विद्यार्थ्यांना लिहते करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ब्लॉग बेंचर्स या स्पध्रेत विद्यार्थ्यांना समलिंगी संबंधांच्या संदर्भात सनातन्यांच्या बुरसटलेल्या भूमिकेवर तुटून पडणाऱ्या ‘लोकसत्ता’त ३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘समलिंगी समानता’ या अग्रलेखावर त्यांची मते नोंदविण्याची संधी देण्यात आली होती. यावर विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मतांपैकी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील पियुष देशपांडे या विद्यार्थ्यांने मांडलेल्या विचारांना प्रथम पारितोषिक देण्यात आले आहे.

Untitled-12
लैंगिकता आणि लैंगिकतेशी संबंधित विषयांबाबत सद्यकालीन भारतवर्षांची मानसिकता केवढी मागास आहे याचा साक्षात्कार हा पदोपदी; म्हणावयास घरोघरी होतच असतो. सोशल मीडियावर स्वत:च्या सदाचरणाची प्रौढी मिरवणारी, स्वयंघोषित न्यायकर्त्यांचा आव आणणारी संस्कृतिरक्षक अशी मंडळी, ही नाक्यावरच्या कट्टय़ांवर misogynist, sexist  आणि हिडीसपणाची किनार असलेल्या अश्लील असल्या विनोदांवर मात्र टाळ्या पिटतात. भारतीय समाजाची, ‘लैंगिकता’ या विषयावर जी मूग गिळून गप्प बसण्याची दांभिक प्रवृत्ती आहे त्यामुळे कुटुंबापरत्वे होऊ पाहणारा पारदर्शी, स्पष्ट, ज्ञानदायक सुसंवाद, एखाद्या अडगळीच्या वस्तूप्रमाणे मनाच्या फडताळात बंदिस्त झाला. सांप्रत काळात लैंगिकतेस आपण मिथ्या नतिक-अनतिकतेच्या बेडय़ांमध्ये अडकवून तिच्या नसíगक-अनसर्गिकतेबद्दल चर्चा करत बसलोय याउपर दैवदुर्वलिास आणिक तो काय? समाजाने सूत्रबद्धरीत्या(?) रचलेल्या रचनेस झिडकारून जो स्वत:ची स्वतंत्र अशी रचना निर्माण करू पाहतो, जो मानवी मनाच्या भ्रामक संकल्पना मोडून चाकोरीबाहेरील विचार करू पाहतो व त्या संलग्न कृती करण्याचं धाडस दाखवतो; समाज व्यवस्थेने नेहमीच ती कृती ही निषिद्ध घोषित करून, त्या व्यक्तीस अनतिक आणि म्हणूनच बहिष्कृत ठरवलं आहे. लैंगिकतेसंदर्भातील अर्वाचीन भारताची विचारसरणी किती प्रागतिक आणि उदारमतवादी होती हे कोणास वेगळं सांगावयाची गरज नाही- पोथीनिष्ठ मनुवाद्यांना तर नक्कीच नाही. लैंगिकतेविषयी असलेल्या अचाट, अफाट, विलक्षण कल्पनारम्यता, लैंगिक स्वातंत्र्य, लैंगिक कल व अभिमुखतेची स्वीकृती, विषयासंबंधित शारीरिक अवयवांशी निगडित असलेलं ज्ञान हे फक्त वात्सायनाच्या कामसूत्रात नमूद केलेलं नसून हा सगळा उल्लेख रूपक कथेने का होईना पण श्रुतींमध्ये (विशेषत: अश्वमेध यज्ञाची संहिता) होतो. सद्य:स्थितीतील भारतीय समाज, हा कालौघात बौद्धिकतेची एकेक पायरी उतरत निर्माण झाला आहे, हे दर्शवतो कारण अजूनही स्वातंत्र्योत्तर काळात आपण बिटिशांकडून आंदण मिळालेले स्वातंत्र्यपूर्व कायदे पाळत आहोत; किंबहुना मध्ययुगीन ब्रिटिश विचारसरणीची गुलामगिरी करण्यात जो आनंद