|| सौरभ कुलश्रेष्ठ

‘‘येन वळी थनी वळी…’’ हा तमीळनाडूचा सुपरस्टार रजनीकांत याच्या तोंडी असलेला प्रसिद्ध संवाद तमीळनाडूच्या राजकारणाचे चपखल वर्णन करतो. ‘येन वळी थनी वळी’ याचा सरळसोपा अर्थ माझी शैली (पद्धत-मार्ग) ही केवळ माझीच अशी अभिनव शैली आहे. घटनांचे नाट्य, समृद्ध परंपरेचा वारसा मिळवण्यासाठी पक्षांतर्गत-कौटुंबिक वाद, टोकाचे राजकीय वैर आणि त्या सगळ्याला अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या बिनधास्त नेत्यांच्या फिल्मी बाजाच्या संवादाची फोडणी आणि अशी एखाद्या मसाला चित्रपटात शोभेलशी तमीळनाडूच्या राजकारणाची शैली देशात एकमेवाद्वितीय आहे. त्यामुळेच केंद्रातील सत्तेत कोणता का पक्ष असेना, तमीळनाडूसमोर जरा बेतानेच घेतो. अशा या तमीळनाडूत आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने हे सारे पैलू समोर येत आहेत. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या वादग्रस्त सहकारी व्ही. के . शशीकला यांचे तुरुंगातून सुटका होऊन त्यांचे होऊ घातलेले नाट्यमय पुनरागमन, त्याचवेळी विद्यमान अण्णा द्रमुक सरकारने केलेली कृषीकर्जमाफीची घोषणा, कमल हासन व रजनीकांतसारखे अभिनेतेच नव्हे तर द्रमुकचे नेते एम. के . स्टॅलिन यांना येत असलेला एम.जी. रामचंद्रन यांच्या वारशाचा उमाळा ही सारी त्याचीच उदाहरणे.

स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू असेपर्यंतच्या काळातील काँग्रेसची सत्ता वगळता नंतर अखंडपणे तमीळनाडूतील सत्ता द्रविड चळवळीचा वारसा सांगणाऱ्या द्रमुक व अण्णा द्रमुक यांच्याकडे राहिली. त्यातही गंमत म्हणजे, गेली ५० वर्षे आधी द्रमुकचे एम. करुणानिधी व द्रमुकमधून बाहेर पडत अण्णा द्रमुक स्थापन करणारे एम.जी. रामचंद्रन आणि एमजीआर यांच्यानंतर करुणानिधी व जयललिता हे चित्रपटसृष्टीशी संबंध असलेले नेतेच राजकीय पटलावर आमने-सामने होते. दोन पक्ष व दोन नेत्यांमध्येच तमीळनाडूच्या राजकारणाचे ध्रुवीकरण होते. २०१६ मधील निवडणुकीनंतर आधी मुख्यमंत्री व अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता यांचे निधन झाले. त्यानंतर २०१८ मध्ये द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचे निधन झाले. त्यामुळे द्रविड राजकारणातील दोन प्रवाहांच्या सर्वोच्च नेत्यांच्या गैरहजेरीत होणारी गेल्या ५० वर्षांतील ही पहिली निवडणूक आहे. आतापर्यंत करुणानिधी व जयललिता या आपापल्या नेत्यांच्या सावलीत राजकारण करणारे व निवडणूक लढवणारे द्रमुकचे नेते एम. के . स्टॅलिन, अण्णा द्रमुकच्या सरकारचे मुख्यमंत्री ई. के . पलानीस्वामी व उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम, अभिनेता ते नेता ही तमीळ राजकारणातील परंपरा कायम ठेवू पाहणारे मक्कल निधी मायमचे प्रमुख कमल हासन अण्णा द्रमुक पक्ष या दोन्हींवर दावा सांगणाऱ्या व्ही. के . शशीकला हे नवे गडी तमीळनाडूच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी येण्यासाठी डाव टाकत आहेत. त्यातच राजकीय पक्ष स्थापनेचा विचार सोडला तरी जनतेसाठी काम करणार अशी ग्वाही देणारे रजनीकांत व द्रविडभूमीत हिंदू राजकारणाचा झेंडा रोवू पाहणारा भाजप हेही एका पोकळीत नवी संधी शोधत आहेत.

