विघटनकारी नेत्याबरोबर काम करूनसुद्धा राहुल गांधी हे सामाजिक सौहार्द आणि एकतेची भाषा बोलताहेत. उत्तर प्रदेशातील दादरी येथे अखलाकच्या निधनानंतर पहिली भेट राहुल गांधी यांनीच जातीय भावना भडकावण्यासाठी दिलेली होतीअसे सांगतानाच राजकारणाचे गांभीर्यस्पष्ट करणारा हा एक दृष्टिकोन..

संपूर्ण भारतभरातील निवडणुकांमधून भाजपला मिळणारे विस्मयकारक यश म्हणजे नरेंद्र मोदी हे एक लोकनायक, एक सक्रिय प्रशासक, एक प्रेरक नेतृत्व आणि एक नि:स्वार्थ कार्यकर्ते म्हणून किती मोठे आहेत, याची पोचपावतीच होय. गरिबांचे कल्याण करणाऱ्या आणि विकासाभिमुख धोरणांमुळे पंतप्रधानांना पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचे सारे भारतीय अगदी मनापासून पाठिंबा देत आहेत, याचा आणखी एक पुरावा अलीकडेच गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये मिळाला.

प्रस्थापित सरकारविरुद्ध जाणारे जनमत किंवा ‘अँटी-इन्कम्बन्सी’ हा भारताच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा होणारा मुद्दा ठरला आहे. परंतु गुजरातमध्ये मोदी-शहा यांनी एकमेकांच्या जोडीने ही सारी चर्चा ‘प्रस्थापित सरकारच्या बाजूनेच उभे राहणारे जनमत’ किंवा ‘प्रो- इन्कम्बसी’च्या पातळीला नेली. लोकशाहीमध्ये लोकांचा कौल हा सर्वोच्च असतो, आणि पुन्हा एकवार लोकांनी अढळ विश्वासाचे प्रमाणपत्र पंतप्रधानांनाच दिलेले आहे.

याउलट, काँग्रेसने मूर्खपणाच्या साऱ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत. हिमाचल प्रदेशात हतप्राण झाल्यावर आणि गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा हरावेच लागल्याचे दु:ख कपाळी येऊनसुद्धा, त्यांचे नव-अभिषिक्त अध्यक्ष राहुल गांधी हे कृत्रिमरीत्या ‘फील गुड फॅक्टर’ साकारण्याचा आटापिटा करीत असून भाजपचा विजय हा भाजपला धक्काच असल्याचे दर्शन त्यांना घडते आहे.

राष्ट्राला उत्कंठापूर्ण अपेक्षा होती की पराजयानंतर श्रीयुत गांधी जरा अर्थपूर्ण बोलू लागतील आणि थोडेफार आत्मपरीक्षणही करू लागतील. पण त्यांनी चालवलेल्या तर्कहीन आणि अर्थहीन शेरेबाजीमुळे पुन्हा हेच सिद्ध होते आहे की ते गांभीर्यच नसणारे नेते आहेत, राष्ट्राची नाडी समजूनच घेता येत नाही असे राजकारणी आहेत.

आता हे चित्र पाहा. एक राजकीय गट म्हणून काँग्रेस आज अत्यधिक हलाखीच्या स्थितीत आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात दारुण पराभव उत्तर प्रदेशमध्ये निवडणूकपूर्व आघाडी करूनसुद्धा अवघे सात आमदार आले, तेव्हा काँग्रेसने पाहिलेलाच आहे. उत्तराखंडातील काँग्रेसचा पराभव हा तीनचतुर्थाशाच्या मताधिक्याने झालेला आहे. बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांसारख्या राज्यांत, जेथे काँग्रेसची सरकारे असत, तेथे हा पक्ष तिसऱ्या वा चौथ्या स्थानावर फेकला गेलेला आहे.

