कबड्डीसारख्या देशी खेळाची आयपीएलच्या पद्धतीने स्पर्धा घेण्याच्या ईष्रेने प्रेरित होऊन महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी ‘प्रो-कबड्डी’ लीगची घोषणा केली. खेळ आणि मनोरंजन यांची सांगड घालून तयार करण्यात आलेला हा फॉर्म्युला लोकप्रिय करण्यासाठी महिंद्रा यांच्या नेतृत्वाखाली मशाल स्पोर्ट्स कंपनी सज्ज झाली आहे. ‘प्रो-कबड्डी’ म्हणजे या खेळाला आधुनिक, स्पर्धात्मक आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकार म्हणून प्रस्थापित करण्याचा एक प्रयत्न असल्याचे महिंद्रा अभिमानाने सांगतात. याचप्रमाणे ‘प्रो-कबड्डी’ लीग ही सध्या तरी जोखीम असलेली भांडवली गुंतवणूक म्हणता येईल. अनेक आव्हाने आमच्यासमोर आहेत. टेलिव्हिजनवर प्राइम टाइमला हा खेळ आकर्षक पद्धतीने सादर करणे, हे सध्या तरी एक प्रकारे साहसच म्हणता येईल, असे त्यांनी सांगितले. जुलैपासून साकारणाऱ्या ‘प्रो-कबड्डी’ लीग स्पध्रेविषयी आनंद महिंद्रा यांच्याशी केलेली खास बातचीत
*कबड्डीला अनेक वर्षांचा इतिहास आहे. परंतु तरीही या खेळाला देशात मानाचे स्थान दिले जात नाही. ‘प्रो-कबड्डी’मुळे या वातावरणात बदल होईल, असे तुम्हाला वाटते का?
– भारतात कबड्डी हा खेळ किती प्रमाणात लोकप्रिय आहे, याची मलासुद्धा काही दिवसांपूर्वी कल्पना नव्हती. परंतु नंतर मला एक महत्त्वाची आकडेवारी मिळाली. त्यानुसार, देशात सुमारे चार हजारांहून अधिक कबड्डी संघ अस्तित्वात आहेत. यापैकी मुंबई शहरात असलेल्या कबड्डी संघांची संख्या चारशेहून अधिक आहे. या सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने कबड्डीरसिक उपस्थित असतात. फारसा खर्चीक नसलेला हा खेळ देशातील सुमारे सात लाख शाळांमध्ये खेळला जातो. जागतिक पातळीवर या खेळाचा विचार केल्यास आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाची ३२ देशांना मान्यता आहे. यात जर्मनी, इटली, जपान आणि कोरिया यांच्यासारख्या प्रगत देशांचा समावेश आहे.
कबड्डी हा खेळ देशात आणि परदेशात अतिशय लोकप्रिय आहे आणि ‘प्रो-कबड्डी’ म्हणजे या खेळाला आधुनिक, स्पर्धात्मक आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकार म्हणून प्रस्थापित करण्याचा एक प्रयत्न आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास ‘प्रो-कबड्डी’मधील सर्वच सामने देशातील मोठय़ा शहरांमधील बंदिस्त स्टेडियममध्ये खास विकसित करण्यात आलेल्या मॅट्सवर खेळवण्यात येणार आहेत. देशातील आणि परदेशातील अनेक दिग्गज कबड्डीपटू या लीगमध्ये खेळणार आहेत. ‘प्रो-कबड्डी’ लीगचे ‘स्टार स्पोर्ट्स’ या क्रीडा वाहिनीवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. ध्वनिचित्रांची एक अद्भुत अनुभूती देण्याच्या इराद्यानेच या सामन्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
*गेली सात वष्रे भारतात समर्थपणे उभ्या असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचा डोलारा हा खंबीर आर्थिक पायावर उभा आहे. व्यावसायिक पद्धतीने कोणत्याही खेळाला चालना देता येते, असे तुम्हाला वाटते का?
