News Flash

हिंसा, द्वेषाचे ‘कोवळे कोंब’..

पेशावरमधील शाळेवर झालेल्या निर्घृण हल्ल्यानंतर त्या दुर्दैवी मुलांना श्रद्धांजली वाहणे, त्यावर मुलांची भाषणे, माध्यमांमधून मुलांच्या मुलाखती अशा तात्कालिक प्रतिक्रिया उमटल्या.

| January 2, 2015 12:26 pm

पेशावरमधील शाळेवर झालेल्या निर्घृण हल्ल्यानंतर त्या दुर्दैवी मुलांना श्रद्धांजली वाहणे, त्यावर मुलांची भाषणे, माध्यमांमधून मुलांच्या मुलाखती अशा तात्कालिक प्रतिक्रिया उमटल्या. काही मुलांची मनोगते प्रक्षोभक या शब्दात वर्णन करण्याजोगी वाटली.  यामुळे बालवयातच धार्मिक द्वेषाची बीजे पेरली जाऊन त्याला गंभीर वळण लागू नये यासाठी  काय करावे, याची चर्चा करणारा लेख..

नुकताच पेशावरच्या सैनिकी शाळेत झालेल्या मुलांच्या निर्घृण हत्याकांडाचा सर्व थरांतून निषेध होत आहे. पण हा निषेध करीत असताना याच्या शाळेतील मुलांमध्ये उमटणाऱ्या उग्र प्रतिक्रिया व या घटनेचे साक्षीदार असणाऱ्या मुलांच्या ‘आम्ही मोठे होऊन या अतिरेक्यांचा र्निवश करू,’ अशा गर्जना. हा बालमानसशास्त्रज्ञांसाठीच नव्हे तर एकूणच समाजासाठी मोठा चिंतेचा विषय आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या आझाद मैदानावरील हिंसाचारात लहान मुलांचा थेट सहभाग होता. गुजरात दंगली, ९३चे साखळी बॉम्बस्फोट, २६/११चा हिंसाचार व अधूनमधून उसळणाऱ्या जातीय दंगलींमध्ये मुले भरडली जातातच; पण आजवर जातीय हिंसाचार व दहशतवादाची मूक साक्षीदार असलेली मुले पेशावरच्या घटनेमुळे थेट दहशतवादात खेचली गेली आहेत. या घटनेचा व माध्यमांमधून व समाजात धार्मिक हिंसाचाराचा मुलांच्या मानसिकतेवर कसा, काय परिणाम होऊ शकतो व त्यासाठी त्यांच्याशी योग्यरीत्या संवाद साधून शालेय जीवनातच त्यांची वैचारिक बैठक नीट बसविली नाही तर बालवयातच धार्मिक द्वेषाची बीजे पेरली जाऊन भविष्यात अशा घटनांची ‘चेन रिअ‍ॅक्शन’च निर्माण होऊ शकते. पेशावरच्या घटनेनंतर बऱ्याच शाळांमधून दोन मिनिटे शांतता पाळणे, यावर मुलांची भाषणे, माध्यमांमधून मुलांच्या मुलाखती अशा तात्कालिक प्रतिक्रिया उमटल्या; पण त्यांच्या विचारांना योग्य दिशा द्यायची झाल्यास बालमानसशास्त्रातील काही तत्त्वे समजून निश्चित पावले उचलणे, संवादाच्या योग्य पद्धती अंगीकारणे आवश्यक आहे.
पेशावरची घटना व एकूणच जातीय हिंसाचाराविषयी मुलांच्या मानसिकतेचा विचार करताना आपणा सर्वाकडून होणारी पहिली चूक म्हणजे मुले या विषयाकडे गांभीर्याने बघत नाहीत व विचार करीत नाहीत, हा आपला गैरसमज. मुले फक्त त्याच्या खेळांमध्ये व त्यांच्या विश्वात मग्न असतात व समाजात अवतीभवती काय घडते याच्याशी त्यांना काही देणे-घेणे नसते. तसेच त्यांनी याबद्दल मत विचारू नये, बनवू नये हा समज सर्वप्रथम आपण झुगारून दिला पाहिजे. बालमानसशास्त्रज्ञही अलीकडच्या काळापर्यंत हा विषय गांभीर्याने घेत नव्हते. काही वर्षांपूर्वी ‘गुजरात दंगली’मध्ये होरपळलेल्या व इतर मुलांमध्ये होणाऱ्या मानसशास्त्रीय परिणामांचा एक संशोधनात्मक अभ्यास ‘निमहान्स’ या मानसशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रामाची काशी समजल्या जाणाऱ्या संस्थेने प्रकाशित केला. यानंतर मात्र बालमानसशास्त्रज्ञांचे डोळे उघडले व या विषयाचा विचार तरी सुरू झाला; पण पालक, शिक्षक, शाळा अजूनही हा विषय तितकासा गांभीर्याने घेत नाहीत. अतिरेकी संघटना धार्मिक द्वेषाचा परिणाम झालेली मुले पुढे ट्रेनिंग कॅम्प व अतिरेकी घडविण्यासाठी करतात. आम्ही मात्र मानसशास्त्राचे उत्तम ज्ञान असूनही हा द्वेष पुसण्यासाठी या ज्ञानाचा काहीच उपयोग करीत नाही.
