News Flash

मते.. मतांतरे..

रविवार ,१० मार्च रोजीच्या ‘लोकसत्ता’ मध्ये मधु कांबळे यांचा ‘आंबेडकर विरुद्ध मूलनिवासी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. अलीकडच्या काळात बामसेफने जी मूलनिवासी ही

| March 17, 2013 12:07 pm

रविवार ,१० मार्च रोजीच्या ‘लोकसत्ता’ मध्ये मधु कांबळे यांचा ‘आंबेडकर  विरुद्ध  मूलनिवासी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. अलीकडच्या काळात बामसेफने जी मूलनिवासी ही संकल्पना मांडण्यास सुरुवात केली आहे, त्या अनुषंगाने लिहिलेल्या लेखावरील या वाचकांच्या काही प्रतिक्रिया..

बामसेफ हे जातींचे कडबोळे नाही
कांबळे यांचा लेख वाचून खूप वाईट वाटले. आपण जे लिहिले, त्यामध्ये माहितीचा आपल्याजवळ अभाव आहे असा आमचा समज झाला आहे.
१. ज्या बामसेफच्या एकत्रीकरणाबद्दल आपण लिहिले आहे, ती मूळ बामसेफमधून बाजूला झालेल्या लोकांची कृती आहे. त्याची प्रचीती पुढील वेबसाइटवरून आपणास समजून येईल.
http://unitedblackuntouchablesworldwide.blogspot.in/2013/03/bamcef-unification-conference.html
दुसरी, ज्यांच्या संघटनेला तुम्ही गट म्हणालात, त्यांच्या अधिवेशनाची छायाचित्रे मूलनिवासी नायक दैनिकातून आपणास मिळतील.
२. भारत मुक्ती मोर्चा हे राजकीय संघटन नसून सामाजिक आंदोलनासाठी- राष्ट्रव्यापी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांचे संघटन आहे. ज्यांना तुम्ही कातडीबचाऊ म्हणता तेच लोक तुम्हाला रस्त्यावर दिसतील. दिल्लीला झालेल्या ३ मार्चच्या रॅलीची छायाचित्रे मूलनिवासी नायकमध्ये बघा.
३. बामसेफमधून ज्या लोकांनी पक्ष काढला, त्याचे नाव ‘बहुजन मुक्ती पार्टी’असे असून त्याचे अध्यक्ष न्या. ए. के. अकोदिया हे आहेत.
४. बाबासाहेबांनी जी पुस्तके लिहिली ती उत्कृष्टच आहेत, पण तुम्ही तुमच्या सोयीची मोजकीच वाचलीत की सर्व वाचून बामनांच्या सोयीची आहेत ती मांडत आहात, याबद्दल मनात शंका होत आहे.
५. बामसेफ हे जातींचे कडबोळे नसून मूलनिवासी लोकांचा एक समूह होईल. एकदा वामन मेश्राम अध्यक्ष असलेल्या बामसेफ या राष्ट्रव्यापी संघटनेच्या किमान एका कार्यकर्त्यांशी तरी चर्चा करा.
६. मूलनिवासीसंदर्भात तुम्ही जे लिहिलेत, ते बुद्धांच्या, बाबासाहेबांच्या विज्ञानवादी दृष्टिकोनाच्या अगदी उलट दिशेने म्हणजे नाव, चेहरा मूलनिवासींचा, पण मेंदू विचार करण्यासाठी बामनाच्या ताब्यात दिल्यासारखी तुमची अवस्था आहे. ज्या वंशशास्त्रज्ञाबद्दल  त्यातील काही नावे अशी- प्रा. मायकेल बामशाद तसेच कोलकात्याचे पार्थ पी. मुजुमदार, संघमित्रा साहू, अनामिका सिंह, जी. हिमाबिंदू, झेलम बॅनर्जी, टी. सीतालक्ष्मी, सोनाली गायकवाड, आर. त्रिवेदी, फिलिप एण्डिकॉट वरील सवार्ंना बोलावण्यासाठी फक्त भारताच्या कोर्टात एक केस दाखल करा. उगाच महात्मा फुलेंचे नाव चुकीच्या संदर्भाने घेऊन बदनाम करू नका. आपण एकदा सविस्तर बामसेफच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करा.  बामनांशीही  चर्चा करा आणि  DNA म्हणजे नेमके काय हे समजून घ्या, विचार करा आणि मग लिहा. असे फक्त मूलनिवासीच  तुम्हाला सांगू शकतो. तरी बामनाच्या मेंदूने विचार न करता स्वत:च्या डोक्यात मेंदू असेल तर त्याचा वापर करावा.        
– प्रवीण राजीगरे

प्रश्नच निर्थक
इतिहास असं सांगतो की मानवाची उत्पत्ती आधी आफ्रिका खंडात झाली आणि नंतर मानवाचे इतर ठिकाणी स्थलांतर झाले. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर आपण सर्वच उपरे आहोत. त्यामुळं मूलनिवासी कोण हा प्रश्नच निर्थक आहे असं मला वाटतं. ब्राह्मणांचाच काय, कुणाचाही द्वेष निव्वळ स्वार्थासाठी करू नये अशी बुद्धांची शिकवण आहे. पण हे सांगायला गेलं तर आपणच पांढरपेशे ठरतो, हीच खरी शोकांतिका आहे..
-आशित कांबळे

