||  सुलक्षणा महाजन

मूळ इमारत न पाडता, उपलब्ध जागा वाढवून तीच इमारत ‘नवी’ करणारे वास्तुरचनाकार दाम्पत्य यंदा वास्तुकलेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे मानकरी ठरले.. पण त्यांच्याकडून आपण जोवर काही शिकत नाही, तोवर ‘अडाण्याचा गाडा’ सुरूच राहणार..

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

 

वास्तुकला-वास्तुशास्त्राच्या क्षेत्रातला दरवर्षी दिला जाणारा प्रिट्झ्कर पुरस्कार जागतिक महत्त्वाचा, नोबेल बक्षिसाच्या तोडीचा. या वर्षीचा हा पुरस्कार फ्रान्समधील अ‍ॅन लकातो आणि फिलिप वासल यांना वास्तू व्यवसायातील त्यांच्या योगदानाबद्दल देण्यात आला. वास्तुकला-वास्तुशास्त्रातील ‘स्थळ आणि काळ’ या सार्वत्रिक तत्त्वांच्या आधारे त्यांनी केलेल्या वास्तुरचनांसाठी, विशेषत: नवजीवन दिलेल्या वास्तूंच्या कामासाठी या दोघांची निवड झाली आहे. त्यातील एक आहे पॅरिसमध्ये १९६० साली बांधलेला प्रकल्प. ५३० घरे असलेल्या बहुमजली निवासी इमारतीची विशेष दखल घ्यायला हवी. तेथील इमारतींच्या बाहेर चार मीटर रुंदीचा दर्शनी भाग नव्याने वाढवून नंतर तो प्रत्येक घराला तो जोडला. जुन्या घराची बाह्य़ भिंत पाडून तेथे काचेचे दरवाजे बसवून प्रत्येक घराचे क्षेत्रफळ, नैसर्गिक उजेड आणि वायुविजन वाढवले. शिवाय अंतर्गत भागात कुटुंबांच्या गरजेनुसार बदल करून, दुरुस्ती करून सोयी-सुविधा वाढवल्या. जुन्या झालेल्या इमारतींचे आयुष्य किमान ५० वर्षांनी वाढवले.

विशेष म्हणजे  ते करत असताना कोणत्याही कुटुंबाला घर सोडून जावे लागले नाही. कमी खर्चात नवीन, मोठी सोयीची घरेही मिळाली आणि त्यांचे बाजारमूल्यही वाढले. नवीन कल्पना, आधुनिक बांधकाम साहित्य आणि तंत्र, जुन्यातून नवे करण्याची मानसिक धडपड याची विशेष नोंद घेतली गेली.

अ‍ॅन म्हणते, ‘‘आम्ही कोणत्याही वास्तू प्रकल्पाचा विचार करताना बाह्य़ आकारापेक्षा त्या वास्तूचे शहरातले स्थान, विशिष्ट भूखंड आणि तिथे रुजलेल्या समाजाला प्राधान्य देतो. शहरांमध्ये जागोजागी ज्या वास्तू उपलब्ध असतात त्यात बदल घडवून त्याचे मूल्य वाढविण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ते करताना हवामान बदलाचे आव्हान आम्ही नजरेआड  होऊ देत नाही, कारण वास्तू रचनाकारांची ती मोठी जबाबदारी आहे असे आम्ही मानतो’’. फिलिप  म्हणतो, ‘‘आम्ही जुन्या इमारती पाडत नाही, तेथील लोकांना बेदखल करत  नाही, तर त्यामध्ये भर घालतो, सुयोग्य बदल करतो आणि राहण्यासाठी, वापरासाठी त्या अधिक सोयीस्कर करतो. आम्ही वास्तू आतून बघतो, जाणून घेतो, थोडय़ा बदलातून खूप काही साध्य करतो. कारण वास्तूंशी अनेक लोकांचे भावनिक संबंध गुंतलेले असतात, आठवणी असतात आणि त्या नष्ट करणे योग्य नसते. अशा इमारतींमध्ये खूप बांधकाम साहित्य, श्रम, ऊर्जा आणि ज्ञान वापरलेले असते. इमारती पाडून ते सर्व वाया घालविणे आम्हाला पटत नाही. त्यामुळेच आम्ही वास्तू पाडण्याचा विचार कधीही करत नाही.’’

