दोन भव्य अशी दालने आणि एक लहानशी कॉन्फरन्स रूम, पदाधिकाऱ्यांसाठी आणि पक्षाच्या नेत्यांसाठी ‘वाय-फाय’ सुविधा असलेली १८ दालने, मंत्री आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची दालने, मीडिया सेंटर, महिला पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालने, आलिशान प्रतीक्षागृह आणि अत्याधुनिक संपर्क यंत्रणेचा वापर, हे सारे बघता क्षणीच डोळ्यांत भरते. एवढय़ा अवाढव्य कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी खर्च किती आला असेल, असा विचारही मनात चमकून जातो
मुंबईच्या मंत्रालयातून बाहेर पडून समोर पाहिलं, की फ्री प्रेस जर्नल मार्ग दिसतो. डावीकडचा फूटपाथ पकडून त्या रस्त्यानं सरळ चालत निघायचं. दोन-तीन मिनिटांत डावीकडे बैठय़ा इमारतींचं एक संकुल दिसतं. बाहेर एक मळकटलेला बोर्ड दिसतो. ‘लेखा व कोषागार कार्यालये’.. महाराष्ट्राच्या सरकारी तिजोरीच्या चाव्या या कार्यालयाकडे असतात. गेटबाहेर रस्त्याकडेला काही पाइप एकावर एक रचून ठेवलेले दिसतात. केव्हाही बघितलं, तरी त्या पाइपवर काही जण बसलेले दिसतात, ताटकळल्यासारखे, कुणाच्या तरी भेटीसाठी, गावाकडून आलेले. एखाद्याच्या अंगावर सफेद खादीचा कडक शर्ट असतो आणि पायात पांढऱ्या पॉलिशच्या चप्पल किंवा पांढरे बूट असतात. अशी माणसं या परिसरात कायमच दिसतात. गेटमधून आत डोकावलं, की या संकुलात समोरासमोर उभ्या असलेल्या बैठय़ा इमारती दिसतात. डावीकडची इमारत चकचकीत, ताजीतवानी आणि तेजस्वी, तर उजवीकडची इमारत काहीशी काळवंडलेली.. एकटीएकटी वाटणारी. जुनीपुराणी, धुळीची पुटं अंगावर साचल्यानं काहीशी लाजल्यासारखी वाटणारी.. ही इमारत म्हणजे महाराष्ट्र शासनाची लेखा व कोषागार कार्यालये आणि डावीकडची चकचकीत इमारत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय- राष्ट्रवादी भवन!
..एकाच आवारातील ही दोन चित्रे. सरकारच्या तिजोरीचं एक ‘वास्तव’ रूप आणि राज्याचा कारभार हाकणाऱ्या एका राजकीय पक्षाचं एक रूप. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या चकचकीत कार्यालयाच्या जागेवरही अगोदर लेखा व कोषागार कार्यालयांचाच ताबा होता, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या नूतनीकरणाचं काम काढलं आणि या बैठय़ा इमारतीमधील लेखा कोषागाराच्या कागदपत्रांची गोदामे थेट नवी मुंबईला हलवून राष्ट्रवादीच्या कार्यालयासाठी जवळपास तीन हजार चौरस फुटांची जागा सरकारी परवानगीने रिकामी करण्यात आली. काँग्रेसच्या वर्धापन दिनी, २८ डिसेंबर २०१२ या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या टवटवीत कार्यालयाचं, ‘राष्ट्रवादी भवना’चं, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झालं, त्याच्या काही महिने आधी, पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली होती. सिंचन क्षेत्रातील कामांत हजारो कोटींचा गैरव्यवहार झाला, असा आरोप करून विरोधी पक्षांनी राष्ट्रवादीला धारेवर धरले होते. या आरोपांचा गदारोळ एवढा वाढला, की २४ सप्टेंबर २०१२ या दिवशी अखेर अजित पवार यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या आरोपातून मुक्तता होईपर्यंत आपण राजीनामा देत आहोत, असे त्यांनी जाहीर केले आणि मंत्रिपदावरून मुक्त झाल्यानंतर त्यांनी कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या शेवटच्या टप्प्यावर आलेल्या कामावर लक्ष केंद्रित केले. पुढे काही दिवसांतच, ८ डिसेंबरला अजितदादांनी पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, १२ डिसेंबरला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस पक्षाने साजरा केला आणि २८ डिसेंबरला, नवे रूप ल्यालेले ‘राष्ट्रवादी भवन’ कार्यकर्त्यांच्या वावराने गजबजून गेले.. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मते, काँग्रेसचा वाढदिवस आणि राष्ट्रवादी भवनाचं उद्घाटन हा केवळ योगायोग.. