दिल्लीवाला

कलादालन..

शाहीन बागेत आंदोलकांनी आंदोलन करून पन्नास दिवस होऊन गेले. इथं लोकांचा राबता असतो. काही खरोखरच आंदोलकांना समर्थन द्यायला येतात, त्यांची भाषणं होतात. ते शिरा ताणून ताणून मोदी-शहांच्या विरोधात बोलतात. मंडपातल्या महिला शांतपणे ऐकून घेतात. एखादा मुद्दा पटला तर टाळ्यांचा कडकडाट होतो. काही हौशेनवशेही येतात. फोटो काढतात आणि निघून जातात. रस्ता ओलांडण्यासाठीचा पादचारी पूल सध्या विविध चित्रप्रदर्शनांनी भरलेला आहे. मोदींना हिटलरच्या रूपात दाखवणारी चित्रं आहेत. इथं चहुबाजूंनी इतक्या निरनिराळ्या प्रकारचे तक्ते, छायाचित्रं, चित्रं लावलेली आणि रंगवलेली आहेत, की एखाद्या चित्र कलादालनात आलो आहोत असं वाटतं. सावित्रीबाई फुले नावाचं छोटं ग्रंथालयदेखील आहे. तिथं डाव्या विचारांची, चळवळींना वाहिलेली पुस्तकं ठेवलेली आहेत. दुपापर्यंत गर्दी तुलनेत कमी असते. महिलांची संख्याही तुरळक दिसत होती. पण अडीच-तीन वाजेनंतर बाहेरून लोक जमायला लागले. मंडप महिलांनी भरून गेला. बहुधा घरची कामं उरकून महिला आंदोलनात सहभागी होत असाव्यात. महिनाभरातील त्यांचा हा नित्यक्रम असावा. मंडपात महिला बसलेल्या असल्यानं पुरुष मंडळी बाहेर उभी राहून पाठिंबा देत असतात.. भूक लागली तर खायला बिर्याणी होती हे खरं; पण ती कोणी कोणाला वाटत नव्हतं. अनेक पर्यायांपैकी बिर्याणीचाही पर्याय होता. फक्त बिर्याणीच नव्हे, तर भेळ होती, सामोसे होते, अननस, पेरू ही फळंही फेरीवाले विकत होते. शीख समुदायातील काहींनी लंगर लावलेला होता. तिथं जेवण मिळत होतं. चहाच्या टपऱ्या होत्या. बाहेरून आलेले लोक या सर्व पदार्थाचा आस्वाद घेत होते. गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्यानं थोडा तणाव होताच. स्थानिकांची बाहेरच्या लोकांवर नजर होती. त्यांनी सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेतली होती. शाहीन बागेत शांततेने, पण नेटाने आंदोलन सुरू आहे!

शिक्षकी पेशा..

