28 January 2021

News Flash

राज्यावलोकन : संक्रमण की स्थैर्य?

राज्यांची स्पंदने टिपणाऱ्या नव्या साप्ताहिक सदरातील हा दुसरा लेख..

आसिफ बागवान

राज्यांची स्पंदने टिपणाऱ्या नव्या साप्ताहिक सदरातील हा दुसरा लेख.. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन महिने उलटले तरी बिहारमध्ये राजकीय वातावरण तापलेलेच आहे. ते का, हे सांगणारा!

उत्तर भारतात गेल्या तीन दिवसांपासून आकाशात होणाऱ्या ढगांच्या गर्दीने थंडीचा आल्हाददायक आनंद पुसट केला आहे. बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ)वरही अशाच प्रकारचे मळभ सध्या दाटले आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आज बरोब्बर दोन महिने झाले. मात्र, अजूनही त्या निकालाचे कवित्व कायम आहे. रालोआचे पुन्हा सत्ताग्रहण आणि नितीशकुमार यांचे पुन्हा मुख्यमंत्रिपदावर आरूढ होणे, हा या निकालाचा अंतिम निष्कर्ष. मात्र, हा निकाल तेवढेच सांगत नाही. त्या निकालाला अनेक कंगोरे आहेत आणि पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत त्याचे वेगवेगळे पडसाद, परिणाम दिसत राहणार आहेत. गेल्या दोन महिन्यांतील बिहारमधील राजकीय शेरेबाजी, विधाने आणि घडामोडींनी हीच बाब अधोरेखित केली आहे.

निवडणुकीत ७४ जागा जिंकून रालोआतील पहिल्या क्रमांकाचा पक्ष असतानाही भाजपने मुख्यमंत्रिपदाची माळ नितीश यांच्या गळ्यात घातली. त्याच वेळी उपमुख्यमंत्रिपदासाठी दोघांची निवड करून नितीश यांच्या कारभारावर आपला वचक राहील, याचीही व्यवस्था केली. खरे तर तेव्हापासूनच भाजपविषयी संयुक्त जनता दल (जदयू) व नितीश यांच्यात असंतोष शिजू लागला आहे. त्यात अरुणाचल प्रदेशमधील राजकीय भूकंपाने फोडणी घातली. अरुणाचलमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या जदयूच्या सातपैकी सहा आमदारांना आपल्या पक्षात घेऊन भाजपने नितीश यांना जुमानत नसल्याचे दाखवून दिले आहे. नितीश यांचे जदयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होणे, हे त्याचेच द्योतक.

२०१९ मध्ये जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने तीन वर्षांसाठी नितीश यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमणूक केली होती. मात्र, ‘मुख्यमंत्रिपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपद एकत्र सांभाळणे कठीण जाईल,’ असे सांगत नितीश यांनी अध्यक्षपदी रामचंद्र प्रसाद ऊर्फ आरसीपी सिंह यांची नेमणूक केली. पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होऊन नितीश यांनी भाजपबरोबरच्या संवादात भिंत उभी केली आहे. आतापर्यंत भाजपचे बिहार प्रभारी भूपेंद्र यादव हे थेट नितीश यांच्याशी चर्चा करत होते. मात्र, यापुढे यादव यांना आणि पर्यायाने भाजपला आधी आरसीपी सिंहरूपी नंदीला नमस्कार घालावा लागणार आहे. ही व्यवस्था नितीश यांचा अहंकार फुलवण्यासाठीही असावी. मोदी-शहा या जोडगोळीला गाठण्यापूर्वी कोणालाही भाजपमधील नड्डा, यादव वगैरेंसमोर उभे राहावे लागते. आरसीपी सिंह यांच्या नियुक्तीतून नितीश यांनाही तेच अभिप्रेत असावे. संवादादरम्यानच्या पायऱ्या वाढल्या की समन्वय बिघडण्याची आणि विसंवाद वाढण्याची शक्यता असते. नितीश यांची कृती जदयू व भाजपमधील विसंवादालाच खतपाणी घालणारी आहे.

अरुणाचल प्रदेशमधील गडबडीनंतर जदयूमध्ये हा फेरबदल होत असतानाच, राष्ट्रीय जनता दलाने ‘जदयूतील १७ आमदार आमच्या पक्षात येण्यास तयार आहेत’ असा दावा केला. भाजपकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीला कंटाळलेले हे आमदार कधीही राजदमध्ये येऊ शकतील. मात्र एकूण २८ आमदारांचा गट घेऊन या, म्हणजे तुम्हाला पक्षांतरबंदी कायद्याचा अडसर येणार नाही, असे त्यांना सांगितल्याचे राजदच्या नेत्यांचे म्हणणे आहे. राजदच्या या दाव्यावर जदयूतून थेट प्रतिक्रिया आली नसली, तरी नितीश यांनी भाजपबरोबरची आघाडी मजबूत असल्याचे सांगत हा दावा खोडून काढला.

एकीकडे जदयूतील आमदार फोडून ‘महागठबंधन’चे सरकार स्थापन करण्याचे राजदचे दावे सुरू असताना, महागठबंधनमधील काँग्रेसच्या गटातही चलबिचल सुरू आहे. पक्षाचे प्रभारी शक्तिसिंह गोहील यांनी अचानक जबाबदारी सोडल्यानंतर काँग्रेसने भक्तचरण दास यांना प्रभारी केले. त्याच वेळी काँग्रेसचे एक माजी आमदार भरत सिंह यांनी पक्षातील १९ पैकी ११ आमदार सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे भाकीत केले. या वक्तव्यावरून उलटसुलट चर्चा सुरू असताना जदयूचे आमदार गोपाल मंडल यांनी तर- ‘येत्या सहा महिन्यांत नितीश मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील आणि तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री बनतील’ असा दावा केला. या साऱ्या विधानांमुळे निवडणुकीपासून तापलेले बिहारचे राजकारण अजूनही थंड होण्याच्या बेतात नाही.

