News Flash

अण्णाभाऊ कुणाचे?

शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीची सुरुवात १ ऑगस्टपासून होत आहे.

|| सुबोध मोरे

शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीची सुरुवात १ ऑगस्टपासून होत आहे. त्यानिमित्ताने, अलीकडच्या काळातील अण्णा भाऊंच्या प्रतीकनिर्मितीमागील राजकारणाची चिकित्सा आणि त्याअनुषंगाने केल्या जाणाऱ्या प्रचारी दाव्यांची सत्यता तपासणारा लेख..

महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या नवनिर्मितीच्या लढय़ात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि त्यांचे तत्कालीन सहकारी अमर शेख, दत्ता गव्हाणकर यांचे शाहीर म्हणून असलेले योगदान सारा महाराष्ट्र जाणतोच; परंतु अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व वरील दोन शाहिरांपेक्षा वेगळे होते. अण्णा भाऊंमध्ये एक गीतकार, कादंबरीकार, कथाकार, पटकथाकार, नाटककार, पत्रकार आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीवर अपार निष्ठा असलेला एक साम्यवादी कार्यकर्ताही होता.

महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळीच्या इतिहासात १९६०-७० च्या दशकाचे खास महत्त्व आहे. या कालखंडात युक्रांद, मागोवा, दलितमुक्ती आघाडी आणि दलित पँथरसारख्या तरुणांच्या लढाऊ संघटना उदयास येत होत्या. १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातर करून बौद्ध धम्म स्वीकारला, त्याचेही सामाजिक-सांस्कृतिक पडसाद दलित तरुणांवर पडू लागले होते. नवे आत्मभान आणि स्वतंत्र अस्मिता घेऊन ते लिहू-बोलू लागले. प्रस्थापित ब्राह्मणी, भांडवली आणि पुरुषसत्ताक मूल्यांविरुद्धचा असंतोष साहित्य – संस्कृतीच्या पटलावर उमटू लागला होता. एकीकडे लघु(अ/)नियतकालिकांमधून प्रस्थापित साहित्यमूल्यांना आव्हान मिळू लागले, दुसरीकडे कामगार कवी नारायण सुर्वे, शिवराम देवलकर.. आदी मंडळी साहित्य क्षेत्रात कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करू लागले आणि तिसरीकडे फुले-आंबेडकरी व प्रगत साहित्याची प्रेरणा घेऊन दलित साहित्याने जात-वर्ग व्यवस्थेच्या मूल्यांवर प्रखर शब्दांनी हल्लाबोल केला. नेमका हा कालखंड अण्णा भाऊंची परिवर्तनवादी, प्रगतिशील साहित्यिक म्हणून खरी ओळख होण्यास उपयुक्त ठरला.

