आर. एस. खुराना, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष

रेल्वे असो, मेट्रो असो, बेस्ट किंवा मोनो.. या विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रवाशांचा प्रवास सुलभ, सुखकर व्हावा यासाठी एकमेकांना पूरक असायला हव्यात. सर्व यंत्रणांचे उद्दिष्ट प्रवासीकेंद्रित असायला हवे. ही यंत्रणा अमलात आणताना समन्वय ही सर्वात महत्त्वाची बाब ठरते; पण सध्या या सर्व यंत्रणा समन्वयातून विकास प्रकल्प हाती घेत आहेत. अंधेरी रेल्वे स्थानकाचेच उदाहरण घ्या. अंधेरी स्थानकातून मेट्रोकडे जाता यावे यासाठी पादचारी पूल उभारण्यात आला. त्यामुळे प्रवासी अगदी थोडक्या वेळेत मेट्रोकडे जाऊ शकतात. ही सुविधा समन्वयातूनच साकारण्यात आली.

प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून अद्ययावत सोयीसुविधा उभारण्यासाठी १९ स्थानकांची निवड करण्यात आली. रेल्वे स्थानकांमध्येच बेस्ट आगार, मेट्रो स्थानक असल्यास प्रवाशांना पुढील प्रवास सोपा, सुलभ ठरेल यात शंकाच नाही; पण अनेक स्थानके अशी आहेत जेथे अशी व्यवस्था करणे शक्य नाही. त्यासाठी स्थानकाबाहेरील जागेची आवश्यकता आहे. म्हणजे स्थानकाच्या पाचशे मीटर परिघातील रहिवासी वस्ती, बाजारपेठा, व्यावसायिक संकुल इतरत्र हलवून तेथे सार्वजनिक वाहतुकीचे केंद्र उभारावे लागेल. यासाठी राज्य सरकारने स्वत:हून पुढाकार घेणे आवश्यक आहे. अनेक प्रकल्पांमध्ये प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अडथळा ठरते. योग्य प्रकारे पुनर्वसन व्हावे यासाठी परिणामकारक व्यवस्था उभी करायला हवी.

स्थानकांवरील गर्दी कमी व्हावी, लोकलमधून प्रवाशांना सुटसुटीतपणे प्रवास करता यावा यासाठी मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांतर्गत वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. त्यात प्रवाशांची क्षमता ३५ टक्क्यांनी वाढवण्यात आली. हार्बर मार्गावर १२ डब्यांची लोकलसेवा सुरू करण्यात आली; पण वेळेनुसार प्रवाशांची संख्या वाढत गेली आणि वाढीव क्षमताही आता अपुरी पडू लागली. जर हे उपाय त्या वेळेस केले गेले नसते तर आज लोकलसेवा कोलमडून पडली असती.

सध्या एमयूटीपी ३अ अंतर्गत मुंबईसह पनवेल, विरार, कर्जत, कसारा या मार्गावरील उपनगरांमधील प्रवाशांच्या दृष्टिकोनातून सुमारे ५५ हजार कोटींचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. विरार-पनवेल मार्गिका, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल उन्नत मार्ग, कल्याण-बदलापूर, कल्याण-आसनगाव, बोरिवली-विरार, विरार-डहाणूदरम्यान अतिरिक्त मार्गिका प्रस्तावित आहे.

बदलापूर, आसनगाव येथे अतिरिक्त मार्गिकांसाठी कल्याण यार्डाचा पुनर्विकास केला जाणार आहे, जेणेकरून दोन्ही मार्गावरून कल्याणकडे येणारे आठ रूळ, त्यावरून होणारी लोकल व लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाडय़ांची वाहतुकीची घडी अचूक बसू शकेल. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ जोडण्याच्या दृष्टिकोनातून सीएसएमटी-पनवेल मार्गाला मानखुर्द आणि नेरुळ येथे मेट्रोची जोड दिली जाणार आहे. ठाणे-दिवादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे कामही जोमाने सुरू आहे. मधल्या काळात या प्रकल्पात अडथळे होते. मात्र ते दूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमध्ये अपंग, विशेष व्यक्तींसाठी केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार उपाययोजना होतील. शिवाय येत्या काही वर्षांमध्ये एम इंडिकेटरप्रमाणे अन्य अ‍ॅप विकसित केली जातील, ज्यात लोकल किती वेळेत स्थानकावर येईल, एखाद्या स्थानकावरून पुढील प्रवास करण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय आदी त्यात समाविष्ट असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पांतर्गत अद्ययावत सिग्नल व्यवस्था उभारण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सिग्नल प्रणालीमध्ये एका तासाला सरासरी १५ ते १६ लोकल्सची वाहतूक होते. ती वाढून २५ वर जाईल. म्हणजे लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होऊ शकेल.

प्रवाशाला एकाच वेळी विविध ठिकाणी तिकिटांची रांग न लावता लोकल, मेट्रो, बेस्टने प्रवास करता यावा यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. म्हणजे हे कार्ड मेट्रोतही चालेल तसेच रेल्वे आणि बेस्टमध्येही. हे कार्ड फक्त स्थानकांवरील यंत्रासमोर धरल्यास प्रवासाला परवानगी मिळेल. मुंबईसह महाराष्ट्रात या कार्डचा वापर व्हावा यासाठीचा अभ्यास सुरू आहे.

’संकलन – स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ, रेश्मा शिवडेकर, प्रसाद रावकर, जयेश शिरसाट व सुशांत मोरे ’छया – गणेश शिर्सेकर व संतोष परब