राखी चव्हाण

शाळा म्हणजे काय? विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण देऊन भविष्यात आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होण्याइतपत सक्षम केले जाते ती, की जिथे शिक्षणासोबतच संस्कारक्षम विद्यार्थी घडवला जातो ती शाळा..? मग वेगवेगळ्या कारणांनी घरापासून दुरावलेल्या आणि बेवारस, रस्त्यावर जगणाऱ्या मुलांना शिक्षणच नव्हे, तर त्यांच्यावर संस्कारही करण्याचे दिव्य करणाऱ्या मंदिराला काय म्हणायचे? पण हे दिव्य नागपुरातल्या प्लॅटफॉर्म शाळेत पेलले जाते. हो.. या शाळेचे नाव प्लॅटफॉर्म शाळाच आहे. तब्बल सहा वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंघल यांच्या संकल्पनेतून प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर निवासी शाळाजन्माला आली. एवढेच नव्हे तर गेल्या सहा वर्षांत या शाळेतल्या मुलांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यापर्यंत मजल मारली आहे.

देशातल्या कोणत्याही शहरातील रेल्वे स्थानकावर एक नजर टाकली तरीही या देशातील दारिद्रय़ लक्षात येईल. अनेक मुले या ठिकाणी बेवारसपणे भटकताना दिसतात. मळकटलेले कपडे, कुणाच्या तरी मागे चार पैशांसाठी धावणे, हातात एक ब्रश आणि डबी घेऊन बूटपॉलिशसाठी विनवणी करणे, नाहीच जमले तर पाकीटमारी करणे हा या रेल्वे स्थानकावरील मुलांचा उद्योग! यातील ९० टक्के मुले खेळण्याबागडण्याच्या आणि शिक्षण घेण्याच्या वयातच व्यसनाच्या आहारी गेलेली! राज्याच्या उपराजधानीत म्हणजेच नागपुरातही हे दृश्य काही वेगळे नाही. येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे डोळेही याला सरसावलेले. रेल्वे पोलीसही कधी हे बेसूर चित्र बदलण्याच्या भानगडीत पडले नाहीत. पोलिसांकडे तर तसेही कठोरहृदयी म्हणूनच पाहिले जाते. अशाच एका कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची, रवींद्र सिंघल यांची रेल्वे पोलीस अधीक्षक म्हणून सहा वर्षांपूर्वी येथे बदली झाली, पण या कर्तव्यकठोर अधिकाऱ्यामध्ये एक संवेदनशील हळवे मन दडलेले होते. ते या रेल्वे स्थानकावरील दृश्याने न द्रवेल तरच नवल.

देशभरातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या इथल्या मुलांचे होरपळणारे बालपण त्यांनी पाहिले. त्यांनी या दिशाहीन कोवळ्या मुलांना दिशा देण्याचे, त्यांच्या जगण्याला नवा अर्थ देण्याचे ठरविले. सिंगल यांच्या पुढाकारातून प्लॅटफॉर्म शाळेचा जन्म झाला. २३ जून २०१० ही ती तारीख! ज्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मने या मुलांना जगण्याचा आधार दिला होता, त्याच प्लॅटफॉर्मचे नाव त्यांच्या शाळेला देण्यात आले- ‘प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर निवासी शाळा’!

पालिकेने जागा दिली

बेवारस भटकंती करणाऱ्या मुलांची संख्या थोडीथोडकी नाही तर बरीच मोठी होती. त्यामुळे शिक्षणापासून ते निवासाचे आणि भोजनाच्या खर्चाचे आव्हानही होते, पण चांगल्या कामासाठी मदतीचे हातही पुढे येतात. सिंघल यांच्या कल्पनेला पहिला मदतीचा हात नागपूर महानगरपालिकेने दिला. महापालिकेची बंद असलेली शाळा त्यांनी या प्रकल्पासाठी दिली. लोहमार्ग पोलिसांनी प्लॅटफॉर्मवर बेवारस भटकणाऱ्या मुलांना शाळेत आणण्याची जबाबदारी स्वीकारली आणि विश्व हिंदू जनकल्याण परिषदेने शाळेच्या व्यवस्थापनाचे कार्य हाती घेतले.