– सर्वच खेळ हे परावलंबी असतात. सरकारी किंवा खासगी क्षेत्रातून मिळणाऱ्या मदतीशिवाय ते टिकूच शकत नाहीत. क्रीडा अर्थव्यवस्थेला उद्योग क्षेत्राकडून अधिकाधिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे आणि उद्योग क्षेत्राला आपण केलेल्या गुंतवणुकीतून फायदा व्हावा, अशी अपेक्षा आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये आणि अमेरिकेत आजच्या घडीला क्रीडा उद्योग नमुना हा बास्केटबॉल, बेसबॉल, अमेरिकन फुटबॉल आणि आइस हॉकी या खेळांच्या लीगस्च्या बाबतीत यशस्वीपणे कार्यरत आहे. म्हणूनच या देशांमध्ये सदर खेळांनी लोकप्रियतेची उंची गाठली गेली आहे. भारताचा विचार केल्यास क्रिकेट हा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंतु अब्जावधीहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशाने फक्त एका खेळापुरते मर्यादित राहू नये, असे मला वाटते.देशात असलेल्या कबड्डीच्या लोकप्रियतेचाच उत्तम वापर करता येईल, अशी ‘प्रो-कबड्डी’ लीगला आशा आहे. ‘प्रो-कबड्डी’ लीग ही सध्या तरी जोखीम असलेली भांडवली गुंतवणूक म्हणता येईल. अनेक आव्हाने आमच्यासमोर आहेत. टेलिव्हिजनवर प्राइम टाइमला हा खेळ आकर्षक पद्धतीने सादर करणे, हे एक प्रकारे साहसच म्हणता येईल. स्टार, ओ अॅण्ड एम, वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुप इत्यादी आघाडीच्या कंपन्या आमच्यासोबत या जोखमीत भागीदार आहेत. संघमालकांनीही आपली खेळावरील निष्ठा आणि त्याची क्षमता लक्षात घेऊन गुंतवणूक केली आहे.
*कोणत्याही कबड्डीपटूला क्रिकेटपटूप्रमाणे ओळख नाही. ‘प्रो-कबड्डी’ लीगचे ‘स्टार स्पोर्ट्स’ या अव्वल क्रीडावाहिनीवरून प्रक्षेपण होणार आहे. या थेट प्रक्षेपणामुळे कबड्डीपटूंना चांगली ओळख मिळेल का?
– मनोरंजनाला तुमच्या दिवाण्खान्यात आणण्याची क्षमता टेलिव्हिजनमध्ये आहे. तुम्ही रिमोट फार काळ दूर ठेवूच शकत नाही. क्रीडा क्षेत्रातही तसेच आहे. व्यावसायिक खेळाडू आणि क्रीडारसिक टेलिव्हिजनच्या माध्यमातूनच घरोघरी पोहोचले आहेत. खेळाचा सच्चा चाहता आणि खेळाडू यांच्यात हे नाते निर्माण करण्यात ‘स्टार स्पोर्ट्स’चा सिंहाचा वाटा आहे. टेलिव्हिजनमुळे एक उत्तम क्रीडापटू त्या खेळातील लोकप्रिय खेळाडू म्हणून प्रकाशात येतो. आता ही वाहिनी देशातील कबड्डीपटूंना ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
*अभिनेता अभिषेक बच्चनने जयपूर संघासाठी गुंतवणूक केली आहे. ‘मी खेळाडू म्हणून नव्हे, तर या खेळावरील प्रेमाखातर ‘प्रो-कबड्डी’मध्ये सामील झालो आहे,’ असे तो म्हणतो. ‘प्रो-कबड्डी’च्या यशासाठी तुम्ही ग्लॅमरला किती महत्त्व देणार?