गुजरातमध्ये अत्यंत जातीयवादी आणि धर्माधारित प्रचार काँग्रेसने केला तरीदेखील, निवडणूक-प्रचाराचे सारे काम काँग्रेसने ‘आऊटसोर्स’ करविले तरीदेखील, ‘स्यूडो-हिंदुत्व’ किंवा व्याज-हिंदुत्वात स्वत:ला बुचकळून घेतल्यानंतरदेखील, भाजपला सत्तेपासून दूर खेचण्यात २२ वर्षांनंतरसुद्धा राहुल गांधी अपयशीच ठरलेले आहेत. आणि आता त्यांना वाटते आहे की त्यांचा पक्ष आणि त्यातील कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ‘चांगल्या कामगिरी’बद्दल आनंदोत्सव करावा.

पुन्हा एकवार, गुजरातच्या लोकांनी अतिशय ठामपणे पंतप्रधानांना आणि भाजपलाच विकासाभिमुख आणि प्रागतिक धोरणांसाठी पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे काँग्रेसला विरोधी बाकांवर राहणे भाग पडलेले आहे. आणि श्रीयुत राहुल गांधींना मात्र विचार सुचतो आहे तो असा की ही वेळ आनंदाची आणि उत्सवाची आहे.

काँग्रेसचे हे अध्यक्ष म्हणतात की त्यांचे राजकारण प्रेम, सहानुभाव आणि एकतेवर आधारलेले आहे. हार्दिक पटेल आणि त्याचा जातीयवादी राजकीय कृतिकार्यक्रम यांना पाठिंबा देऊन वास्तविक, राहुल गांधींनीच गुजरातमध्ये जातीय राजकारण भडकावून प्रगतिपथावरील या राज्यामधील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा घृणास्पद प्रयत्न केलेला आहे.

सामाजिक सौहार्द बिघडवण्यासाठीच जो बोलतो, राष्ट्रविरोधी शक्तींकडून आर्थिक मदत मिळत असल्याचे जो जाहीरपणे मान्य करतो, जो तिरस्कार आणि दुफळीचेच राजकारण करतो, अशा जिग्नेश मेवानीसारख्या जातीयवादी नेत्यांशी हातमिळवणी करून राहुल गांधींनी सहानुभाव व प्रेमाच्या राजकारणाचा सज्जड पुरावाच दिलेला आहे!

उत्तर ईव्हीएमच्या माध्यमातून 

तसेच, भारतीय समाज तोडण्याचा ज्याचा कृतिकार्यक्रम आहे, त्या अल्पेश ठाकोरसारख्या विघटनकारी नेत्याबरोबर काम करूनसुद्धा राहुल गांधी हे सामाजिक सौहार्द आणि एकतेची भाषा बोलताहेत.

उत्तर प्रदेशातील दादरी येथे अखलाकच्या निधनानंतर पहिली भेट राहुल गांधी यांनीच जातीय भावना भडकावण्यासाठी दिलेली होती, याचा विसर राष्ट्राला पडलेला नाही. काँग्रेसच्या अध्यक्षांनीच वल्लभगड (हरयाणा) येथील मृत्यूंमधून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला. हैदराबादेतल्या विद्यापीठातील एका विद्यार्थ्यांच्या मृत्यूवरून गलिच्छ राजकारण करताना राहुल गांधी हे काय शांती आणि सद्भावनेचा संदेश देत होते? भारतविरोधी घोषणा देणाऱ्या जेएनयू नेत्यांशी सांधेजोड करणारे श्रीयुत गांधी हे काय फक्त राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देत होते?

भारतीय जनता ही राहुल गांधी यांचे नकारात्मक आणि विघटनकारी प्रकारातील राजकारण चांगलेच ओळखून आहे, हे समजण्यात राहुल गांधी अपयशी ठरलेले आहेत. ही जनता ‘ईव्हीएम’च्या माध्यमातून त्यांच्या राजकारण-शैलीला समर्पक प्रत्युत्तर देतेच आहे.

