कल्याणच्या पिसवली जिल्हा परिषद शाळेला चौकट अशी नाहीच. म्हणून वर्षभरात सुट्टय़ा किती, हजेरी किती, असल्या हिशोबात इथले शिक्षक अडकलेले दिसत नाहीत. चौकस, स्वयंशिस्त, स्वयंपूर्ण विद्यार्थी घडविणे हेच येथील शिक्षकांचे ध्येय आहे. त्यासाठी वेळोवेळी अध्यापनाच्या पारंपरिक चौकटी मोडण्याचे कामही शिक्षक करतात.

विद्यार्थ्यांना नोकरी वा व्यवसायाभिमुख बनविण्यातच आपले इतिकर्तव्य आहे, असे पिसवलीच्या शाळेला वाटत नाही. इथला विद्यार्थी केवळ नोकरदार वा व्यावसायिक न बनता त्याने अभिनेता, दिग्दर्शक, वारकरी, उत्तम वक्ता, कीर्तनकार-प्रवचनकार, समाजसेवक, राजकारणी बनावे, थोडक्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत मुशाफिरी करणारा आपला विद्यार्थी असावा, या हेतूने पिसवलीची ही जिल्हा परिषद शाळा गेली नऊ वर्षे कार्यरत आहे.

पिसवली कल्याण-डोंबिवलीपासून तीन किलोमीटरवर असलेले गाव. वाढत्या नागरीकरणामुळे गाव आता नावापुरते उरले आहे. चोहोबाजूंनी इमारती, झोपडय़ा, चाळी अशी गावाची सध्याची परिस्थिती आहे. शाळेच्या चोहोबाजूंनी धनदांडग्यांच्या शाळा; पण या वातावरणातही विद्यार्थिसंख्येचा पट, थोडक्यात अस्तित्व शाळा उत्तमरीत्या टिकवून आहे, ते इथल्या काही मूलभूत तत्त्वांच्या बळावर.

शाळा हे आपले दुसरे घर आहे. घर जसे आपण टापटीप, स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे सरस्वतीचे हे मंदिर नियमित स्वच्छ ठेवले पाहिजे, हा शाळेचा पहिला संस्कार. नव्या ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन पद्धतीची कास धरत शाळेचा डिजिटल कायापालट करण्यात आला आहे. गावातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे, हे शाळेचे उद्दिष्ट. शाळेतील उपक्रमशील शिक्षक अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाने येथे विविध उपक्रम राबविले जातात. सध्याच्या घडीला पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात मिळून शाळेत साडेचारशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील अध्ययन आणि अध्यापनाचा दर्जा उत्तम रीतीने सांभाळला जात आहे. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना अन्य शाळेत टाकावे असे कधी वाटत नाही.

लोकशाही पद्धतीने कारभार 

आपल्या देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो म्हणजे काय, हे बालपणीच विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर शाळेतील प्रत्येक कामासाठी मंत्रिमंडळ नेमले जाते. त्याकरिता निवडणूक घेतली जाते. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतो. त्याकरिता विद्यार्थ्यांमधून निवडणूक आयोगासारखी यंत्रणा निर्माण केली जाते. उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या जातात. पात्र उमेदवार विद्यार्थ्यांना शाळेच्या मधल्या सुट्टीत प्रत्येक वर्गात जाऊन प्रचार करण्याची संधी दिली जाते. गुप्त मतदान पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या आठ उमेदवारांची (विद्यार्थ्यांची) नावे एका कोऱ्या कागदावर लिहून विद्यार्थ्यांनी ती मतपेटीत टाकायची असतात. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची नावे घोषित केली जातात. त्यामधून मग मुख्यमंत्री, स्वच्छता, क्रीडा, आरोग्य, गृह, सहल, नियोजन अशा पद्धतीने मंत्री नेमले जातात. मंत्रिमंडळ कार्यरत झाले की वर्षभर शाळेचे व्यवस्थापन मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य मंत्री, शिक्षकांच्या सहकार्याने केले जाते. उदा. शाळेतील नियमित झाडलोट, परिसर स्वच्छतेचे उपक्रम स्वच्छतामंत्र्याच्या नियंत्रणाखाली पार पाडले जातात. आरोग्यमंत्री शाळेत कोणी विद्यार्थी आजारी असेल तर शिक्षकांना त्याची माहिती देणे तसेच शाळेत आरोग्य शिबीर लावण्याबाबत शिक्षकांना सुचवितो. शाळेतील सुविधा व नियोजनाबाबत दर महिन्याला शाळेचा मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची बैठक घेतो. अशा प्रकारे नागरिकशास्त्रातील लोकशाहीचे धडे अभ्यासताना वर्षभर विद्यार्थी लोकशाही पद्धतीचा प्रत्यक्ष अभ्यास मंत्रिमंडळाच्या माध्यमातून करतात.

गाव-शाळा सुसंवाद

गावाने शाळेकडे आले पाहिजे, असे एक शाळेचे सूत्र आहे; परंतु बहुतांश पालक शाळेत येत नाहीत. त्यामुळे दर दोन महिन्यांनी काही तरी कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थी पिसवली गावात घरोघरी जातात. शाळेत चाललेल्या उपक्रमांची माहिती कुटुंबीयांना देतात. गावातील प्रत्येक मूल शाळेत आले पाहिजे यासाठी आग्रही असतात. या गाठभेट उपक्रमातून काही दानशूर पालक शाळेला पुस्तक, वस्तुरूपाने आवश्यक असलेली एखादी वस्तू भेट देतात.