अयोग्य विचार फेटाळा
कांबळे यांचा लेख वाचला.  हजारो ब्राह्मणांच्या मनातील विचार तुम्ही मांडले आहेत. जातीयवादाच्या (चातुर्वण्र्य) ब्राह्मणी विचारांना आंबेडकर आणि फुले यांनी विरोध केला, सरसकट सर्व ब्राह्मणांना नव्हे. परंतु आता सर्व अयोग्य बाबींचे खापर ब्राह्मणांवरच फोडण्याची फॅशन आली आहे. मानवाच्या उत्क्रांतीत, विशेषत: सामाजिक उत्क्रांतीत हे महत्त्वाचे पाऊल असल्याने जातीयवाद आणि जुन्या धर्मग्रंथांमधील सर्व प्रकारचे अयोग्य विचार ‘वसुधैवकुटुम्बकम’ साध्य करण्यासाठी फेटाळले गेले पाहिजेत. आपला लेख शौर्य दर्शवितो आणि आपणच बाबासाहेब आणि फुले यांचे खरे अनुयायी असल्याचे सिद्ध करतो. आपण भारतीय म्हणून पुढील पिढीसमोर जातीचा नि:पक्षपाती इतिहास आपल्या पूर्वजांच्या चुकांसह आणि आपल्या समाज सुधारकांसह सकारात्मक पद्धतीने मांडला पाहिजे.
डॉ. मंगेश पी. मोहरील, अकोला

आंबेडकरी पद्धतीने छाननी
‘मूळनिवासी विरुद्ध आंबेडकर’ हा लेख वाचला. तथाकथित मूळनिवासींच्या व्याख्यानाची  कांबळे यांनी आंबेडकरी पद्धतीने छाननी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. अलीकडेच मी ‘मूलनिवासीवाद का झूठ’ हे समता सैनिक दलाचे पुस्तक वाचले आणि आपल्याप्रमाणेच माझे मत झाले. त्याचबरोबर आपण शूद्र आणि अस्पृश्यता या संदर्भातही ठोस आणि ऐतिहासिक दस्तऐवज वाचला. मी आंबेडकरवादी असून मीडिया आणि इतिहासाचा विद्यार्थी याची स्तुती करील, कारण माझ्या पिढीतील बहुसंख्य लोक संशोधन करीत नाहीत, केवळ नेत्यांकडून मिळालेल्या माहितीवर प्रतिवाद करतात.
विनय सोनुले.

पटणारे विचार
आंबेडकर विरुद्ध मूळनिवासी हा आपला लेख वाचला. अत्यंत माहितीपूर्ण लेख आहे. जेव्हा २००७ मध्ये मी ‘बामसेफ’च्या बैठकीला हजर होतो तेव्हा माझ्या मनात विचार होता की, ‘बामसेफ’चा सदस्य ‘जय भीम’ म्हणण्याऐवजी ‘जय मूळनिवासी’ असे म्हणतो. हे आंबेडकर यांच्या विरोधातील विचार आहेत. मी आपल्याशी पूर्णपणे सहमत आहे.  डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीबद्दल आपल्याकडून अधिक माहितीची अपेक्षा करतो.
नवनाथ सरवदे, अमरावती.

लेख अपुऱ्या माहितीवर
मधु कांबळे यांना अपूर्ण माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यासारखी माणसे आम्हाला हवी आहेत. गेल्या ३ मार्च रोजी ज्या ‘बामसेफ’वाल्यांनी अखेरीला सभेचे आयोजन केले होते आणि त्याबाबत आपण ज्यांचा उल्लेख हुकूमशहा असा केला ते दिल्लीत अतिविशाल सभेला संबोधित करीत होते. आपल्या गैरसमजाला आता मूळनिवासी कधीही फसणार नाहीत.  टिळकांनी आपल्या पुस्तकांत आम्ही युरेशियातील ब्राह्मण आहोत, असे लिहिले आहे का, डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये नेहरू लिहितात की, आम्ही विदेशी ब्राह्मण आहोत, सर विल्यम जोन्स यांच्या मते ब्राह्मण हंगेरीतून आले आहेत. ऋग्वेद आणि इराणच्या ग्रंथात, ब्राह्मण अंटाक्र्टिकातून आल्याचे म्हटले आहे. जरा हे लिहा, तरच आम्ही तुम्हाला सच्चे मानू. आपण ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद या दोघांच्या विरोधात आहोत, असे १९३५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. आपण हे लिहिलेत तर मी तुम्हाला आंबेडकरवादी म्हणेन.
– मनोज साळवे.

चळवळीला प्रोत्साहन मिळेल
कांबळे यांचा लेख वाचला. आज भारतात लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्याचे मूळ कारण ब्राह्मणवाद आहे. ब्राह्मणवादामुळे असमानता, जातीयवाद, गुलामगिरी, बेरोजगारी, बॉम्बस्फोट, नक्षलवाद जन्मले आहेत. ‘बामसेफ’ आणि भारत मुक्ती मोर्चा या संघटनेने आम्हाला महापुरुषांनी दाखविलेल्या वाटेवरून जावयास शिकविले आहे. या महापुरुषांनी वरील समस्या सोडविण्यासाठी आपले आयुष्य वेचले म्हणजेच ते ब्राह्मणवादाविरुद्ध लढले. आपल्या लेखात आपण ‘बामसेफ’वर टीका केली आहे. त्यामुळे देशव्यापी चळवळीला प्रोत्साहन मिळेल.
– अजय कांबळे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:07 pm

Web Title: people reaction on article by madhu kamble on bamcef
टॅग : Dr Babasaheb Ambedkar
Next Stories
1 अमृतमहोत्सवी ‘युवक’
2 कर्जबुडव्यांना प्रसिद्धीचा उपाय जुनाच..
3 संमती वय, कायदा आणि समाज
Just Now!
X