News Flash

जनविज्ञान-जनआरोग्य चळवळीचे प्रवर्तक…

एमडी असलेले डॉक्टर स्मरजित जाना सत्तरच्या दशकाच्या अखेरीस भारतात सुरू झालेल्या जनविज्ञान चळवळीच्या बिनीच्या प्रवर्तकांपैकी एक होते.

डॉ. स्मरजित जाना

|| प्रमोद मुजुमदार

शरीरविक्रयकत्र्यांच्या हक्कांची चळवळ भारतात उभारणारे आणि शरीरविक्रयकत्र्या स्त्रियांना मानवी प्रतिष्ठा देणारा क्रांतिकारी दृष्टिकोन मांडणारे डॉ. स्मरजित जाना यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या कार्यास उजाळा देणारे हे टिपण…

१९८० च्या दशकातील भारतातील जनविज्ञान आंदोलनाच्या प्रवर्तकांपैकी एक बिनीचे कार्यकर्ते आणि भारतातील ‘सेक्स वर्कर्स’च्या हक्कांचे प्रणेते डॉ. स्मरजित जाना यांचे ७ मे रोजी कोलकाता येथे करोना संसर्गाने निधन झाले. ‘शरीरविक्रयकर्ते (सेक्स वर्कर्स) करत असलेले काम हे अन्य कोणत्याही श्रमाच्या कामासारखे काम आहे, त्यामुळे शरीरविक्रयकत्र्यांना श्रमाचे काम करणाऱ्या कामगारांचा दर्जा आणि हक्क मिळायला हवेत,’ ही भूमिका भारतात प्रथमच ठामपणे मांडली ती डॉ. स्मरजित जाना यांनी. शरीरविक्रयकत्र्यांच्या हक्कांची चळवळ भारतात उभारण्याचे मुख्य श्रेय डॉ. जाना यांनाच जाते. शरीरविक्रयकत्र्या स्त्रियांना मानवी प्रतिष्ठा देणारा हा एक क्रांतिकारी दृष्टिकोन होता.

एमडी असलेले डॉक्टर स्मरजित जाना सत्तरच्या दशकाच्या अखेरीस भारतात सुरू झालेल्या जनविज्ञान चळवळीच्या बिनीच्या प्रवर्तकांपैकी एक होते. सुरुवातीला काही काळ त्यांनी छत्तीसगडमधील दल्ली राजहरा येथे शंकर गुहा नियोगी यांच्या नेतृत्वाखालील लोह खाण कामगारांच्या संघटनेबरोबर काम केले होते. या खाण कामगार संघटनेतर्फे ‘शहीद अस्पताल’ नावाने एक रुग्णालय उभे करण्यात आले होते. संपूर्ण भारतात जनआरोग्य चळवळीचे एक आदर्श प्रारूप म्हणून प्रसिद्ध झालेल्या या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण रुग्णालयाच्या उभारणीत डॉ. जाना यांचा मोठा सहभाग होता. या रुग्णालयामधील बहुतेक सर्व साहित्य आणि उपकरणे, शस्त्रक्रिया-गृह स्थानिक कुशल कामगारांनी डॉ. जाना आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांच्या मदतीने तयार केले होते. स्थानिक कौशल्य आणि सामान्य माणसांच्या सहभागाचे हे एक आदर्श उदाहरण होते. बहुसंख्य आदिवासी समाजातील या खाण कामगारांसाठी अत्यंत माफक दरात वैद्यकीय सेवा देणारे ‘शहीद अस्पताल’ म्हणजे अक्षरश: जीवनदायी आरोग्यसेवा होती. ‘शहीद अस्पताल’ची कीर्ती आणि विश्वासार्हता इतकी पसरली की, या रुग्णालयामध्ये खाण मालक आणि त्यांचे नातेवाईकही येत असत.

डॉ. जाना यांनी ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीपासून कोलकात्यात एचआयव्ही संसर्गित रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली. यानिमित्ताने त्यांचा एचआयव्ही संक्रमित शरीरविक्रयकत्र्या समूहांशी संपर्क आला. या संपर्कामुळे शरीरविक्रयकत्र्यांच्या दयनीय स्थितीची त्यांना कल्पना आली. डॉ. जाना साथीचे रोग आणि सार्वजनिक आरोग्य या विषयाचे विशेषज्ञ होते. त्यांनी शरीरविक्रयकत्र्यांना एचआयव्ही प्रतिबंध प्रकल्पाच्या माध्यमातून संघटित करायला सुरुवात केली. हा प्रकल्प म्हणजे भारतातील एचआयव्ही प्रतिबंधासाठी सुरू केलेला पहिला पथदर्शी प्रकल्प ठरला. डॉ. जाना यांनी शरीरविक्रयकत्र्यांना संघटित करून ‘दरबार महिला समन्वय समिती (डीएमएससी)’ ही संघटना उभी केली.

