19 October 2019

News Flash

साने गुरुजींचे निष्ठावान अनुयायी

साने गुरुजी ही देशाला लाभलेली ईश्वरी देणगी होती.

|| यशवंत ब. क्षीरसागर

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक कार्यकर्ते, माजी आमदार आणि साने गुरुजींचे खंदे समर्थक प्रकाशभाई मोहाडीकर यांची जन्मशताब्दी येत्या ९ जानेवारी रोजी साजरी होत आहे. त्यानिमित्ताने या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे स्मरण..

साने गुरुजी ही देशाला लाभलेली ईश्वरी देणगी होती. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची अथांग करुणा, गोरगरिबांविषयी, विद्यार्थीवर्गाविषयी, पददलितांविषयी त्यांना वाटणारा जिव्हाळा हा त्यांच्या जीवनात स्थायिभाव होता. स्वातंत्र्यपूर्वकाळात आणि स्वातंत्र्योत्तर प्रचंड कार्य करूनही त्यांच्या अंत:करणाला अभिमानाचा स्पर्श कधी झाला नाही.

करीन सेवा तव मोलवान।

असा अहंकार असो मला न।

मदिय आहे बल अल्प देवा।

बलानुरुपा मम घेई सेवा॥

असे साने गुरुजी म्हणत. साने गुरुजींच्या प्रत्यक्ष सहवासाने आणि विचारांच्या स्पर्शाने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अनेक सेवाभावी कार्यकर्ते उभे राहिले आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने नवा इतिहास घडविला. त्यांची जन्मशताब्दी ९ जानेवारी २०१९ रोजी संपन्न होत आहे. ते महाराष्ट्राला सुपरिचित  प्रकाशभाई मोहाडीकर हे साने गुरुजींच्या थोर अनुयायींच्या प्रभावळीपैकी होत.

प्रकाशभाईंचे खरे नाव लक्ष्मण गणेश मोहाडीकर. ९ जानेवारी १९१९ हा त्यांचा जन्मदिवस; पण स्वातंत्र्याच्या चळवळीत पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते कधी नाव बदलून, कधी ‘प्रकाशचंद्र शहा’ बनून, तर कधी दुसऱ्या एखाद्या नावाने वावरत होते. पुढे याच सिलसिल्यात ‘लक्ष्मण मोहाडीकरांचे प्रकाश मोहाडीकर झाले! सुरवटांचे फुलपाखरू बनवण्याची किमया ठरली. ‘इच्छा असेल तेथे मार्ग आहे’ या उक्तीप्रमाणे त्यांनी स्वत:च्या खडतर जीवनातून आश्चर्यकारक मार्ग काढला. एक वेळ कॉलेजची फी भरण्यासाठी वडीलबंधूंची (रामभाऊंची) सायकल गहाण ठेवण्याच्या प्रयत्नात त्यांना पोलिसांचा प्रसाद खावा लागला होता!

पूर्ववयात अंमळनेर हायस्कूलमध्ये साने गुरुजींचे विद्यार्थी म्हणून वावरलेले प्रकाशभाई मोहाडीकर हे साने गुरुजींचे निष्ठावंत अनुयायी बनले आणि आपल्या ९४ व्या वर्षांच्या जीवनात त्यांनी जो समाजसेवेचा भव्यदिव्य आदर्श निर्माण केला त्याला इतिहासात तोड नाही! लहानपणी फी भरायला ‘एक रुपया’ नाही, म्हणून शालेय शिक्षणापासून वंचित राहिलेल्या प्रकाशभाईंनी आपल्या जीवनात विविध संस्थांना आणि उपक्रमांना लाख लाख रुपयांची मदत मिळवून दिली, हे समकालीन आश्चर्य म्हणायला हवे. प्रकाशभाईंना देशभक्तीचे आणि देशसेवेचे बाळकडू त्यांच्या राष्ट्रीय वृत्तीच्या वडिलांकडून मिळाले होते. खादीचे व्रतादी त्यांनी वडिलांकडून स्वीकारले आणि त्यायोगे गांधीजींशी, गोरगरिबांशी, वंचितांशी आणि दु:खितांशी ते सदा जोडलेले राहिले.

१५ ऑक्टोबर १९३७ रोजी वयाच्या १७-१८ व्या वर्षी स्थापन केलेल्या प्रकाशमंडळांनी प्रकाशभाईंच्या समाजसेवेचा श्रीगणेशा झाला. पुढे १९४२ च्या स्वातंत्र्यलढय़ात एस. एम. जोशी, शिरुभाऊ लिमये, साने गुरुजी यांच्या सहवासात आल्यावर प्रकाशभाईंच्या कर्तृत्वाला नवा तजेला आला आणि जीवनाचे ध्येय त्यांना जणू गवसले. या लढय़ातील खानदेशची जबाबदारी प्रकाशभाईंनी स्वीकारली होती आणि ती त्यांनी यशस्वीपणे सिद्ध करून दाखविली.

१९४४ साली पुढील शिक्षणासाठी त्यांनी दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये सकाळची अध्यापनाची जबाबदारी स्वीकारून, रुईया महाविद्यालयात पदवी शिक्षणासाठी नाव दाखल केले. १९४६ च्या मुंबईत भडकलेल्या जातीय दंगलीत त्यांनी शांतता निर्माण व्हावी म्हणून नागरिक दलाची स्थापना केली, चाळ समित्या बनविल्या, विभागात स्वयंसेवकांची गस्त सुरू केली.