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना शिक्षकी पेशा महागात पडला. समोरच्या व्यक्तीला आपण काय म्हणतो हे समजले पाहिजे, असा त्यांचा अट्टहास असतो. त्या व्यक्तीनं स्वत:चं डोकं वापरण्याआधीच सीतारामन अर्थ सांगायला लागतात. पत्रकारांना मुद्दा उलगडून सांगायला हवा असतो, त्यांचं काम सोपं होऊन जातं. पण सगळ्यांना मुद्दय़ांची फोड करून सांगितलेली वा त्याची पुनरावृत्ती आवडत नाही. त्यांचा अहं दुखावतो. यंदाच्या अर्थसंकल्पाच्या भाषणात सीतारामन यांनी प्रत्येक मुद्दय़ावर स्पष्टीकरण दिल्यानं खासदारांच्या ‘आत्मसन्माना’ला धक्का लागला असावा. आम्हाला काय समजावून सांगता, आम्ही काय अर्थ काढायचा तो काढू, अशा आविर्भावात काही खासदार होते. अनेकांना अर्थसंकल्पाच्या कुठल्याच मुद्दय़ामध्ये रुची नव्हती. मग तासाभराने ते कंटाळले. मोदी बसले असल्यानं भाजपच्या सदस्यांना फार चुळबुळ करता येईना, तरीही बरेच खासदार मधेच उठून गेले. काही परतले. काही परतले नाहीत. काहींना भूक लागली असावी. त्यांपैकी काहींनी मागच्या बाकावर बसून हळूच चॉकलेट खाऊन घेतलं. तृणमूल काँग्रेसच्या काकोली घोष, महुआ मोईत्रा, कल्याण बॅनर्जी, सौगत राय या सदस्यांनी सीतारामन यांच्यावर खरं तर दबाव आणला. कोणी म्हणालं थोडा विराम पाहिजे. हवं तर जेवण घेऊ, मग पुन्हा भाषण सुरू करू.. दोन तास होऊन गेल्यावर अनेकांचा धीर सुटला. आपापसांत गप्पा सुरू झाल्या. जांभया, आळस सगळं सभागृहात पसरत गेलं. मग सीतारामन यांचंही मनौधैर्य खचलं. त्या भाषणांच्या पानावर कमी आणि समोरच्या घडय़ाळात अधिक बघत होत्या. त्यांनाही हे भाषण कधी संपतंय असं झालं होतं. त्यात त्यांची तब्येत बिघडली. दणक्यात सुरू झालेलं भाषण अखेर कासवाच्या गतीनं संपलं. याआधीही दोन तासांहून अधिक वेळ लांबलेली भाषणं झाली आहेत, पण इतकं लांबलचक भाषण कोणी मंजूर केलं? त्याची खरंच गरज होती का? नेतृत्वाचा तसा आग्रह होता का? की सीतारामन यांनाच तीन तास बोलण्याची होस होती?

राजधानीत की राज्यात?

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारानिमित्त राजधानीत होता. अधूनमधून ते राज्यात जाऊन परत येत होते. राज्य गमावलं असलं तरी भाजपला फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत. फडणवीस यांना ते ‘लंबी रेस का घोडा’ म्हणतात. मराठी माणसाचं हिंदी भन्नाट असतं. त्यामुळं दिल्लीत येऊन प्रचार करायचा म्हणजे प्रचार करणाऱ्यालाच धडकी भरते. फडणवीसांचं हिंदी तुलनेत बरं असल्यानं त्यांचा प्रचारात फायदा होऊ  शकेल असं गणित होतं. फडणवीसांनी ही कामगिरी नीट पार पाडली. पण त्यांच्या दिल्लीतील वास्तव्यामुळं ते दिल्लीत रमणार की राज्यातच राहणार, याची चर्चा पुन्हा सुरू झाली. पाच वर्ष शिवसेनेचे शिव्याशाप पचवून त्यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली असल्यानं केंद्रीय मंत्रिपदही सांभाळतील असं काहींना वाटतं. भाजपच्या खासदारांना विचारलं तर म्हणाले, कशाला येतील ते दिल्लीत?  इथं येऊन ते काय करणार आहेत? महाविकास आघाडीचं सरकार आज ना उद्या पडणारच, मग राज्य सांभाळायला नको का कोणी?.. महाविकास आघाडीचं सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही, हा विचार या खासदारांनी इतक्या आत्मविश्वासानं मांडला, की भाजप पुन्हा कमळ मोहीम हाती घेईल की काय, असं वाटावं. तसं होईल किंवा होणारही नाही. राजकीय भविष्य कोणीच वर्तवू शकत नाही. कर्तेकरविते कोणी दोघेच! पण फडणवीसांची राजकीय कारकीर्द नजीकच्या भविष्यात दिल्लीत घडेल की राज्यात, हे बघायचं.