– अभिषेकने जयपूर संघाची घोषणा करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. वडील अमिताभ बच्चन यांनी त्याला या खेळाचा बालपणी परिचय करून दिला. अभिषेक हा स्वत:ला क्रीडापटू समजतो. खेळाविषयी जिवापाड प्रेम करणारा अभिषेक कबड्डी हा खेळ भारताचा ऐतिहासिक ठेवा असल्याचे मानतो. क्रीडाजगताचा आणि चित्रपटसृष्टीचे गेल्या अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध आहेत. या दोन्ही क्षेत्रांमध्ये मनोरंजनासाठी आवश्यक सर्व घटक आहेत. या दोन्हीमध्ये हृदयस्पर्शी असे समर्थ नायक आणि नायिका आहेत. त्यामुळे जगातील प्रत्येक खेळाचे ग्लॅमर क्षेत्राशी ऋणानुबंधाचे नाते आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हा व्याख्येचा घटक नाही, परंतु त्यामुळे काही प्रमाणात मोल वाढते, असे मला वाटते.
*काही वर्षांपूर्वी महिंद्रा ही कंपनी क्रीडा क्षेत्रातील महासत्ता म्हणून कार्यरत होती. आता काही वर्षांच्या अंतराने महिंद्रा ‘प्रो-कबड्डी’च्या निमित्ताने पुन्हा मोठय़ा प्रमाणात सक्रिय झाली आहे. तुम्ही कबड्डी या खेळाची का निवड केली?
– फुटबॉल, हॉकी आणि कबड्डी यांसारख्या अनेक खेळांना गेली अनेक वष्रे महिंद्राने पाठबळ दिले आहे. परंतु गेली काही वष्रे आम्ही ब्रॅण्ड व्हॅल्यू आणि उद्योगाशी निगडित क्रीडा क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे अन्य खेळांमधील गुंतवणूक कमी करून आम्ही महिंद्रा रेसिंगकडे आमचे लक्ष केंद्रित केले आहे. दुचाकींसाठीची मोटो जीपी अजिंक्यपद, फॉम्र्युला ई आणि एफआयएची इलेक्ट्रिक कार अजिंक्यपद आदी शर्यतींमध्ये आम्ही प्रतिनिधित्व करीत आहोत. ब्रॅण्ड व्हॅल्यू म्हणून आम्ही आमच्या वाहन उद्योगावर लक्ष वळविले. त्यामुळे मध्यंतरीच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रावर काहीसा खर्च कमीदेखील झाला.
दुसरे सांगायचे म्हणजे, ‘प्रो-कबड्डी’मध्ये महिंद्रा उद्योगसमूहाची नव्हे, तर माझी वैयक्तिक गुंतवणूक आहे. माझे मेहुणे आणि क्रीडा समालोचक चारू शर्मा यांनी या खेळाशी माझी नव्याने ओळख करून दिली. अनेक बठकींनंतर मला या लीगचे महत्त्व पटले. कबड्डी या प्राचीन भारतीय खेळात आधुनिकरीत्या साकारण्याची क्षमता आणि भवितव्य आहे. कबड्डीवरील या वैयक्तिक विश्वासामुळे मी हा निर्णय घेतला. महिंद्रा समूहाच्या विकास तत्त्वज्ञानाच्या आधारे मी ‘प्रो-कबड्डी’मध्ये गुंतवणूक करू शकलो.
* क्रिकेटमधील सर्वसामान्यांचे धावफलक, विक्रम आणि आकडेवारी उपलब्ध आहे. कबड्डी हा खेळ एशियाड, सॅफ या क्रीडास्पर्धाप्रमाणेच त्याचा विश्वचषकसुद्धा होतो. परंतु याबाबतची कोणतीही आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही. ‘प्रो-कबड्डी’ लीगच्या संयोजकांनी याचा गांभीर्याने विचार केला आहे का?