प्रकाशभाईंनी १९४७ साली स्थापन केलेले अमर हिंद मंडळ आणि त्यायोगे त्यांनी यशस्वी केलेल्या महान कार्यकर्त्यांच्या आणि विचारवंतांच्या वसंत व्याख्यानमाला महाराष्ट्रभर गाजल्या. आनंदाची गोष्ट ही की, हे मंडळ आजही दादर- गोखले रोडवर स्वत:च्या वास्तूत कार्यरत आहे. या व्याख्यानमालेसाठी प्रकाशभाईंनी साने गुरुजींना ‘कर्तव्याची हाक’ या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केले होते, पण गुरुजींनी ते निमंत्रण नाकारले! सुशिक्षितांसमोर मी काय बोलणार, असे गुरुजींना वाटे.

११ जून १९५० रोजी साने गुरुजींचे परेल येथील के.ई.एम. रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. प्रकाशभाईंच्या जीवनातील हा काळाकुट्ट दिवस होता; पण आश्चर्य असे की, या आघाताने प्रकाशभाई खचले नाहीत. उलट वर्षभरात साने गुरुजींच्या जयंतीदिनी २४ डिसेंबर १९५१ रोजी त्यांनी साने गुरुजी कथामालेची स्थापना केली. त्या दिवशी साने गुरुजींचे जुने स्नेही आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गांधीवादी विचारवंत आचार्य भागवत यांनी विद्यार्थ्यांनी आणि चाहत्यांनी तुडुंब भरलेल्या दादरच्या कित्तेभंडारी हॉलमध्ये महाभारतातील कथा सांगून कथामालेचे उद्घाटन केले. आज ‘अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला’ बालसंस्कारासाठी अतिशय उपयुक्त, अतिशय सुलभ आणि अतिशय प्रभावशाली साधन ठरले आहे. सतत वर्धिष्णू कथामालेच्या रूपाने प्रकाशभाईंची स्मृती अजरामर झाली आहे यात शंका नाही. त्यांच्या मृत्यूपूर्वी काही महिने दापोली येथे भरलेल्या साने गुरुजी कथामाला अधिवेशनात प्रकाशभाई रुग्णवाहिकेने उपस्थित राहिले होते.

१९५४ साली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे भरलेला विद्यार्थ्यांचा अतिभव्य मेळावा आणि संगीतकार वसंत देसाई यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली त्या वेळी उपस्थित लाख विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध गायिलेले राष्ट्रगीत प्रकाशभाईंच्या संघटन कौशल्याचे अविस्मरणीय उदाहरण होय.

बाबा आमटे यांच्या आनंदवनातील अनाथ बालकांसाठी प्रकाशभाईंनी विद्यार्थी वर्गाला आवाहन करून जमवून दिलेले  चार साडेचार लाख रुपये, पनवेलच्या शांतिवनासाठी त्यांनी दिलेले व्यक्तिगत आणि आर्थिक साहाय्य, १९५५ साली दादर येथे उभारलेले साने गुरुजी विद्यालय – या सर्व उपक्रमांत प्रकाशभाईंवरील सर्वसामान्यांचा अतूट विश्वास प्रगट होत आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  मनोहर जोशी यांनी देऊ केलेली सरकारी जागा नियमाविरुद्ध वाटल्यामुळे प्रकाशभाईंनी नाकारली आणि ‘परिमल’मधील ‘१०x१०’ च्या जागेत राहणे पसंत केले!

साने गुरुजींसारख्या महापुरुषाच्या जीवन तत्त्वज्ञानावरील अविचल निष्ठा, उत्तम सात्त्विक आचरण, विशुद्ध सेवाभाव आणि स्नेहभाव आम्ही प्रकाशभाईंच्या सेवाभावी जीवनात पाहिला आणि धन्य झालो! आता त्या जीवनयात्रेत उषाताईंचे त्यांना मिळालेले पाठबळ लक्षणीय होते. विवाहानंतर उषाताईंनी जिद्दीने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेऊन साने गुरुजी विद्यालयात अध्यापन केले. जीवनसंघर्षांत त्यांनी प्रकाशभाईंना सहधर्मचारिणी म्हणून मोलाची साथ दिली. प्रकाशभाई आमदार म्हणून निवडून आल्यावर किंवा मुंबई महापालिकेत शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून वावरताना त्यांच्यासोबत वावरणाऱ्या उषाताईंना पाहून आम्हा मित्रांना आनंद वाटे; पण स्वत: उषाताईंना या मानसन्मानाचे ओझे कधी वाटले नाही! त्या नेहमी समचित्त आणि शांत दिसत, अभ्यागतांशी अगदी सहजपणे बोलत. उषाताईंच्या दु:खद निधनानंतर प्रकाशभाईंच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली होती; पण प्रकाशभाईंनी धीरोदात्तपणे आपले दु:ख कधी प्रगट होऊ दिले नाही!

शेवटी असे म्हणावेसे वाटते की, प्रकाशभाई मोहाडीकर केवळ एक व्यक्ती नव्हती, ती एक महान शक्ती होती. प्रदीर्घ जीवनाबरोबर त्या शक्तींच्या विविध कला सदैव विकसत गेल्या! सभोवारचा संसार सुखी-समाधानी व्हावा यासाठी ही शक्ती सदैव झटत राहिली, कार्यरत राहिली!

तुमच्या-आमच्या जीवनातून, संकल्पातून, कृतीमधून ही शक्ती पुनरपि जागृत होईल, नवनवे उन्मेष तिला लाभतील आणि देशाचे अंतिम कल्याण हेच तिचे ध्येय असेल!

प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

First Published on January 6, 2019 12:03 am

Web Title: prakash mohadikar