मानला जातोय यापेक्षा वेगळी बौद्धिक दिवाळखोरी म्हणावी तरी कशाला? ही इतिहासाकडे गहाण टाकलेली अक्कलच कलम ३७७चं पालकत्व स्वीकारते हे मात्र कुणीही नाकारू शकत नाही. समलैंगिकतेची जडणघडण ही मानवाची जनुकं, त्यांचं लैंगिक व्यक्तिमत्त्व घडवणारी संप्रेरक आणि जन्मानंतर त्याच्या भवतालची परिस्थिती, घडणाऱ्या घटना, त्याचं संगोपन यामुळे निर्माण होणाऱ्या जाणिवा-नेणिवांवर अवलंबून असते. ही सर्व प्रक्रिया निसर्गास्वभावास अनुसरून असल्याने त्यास खचितच विकृती म्हणता येत नाही, याउलट त्या विशिष्ट व्यक्तीची ती प्रकृती आहे असं म्हटल्यास ते चूक ठरणार नाही. हाच समलैंगिकतेचा धागा पकडून पुढचा प्रवास करू पाहणाऱ्या आणि त्याद्वारे आनंद लुटू पाहणाऱ्या व्यक्तीचं ते पूर्णत: वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. ह्य़ासंदर्भात असलेलं लोकांचा खासगी आयुष्याची सुरक्षितता आणि स्वातंत्र्य सुनिश्चित करणारं कलम २१ हे कलम ३७७ला नि:संशयपणे अधिक्रमित करतं. अर्थात हा लढा नुसता येथेच संपत नाही उभयिलगी, समिलगी संबंधांना समाजमान्यता मिळावी यासाठी लोकनिर्वाचित अशा संसदीय सभागृहाकडून वा न्याययंत्रणेकडून कलम ३७७ सारखा निरुपयोगी कायदा मोडीत काढणं अनिवार्य ठरतं. समाजाचा लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एकंदर नकारात्मकच असल्याने, समिलगी लोकांवर होणारे भीषण अत्याचार, धमक्यांच्या स्वरूपात केली जाणारी मुस्कटदाबी व छळवणूक (शारीरिक,मानसिक) याकडे सोईस्कर दुर्लक्ष केलं जातं. पूर्वी समलैंगिकतेला रोग समजलं जात असे, अशा एखाद्या व्यक्तीस मग जैविक प्रयोगांसाठी गिनी पिग बनवून त्यांचं केमिकल कॅस्ट्रेशन (रासायनिक नपुंसकत्व) केलं जाई. आज हाच प्रयोग, आचरणशून्यतेचा शिरोिबदू गाठलेल्या नराधमांकडून करेक्टिव्ह रेपच्या नावाखाली समलिंगींवर केला जातो. स्वत: अतृप्त कामवासना बाळगणाऱ्या, समलैंगिकतेस विरोध करणाऱ्या उद्याच्या पशुतुल्य नवनाझींची ही पिल्लावळी जन्मास घालून आपला प्रवास लोकशाही ते फॅसिझम असं सुखेनव होईल याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही. उत्क्रांत होत जाणं हा मानवाचा स्थायिभाव आहे. उत्क्रांती ही रेंगाळणारी असली तरी चिरकाल टिकणारी व शांततापूर्ण असते.
भारतीय समाजव्यवस्थेला अकस्मात होणाऱ्या असल्या क्षणभंगुर क्रांतीची गरज नसून प्रबोधनात्मक पद्धतीने घडवलेल्या उत्क्रांतीची अधिक आवश्यकता आहे. लैंगिकतेबद्दल असलेली पूर्वग्रहांची जळमटं पुसून मनाची कवाड किलकिली करून कौटुंबिक सुसंवादास वाट मोकळी करून देणं हे क्रमप्राप्त ठरतं. सदसद्विवेकबुद्धीला नमन करून उचित-अनुचिततेचे संकेत ओळखून लैंगिकतेचा शोध घेणं अनिवार्य आहे. अन्यथा काळाची पावलं समजूनही काळानुसार न बदलणं ही एक शोकांतिका ठरते व ह.ना. यांचं वचन सत्यात उतरतं; पण लक्षात कोण घेतो?