हा संवाद मुलांशी साधताना हे विचार रुजविण्यासाठी योग्य संधी निवडणे सर्वप्रथम गरजेचे असते. अशा घटनांचे वार्ताकन किंवा बातम्यांच्या निमित्ताने घरात चर्चा सुरू असताना बऱ्याचदा मुले याविषयी प्रश्न विचारतात. बऱ्याचदा अभ्यास करीत असताना किंवा इतर वेळी शिक्षकांनी प्रश्न विचारला तर मुले दंगलींची व हिंसाचाराची उदाहरणे देतात. एका पालकाने मुंबईत कुठले पर्यटन स्थळ पाहायचे, असे विचारल्यावर पाच वर्षांच्या मुलाने ‘सीएसटीवर कसाबने मारलेल्या गोळ्या आणि ताज हॉटेल,’ असे उत्तर दिले. अशा घटना मुलांशी याविषयी चर्चा करण्याची उत्तम संधी असते.
योग्य वेळी चर्चा सुरू झाल्यास याविषयी मुलांची मते ते मोकळेपणाने मांडतात. अशा वेळी आपले मत मुलांवर ठसविण्यापेक्षा परिस्थिती व दोन्ही बाजू त्यांच्यासमोर ठेवल्यास, त्यांना त्यांची मते बनविण्याची संधी दिल्यास त्यांचा विचार मनात रुजतो व दीर्घकाळ टिकतो. म्हणून त्यांना सर्वप्रथम ‘तुम्हाला काय वाटते?’ ही चर्चेची योग्य सुरुवात ठरते. पाच ते सात वर्षांपर्यंत हिंसाचारात उत्सुकता असते. सात ते १० वर्षांपर्यंत मृत्यूची संकल्पना व मृत्यूची भीती मनात रुजू लागते आणि घटनांकडे प्रामुख्याने नायक व खलनायक कोण? आपण कोणाच्या बाजूने? आणि आपण हरलो की जिंकलो, हे प्रश्न अशा घटनांबाबत मनात रुंजी घालतात. या प्रश्नांना पालकांकडून योग्य उत्तरे मिळाली नाहीत तर मात्र मुले एकमेकांशी चर्चा करून किंवा स्वत:च विचार करून टोकाची मते बनवितात. अशा वेळी हिंसाचार केलेली व्यक्ती त्या परिस्थितीत व त्याला चुकीची शिकवण मिळाल्याने तशी वागली आहे आणि याचा अर्थ त्याचा धर्म वाईट आहे, असे मुळीच नाही हे मुलांना आवर्जून सांगितल्यास कळते. यासाठी त्यांना त्यांच्या सभोवतालची उदाहरणे व त्यांच्याशी आधी भांडण असलेल्या व आता चांगली मैत्री असलेल्या मित्राचे उदाहरण दिल्यास हरकत नाही. तसेच ही चर्चा करताना ‘चांगले कोण’, ‘वाईट कोण’ या अंगाने चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीमध्ये व धर्मामध्ये सत्प्रवृत्ती असतात व प्रत्येक प्रवृत्तीचा नैसर्गिक प्रवास व अंत कसा असतो, हे समजून सांगितल्यास मुलांना त्याविषयी मत बनविणे सोपे जाते.
बऱ्याचदा जातीय हिंसाचाराचे प्रतिबिंब मुलांच्या खेळांमध्ये दिसते व त्यांच्या खेळांचे नीट निरीक्षण केल्यास त्यांची मते कळू शकतात. साधारण आठवीनंतर खेळांमध्ये बिनसल्यास जातिवाचक शिव्या देण्याचे प्रकार घडतात. अशा गोष्टींना कडक शिक्षा दिल्यास बंड करण्याची कुमारवयीन प्रवृत्ती आणखीनच उफाळून येते व धार्मिक द्वेष कमी होण्याऐवजी वाढतो. म्हणून शांततेतच मुलांशी संवाद साधावा लागतो. मुलांच्या खेळातील हे प्रतिबिंब ओळखून लादेनवरील लष्करी कारवाईनंतर अमेरिकेत ओसामाला सैनिक बनून मारण्याचा व्हिडीओ गेम बाजारात आला व खूप प्रसिद्ध झाला. आपल्याकडेही कार्टून्स आणि व्हिडीओ गेम्समध्ये मुलांना रिझविण्यासाठी हिंसाचाराचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपले मूल पाहत असलेले कार्टून एकदा तरी स्वत: पाहावे. यात दाखविला जाणारा हिंसाचार हा धार्मिक नसला तरी तो सुप्त मनात वारंवारतेमुळे हिंसक वृत्ती रुजवितो व पुढे धर्म व दंगली तो व्यक्त करण्याची संधी देतात.