विसाव्या शतकात लोखंड, सिमेंट आणि काचा अशा साधनांचा शोध लागल्यापासून वास्तुकला- शास्त्राच्या क्षेत्रामध्ये ‘मोअर इज लेस’ हा मंत्रजागर सुरू झाला होता. उत्तुंग, भव्य, प्रशस्त वास्तुरचना करून डोळे दिपवून टाकण्याची एक स्पर्धा सुरू झाली होती. पाश्चिमात्य देशांमध्ये निसर्गावर आधिपत्य हा विचार प्रबळ असण्याचा तो काळ होता. औद्योगिक क्रांतीच्या काळात, पंधराव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मानवाने नैसर्गिक साधनांचा वापर प्रचंड प्रमाणात केला. नंतर मात्र पर्यावरणाच्या विनाशात स्वत:च्या नाशाची बीजे असल्याचे लक्षात आल्यावर त्याला आवर घालण्याचे प्रयत्न सुरू झाले. सर्वप्रथम मिस-व्हॅन- डी- रोह या वास्तुतज्ज्ञाने ‘लेस इज मोअर’ हा विचार १९३०मध्ये मांडला. तेव्हापासून नैसर्गिक संपत्तीचा वापर कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

एकविसाव्या शतकात आता शाश्वत विकासाला महत्त्व आले आहे. लोकसंख्यावाढ, शहरीकरण, उपभोगाची संस्कृती, पायाभूत सेवा क्षेत्राचा विस्तार, अभियांत्रिकी, वाहतूक, ऊर्जा वापर आणि वास्तूची रचना एकमेकांशी निगडित असतात. हा संबंध ओळखला नाही, तर जमीन, पाणी, हवा आणि सजीव सृष्टीवर त्यांचे विपरीत परिणाम होतात. त्यामुळेच बांधकाम क्षेत्राने पूर्वी वापरलेली नैसर्गिक साधनसंपत्ती, बांधकामे, पायाभूत सेवा यांचे संवर्धन करणे हे मोठे आव्हान मानून अ‍ॅन लकातो आणि फिलिप वासल यांनी वास्तुरचना केल्या.

भारतामध्ये मात्र भक्कम बांधकामे पाडण्याची मोहीम जोरात आहे. त्यासाठी निमित्त शोधण्याचेच प्रकार चालू आहेत. गेली तीस वर्षे, जुन्या चाळी पाडून त्या जागी नव्या, मोठय़ा इमारती बांधून १०० ते २०० पट नफा मिळविण्याच्या वेडाने मुंबई-महाराष्ट्रातील राजकारणी, विकासकांना पछाडले होते. त्यांच्या बरोबरच आता निदान पन्नास-साठ वर्षे अत्यल्प भाडय़ाचा उपभोग घेतलेले भाडेकरू, अधिकृत झोपडवस्त्या आणि तीस-चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या गृहनिर्माण संस्थांमधील लाखो सभासदांनाही ‘फुकट घरां’च्या लोभाने ग्रासले असून इमारती पाडण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र सरकार गेली दोन दशके वाढीव चटई क्षेत्राचे चलन कागदी फतवे काढून वितरित करते आहे. या वेडाच्या लाटेत काहींना घरे मिळाली असली तरी असंख्य कुटुंबे देशोधडीला लागली आहेत. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात नदीच्या वाळूतून सोन्याचे कण मिळविण्यासाठी ‘गोल्ड रश’ होऊन अनेकजण फसले होते त्याचप्रमाणे फुकट घरे मिळविण्याची घाई आता तोटय़ाच्या खाईत नेणारी ठरू शकते.