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर जून १९९९ मध्येच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती! या कार्यालयाच्या शेजारीच, काँग्रेसचे गांधी भवन हे कार्यालयही आहे. रस्त्यावरून चालताना ही दोनही पक्ष कार्यालये सहज नजरेत भरतात आणि नकळत फरकाची तुलना सुरू होते. राष्ट्रवादीच्या कार्यालयाभोवतीचा माणसांचा गजबजाट नजरेत भरतो. रस्त्यावरच्या पाइपवर ताटकळणारी माणसंदेखील याच कार्यालयातील कुणाच्या तरी भेटीसाठी थांबली आहेत, हे कुणी न सांगताच उमगून जातं आणि या चकचकीत कार्यालयात डोकावलंच पाहिजे, असा मोह अनावरही होतो.. आतमध्ये अपेक्षेप्रमाणे गर्दीच असते. दोन भव्य अशी दालने आणि एक लहानशी कॉन्फरन्स रूम, पदाधिकाऱ्यांसाठी आणि पक्षाच्या नेत्यांसाठी ‘वाय-फाय’ सुविधा असलेली १८ दालने, मंत्री आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची दालने, मीडिया सेंटर, महिला पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालने, आलिशान प्रतीक्षागृह आणि अत्याधुनिक संपर्क यंत्रणेचा वापर, हे सारे बघता क्षणीच डोळ्यांत भरते. याचा अनुभव घेण्यासाठीच, कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर दीड-दोन महिन्यांतच, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मुद्दाम या कार्यालयास भेट दिली आणि तेथील अद्ययावत यंत्रणांचे कौतुक केले. महाराष्ट्रातील एकमेव आधुनिक कार्यालय राष्ट्रवादीने उभे केले होते, त्याचा कित्ता गिरविण्याची इच्छा अन्य पक्षांना होणेही साहजिकच होते. शिवसेनेनेही कार्यालयाच्या नूतनीकरणाचे मनावर घेतले. भाजपच्या कार्यालयावरही नवी झळाळी चढविण्याचे ठरले.. अशा रीतीने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यालयाने अन्य पक्षांना नूतनीकरणाची आणि आधुनिकीकरणाची कास धरण्याची प्रेरणा दिली!..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नव्या कार्यालयात जागोजागी संगणकयुग अवतरलेले दिसते. आपल्या पक्षाचे कार्यालय अत्याधुनिकच असलं पाहिजे, कागदांचा आणि फायलींचा पसारा कुठेही असू नये, संपूर्ण कामकाज ‘पेपरलेस’ असलं पाहिजे, असा अजित पवारांचाच आग्रह होता, असं कार्यालयातील कर्मचारी आणि सतत वावरणारे कार्यकर्ते आवर्जून सांगतात. राष्ट्रवादी भवनाचे ‘इंटीरियर’ – अंतर्गत सजावट- खरं म्हणजे, राजकीय पक्षाच्या कार्यालयांच्या आजवरच्या संस्कृतीला साजेशी नाही. अत्याधुनिक, अद्ययावत आणि असे सारे शब्द एकत्र केल्यानंतर जे काही नजरेसमोर उभे राहते, ते म्हणजे राष्ट्रवादी भवन, इतक्या शब्दांत या कार्यालयाचे वर्णन करता येईल. शरद पवार यांच्याबरोबरच, देशाच्या राजकारणावर ठसा उमटविलेल्या दिग्गज नेत्यांच्या तैलचित्रांनी या भवनात पक्षभेद पुसला आहे. खुद्द अजित पवारांची या नूतनीकरणाच्या प्रत्येक कामावर बारीक नजर  होती. त्यांच्या सूचनेनुसारच इथली प्रत्येक रचना केली गेली. कार्यालयातील फर्निचरदेखील ‘इंपोर्टेड मटेरियल’ वापरूनच बनविले असे कुणी तरी हलकेच सांगून टाकतो.. मग साहजिकच, डोळे विस्फारतात. एवढय़ा अवाढव्य भवनाच्या नूतनीकरणासाठी खर्च किती आला असेल, असा विचारही मनात चमकून जातो आणि त्या वेळी झालेल्या खर्चाच्या चर्चाही आठवू लागतात. अगदी एक कोटीपासून २० कोटींपर्यंतच्या खर्चाचे वेगवेगळे तर्क त्या वेळी लढविले गेले होते आणि ‘खर्चाची माहिती मिळविण्यासाठी आरटीआय वापरू नका, आम्हीच ती देऊ,’ असे त्या वेळचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांचे वक्तव्यही आठवून जाते. राष्ट्रवादी भवनात मात्र कोणीही खर्चाच्या प्रश्नावर काहीच बोलत नाही. लेखा व कोषागारांच्या गोदामांची जागा ताब्यात घेतल्याने, भाडय़ापोटी सरकारला भराव्या लागणारी रक्कमच लाखांच्या घरात असेल, एवढीच माहिती कुणी तरी देऊन जातो.
कार्यालयापासून काही पावलांच्या अंतरावरच मंत्रालय असल्याने, राज्यभरातून मंत्रालयाकडे येणारे कार्यकर्ते काही वेळ राष्ट्रवादी भवनातही रेंगाळतात. काही जण ओळखी काढून कुठल्याकुठल्या दालनात डोकावतात, तर काही केवळ बाहेरच्या अभ्यागतांच्या बाकडय़ावर बसूनच गजबज अनुभवत वेळ काढतात.. अचानक समोरून कुणी तरी नेता येताना दिसतो. राष्ट्रवादी भवनातील गजबज शिस्तबद्ध होते. गलबलाही कमी होतो आणि बाकडय़ावर बसलेला तो गावाकडला कार्यकर्ता नकळतच उठून उभा राहतो. साहेब दालनात गेले, की पुन्हा तो गजबजाट, गलबला सुरू होतो. कधी तरी ‘मोठे साहेब’ही इथे येतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साहेब अनेक आहेत. म्हणूनच, शरद पवारांना ‘मोठे साहेब’ म्हटलं जातं. मोठे साहेब त्यांच्या दालनात असले, की या भवनाचा सूर आणि नूरही काही निराळाच असतो. ते दिसले नाहीत, तरी त्यांचं तिथे असणं सहज जाणवून जातं.
..अशा वेळी, गावाकडचा एखादा कार्यकर्ता राष्ट्रवादी भवनात अभ्यागतांच्या बाकडय़ावर बसलेला असेल, तर त्याच्यासाठी तो क्षण अविस्मरणीय असतो. त्या क्षणाची सोबत घेऊनच तो गावाकडे परततो.