महाराष्ट्राच्या साठोत्तर राजकीय इतिहासात ज्यांची ठळकपणे नोंद केली जाईल, त्यात रिपब्लिकन पक्षाचे मुत्सद्दी नेतृत्व म्हणून रामकृष्ण सूर्यभान ऊर्फ रा. सू. गवई यांच्या नावाचा अपरिहार्यपणे समावेश असणारच. सबंध देशच राजकीयदृष्टय़ा अडाणी असताना आणि त्यातील पुन्हा अस्पृश्यासारख्या गुलामाचेच जिणे जगणाऱ्या एका मोठय़ा वर्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थेट मानवी अधिकाराबरोबर राजकीय हक्काच्या लढाईत उतरवले. सामाजिक-राजकीय परिवर्तनाच्या लढय़ातील ती अभूतपूर्व घटना होती. बाबासाहेबांच्या नंतर त्यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचे किती गट झाले, किती तट पडले, किती तुकडे झाले, तरी महाराष्ट्राच्या राजकारणातील रिपब्लिकन राजकारण हा एक स्वंतत्र प्रवाह आहे. तो दखलपात्र आहे, कारण त्यामागे लढाऊ बाणा, बंडखोरी आणि स्वाभिमान, ही आंबेडकरी विचारधारा आहे. अशा आंबेडकरी राजकारणाचे ज्यांनी प्रदीर्घ काळ नेतृत्व केले ते रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रा. सू. गवई काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील जुने-नवे नेतृत्व आणि कार्यकर्ते यांना जोडणारा दुवा संपला. आंबेडकरी विचारधारेच्या राजकारणाचे समर्थ नेतृत्व करण्याऐवजी रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाचे चालक होण्यात व त्याआधारे आयुष्यभर सत्तापदे उपभोगण्यात गवई यांनी आपले राजकीय कसब पणाला लावले किंवा कामी आणले, अशी त्यांच्यावर सातत्याने टीका होत राहिली. खरे म्हणजे ती टीका वैयक्तिक नव्हती, तर त्यांच्यातील नेतृत्वगुणाला आव्हान देणारी होती. त्यांनी ते आव्हान खरे म्हणजे स्वीकारले की नाही, याचे स्वतंत्रपणे विश्लेषण करता येईल; परंतु बाबासाहेबांच्या नंतर, त्या काळातल्या दिग्गज नेत्यांच्या तालमीत तयार झालेल्या व युवा नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या गवई यांनी रिपब्लिकन पक्षाच्या नावाने आंबेडकरी राजकारण त्यांच्या कुवतीप्रमाणे, इच्छेप्रमाणे आणि स्वकीयांतीलच गटबाजीचे अडथळे पार करत जिवंत ठेवण्याचा व पुढे नेण्याचा प्रयत्न केला हे कुणाला नाकारता येणार नाही.
खरे तर आंबेडकरी विचाराला अनुसरलेल्या समाजाला सत्तापदांपेक्षा एकसंध व सशक्त चळवळीचे अधिक आकर्षण आहे. त्यांना मंत्री, खासदार, आमदारकीपेक्षा अन्यायमूलक समाजव्यवस्थेत जरब व धाक निर्माण करणाऱ्या भक्कम चळवळीची आस आहे. बाबासाहेबांच्या नंतर, त्या वेळच्या नेतृत्वाने तसा काही काळ प्रयत्न केला; परंतु नेतृत्वाच्या संघर्षांतून रिपब्लिकन राजकारण खचत केले. त्याच वेळी १९६० नंतर रा. सू. गवई यांच्या रूपाने रिपब्लिकन राजकारणात तरुण नेतृत्व पुढे आले. बाबासाहेब आंबेडकर बंडखोर होते, लढाऊ होते, आक्रमक होते; परंतु त्याचबरोबर ते संसदीय लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते होते. संसदीय राजकारणाची म्हणून एक संस्कृती असते. ती आपल्याकडे फार कमी राजकीय पक्षांनी व नेतृत्वाने आत्मसात केलेली आहे. संसदीय संस्कृती म्हणजे संसदीय सभ्यता. गवई यांच्याकडे ती होती. त्यावर त्यांचा अटळ विश्वास होता. राजकारण हा डावपेचाचा खेळ आहे; परंतु त्यात सभ्यता वाहून जाणार नाही, याची काळजी घ्यायची असते, तो खरा मुत्सद्दी नेता. गवई त्या मालिकेतील नेते होते. त्यांचे काँग्रेस तसेच डाव्या-उजव्या अशा सर्वच पक्षांतील नेत्यांशी-कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध होते. म्हणूनच सत्ताधाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध ठेवूनही ते विरोधी पक्षनेतेही बनले, ही राजकीय किमया फक्त गवई हेच करू शकले. १९६४ मध्ये विधान परिषदेचे सदस्य म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची संसदीय राजकारणाची सुरुवात झाली. पुढे विधान परिषदेचे उपसभापती, सभापती, विरोधी पक्षनेते, खासदार, बिहार व केरळचे राज्यपाल अशी अनेक मानाची व उच्चपदे त्यांनी भूषविली. मुख्य राजकीय प्रवाहातील यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार, अ. र. अंतुले, विलासराव देशमुख अशा दिग्गज नेत्यांशी त्यांचा संबंध आला होता. विद्यार्थिदशेपासूनच आंबेडकरी चळवळीत ओढल्या गेलेल्या गवई यांचा भूमिहिनांच्या सत्याग्रहातील सहभाग महत्त्वाचा होता. रस्त्यावर नामांतराची लढाई सुरू असताना आणि त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण व समाजकारण ढवळून निघाले असताना, रा. सू. गवई विधिमंडळात नामांतरवाद्यांची बाजू भक्कपणे मांडत होते. रिडल्सच्या आंदोलनात इतर तरुण नेत्यांच्या बरोबरीने ते अग्रभागी राहिले. रिपब्लिकन ऐक्याचे अनेकदा प्रयोग झाले, त्यातही गवई यांनी कधी आढेवेढे घेतले नाहीत; परंतु ऐक्याचे प्रयोग सातत्याने फसत गेले हा भाग वेगळा. गवई रिपब्लिकन राजकारणातील एक राजबिंडे व्यक्तिमत्त्व होते. संसदीय संस्कृती आत्मसात केलेला एक सभ्य, सुसंस्कृत व मुत्सद्दी नेता म्हणून महाराष्ट्राचा राजकीय इतिहास त्यांची ठळकपणे नोंद घेईल, यात शंका नाही.
ज्येष्ठ रिपब्लिकन नेते, बिहार व केरळचे माजी राज्यपाल, राज्य विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते रा. सू. गवई यांचे काल निधन झाले. दलितांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सतत आवाज उठविला.संसदीय संस्कृती आत्मसात केलेला एक सभ्य, सुसंस्कृत व मुत्सद्दी नेता म्हणून महाराष्ट्राचा राजकीय इतिहास त्यांची ठळकपणे नोंद घेईल,हे निश्चित.