|| जतीन देसाई

पाकिस्तानात अफगाणिस्तानला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवादी कारवायांना अटकाव घालण्यासाठी सहा वर्षांपूर्वी तिथल्या लष्कराने मोहीम सुरू केली. त्यात काही प्रमाणात यशही आले, परिणामी अनेक दहशतवादी अफगाणिस्तानात पळून गेले. मात्र गेल्या दीडेक वर्षात ‘तेहरीक-ए-तालिबान’, ‘हक्कानी नेटवर्क’ यांसह इतरही काही दहशतवादी संघटना तिथे सक्रिय झाल्या आहेत. पुनर्सक्रियतेनंतर या दहशतवादी संघटनांचे लक्ष्य आहे ते स्त्रियांच्या हक्कांचे खच्चीकरण करण्याचे…

 

नाहीद बीबी, इर्शाद बीबी, आयेशा बीबी आणि जवेरिया बीबी या चार महिला कार्यकत्र्यांची दहशतवाद्यांनी सोमवारी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान येथे हत्या केली. अशांत उत्तर वझिरीस्तानातील महिलांना त्या विकासकामांबद्दल प्रशिक्षण देत व मार्गदर्शन करत असत. या परिसरात बऱ्याच प्रमाणात कमी झालेला दहशतवाद पुन्हा डोके वर काढू लागला आहे. अफगाणिस्तानला लागून असलेल्या या भागात वेगवेगळ्या दहशतवादी संघटना सक्रिय आहेत.

या महिला खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू शहरातून मिर अली या शहराजवळ असलेल्या एपी गावात वाहनातून जात असताना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली आणि डोंगरात पळून गेले. मरियम बीबी या हल्ल्यात वाचल्या. दहशतवाद्यांनी आता महिलांना लक्ष्य बनवण्याचे ठरवले असल्याचे दिसते. गतवर्षी सप्टेंबरमध्ये आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या वाहिद गुल (२५) नावाच्या महिलेची दहशतवाद्यांनी मिर अलीजवळ हत्या केली होती. वाहिद गुल पोलिओविरोधी मोहिमेशी संबंधित होती. पाकिस्तानात दहशतवादी आणि कट्टर धार्मिक संघटना पोलिओविरोधी मोहिमेच्या विरोधात आहेत. वाहिदच्या हत्येच्या काही दिवस आधी एका स्थानिक महिलेचीदेखील हत्या करण्यात आली होती. महिलांचे स्थान घरातच असावे, अशी दहशतवाद्यांची भूमिका आहे.

पोलिओची लस देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचीदेखील उत्तर व दक्षिण वझिरीस्तान, मोहमेंड, बजौर, ओरकझाई, खैबर आणि खुर्रम येथे अत्यंत वाईट अवस्था आहे. त्यांना काम न करण्याची धमकी दिली जाते किंवा त्यांची हत्या केली जाते. उत्तर व दक्षिण वझिरीस्तान वगैरे आधी स्वतंत्र प्रशासकीय क्षेत्रे होती. २०१८ मध्ये त्यांचा खैबर-पख्तूनख्वा प्रांतात समावेश करण्यात आला. मोहसीन दावर उत्तर वझिरीस्तानचे खासदार आहेत. पख्तून किंवा पठाण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अहिंसक आंदोलन चालवणाऱ्या पश्तुन तहफुज मूव्हमेंट (पीटीएम)चे ते नेते आहेत. तर… हे मोहसीन दावर तसेच माजी खासदार बुशरा गोहर, अवामी नॅशनल पार्टी आदींनी या महिला कार्यकत्र्यांच्या हत्येचा निषेध केला आहे. बुशरा गोहरनी ट्वीट करून म्हटले, ‘उत्तर वझिरीस्तानात चार महिलांची करण्यात आलेल्या हत्येचा मी निषेध करत आहे. #पपेट पंतप्रधान #तालिबान खानने तालिबानला पुन्हा संघटित होण्याची आणि खैबर पख्तूनख्वात स्थानिक लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याची जणू सूट दिली आहे. पश्तुन लोकांवर खोटे गुन्हे गुदरले जाताहेत.’ मोहसीन दावरनी तर ‘सरकार कुठे आहे?’ असा प्रश्न केला आहे. ‘ह्युमन राइट्स कमिशन ऑफ पाकिस्तान’नेदेखील या हत्याकांडाचा निषेध केला असून ‘लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारची आहे,’ असे म्हटले आहे.

२०१४ च्या जून महिन्यात पाकिस्तानच्या लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात ‘झर्ब-ए-अझ्ब’ नावाने एक मोहीम सुरू केलेली. त्यात अनेक दहशतवादी मारले गेले. अनेक अफगाणिस्तानात पळून गेले. ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातून त्यांची दहशत कायम ठेवलेली. मात्र या दरम्यान उत्तर वझिरीस्तानमधील ‘हक्कानी नेटवर्क’ या दहशतवादी संघटनेकडे पाकिस्तानने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. हक्कानी मूळचे अफगाणिस्तानचे. २००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातील तेव्हाच्या तालिबान सरकारविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईमुळे हक्कानी गटाने उत्तर वझिरीस्तानमध्ये आश्रय घेतला आणि तिथून दहशतवादाला सुरुवात केली. पाकिस्तानच्या लष्कर आणि ‘आयएसआय’ या गुप्तचर यंत्रणेची ‘हक्कानी नेटवर्क’ला मदत मिळत होती. ‘हक्कानी नेटवर्क’चा उपयोग अफगाणिस्तानात भारताच्या विरोधात आयएसआय करू पाहात होती आणि तसे त्यांनी बऱ्याचदा केलेही.