शाळेत सप्ताह

राष्ट्रपुरुष, हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी शाळेत पारायण सोहळे आयोजित केले जातात. उदा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एकोणीस दिवस अगोदर शिवचरित्राचे पारायण केले जाते. दररोज विद्यार्थ्यांना साध्या सोप्या भाषेत शिवाजी महाराजांचा जीवनपट सांगितला जातो. महाराजांचा जन्म, जिजाबाईंची शिकवण, मावळे, महाराजांचे गुरू, स्वराज्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न, महत्त्वाची युद्धे यांची माहिती पारायण सोहळ्यातून दिली जाते. त्यावर आधारित प्रश्नमंजूषेचा उपक्रम मग शिवजयंतीच्या दिवशी घेतला जातो. इतिहासाच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ग्रहणशक्तीला उत्तेजन देण्यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरतो. ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून नऊ दिवस शाळेत दररोज एका हुतात्म्याची माहिती दिली जाते.

नाटय़ प्रशिक्षण

अभिनयाची कार्यशाळा अशी पिसवलीच्या शाळेची आणखी एक ओळख. शिक्षक अजय पाटील हे स्वत: नाटय़लेखन व दिग्दर्शन करतात. गेल्या नऊ वर्षांत शाळेच्या विद्यार्थ्यांनी नाटय़ सादरीकरणात जिल्हा, राज्यस्तरावर ५०हून अधिक बक्षिसे मिळवली आहेत. राज्य बाल नाटय़ महोत्सवात भाग घेणारी पिसवली ही एकमेव शाळा आहे. विद्यार्थ्यांना संहितावाचन, पाठांतर यांची सवय लागते. आकलनशक्ती वाढावी तसेच विद्यार्थ्यांमधील नाटय़विषयक कलागुण वाढीस लागावे हा नाटक उपक्रमामागील उद्देश आहे. ‘आम्ही फुले बोलतोय’, ‘आमच्या गुरुजींची गाडी’, ‘धुळवड’, ‘बंधारा’ असे लघुचित्रपट शिक्षक, विद्यार्थ्यांच्या एकत्रित सहभागातून निर्माण करण्यात आले आहेत.

अवांतर वाचन

मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी म्हणून गोष्टीरूप पुस्तकांबरोबर नाटक, चरित्र, कादंबरी, कवितासंग्रह विद्यार्थ्यांना आवडीप्रमाणे उपलब्ध करून दिली जातात. शाळेचे माजी विद्यार्थी, दानशूर गावकऱ्यांकडून शाळेला भेट म्हणून विद्यार्थ्यांच्या आवडीची पुस्तके भेट म्हणून येतात. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी अभ्यासाबरोबर नियमित काही तरी वाचत असतो. राष्ट्रपुरुषांची जयंती, पुण्यतिथीच्या दिवशी त्या राष्ट्रपुरुषाचे स्मरण म्हणून विद्यार्थ्यांकडून त्यांच्या जीवनपटावर भाषणे करवून घेतली जातात.

सण-उत्सव

वर्षांतील सर्व सण, उत्सव साजरे केले जातात. पर्यावरणाचे संवर्धन, प्रदूषण होणार नाही याची कशी काळजी घ्यावी याचे धडे हे उत्सव साजरे करताना दिले जातात. होळीच्या दिवशी शाळेच्या आवारात रंगांचे पाणी वापरून रंगपंचमी खेळली जाते. अधिक पाणीउपसा होऊ नये म्हणून कोरडय़ा रंगांचा वापर केला जातो. शाळेत दीपोत्सव साजरा केला जातो. सणांच्या साजरीकरणातही विद्यार्थ्यांच्या चौकस, वैज्ञानिक बुद्धीला आव्हान देणारे काही ना काही असते. उदा. दीपोत्सव साजरा करताना पहिल्या दिव्याचा शोध ते बाजारात आता आलेले नवीन दिवे याची माहिती दिली जाते. काही विद्यार्थी उत्तम गायक, वादक असतात. त्यांच्या पुढाकाराने आषाढी एकादशीला गावातून टाळ, मृदुंगाच्या गजरात गावातून वारकऱ्यांच्या वेशात सजविलेल्या मुला-मुलींची दिंडी काढली जाते. झाडांचे महत्त्व व प्रत्येकाने वृक्षारोपण करावे म्हणून गावातून वृक्षदिंडी काढली जाते. गाव, शाळा परिसरांत पावसाळ्यात दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

छंद वर्ग

दिवाळी, मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात हस्तकला, कागदकात्रण, सौरचूल वापर, अभिनय, गायन, वादन यांचे छंद वर्ग आयोजित केले जातात. विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे या वर्गात सहभागी होऊ शकतात. क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर अन्य प्रांतांतही विद्यार्थ्यांची मुशाफिरी असावी या उद्देशातून पिसवलीची ही शाळा अनंत कार्यरत आहे. ‘वर्षभर चालणारी शाळा’ अशा शब्दांत गट शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांनी या शाळेचा गौरव केला आहे. शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळा प्रगतीची पुढची पावले टाकत राहणार आहे.

 

संकलन – रेश्मा शिवडेकर

eshma.murkar@expressindia.com

भगवान मंडलिक