सध्या राज्यात अण्णा द्रमुकचे सरकार आहे. दर पाच वर्षांनी सत्तांतराची परंपरा असलेल्या तमीळनाडूत २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी सलग दुसरी विधानसभा निवडणूक जिंकत सत्ता कायम राखण्याची किमया केली. पण हे यश भोगण्यासाठी त्या फार काळ जिवंत राहू शकल्या नाहीत. म्हणजेच आताच्या अण्णा द्रमुक सरकारसमोर १० वर्षांच्या सत्तेविरोधातील रोषाला तोंड देण्याचे आव्हान आहे. त्यामुळे सत्ता जाऊ शकते हे या नेत्यांनी एका पातळीवर गृहीत धरले आहे. खरे आव्हान आहे अण्णा द्रमुक एकसंध ठेवण्याचे व पक्षावर पकड ठेवण्याचे. कारण व्ही. के . शशीकला ऊर्फ  चिन्नम्मा या तुरुंगातून सुटका व कोविडमधून बरे झाल्यानंतर चार वर्षांच्या कालावधीनंतर रविवारी तमीळनाडूत परत येत आहेत. त्यांच्यावर बेहिशेबी संपत्तीच्या प्रकरणात शिक्षेचा ठपका असला तरी, त्या जवळपास १६ वर्षे पक्षाची धुरा सांभाळण्यात जयललिता यांना मदत करत होत्या. त्यामुळे संघटनेत त्यांचे काही समर्थक आहेत. शिवाय शशीकला या सूडाने पेटलेल्या आहेत. पक्षांतर्गत असंतुष्ट, भाजपचे काही स्थानिक नेते यांना हाताशी धरून अण्णा द्रमुकवर पुन्हा वर्चस्व मिळवण्याचा किंवा तो फोडण्याचा प्रयत्न शशीकला करणार हे उघड आहे. जयललिता यांच्या समाधीस्थळावर जाऊन तमीळनाडूतील पुनरागमनाचा संदेश देण्याचा शशीकला यांचा प्रयत्न आहे. ते टाळण्यासाठी जयललिता यांचे समाधीस्थळ काही डागडुजीच्या कामासाठी राज्य सरकारने बंद ठेवले आहे. तरीही आपणच जयललिता यांच्या वारसदार हे ठसवण्यासाठी शशीकला त्या ठिकाणी जाऊन काही नाट्य रंगवणारच नाहीत याची खात्री नाही. पलानीस्वामी, पनीरसेल्वम व शशीकला हे जयललिता व एमजीआर यांचा राजकीय वारसा ताब्यात ठेवण्यासाठी झगडत असताना एम. के . स्टॅलिन यांनाही एमजीआरच्या वारशावर दावा सांगण्याची गरज वाटू लागली आहे. खरे तर स्टॅलिन यांचे पिता करुणानिधी व एमजीआर हे दोघे द्रविड नेते अण्णा दुरई यांचे राजकीय शिष्य. आधीचे मित्र व नंतरचे राजकीय वैरी. एमजीआर यांनी १९७७ मध्ये सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर आपले वलय आणि गोरगरिबांच्या कल्याणकारी योजनांच्या बळावर त्यांनी तमीळनाडूवर वर्चस्व गाजवले. एमजीआर यांचे १९८७ मध्ये निधन होईपर्यंत करुणानिधी यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवता आले नाही. तमीळ जनमानसावर एमजीआर यांचा असलेला हा प्रभाव अजूनही अमिट आहे याची जाणीव स्टॅलिन यांना झाली आहे. त्यामुळे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एमजीआर हे माझे पेरियप्पा म्हणजेच काका होते असे सांगत स्टॅलिन यांनीही एमजीआर यांचा वारसा सांगण्याचा प्रयत्न केला होता. याउलट हेकेखोरपणा व कौटुंबिक कलहामुळे करुणानिधी यांची प्रतिमा अखेरच्या दिवसांत थोडी खराब झाल्याने वडिलांपेक्षा हे मानलेले काका जास्त मदतीला येऊ शकतात, असा स्टॅलिन यांचा आडाखा आहे. अण्णा द्रमुक सरकारला १० वर्षे पूर्ण होणे, त्यामुळे जनतेत सत्तेविरोधात येणारा रोष व अण्णा द्रमुकमधील नेतृत्वाची पोकळी व संभाव्य फूट यांमुळे द्रमुकला चांगली संधी असू शकते. त्यास एमजीआरच्या वारशाची फोडणी दिली की सत्तेची भट्टी जमू शकते यादृष्टीने द्रमुक व स्टॅलिन वाटचाल करत आहेत. तिकडे रजनीकांत व कमल हासन हेही एमजीआर यांचा वारसा सांगत आहेत. मी एमजीआर यांच्याप्रमाणेच काम करेन असे कमल हासन सांगत आहेत. तर एमजीआर यांनी दाखवलेल्या मार्गावरच काम करू, अशी ग्वाही रजनीकांत देत आहेत.