गेल्या दीड वर्षात ‘तेहरीक-ए-तालिबान’ने पुन्हा एकदा उत्तर वझिरीस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादाला सुरुवात केली आहे. महिलांच्या शिक्षणाबद्दल किंवा त्यांच्या अधिकारांबद्दल बोलणाऱ्या कार्यकत्र्यांची हत्या करण्यात येत आहे. सरत्या आठवड्यात या दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या चारही महिला एका स्वयंसेवी संस्थे (एनजीओ)शी संबंधित होत्या. एकुणात, महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून त्यांनी शिक्षण घेता कामा नये ही तालिबानची भूमिका आहे.

नोबेल पुरस्कारविजेत्या मलाला युसूफझाईला अलीकडे ‘तेहरीक-ए-तालिबान’चा माजी प्रवक्ता एहसानउल्ला एहसानने धमकी दिली आहे. २०१२ मध्ये स्वात खोऱ्यात मलालावर करण्यात आलेल्या हल्ल्यात त्याचा हात होता. एहसानउल्लाने ट्वीट करून मलालाला दिलेल्या धमकीत म्हटले होते की, ‘आता चूक नाही होणार.’ मलालाने ट्वीट करून पाकिस्तान सरकार आणि लष्कराला प्रश्न विचारला होता की, ‘‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’चा माजी प्रवक्ता लोकांना समाजमाध्यमांवरून धमकी देत आहे. तो पाकिस्तानातून पळून कसा गेला?’ एहसानउल्लाला २०१७ मध्ये पकडण्यात आले होते. आयएसआयने त्याला ‘सुरक्षित घरात’ अटकेत ठेवले होते. गेल्या वर्षी जानेवारीत अचानक तो गायब झाला. त्याची अटक आणि त्याचे पळून जाणे हे दोन्ही रहस्य आहे. ट्विटरने नंतर एहसानउल्लाचे ट्विटर खाते बंद केले.

गेल्या गुरुवारी साऊथ वझिरीस्तानात ‘तेहरीक-ए-तालिबान’ने पाकिस्तानी लष्कराच्या पाच जवानांची हत्या केली होती. यातून स्पष्ट होते की, वेगवेगळ्या दहशतवादी संघटना आणि त्यातही ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ अधिक सक्रिय झाली आहे व हल्ल्यांचे प्रमाणही वाढवले आहे. पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वात हल्ले करून अफगाणिस्तानात पळून जायचे किंवा अफगाणिस्तानात हल्ले करून पाकिस्तानात पळून यायचे ही या दहशतवाद्यांची रणनीती आहे. गेल्या वर्षी २५ मार्चला काबूल येथील गुरुद्वारावर ‘हक्कानी नेटवर्क’ आणि ‘इस्लामिक स्टेट’ने मिळून केलेल्या हल्ल्यात २७ शीख मारले गेलेले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने एकत्र येऊन कारवाई केली तरच हा संपूर्ण परिसर दहशतवादापासून मुक्त होऊ शकतो. अमेरिकेला त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. आपल्या जमिनीचा उपयोग इतर देशांवर हल्ला करण्यासाठी होऊ देणार नाही, असे पाकिस्तान म्हणत असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. पाकिस्तानच्या जमिनीचा उपयोग अफगाणिस्तान आणि भारतावर हल्ले करण्यासाठी करण्यात येत आहे. यापूर्वी अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्यातदेखील ‘हक्कानी नेटवर्क’ची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने ३ फेब्रुवारीला प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, अफगाणिस्तानात सहा ते साडेसहा हजार पाकिस्तानी दहशतवादी आहेत आणि त्यातले बहुतेक ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’चे आहेत. शेहरयार मेहसूद गट, जमात-उल-अहरर, हिजबुल अहरर, अमजद फारुकी गट आणि उस्मानी सैफुल्ला गट (आधीचे ‘लष्कर-ए-झांगवी’) यांसारख्या काही दहशतवादी संघटना ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’मध्ये सामील झाल्या आहेत. ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ने उत्तर आणि दक्षिण वझिरीस्तान व खैबर-पख्तूनख्वात मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. चार महिला कार्यकत्र्यांची हत्या ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ने केली असण्याची शक्यता अधिक आहे. मात्र अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

‘मुजाहिदीन शुरा’ नावाची आणखी एक दहशतवादी संघटना उत्तर वझिरीस्तानात सक्रिय आहे. ऑडिओ-व्हिडीओ कॅसेट्स विकणारी दुकाने या संघटनेतील दहशतवादी बंद पाडत आहेत. महिलांनी कुठल्याही गैरशासकीय/ स्वयंसेवी संघटनांमध्ये अर्थात एनजीओंमध्ये काम करता कामा नये, असा या संघटनेचा आदेश आहे. खैबर-पख्तूनख्वा प्रांतात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. पश्तुन लोक आता मोहसीन दावर यांच्या ‘पश्तुन तहफुज मूव्हमेंट’च्या नेतृत्वाखाली संघटित होत आहेत. ‘तेहरीक-ए-तालिबान’, ‘हक्कानी नेटवर्क’ व इतर दहशतवादी संघटनांच्या विरोधात इम्रान खान व लष्कर यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून  ‘पाकिस्तान -इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अ‍ॅण्ड  डेमोक्रसी’चे सरचिटणीस आहेत.)

          jatindesai123@gmail.com