– अर्थातच, आकडेवारी ही खूपच महत्त्वाची असते. ज्यामुळे तुलनेचा दर्जा आणि सर्वोत्तमतेचे निकष ठरतात. सांख्यिकी आणि विक्रम यांची जोपासना करण्याची नितांत आवश्यकता आहे. परंतु या सर्व गोष्टींसाठी ते सर्वत्र स्वीकारार्ह असायला हवेत. मार्क गेट्टीने ‘क्रिकइन्फो’ खरेदी करण्यापूर्वी क्रिकेटमधील सर्वोत्तम आकडेवारी उपलब्ध असलेले ‘विस्डेन’ खरेदी केले. त्यामुळे त्याच्याकडे १६० वर्षांतील सर्वोत्तम विक्रम आणि सांख्यिकी उपलब्ध झाले. मग त्याने कोणत्याही अडथळ्यांशिवाय ही माहिती नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सादर केली. याच पद्धतीने आम्ही मापनश्रेणी विकसित करीत आहोत, जेणेकरून खेळाचा आनंद लुटता येईल. खेळाडूंना अधिक महत्त्व प्राप्त होईल. आम्ही क्रिकेटनंतर खूप, खूप वर्षांनी याची सुरुवात करीत आहोत, हे आमच्या या अभियानातील सर्वात मोठे आव्हान आहे. कबड्डीच्या प्रारंभीच्या दिवसांची आकडेवारी म्हणजे फक्त जय आणि पराजय एवढाच उपलब्ध आहे. परंतु या सांख्यिकीचा आणि आकडेवारीचा खेळाडू आणि संघांच्या कामगिरीसाठी योग्य उपयोग करून घेता येईल, याची जाणीव आता आम्हाला झाली आहे. आम्ही भारतीय हौशी कबड्डी महासंघासोबत मेहनत घेऊन ही आकडेवारी जमा करीत आहोत. त्यामुळे चढाई, पकड, झटापट आणि अशा अनेक गोष्टी अधोरेखित करता येतील.
*‘प्रो-कबड्डी’साठी फ्रँचायझी शहरांची निवड करताना संयोजकांनी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या? खेळाची शहरातील लोकप्रियता, उद्योगजगत की अन्य घटक..?
– मी नमूद केल्याप्रमाणे कबड्डीला अनेक वर्षांचा इतिहास आहे. संपूर्ण भारतात ही स्पर्धा पोहोचावी आणि लोकप्रिय व्हावी, हा उद्देश समोर ठेवून आम्ही शहरांची निवड केली आहे. याचप्रमाणे या लीगसाठी आवश्यक असणारे दर्जेदार बंदिस्त स्टेडियम्स आणि संघमालक या गोष्टीसुद्धा आम्ही ध्यानात घेतल्या. आमच्या संघबांधणीला उत्तम प्रतिसाद लाभला. फ्यूचर ग्रुप, कोटक ग्रुप, येस बँक, कोअर ग्रीन ग्रुप, कलपाठी इन्व्हेस्टमेंट्स, रॉनी स्क्रूवाला, अभिषेक बच्चन आदी उद्योगक्षेत्रातील यशस्वी कंपन्या, व्यक्ती यांनी संघमालक म्हणून रस घेतला, यासाठी आम्ही स्वत:ला नशीबवान समजतो.
*पहिले ‘प्रो-कबड्डी’ लीगचे पर्व फक्त पुरुषांसाठी असणार आहे. भविष्यात महिलांसाठीसुद्धा अशा लीगची योजना आहे का?
– कोणताही खेळ स्त्री-पुरुष यांच्यापुरता मर्यादित नसतो. आमच्या दीर्घकालीन योजनेत महिलांच्या ‘प्रो-कबड्डी’ लीगचाही समावेश आहे.
*‘प्रो-कबड्डी’च्या प्रचारात सोशल मीडियाची भूमिका किती महत्त्वाची असेल?
– सोशल मीडियाचा मी अत्यंत ऋणी आहे. याच माध्यमातून आम्ही संवाद साधतो, उद्योग वाढवतो, नव्या कल्पना मांडतो किंवा एकमेकांशी चर्चा करतो. सोशल मीडियामार्फत एक समुदाय बनवून त्यांची एका विशिष्ट गोष्टीसाठी कायम बांधीलकी जपली जाते. लोकांचे योगदान आणि सहभाग निर्माण करण्याची ही प्रक्रिया आहे. खेळ, मनोरंजन, राजकारण किंवा वैयक्तिक आयुष्य असो. तो आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.
