अख्ख्या जगात सर्वाधिक कैदी आहेत अमेरिकेत. तब्बल २३ लाखापेक्षा अधिक. त्यात कृष्णवर्णीयांची संख्या जास्तच. त्यातले दोन लाखांहून अधिक कैदी खासगी तुरुंगांमध्ये आहेत. अधिकृतपणे नोंदणी न करता विविध रोजगारांसाठी अमेरिकेत आलेल्या स्थलांतरितांना गजाआड डांबण्याच्या प्रकारांमुळे खासगी तुरुंग व्यवसाय येथे फोफावला आहे. कैद्यांच्या या धंद्यात बक्कळ नफा आहे हे कळल्यावर अनेक कंपन्या या खासगी तुरुंग व्यवसायामध्ये उतरल्या आहेत. त्यांच्या नफ्यामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून, तो नफा शेकडो पटींत वाढला आहे.

तरुण आणि लहान मुले हे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम कैदी. त्यांच्यावर खर्च कमी होतो. आणि त्यांना बाहेर पाठवून भरपूर पैसे मिळवता येतात हा त्याचा मुख्य हेतू. येथील एका न्यायाधीशाने तब्बल चार हजार मुलांना कारण नसताना तुरुंगामध्ये डांबले होते. प्रत्येक मुलामागे तुरुंगाच्या मालकाकडून मिळणारी रक्कम हे त्यामागचे कारण. अशा अनेक घटना येथे समोर येत असतात.

या खासगी तुरुंग उद्योगांसाठी लॉबिंग करणारे अनेक गट असतात. ते राज्य आणि केंद्र पातळीवर तुरुंगवासासाठी पोषक कायदे तयार करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांना एका कैद्यामागे मोठय़ा प्रमाणावर डॉलर मिळतात. अनेकवेळा स्थलांतरितांचा मुख्य गुन्हा हा स्थलांतर करणे असला, तरी कित्येकदा एखाद्या गंभीर फौजदारी गुन्हय़ासाठी कुणी सापडले नाही म्हणून त्यांना तुरुंगामध्ये पाठवले जाते, असे अनेक अहवालांमधून स्पष्ट होते. सुधारगृहाचे मालक सुधारगृहातील एकही खोली रिकामी ठेवत नाहीत. सुधारगृहातील एक कैदी कमी झाला तरी मालकाला अनेक डॉलरचं नुकसान होतं. त्यामुळे कैद्याला टिकवून ठेवण्याची खटपट येथे केली जाते. कैदी बाहेर जाऊ नये यासाठी त्यांना धमकावण्यात येते. तसेच अनेक वेळा मारहाण करण्याचे प्रसंगही घडून येतात.

untitled-23

अमेरिकेतील तुरुंगांची स्थिती

  • खचाखच भरलेले तुरुंग
  • मोठय़ा प्रमाणात अत्याचार
  • सुरक्षा आणि आरोग्य यामध्ये ढिसाळपणा
  • लैंगिक छळ

उच्च दर्जाची सुरक्षा असलेली जगातील प्रमुख १० कारागृहे

  • एडीएक्स फ्लोरेन्स, अमेरिका
  • अल्काट्राझ, अमेरिका
  • ला सेंट तुरुंग, फ्रान्स
  • फेडरल करेक्शनल कॉम्प्लेक्स, अमेरिका
  • सौझा बारानोस्की केंद्र, अमेरिका
  • ऑर्थर रोड तुरुंग, भारत
  • फुचू तुरुंग, जपान
  • कॅप्म डेल्टा, अमेरिका
  • टॅडमोर लष्करी तुरुंग, सीरिया
  • क्विनचेंग तुरुंग, चीन

कैद्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षा

  • कमी दर्जाची सेवा देणे.
  • शिक्षेत वाढ करणे
  • तीन महिन्यांसाठी वाचणे, लिहिणे अथवा चित्र काढणे यासाठी बंदी
  • कपडे धुणे यासह इतर काम करण्यास भाग पाडणे
  • १५ दिवस अतिशय कमी जेवण
  • व्यायाम करू न देणे. लैंगिक छळ करणे. आठवडय़ातून एकदा आंघोळ
  • कमी दर्जाची औषधे. आजारी कैद्यांकडे दुर्लक्ष

पेपरची इस्त्री

कारागृहात कैदी इंग्रजी वृत्तपत्र हटकून मागवताना दिसतात. तो वाचण्यासाठी नाही. कपडय़ांना इस्त्री करण्यासाठी. इंग्रजी पुरवण्या गुळगुळीत कागदाच्या असतात. शर्ट, पॅण्टची घडी घालायची. घडीत पेपर ठेवायचा. खालून वरून पेपरमध्ये कपडे व्यवस्थित गुंडाळून अंथरूणाखाली सारायचे. सकाळी कडक इस्त्रीचे कपडे हाती पडतात.

आर्थर रोडमधील हंडय़ाबंद..

कैद्यांना सकाळी ११ आणि संध्याकाळी ७ वाजता जेवण मिळतं. ते अनेकदा गार, बेचव असतं. पूर्वी कैद्यांना अ‍ॅल्युमिनिअमचे थाळे दिले जात. ते वाकवून खोलगट करायचे. त्यात आमटी, भाजी ओतायची. तेलात बुडवलेले जुने कपडे, सुकवलेल्या चपात्या, रद्दी पेपर यांचं सरपण करून आग पेटवायची. त्यावर जेवण गरम करायचं. मीठ, मसाला मिसळून तो पदार्थ चमचमीत करायचा. त्याला कारागृहात हंडी लावणं हा शब्द वापरला जातो. कारागृह अधिकारी, वॉर्डनला पैसे देऊन अशा अनेक हंडय़ा कारागृहातल्या प्रत्येक बरॅकमध्ये लागायच्या.

पण कारागृह प्रशासनाने आर्थररोडच्या बहुतांश बरॅकमध्ये जेवण गरम ठेवणारं, करून देणारं ‘हॉटपॉट’ दिलंय. शिवाय अ‍ॅल्युमिनिअमच्या जागी फायबरच्या थाळ्या, चमचे दिलेत. त्यामुळे कारागृहातल्या हंडय़ा आता थंडावल्या आहेत.