डॉ. जाना यांनी शरीरविक्रयकत्र्यांमध्ये जागृती करून एचआयव्ही प्रतिबंध प्रकल्पाचे एक अभिनव प्रारूप उभारले. त्यांच्या या पथदर्शी कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. त्यामुळेच जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, मिशिगन विद्यापीठ आणि लीड्स विद्यापीठ अशा अनेक परदेशी विद्यापीठांशी त्यांचा संबंध आला. या विद्यापीठांशी साथरोग आणि सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ म्हणून ते संलग्न होते. डॉ. जाना त्यांच्या एचआयव्ही प्रतिबंध क्षेत्रातील सामाजिक संशोधन कार्यामुळे जगभर प्रसिद्ध होते. शरीरविक्रयकत्र्यांच्या हक्कांसाठी जागतिक पातळीवर सुरू असलेल्या लढ्यांशी त्यांचा जैव संबंध होता. सन २०१२ साली कोलकाता येथे भरलेल्या ‘जागतिक एड्स परिषदे’चे ते अध्यक्ष होते. डॉ. जाना यांनी ‘मेलिंडा अ‍ॅण्ड बिल गेट्स फाऊंडेशन’च्या भारतीय विभागाचे सदस्य म्हणून काम केले होते. डॉ. जाना ‘नॅशनल एड्स कौन्सिल’चे सक्रिय सदस्यही होते. अनेक मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था-संघटनांचे सदस्य म्हणून डॉ. जाना यांनी केलेले काम अतिशय महत्त्वाचे होते. ‘आयसीएमआर’ने अलीकडेच स्थापन केलेल्या ‘कोविड-१९ राष्ट्रीय कृती दला’चेही ते सदस्य होते.

परंतु डॉ. जाना यांची खरी ओळख म्हणजे, त्यांनी भारतातील शरीरविक्रयकत्र्यांसाठी प्रत्यक्ष वस्तीपातळीवर उतरून केलेले काम! सोनागाची ही कोलकात्यातील शरीरविक्रयकत्र्या कामगारांची मुख्य वस्ती. या वस्तीतच डॉ. जाना यांनी ‘सोनागाची रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एसआरटीआय)’ ही संस्था उभारली. या संस्थेचे डॉ. जाना संस्थापक-संचालक होते. संपूर्ण भारतातील शरीरविक्रयकत्र्यांच्या संघटनांना एकत्र जोडणारा ‘ऑल इंडिया नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स’ हा मंच डॉ. जाना यांच्या पुढाकाराने उभा राहिला. कोलकात्यातील शरीरविक्रयकत्र्या स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वायत्त व्हाव्यात यासाठी डॉ. जाना यांनी ‘उषा मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ स्थापन केली. या बहुद्देशीय संस्थेचे सर्व संचालक शरीरविक्रयकर्ते असून संस्थेमार्फत शरीरविक्रयकत्र्यांना अत्यंत कमी व्याजाने कर्ज मिळते, तर त्यांच्या बचतीवर अन्य बँकांपेक्षा अधिक व्याज दिले जाते. या संस्थेने आपले वेगळे उत्पन्नाचे स्रोत तयार करून संस्थेचा आर्थिक कारभार उत्तम चालू ठेवला आहे. शरीरविक्रयकर्ते, त्यांचे नातेवाईक व कुटुंबीय मिळून आज या संस्थेचे एकूण २५ हजार सदस्य असून संस्थेची २५ कोटींची वार्षिक उलाढाल आहे. डॉ. जाना यांनी शरीरविक्रयकत्र्यांच्या मुलांसाठी फुटबॉल अ‍ॅकॅडमी स्थापन केली आहे.

शरीरविक्रयकत्र्यांबरोबर काम करतानाच डॉ. जाना न्याय्य आणि शास्त्रीय जनआरोग्य हक्काच्या प्रश्नावर सामान्य नागरिकांबरोबर सतत कृतिशील होते. दल्ली राजहरातील ‘शहीद अस्पताल’प्रमाणेच त्यांनी कोलकात्यातील बेल्लूर येथे हिंद मोटार कामगार संघटनेबरोबर ‘श्रमजीवी हॉस्पिटल’ सुरू केले होते.

डॉ. जाना यांचे आरोग्य क्षेत्रातील स्थान आणि कार्य पाहता, त्यांना कोलकात्यातील सर्वोत्तम रुग्णालयामध्ये करोनावरील उपचार मिळवणे सहज शक्य होते. त्यांच्या मित्र आणि जवळच्या अनेकांनी तसा आग्रहही धरला होता. परंतु जनआरोग्य चळवळीची मूल्ये आणि दृष्टिकोन आयुष्यभर निष्ठेने अंगीकारणाऱ्या डॉ. जाना यांनी कोविड निदान झाल्यावर श्रमजीवी रुग्णालयामध्येच आग्रहपूर्वक उपचार घेतले. परंतु त्यांची प्रकृती ढासळत गेली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने भारतातील जनविज्ञान आणि जनआरोग्य चळवळीतील एक सच्चा कार्यकर्ता आणि मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

(लेखक ‘सलोखा संपर्क गटा’चे समन्वयक आहेत.)

          mujumdar.mujumdar@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 12:13 am

Web Title: promoter of the public science public health movement akp 94
Next Stories
1 सैन्यमाघारीनंतरच्या संकटाचे सूचन…
2 धर्मनियमांची तपासणी करण्याची वेळ…
3 ‘एनपीआर’ची पन्नाशी…
Just Now!
X