सत्तेचे हे नवी गडी वारसा जिंकण्यासाठी संघर्ष करत असताना भाजपने जयललिता व करुणानिधी यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या नेतृत्व पोकळीचा लाभ उठवण्यासाठी द्रविडभूमीत हिंदू राजकारणाचा नवा डाव मांडण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी भगवान मुरुगन यांना केंद्रस्थानी ठेवत यात्रा काढली. दुसरीकडे भाजपने अण्णा द्रमुकचे पलानीस्वामी व पनीरसेल्वम यांना अंकित करण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. दुसरा सहकारी रजनीकांतनेही नवा पक्ष स्थापन करणे टाळले. त्यामुळे आता विविध गट-तट, अभिनेते व शक्य झाल्यास शशीकला यांचा छुपा वापर करून द्रमुक-अण्णा द्रमुक या दोन धु्रवांत विभागलेल्या तमीळनाडूच्या राजकारणाला छेद देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जमल्यास त्रिशंकू  विधानसभा यावी अशीच भाजपची इच्छा आहे. त्यामुळे द्रविड वारशावरील अनेक दावेदार आणि नव्याने डाव मांडण्याचे भाजपचे राजकारण असा संघर्ष तमीळनाडू विधानसभा निवडणुकीत रंगणार आहे.

कृषी कर्जमाफी

तमीळनाडूचे मुख्यमंत्री ई. के . पलानीस्वामी यांनी शुक्रवारी राज्यातील शेतकऱ्यांंसाठी १२ हजार ११० कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफी योजनेत सहकारी बँकांचे कर्जही माफ होणार असून १६ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, असे पलानीस्वामी यांंनी जाहीर केले. ऐन निवडणुकांच्या तोंडावर जाहीर केलेल्या अशा प्रलोभनांचा उपयोग होतोच असे नाही. शिवाय अण्णा द्रमुकचे सरकार १० वर्षे असल्याने लोकांचा सत्तेविरोधात रोष प्रकट होतच असतो. त्यामुळे कृषी कर्जमाफी योजना जाहीर करताना पलानीस्वामी यांनी केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खूष करण्याचा एकमेव विचार केलेला नाही, तर आपल्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्या सहकारी व्ही. के . शशीकला यांचे आव्हानही डोळ्यांसमोर ठेवले आहे. पलानीस्वामी यांनी अण्णा द्रमुकमधून शशीकला यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आता शशीकला तुरुंगातून सुटून परत आल्यावर अण्णा द्रमुकचे जुने कार्यकर्ते व मतपेढी आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करणार हे स्पष्ट आहे. शशीकला यांना ते सोपे ठरू नये यासाठी आधीच कर्जमाफी करून मतपेढी व पक्ष संघटनेला आपल्याकडे राखण्याचाही हेतूू त्यामागे आहे.

swapnasaurabha.kulshreshtha@expressindia.com