आपल्या देशात कबड्डी हा अतिशय लोकप्रिय खेळ मानला जातो. तो कुठेही खेळला जावो, त्याविषयी लोकांच्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. स्टेडियममधील चाहते खेळावरील प्रेम, भावना आणि निष्ठा ज्या पद्धतीने अनुभवतील, त्याचे परिणामकारक रूपांतरण दिवाणखान्यात टेलिव्हिजन पाहणाऱ्या क्रीडारसिकांमध्ये करण्याचे मोठे आव्हान आमच्यापुढे असेल. स्टेडियममध्ये दिसून येणारी ऊर्जा टेलिव्हिजन स्क्रीन पाहणाऱ्यांनाही जाणवायला हवी. या प्रयत्नांत सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची असेल. याबाबत आम्ही मार्केटिंग आणि सोशल मीडियाशी निगडित अनेक योजना आखल्या आहेत. येत्या काही दिवसांत त्या तुम्हाला दिसून येतील.
देशातील आणि जगातील कबड्डीचाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘प्रो-कबड्डी’ची माहिती मिळू शकेल. सामने, गुण, खेळाडू आदी सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती आणि सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना विविध स्पध्र्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी http://www.prokabaddi.com ही वेबसाइट तसेच ट्विटरद्वारे  @ProKabaddi #ProKabaddiRevolution हे पान आणि फेसबुकवरही ही चळवळ सुरू झाली आहे.
*‘क्रिकेट + मनोरंजन = आयपीएल’ अशी आपण आयपीएलची व्याख्या करतो. ‘प्रो-कबड्डी’ला कशा प्रकारे सूत्रबद्ध करायला तुम्हाला आवडेल?
– क्रीडा क्षेत्राचे मनोरंजन क्षेत्राशी असलेले नाते मी नमूद केले आहेच. टेलिव्हिजन चाहत्यांसाठी हा खेळ आकर्षक स्वरूपात सादर करण्यासाठी आम्ही योजना तयार केली आहे. ‘क्रीडा मनोरंजन’ ही संकल्पना गेली अनेक वष्रे कार्यरत आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. ‘रोमच्या ग्लॅडिएटर्स’नी चमत्कार घडवला, परंतु तो वेगळा होता. त्याचे अपेक्षित परिणाम दिसले नाहीत. खेळाला मनोरंजनाची जोड आवश्यक असते आणि टेलिव्हिजनला याचे मोल माहीत असते. हे मनोरंजन करताना आम्ही खेळाचा आत्मा हरवणार नाही, याची काळजी घेणार आहोत.
*आयपीएल क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंना लिलावातून चांगला पैसा मिळाला आहे. त्यामुळे अनेक क्रिकेटपटूंचे आयुष्य बदलले आहे. ‘प्रो-कबड्डी’द्वारे खेळाडूंवर अंदाजे किती मिळकत होईल?
– कबड्डी या खेळाला देशातील अन्य खेळांप्रमाणेच लोकप्रियतेच्या स्तरावर नेण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या प्रक्रियेला काही अवधी लागेल, याची आम्हाला कल्पना आहे. आयपीएलची आर्थिक मापनश्रेणी आम्ही वापरणार नाही. खेळातील सध्याचा आर्थिक दर लक्षात घेऊन खेळाडूंची बोली लागेल. याचप्रमाणे बक्षिसाची रक्कम आणि इतर भत्ते निश्चित करण्यात येतील. ‘प्रो-कबड्डी’चा खेळाडू म्हणून त्याला आतापर्यंत मिळत आलेल्या मानधनापेक्षा नक्कीच घसघशीत मानधन मिळेल. व्यावसायिक क्रीडापटू म्हणून सदर खेळाडू आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होईल, हेच आमचे प्राथमिक लक्ष्य असेल.