मुलांनी धार्मिक हिंसाचाराविषयी प्रश्न विचारल्यास व याविषयी चर्चा करताना त्यांच्यात चांगले विचार रुजविण्याची उत्तम पद्धत म्हणजे जीवनकौशल्य कार्यशाळा. खरे तर जीवनकौशल्ये शिकविणारी ही कार्यशाळा शालेय अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग असल्याचे अजून शाळांनाही नीट माहिती नाही. ही कार्यशाळा कुठे जाऊन हजेरी लावण्यासारखी गोष्ट नाही तर पालकांनी घराच्या बैठकीतच हसत-खेळत मुलांना शिकविण्याची गोष्ट आहे. त्यातच ‘सेल्फ अवेअरनेस’ म्हणजे ‘स्व’ची जाणीव व ‘एम्पथी’ म्हणजेच इतरांच्या भावना स्वत:च्या म्हणून अनुभवण्याची क्षमता ही दोन जीवनकौशल्ये आवर्जून शिकविणे गरजेचे असते. ‘मिरर न्यूरॉन्स’ हा या दोन विचारांशी निगडित मेंदूचा भाग लहान मुलांमध्ये सर्वाधिक जागृत असल्याने या दोन गोष्टी ते लवकर शिकतात. तसेच धार्मिक हिंसाचाराचे नकारात्मक चित्र समोर आल्यास या दोन्ही भावनांची मोडतोड याच वयात जास्त होते. दुर्दैवाने ‘मिरर न्यूरॉन’ या संकल्पनेचा वापर अतिरेकी संघटनाच जास्त करीत आहेत.
उच्च व मध्यमवर्गीयांच्या मुलांप्रमाणेच व झोपडपट्टीतील, भीक मागणारे व रस्त्यावरील भटक्या मुलांवर जातीय हिंसाचाराचा परिणाम होतो; पण त्यात वेगळेपणा असतो. या मुलांमध्ये जातीय हिंसाचार हा समूहात सामील होऊन मान्यता मिळविण्याचा मार्ग असतो. वैयक्तिक हिंसा हा या मुलांसाठी दैनंदिन जीवनाचा भाग व त्यांची जीवनशैली असते म्हणून धार्मिक दंगली, हिंसाचारात त्यांना वेगळे ‘आव्हान’ वाटत असते. यातील बरीच मुले लैंगिक शोषित व व्यसनाधीन असल्याने सामूहिक हिंसाचारात त्यांना समाजाविरोधात राग व्यक्त करण्याची संधी मिळते. त्यातच निवडणुकांच्या काळात प्रचारात व नंतर मिरवणुकीत भगवा, हिरवा कुठलाही गुलाल उधळण्यासाठी ही मुले ‘पेड’ श्रोते असतात. त्यातून त्यांचे धार्मिक द्वेषासाठी वातावरण निर्माण करणे सुरूच असते. अशा मुलांना जीवनकौशल्ये शिकविणे व्यर्थ ठरते. त्यापेक्षा त्यांना शिक्षण देणे, व्यसनमुक्त करणे व त्यांचे लैंगिक शोषणापासून रक्षण करणे हेच त्यांची हिंसकता कमी करते.
मानसशास्त्रात आत्महत्या, व्यसनाधीनता, गुन्हेगारी यात आनुवांशिकता असल्याचे मानले जाते. मानसशास्त्रज्ञ अशा आनुवांशिकता ओळखून लहान वयातच ‘कोपिंग मॅकॅनिझम’ म्हणजे ही प्रवृत्ती कमी करण्याचे उपाय सुचवितात. धार्मिक हिंसाचार हा असाच आमच्या समाजात आनुवांशिक आहे व मुलांशी या हिंसाचाराविषयी सकारात्मक चर्चा करणे हा ही आनुवांशिकता कमी करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. आम्ही दर वर्षी २६/११, ६ डिसेंबरच्या आठवणी जागवतो, पण लहान वयात रुजत असलेला धार्मिक द्वेष मिटविण्यासाठी काहीच करीत नाही. लहान वयात जातीय द्वेषाचा वापर करून अतिरेकी निर्माण करणाऱ्या अतिरेकी संघटनांवर आपण टीका करतो, पण जगाला जास्त हानी ही दुर्जनांच्या दुष्कृत्यांमुळे नाही तर सज्जनांच्या शांततेने झाली आहे. म्हणून लहान मुलांशी धार्मिक सहिष्णुतेची चर्चा करण्यास पालक, शिक्षक, शाळा, माध्यमे सर्वानीच सक्रिय व्हावे.
*लेखक बालरोगतज्ज्ञ आहेत.
*उद्याच्या अंकात महेंद्र दामले यांचे ‘कळण्याची दृश्यं वळणे’ हे नवे सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 12:26 pm

Web Title: peshawar school students tender victims of violence
Next Stories
1 अल् काइदाची शिकार कोण?
2 आपली माती आपली निर्मिती
3 ‘जलदगती’ धोरणाची लक्षणीय लवचीकता
Just Now!
X