टाळेबंदीमुळे घरात राहण्यासाठी मिळणारा वेळ सत्कारणी लावत घरातील सदस्यांबरोबर नाते घट्ट करण्याची संधी आहे. त्यात घरातील पाळीव सदस्यही अर्थातच आले. भीतीच्या, संशयाच्या या वातावरणात घरातील प्राण्यांची काळजी वाटणे आणि त्याच वेळी त्यांच्यामुळे आपल्याला किंवा कुटुंबाला काही होणार नाही ना याची धास्ती वाटणे स्वाभाविक आहे. मात्र योग्य काळजी घेतल्यास आजारपणाचा धोका टाळता येतो. मुळात आता जगाला भीतीने ग्रासलेला करोना हा श्वान, मांजर किंवा पाळीव प्राण्यांकडून संक्रमित होत असल्याचा ठोस पुरावा अद्याप नाही. त्यामुळे शंका मनात न आणता प्राण्यांनाही आवर्जून वेळ द्या. त्यांची निगा राखताना त्यांच्याबरोबरील नाते अधिक घट्ट करता येईल. त्याचबरोबर काही बाबींची काळजीही घेणे आवश्यक आहे.

उन्हाळ्याचाही विचार हवा

वाढत्या उन्हाळ्याचा प्राण्यांनाही त्रास होतो. काही वेळा प्राणी कमी खातात, आळसावलेले असतात. या काळात त्यांचे केस गळण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे रोज दोनदा तरी केस विंचरावेत. मोठय़ा केसांच्या प्रजातीच्या प्राण्यांचे काही प्रमाणात कापले, म्हणजे केसांची लांबी कमी केली तरी चालू शकते. मात्र कोणत्याही प्रजातीचे केस पूर्ण काढून टाकू नयेत. प्राण्यांचे केस हे बदलणाऱ्या ऋ तुमानानुसार त्यांना संरक्षण देतात. परजीवी कीटकांचा प्रादुर्भावही या काळात अधिक होते. त्यासाठीची औषधे वेळोवेळी फवारणेही आवश्यक. फिरण्याच्या वेळा या कडक उन्हापूर्वी म्हणजे सकाळी साधारण ९ पूर्वी किंवा ऊन उतरल्यावर म्हणजे साधारण ५.३० नंतर असावी. घरात किंवा बाल्कनीत प्राण्यांच्या बसण्याची जागा फार उन्हात असू नये. रोज अंघोळ घालण्याची आवश्यकता नसली तरी आठ ते दहा दिवसांनी श्वानांना अंघोळ घालायला हरकत नाही. मात्र, त्यांची त्वचा कोरडी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.