१९७० च्या दशकातील दलित आणि प्रगत साहित्याच्या चळवळीने अण्णा भाऊ साठेंना साहित्यिक म्हणून मान्यता दिली. मात्र, अण्णा भाऊंच्या निधनापर्यंत तरी मातंग समाजाने त्यांना आपला नेता किंवा मोठा साहित्यिक म्हणून स्वीकारले नव्हते; परंतु १९७०-८० च्या दशकातील दलित साहित्याच्या आणि दलित पँथरच्या झंझावाताने महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणात जी घुसळण घडली, त्यातून महाराष्ट्रातील शोषित जाती-जमाती, आदिवासी आणि तळागाळातील समूह आपले नायक, नेते शोधू लागले. राजकीय पटलावरही त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. राजकारणात दलित चळवळी आणि दलित समूहांचे महत्त्व वाढू लागल्यावर सत्ताधारी आणि प्रस्थापित दलित राजकारणातील नेते बिनबुडाचे वैचारिक वाद उकरून जाती-पोटजातींचे राजकारण करू लागले. याच राजकारणाचा एक भाग म्हणून, डॉ. आंबेडकरांच्या प्रभावाखालील दलित चळवळीला कमजोर करण्यासाठी आणि मातंग समाजाला त्यातून वेगळे पाडण्यासाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी १९७५-७६ सालानंतर अण्णा भाऊंची ‘मातंग समाजाचे नेते’ अशी प्रतिमा पुढे आणण्याचा प्रयत्न केला; परंतु हे करताना सत्ताधाऱ्यांनी अण्णा भाऊ हे साम्यवादी विचारांचे होते, त्यांनी दलित-शोषित वर्गाचे शोषण करणाऱ्या जात-वर्ग व्यवस्थेच्या समर्थकांची हाजी हाजी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना प्रखर विरोध केला होता, हे दडवून ठेवले. अण्णा भाऊंच्या नावातील ‘कॉम्रेड’ हे बिरुद काढून त्यांना केवळ ‘साहित्यरत्न’, ‘साहित्यसम्राट’ असे संबोधून त्यांना निखळ साहित्यिक बनविण्याचा घाट घातला आणि अण्णा भाऊंचे क्रांतिकारकत्व पुसण्याचा प्रयत्न केला. तळाच्या वर्गातील जातसमूहाने त्या जातीतील महान व्यक्ती, नेत्याला आपल्या अस्मितेचे प्रतीक म्हणून पुढे आणणे यात काही वावगे आणि चूकही नाही; परंतु मातंग समाजातील काही नेत्यांनी आणि कालच्या व आजच्या सत्ताधाऱ्यांनी अण्णा भाऊंना केवळ त्यांच्या जातीत बंदिस्त करून अण्णा भाऊंवर अन्यायच केला आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते. ज्या अण्णा भाऊंनी डॉ. आंबेडकरांवर ‘जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मला भिमराव’ अशा गाजलेल्या ओळी लिहिल्या, त्याच अण्णा भाऊंना काही मातंग समाजाचे नेते आणि सत्ताधारी डॉ. आंबेडकरांसमोर स्पर्धेचे प्रतीक म्हणून उभे करण्याचा आणि स्वत:च्या राजकीय हितसंबंधांसाठी वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत. उदाहरणार्थ, हातात घटना घेतलेले डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र वा शिल्प आहे; अगदी त्याच पद्धतीने हातात ‘फकिरा’ कादंबरी घेतलेले आणि धोतर नेसलेले अण्णा भाऊ असे नव्या तंत्रज्ञानाने बनवलेले कृत्रिम छायाचित्र जाणीवपूर्वक सर्वत्र प्रसारित केले जात आहे.

अण्णा भाऊंबाबत खोटय़ा कथा, दंतकथा समाजात पसरल्या आहेत; त्याबाबतची वस्तुस्थिती त्यांच्या जन्मशताब्दीत तरी जाणून घ्यायला हवी. अण्णा भाऊंच्या अखेरच्या हलाखीच्या, दारिद्रय़ाच्या दिवसांबाबत आणि त्यांच्या मृत्यूबाबतच्या अनेक खोटय़ा कहाण्या महाराष्ट्रातील अनेक जण बेधडकपणे भाषणांत आणि पुस्तकांतून सांगत असतात. यातील काहींचा महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरवही केला आहे. २००३-०४ चा बालवाङ्मय पुरस्कार मिळालेले पुण्यातील प्रा. वि. दा. पिंगळे त्यांच्या ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या पुस्तकात म्हणतात की, ‘अण्णा भाऊ साठे यांचे प्रेत तीन दिवस चिरागनगर घाटकोपरच्या झोपडपट्टीत सडत होते.’ पुण्यातीलच रविप्रकाश कुलकर्णी हे ‘स्मरणातील अण्णा भाऊ साठे’ या लेखात म्हणतात, ‘बाबूराव बागूल, नारायण सुर्वे ही साहित्यिक मंडळी अण्णा भाऊंच्या निधनाच्या बातमीने गोरेगावच्या झोपडपट्टीत शिरतात आणि भकास झोपडीतील मिणमिणत्या दिव्यासमोर थांबतात.’ अण्णा भाऊंच्या साहित्यावर पीएच.डी. करणाऱ्यांचे मार्गदर्शक असलेले पश्चिम महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ अभ्यासक अण्णा भाऊंवरील त्यांच्या लोकवाङ्मय गृह प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या संक्षिप्त चरित्रात म्हणतात : ‘अण्णा भाऊंना हलाखीच्या स्थितीमुळे अन्नाला मोताद होण्याची पाळी आली होती. त्यामुळे सुप्रसिद्ध सिने कलावंत बलराज साहनी हे आपल्या गाडीतून अण्णा भाऊंना.. त्यांच्या वाटेगाव गावी सोडून आले आणि तेथेच अण्णा भाऊंचे निधन झाले.’ अण्णा भाऊंच्या निधनाबाबत असा आरोप केला जातो की, कम्युनिस्टांनी त्यांच्या निधनाची दखल घेतली नाही, त्यांच्या अंत्ययात्रेला ५० लोकही नव्हते आणि कम्युनिस्टांनी अण्णा भाऊंना उपेक्षित ठेवले.

मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, १९६५ पूर्वी कम्युनिस्ट चळवळीत सक्रिय असताना अण्णा भाऊंची आर्थिक स्थिती जरूर हलाखीची होती; परंतु संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर अण्णा भाऊ हे नामवंत शाहीर-कलावंत म्हणून पुढे आले होते. ‘फकिरा’पासून त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रकाशित होऊन त्यांवर चित्रपटही बनले होते आणि त्यांना बऱ्यापैकी पैसेही मिळू लागले होते. त्यांच्या मृत्यूच्या एक-दीड वर्षे आधी त्यांना गोरेगावच्या सिद्धार्थ नगरात तीन खोल्या आणि गॅलरी असलेले छान घरही शासनाने दिले होते. याच गोरेगावच्या घरात अण्णा भाऊंचा १८ जुलै १९६९ रोजी मृत्यू झाला होता. त्यामुळे ‘अण्णा भाऊ वाटेगावला वारले, हलाखीमुळे चिरागनगर, घाटकोपरला तीन दिवस प्रेत सडत पडले होते वा ते झोपडपट्टीत राहत होते’ हे सारे खोटे आहे. उलट मृत्यूच्या जवळपास एक वर्षे आधीपासून शासनाने अण्णा भाऊंना ३०० रुपये मासिक असे कलावंत मानधन सुरू केले होते. मृत्यूच्या आदल्या दिवशी, म्हणजे १७ जुलैला अण्णा भाऊ एका चित्रपटाचा समारंभ उरकून टॅक्सीने गोरेगावला परतले होते; परंतु शुद्ध हरपल्याने घर सापडत नव्हते. नेमक्या त्याच वेळेस त्यांच्या घराजवळील चौकात मी आणि काही मित्र बसलो असताना, टॅक्सीवाला आमच्याजवळ येऊन, यांना ओळखता काय म्हणून विचारू लागला. तेव्हा मी टॅक्सीत डोकावलो असता अण्णा भाऊ मान टाकून मागच्या सीटवर पडलेले दिसले. नंतर मी टॅक्सीत पुढे बसून त्यांच्या घराजवळ गेलो आणि चालक व मी त्यांना धरून त्या रात्री घरी सोडले. दुसऱ्याच दिवशी अण्णा भाऊंच्या निधनाची दु:खद बातमी माझे वडील कॉ. सत्येंद्र मोरे यांनी वर्तमानपत्रे, ऑल इंडिया रेडिओ, कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयांना, शाहीर अमर शेख आणि अभिनव प्रकाशनाच्या वा. वि. भट यांना कळविली. अभिनव प्रकाशनाच्या दुकानावरच प्रगत साहित्य सभेची बैठक असल्याने, तेथे बातमी कळताच भट, बाबूराव बागूल, नारायण सुर्वे, दया पवार, प्र. श्री. नेरुरकर, अर्जुन डांगळे, राजा ढाले, प्रल्हाद चेंदवणकर, राजा राजवाडे, शिवराम देवलकर, वामन होवाळ, डॉ. सदा कऱ्हाडे, कॉ. जी. एल. रेड्डी, ए. के. हंगल.. आदी अनेक मान्यवर आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते अंत्ययात्रेला उपस्थित होते.