बांधकाम व्यवसाय हा शेतीखालोखाल रोजगार देणारा महत्त्वाचा उद्योग. शेतीचा हंगाम संपला की अनेक शेतमजूर आणि अल्प भूधारक शेतकरी शहरातील बांधकामावर मजूर म्हणून रुजू होतात. ‘लॉकडाउन’च्या काळात लाखो बांधकाम मजूर बेकार झाले आणि अशा स्थलांतरितांचे तांडे गावांकडे गेलेले आपण पाहिले आहे. बांधकाम क्षेत्र हे राजकीय दृष्टीने नेहमीच आकर्षक असते. भव्य-दिव्य सार्वजनिक बांधकाम प्रकल्प सामान्य नागरिकांचे डोळे दिपवतात; त्यामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय नेते असे प्रकल्प शोधत असतात. शिवाय त्यात कुशल-अकुशल लोकांसाठी मोठे रोजगार निर्माण होतात, अर्थव्यवस्थेला गती मिळते. कारखान्यांच्या आधारावरच उत्पादक उद्योग उभे राहतात; नागरिकांना रस्ते, पाणी, सांडपाणी, वीज अशा पायाभूत सेवा मिळतात. शिवाय अलीकडच्या काळात नेत्यांना त्यातून मोठे वरकड आर्थिक लाभ घेण्याचे कौशल्य अवगत आहे.

एकंदरीत बांधकाम क्षेत्र सार्वजनिक हितापेक्षा राजकीय लाभासाठी जास्त उपयुक्त ठरते आहे. त्यात आवश्यक लोकोपयोगी प्रकल्प आहेत; पण अनावश्यक, दिखाऊ, प्रकल्प कमी नाहीत. राजकीय नेते ‘बांधकामजीवी उद्योजक’ झाले असल्याने त्यांच्या क्षमता आणि लालसा अधिकच वाढल्या आहेत. फुकट घरे, जास्त चटईक्षेत्र, बांधकाम नियमातील सवलती देऊनही पंचवीस वर्षांत बहुसंख्य खासगी इमारतींचा पुनर्विकास होऊ शकलेला नाही. त्यामुळे बांधकामजीवी उद्योजकांची नजर आता म्हाडाच्या, पालिकेच्या, शासनाच्या मोक्याच्या जमिनीकडे वळली आहे.

‘अडाण्याचा आला गाडा, वाटेवरच्या विहिरी पाडा’ किंवा ‘अडाण्याचा आला गाडा, वाटेवरच्या वेशी तोडा’ अशा मराठी भाषेतील म्हणी आपल्याला माहीत आहेत. इमारती पाडणे आणि आणि क्रेनच्या गुढय़ा उभारून आकाश व्यापणे हा मोठा राजकीय उद्योग झाला आहे. अशा अडाणी राजकारण्यांचा गाडा-  नव्हे बुलडोझर – केवळ सजग, जबाबदार आणि बांधकाम-साक्षर नागरिकच अडवू शकतात. शहरातील मध्यमवर्गीय घरमालकांनी देखभाल दुरुस्तीची कामे काढली तर त्यातून बांधकाम क्षेत्राला नवीन दिशा मिळेल, मजुरांच्या हाताला काम मिळेल. कमी गुंतवणुकीतून अर्थव्यवस्थेला गती मिळू शकेल आणि इमारतींच्या पाडापाडीचे वेड आणि अनावश्यक पडझड टाळता येईल.

त्यासाठी रहिवाशांनीही फुकट घराचा आग्रह सोडून अ‍ॅन लकातो आणि फिलिप वासल या वास्तुरचनाकारांच्या उदाहरणांची दखल घेत आपल्या इमारतींची देखभाल-दुरुस्ती, सुधारणा, वाढ अशा पर्यायांचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर वास्तुरचनाकार, अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यावसायिकांनीही इमारतींची आयुर्मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न केले तर बांधकामजीवी राजकीय नेत्यांचा आणि विकासकांना लगाम घालता येईल.

(लेखिका नगररचनाशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)

sulakshana.mahajan@gmail.com