मायेचा हात

ही मुलं देशाच्या बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, लखनौ, मुंबई अशा विविध भागांतून आलेली असल्याने या प्रत्येक मुलाची कहाणीही वेगवेगळी; पण आता रेल्वेचा प्लॅटफार्म अशीच सर्वाची ओळख, पण ती आता बदलत चालली आहे. शाळेने त्यांना चार भिंतींचे छतच नव्हे तर मायेनं डोक्यावर फिरणारा हातही दिला. संस्काराचा ‘स’देखील ज्यांना माहिती नाही, ती मुले आता संस्कारक्षम होत चालली आहेत. सुरुवातीच्या काळात या मुलांनी कित्येकदा पळून जाण्याचा प्रयत्नही केला. त्यात त्यांचा दोष नव्हता, तर घर सोडल्यानंतर त्यांना मिळालेल्या वातावरणाचा तो परिणाम होता, मात्र या प्रकल्पाचे संचालक श्रीकांत आगलावे यांनी मोठय़ा प्रयत्नांनी या मुलांना शाळेत परत आणले, तिची गोडी लावली.

प्लॅटफॉर्म बदलला

आता पहाटे ५ ते सायंकाळी ६ पर्यंतच्या दिनचर्येत या मुलांवर अनेक संस्कारांची रुजवण शाळा करते आहे. रस्त्यावरच्या आयुष्याने सवयी बिघडलेल्या तसेच व्यसनांनी पछाडलेले होते. ध्येय निश्चित नाही, दिशा नाही अशा मुलांचे मन वळवणे हे खरे तर कर्मकठीण काम. तरीही आगलावे यांच्या संस्कारांनी त्यावर मात केली. या मुलांची भरकटलेली गाडी चुकीच्या ‘प्लॅटफॉर्म’ऐवजी आता योग्य प्लॅटफॉर्मवर धावायला लागली आहे. शाळेतील मुले दहावी आणि बारावी परीक्षेत पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होत आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यापर्यंत या मुलांनी मजल गाठली आहे. आपल्या आधीच्या मुलांच्या प्रगतीचा आदर्श आता या मुलांसमोर आहे. इतरही आपले आयुष्य घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांची स्वप्ने मोठी होऊ लागली आहेत. त्यांना बळ मिळते आहे. उच्चशिक्षणापर्यंत गेलेले माजी विद्यार्थी आता शाळेतील इतर लहान मुलांवर संस्कार करण्यात, त्यांना मार्गदर्शन करण्यात गुंतले आहेत. मलाही दादाप्रमाणे अभियंता व्हायचंय, अशी इथली मुलं सांगतात. इतकेच नव्हे तर मोठे होऊन आणि स्वावलंबी झाल्यानंतर चुकीच्या ‘प्लॅटफॉर्म’वर गेलेल्या मुलांना योग्य प्लॅटफॉर्मवर त्यांना आणायचे आहे.

रोल मॉडेल

रेल्वे स्थानकावर फिरणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता नागपूरमध्ये यशस्वीपणे राबविलेला हा प्रयोग रोल मॉडेल ठरला आहे. आता राज्यात इतरत्रही रेल्वे स्थानकावरील वंचित मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. असाच एक प्रयोग आता ठाण्यातही राबविण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त, रेन्बो फाऊंडेशन यांच्या समन्वयाने ठाणे पश्चिम येथील वर्तक नगर येथे ‘प्लॅटफॉर्म शाळा’ सुरू झाली आहे.

दुजाभाव नाही

  • विश्व हिंदू जनकल्याण परिषद आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बजेरिया येथील लालशाळेत प्लॅटफॉर्म ज्ञान मंदिर निवासी शाळा सुरू आहे. पहाटे ५ ते रात्री १०.३० असे या मुलांचे दैनंदिन वेळापत्रक ठरले आहे.
  • शाळा, अभ्यास, व्यायाम, प्रार्थना, खेळ, संगणक, संगीत, स्वसंरक्षण अशा सर्व आयुष्याला वळण लावणाऱ्या गोष्टी त्यांच्या या दैनंदिन वेळापत्रकानुसार होतात. दोन्ही वेळेला दूध, नाश्ता, जेवण असे शाळेतर्फे मुलांना दिले जाते.
  • दात्यांमुळे गेल्या सहा वर्षांपासून हा प्रकल्प अविरतपणे सुरू आहे. अनाथ, गरीब म्हणून कुणी जुनी पुस्तके, दफ्तर, गणवेश असा दुजाभाव त्यांच्यासोबत करीत नाही.
  • ५ ते १५ वयोगटांतली मुले येथे मोठय़ा आनंदाने राहतात. सुमारे ४० मुले आजघडीला या शाळेत आहेत. शाळा हेच त्यांच्यासाठी घर बनले आहे. ही प्लॅटफॉर्म निवासी शाळा म्हणजे अनाथालय नव्हे तर संस्काराचे ते ज्ञानमंदिर आहे.

संकलन – रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com