राजकीय नेत्यांपैकी नेमकी कोणाची वाणी खरी ठरणार, हे सांगता येणे कठीण. मात्र, त्यातून बिहारच्या राजकारणाची अवस्था पाहता येते. भाजपशी हातमिळवणी करून सत्तेत आलेल्या जदयूमध्ये धुसफूस आधीपासूनच सुरू आहे. त्यात अरुणाचल प्रदेशमधील दगाबाजीमुळे पक्षात भाजपविरोधी प्रवाह मोठा होत चालला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाने नितीश यांना खुणावण्याचे आपले प्रयत्न अजिबात लपू दिलेले नाहीत; अगदी दोन दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनीही जदयूने महागठबंधनमध्ये सामील व्हावे, अशा स्वरूपाचे ट्वीट करून साखरपेरणी केली. जदयू आणि राजदमधील या खाणाखुणांवर भाजपचेही लक्ष असलेच पाहिजे. त्यातूनच काँग्रेस आणि अन्य पक्षांतून (जदयूसुद्धा) आमदार आयात करून आपले बळ वाढवण्याच्या भाजपच्या हालचाली निश्चितच सुरू असतील.

अर्थात, नेमके चित्र निश्चित करण्यासाठी फार दिवस वाट पाहावी लागणार नाही. संक्रांतीनंतर वाऱ्यांची दिशा निश्चित होईल. सध्या बिहारमध्ये खरमास सुरू आहे. मकर संक्रांतीच्या पूर्वीचा महिना खरमास म्हणून पाळला जातो. हा काळ अशुभ असल्याने महत्त्वाच्या गोष्टी, निर्णय करण्याचे टाळले जाते. त्यामुळे येथील राजकीय मंडळींना मकर संक्रांतीची प्रतीक्षा आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही त्याच कारणांसाठी रखडला आहे. नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांच्यासमवेत १४ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यापैकी मेवालाल चौधरी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता १४ जानेवारीनंतर १८ ते २० जणांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजपचे मंत्री अधिक असतील आणि भाजप महत्त्वाची खाती पटकावेल, असेही मानले जात आहे. त्यांपैकी गृह खात्यावरून दोन्ही पक्षांत पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. बिहारमधील कायदा व सुव्यवस्था नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. नितीशकुमार यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात गृह खात्याच्या माध्यमातून महिला सुरक्षा वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे त्यांना महिला मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे नितीश यांच्यासाठी हे खाते महत्त्वाचे आहे. आता भाजपने त्यासाठी हट्ट धरल्यास नितीश काय करणार, याचा उलगडाही या आठवडय़ाच्या उत्तरार्धात होईल.

बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींकडे निकालानंतरची सळसळ म्हणून पाहता येईल. सूर्याचे उत्तरायण सुरू झाले आहे. हा काळ संक्रमणाचा म्हणून ओळखला जातो. आता संक्रांतीनंतर बिहारमध्ये संक्रमण सुरू होईल की स्थैर्य येईल, हे दिसेलच!

गुन्हेगारी आणि बेरोजगारी

बिहारला भेडसावणारे हे सर्वात मोठे प्रश्न. राज्यातील सुशिक्षित वर्गासाठी हे दोन्ही मुद्दे अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. त्यामुळेच नितीश यांनी मुख्यमंत्री बनताच या मुद्दय़ांकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या महिनाभरात त्यांनी दोन वेळा राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गुन्हेगारीवर नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या. याला कारणही तसेच आहे. राज्याच्या गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या नऊ महिन्यांत बिहारमध्ये २,४०६ हत्या प्रकरणे आणि १,१०६ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली. हे सर्व नितीश यांच्याच आधीच्या कार्यकाळातील. साहजिकच त्याबद्दल प्रश्न उपस्थित होणार. म्हणूनच नितीश हे सध्या गुन्हेगारी नियंत्रणाबाबत विशेष लक्ष ठेवून आहेत.  तीच गोष्ट बेरोजगारीची. करोनाकालीन टाळेबंदीनंतर मुंबई, दिल्लीसारख्या शहरांतून बिहारमध्ये परतलेल्या तरुणांना येथेच रोजगार दिला जाईल, हे निवडणुकीच्या प्रचारात सांगणे वेगळे आणि प्रत्यक्ष तशा संधी निर्माण करणे वेगळे. त्यामुळे बिहारमधील तरुण वर्ग पुन्हा अन्य राज्यांत रोजगारासाठी जात आहे. याला आवर घालण्यासाठीच नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर खासगी तसेच सरकारी क्षेत्रात २० लाख रोजगारनिर्मिती करण्यासाठीच्या योजनेला तातडीने मंजुरी दिली. राज्यात महापालिका आणि नगर परिषदांची संख्या वाढवण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यातूनही अधिकाधिक रोजगारनिर्मिती होण्याचा रालोआ सरकारचा आशावाद आहे.

asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 12:31 am

Web Title: political atmosphere in bihar after two months of assembly elections zws 70
Next Stories
1 अभिव्यक्तीपुढे आव्हान..
2 चाँदनी चौकातून : संघटना
3 जगाचे नकाशे, नकाशांचे जग!
Just Now!
X