‘श्रेय’

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून अमित शहा आता पायउतार झाले आहेत. त्यांच्या जागी जे. पी. नड्डा यांची नियुक्ती झालेली असल्यानं पक्षाच्या बैठकांमध्ये पंतप्रधान मोदींच्या शेजारी नड्डा बसतात. शहा हेच पक्षाचे सर्वेसर्वा असले तरी अध्यक्षपदाचा मान राखण्यासाठी त्यांनाही पदाधिकाऱ्यांच्या रांगेत बसावं लागतं. पूर्वी अडवाणी वा वाजपेयी पक्षाध्यक्ष नसले तरी त्यांच्या प्रतिमा ठळकपणे लावल्या जात आणि या दोघांबरोबर विद्यमान अध्यक्षाचीही प्रतिमा असे. पण दिल्लीच्या भाजपच्या जाहीरनाम्यात मोदी आणि नड्डा यांना ठळकपणे स्थान दिलं गेलं. पानांवर, फलकांवर शहांचा ठळकपणे फोटो नसेलही, पण दिल्ली विधानसभेत भाजपच्या जागा वाढल्या तर त्याचं ‘श्रेय’ शहांनाच द्यावं लागेल. दिल्लीची निवडणूक त्यांनी एकहाती लढवली आहे. शहांनी ‘शाहीन बाग’विरोधात आक्रमक शाब्दिक हल्ला केला. शाहीन बाग हा परिसर निवडणुकीसाठी अतिसंवेदनशील बनलेला होता. त्यामुळं निवडणूक आयोग आधीपासून दक्ष होता. त्यांनी शाहीन बाग, जामिया या भागांत विशेष अधिकारी पाठवला होता. या अधिकाऱ्यानं तिथल्या लोकांशी चर्चा केली. मतदानाचं महत्त्व पटवून दिलं.

काटेकोर काम

सभागृहात सदस्य इतके आक्रमक होतात, की कोणते शब्द कोणासाठी वापरत आहोत, याचं भान ठेवलं जात नाही. लोकसभेत चर्चा करताना काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदींचं वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द कामकाजातून काढून टाकण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यांनी उच्चारलेल्या दोन शब्दांमुळं गदारोळ सुरू झाला. त्यावर अधीररंजन यांनी स्पष्टीकरण देण्याचा आटापिटा केला. त्यांचा हा सगळा प्रकार केविलवाणा होता. तरीही अधीररंजन यांनी आपण सारे कसे भौतिक जगात वावरतो. आध्यात्मिक जगात वावरणारे कोण असतात, वगैरे शब्दांचे अर्थ सांगायला सुरुवात केली. काही वेळ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला शांत बसून राहिले, मग सदस्यांना म्हणाले की, गडबड होईल असे शब्द वापरायचे टाळा! तरीही गोंधळ सुरू राहिला.

राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू अतिशय काटेकोरपणे कामकाज चालवतात. गेल्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी- ‘‘आम्ही शाळेतील मुलं असल्यासारखं वागवू नका, इथं बसलेल्या अनेक सदस्यांनी मंत्रिपद सांभाळलेलं आहे. कोणी पंतप्रधानपद सांभाळलेलं आहे..,’’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केल. पंतप्रधानांच्या भाषणातील मजकूर कामकाजातून काढून टाकण्याची वेळ क्वचित येते. तसं धाडस कोणी करत नाही. पण राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर मोदींनी दिलेल्या उत्तरातील एक शब्द काढून टाकण्याचा आदेश नायडू यांनी दिला. भाजपचे नेता या ‘हुद्दय़ा’पेक्षा राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा मान मोठा असल्यानं नायडू तो डोळ्यांत तेल घालून जपतात. सभागृहात गमतीजमतीही भरपूर होतात. एका सदस्यानं दूरसंचार मंत्र्यांना ‘बीएसएनएल’बद्दल तक्रारी सांगायला सुरुवात केली- बीएसएनएलचे फोन बंद पडतात. खंडित झालेली सेवा चार-चार दिवस सुरू होत नाही. बीएसएनएल म्हणजे ‘भाई साब नही लगेगा’ झालंय.. ‘बीएसएनएल’चं हे पूर्ण नाव ऐकून रविशंकर प्रसाद यांच्यासह अख्खं सभागृह हास्यात बुडालं!