शाहीर अमर शेख घरी नसल्यामुळे त्यांना बातमी उशिरा कळाली; पण तरी ते रात्री- शवघरातून काढण्याच्या आधी- पोहोचले. अण्णा भाऊंचे कलेवर पाहून, ‘माझा अण्णा गेला..’ असे म्हणत त्यांनी हंबरडाच फोडला. त्याच वेळेस अण्णा भाऊंच्या द्वितीय पत्नी जयवंताबाई साठे आणि मुली शकुंतला आणि शांताबाई दर्शन घेण्यासाठी पुढे आल्या असता, अण्णांच्या काही नातेवाईकांनी त्यांना धक्काबुक्की करून रोखण्याचा प्रयत्न केला. अमर शेख त्या नातेवाईकांवर रागावले आणि म्हणाले, ‘‘माझ्या बहिणीला भेटू द्या, तिनेच खस्ता खाऊन अण्णाला जपले आहे.’’ अमर शेख रागावल्याने सगळे शांत झाले. जयवंताबाई आणि इतरांनी अखेरचे दर्शन घेतले आणि अंत्ययात्रा ओशिवरा स्मशानभूमीत गेली. अंत्ययात्रेत वरील मान्यवरांसह कम्युनिस्ट-दलित चळवळीशी संबंधित अनेक लोक सहभागी होते. अण्णा भाऊंच्या प्रेताला अग्नी अमर शेखांनीच दिला. नंतर काही दिवसांनी गोरेगावातील सिद्धार्थ नगरमधील खुल्या मैदानात कम्युनिस्ट पक्ष आणि अन्य संघटनांतर्फे अण्णा भाऊंना आदरांजली वाहण्यासाठी मोठी जाहीर शोकसभाही झाली. याच सभेत अमर शेखांनी आपल्या पहाडी आवाजात गायलेली अण्णा भाऊंची प्रसिद्ध ‘मुंबईची लावणी’ अजूनही स्मरत आहे. या आदरांजली सभेनंतर काही दिवसांनीच- २९ ऑगस्टला अमर शेख यांचे अहमदनगरजवळ अपघातात निधन झाले. वरील दोन्ही शाहिरांच्या निधनाची कम्युनिस्ट पक्षाने गंभीर नोंद घेऊन, या दोन्ही शाहिरांना आदरांजली वाहणारा ‘युगांतर’चा विशेषांक काढला, जो आजही संग्राह्य़ आहे. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाने अण्णा भाऊंना उपेक्षित ठेवले, या म्हणण्यात तथ्य नाही. वरील दोन्ही शाहिरांना घडवण्यात आणि त्यांचे साहित्य प्रथम प्रकाशित करण्यात कम्युनिस्ट पक्षाचाच सिंहाचा वाटा आहे.

अण्णा भाऊंविषयी खोटा प्रचार अनेक मान्यवर वक्ते, पत्रकार-संपादक, बामसेफसारख्या संघटना करीत असतात. शासनाच्या ‘बार्टी’सारख्या संस्थेने प्रकाशित केलेल्या अण्णा भाऊंवरील गौरवग्रंथातही छापले आहे की, ‘अण्णा भाऊंनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी- स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी- मुंबईच्या आझाद मैदानात भर पावसात ‘ये आझादी झुठी है, देश की जनता भुकी है’ अशी घोषणा देत हजारो लोकांचा मोर्चा काढला आणि या मोर्चाला कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला होता.’ मात्र, याबाबतची वस्तुस्थिती अशी आहे की, अण्णा भाऊंनी असा मोर्चा कधीच काढला नव्हता. कम्युनिस्ट पक्षाचे आणि अण्णा भाऊंचे मिळालेल्या स्वातंत्र्याविषयी जरूर काही वेगळे मत होते; पण अशा तऱ्हेने विरोध केला नव्हता. अण्णा भाऊंच्या हयात असलेल्या दोन्ही मुली शकुंतला आणि शांताबाई यांनी मला १५ ऑगस्ट १९४७ या दिवसाची आठवण सांगितली आहे. अण्णा भाऊंनी निषेध मोर्चा वगैरे काढला नव्हताच, उलट ते त्या दोघींना घेऊन गेट वे ऑफ इंडियाला स्वातंत्र्य दिनाची रोषणाई पाहण्यास घेऊन गेले होते. वरील मोर्चाची आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणि अन्यत्रही कुठे नोंद नसताना, बिनदिक्कतपणे खोटा प्रचार केला जात आहे. मुख्य म्हणजे, शासनही ते पडताळून न घेता छापत आहे, हे खेदजनक आहे. अण्णा भाऊंवरील काही चरित्रकारांनी त्यांच्या अखेरच्या काळातील दुरवस्थेला, शोकांतिकेला त्यांच्या द्वितीय पत्नी जयवंताबाई यांना दोषी ठरविण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यामुळे अण्णा भाऊ व्यसनाच्या आहारी गेले आणि भरकटले, असा आरोप ही मंडळी करीत असतात. वस्तुस्थिती मात्र त्याउलट होती. जयवंताबाईंनी आणि त्यांच्या दोन्ही मुलींनी अपार हालअपेष्टा सोसून अण्णा भाऊंमधील सर्जनशील लेखक-कलावंत जपला; पण त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हे अन्यायकारक आहे. किमान अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीत तरी त्यांच्यावरील खोटा प्रचार थांबवावा. अण्णा भाऊंचा खरा जीवनसंघर्ष सम्यकपणे समजून घेण्याची ही संधी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 10:45 pm

Web Title: poet annabhau sathe mpg 94
Next Stories
1 अख्ख्या सरकारला उभं केलं!
2 स्त्री-शिक्षणातून लोकसंख्या नियंत्रण!
3 विश्वाचे वृत्तरंग: विजयाचे दावे-प्रतिदावे
Just Now!
X