लोकांना राहुल गांधी यांचे राजकीय चातुर्य, त्यांची राजकीय समज आणि त्यांचे सोयवादी राजकारण हे सारे पूर्णपणे माहीत आहे. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या वेळी त्यांनी मशिदींना भेटी दिल्या आणि गुजरातमध्ये मंदिरांना. विशेष हे की, उत्तर प्रदेशच्या प्रचारादरम्यान अयोध्येला जाऊनसुद्धा राहुल गांधी रामाच्या मंदिरामध्ये नतमस्तक झालेच नाहीत. आणि तरीही भारतीय लोक हे चुका करणारे आहेत, ते आपल्या सांप्रदायिकतावादी राजकारणाच्या सापळय़ात पडतीलच, असा विचार राहुल गांधी करीत आहेत.

आयुष्य पारदर्शक असावे

श्रीयुत गांधी, राजकारण हा गंभीर विषय आहे. तो ‘पिडीचा खेळ’ नव्हे! पिडी हे स्वत:चे आवडते पाळीव कुत्रे राहुल गांधी यांनी राजकीय प्रश्न विचारण्यासाठी वापरले, यातूनच या माणसाची असेल तेवढी बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते. सन २०१३ मधील एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी त्यांच्याच स्वत:च्या पक्षाच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल निष्प्रभ ठरवण्यासाठी प्रसृत करविलेला एक अध्यादेश टराटरा फाडून टाकला होता, हे कोणास कधी विसरता येईल काय? यातून राहुल गांधींनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्याच पक्षाचे सरकार यांचा अवमानच केवळ केला असे नव्हे, तर देशाच्या लोकशाही ढांच्यावरच या कृतीमुळे प्रश्नचिन्ह लागले.

राजकारणी व्यक्तीचे आयुष्य पारदर्शक असावे आणि त्याने स्वत:चा आदर्श घालून देऊन नेतृत्व करावे. परंतु राहुल गांधी यांचे प्रकरण मात्र याच्या अगदी विरुद्ध असून, त्यामुळे भावी काळात नेता होण्याच्या राहुल गांधी यांच्या इराद्यांवर आणि त्यासाठीच्या त्यांच्या क्षमतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह लागलेले आहे. संसद अधिवेशन सुरू असताना राहुल गांधी यांची दीर्घ गैरहजेरी आणि त्यांचे दीर्घ, गोपनीय परदेशप्रवास हे तर्कवितर्क निमंत्रण देणारेच आहेत.

जेव्हा श्रीयुत गांधी यांनी त्यांच्या पक्षाला गुजरात व हिमाचल प्रदेशात बसलेल्या दणक्याचा ताळेबंद गंभीरपणे मांडायला हवा, तेव्हा ते चित्रपट पाहणे पसंत करतात! यातून भारताच्या सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षाला असलेल्या गांभीर्याची पातळी दिसून येते.

आठ नोव्हेंबर २०१६ या दिवशी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात धाडसी निर्णय घेताना, आपल्या व्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी काळ्या पैशाविरुद्ध युद्ध पुकारले. त्याचप्रमाणे, २०१७ मध्ये मोदी सरकारने क्रांतिकारी ‘जीएसटी’ (वस्तू व सेवा कर) लागू केला. विरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्या बदनामीचे आणि हेतूंविषयी शंका घेण्याचे कितीही प्रयत्न केले तरी, लोकांनी मात्र मोदी यांच्याच बाजूने उभे राहून त्यांच्या धैर्यवान निर्णयांना मनापासून पाठिंबा दिला.

दोनतृतीयांश भारतभूमीवर राज्य भाजपचे 

हे सारे निर्णय सर्व भारतीयांवर परिणाम घडविणारे होते. परंतु नरेंद्र मोदी यांनी ही अग्निपरीक्षा २०१७ सालातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्याच्या विधानसभा निवडणुकींत यशस्वीपणे पार केली. पंतप्रधानांचा, नोटाबंदीसारखा वेगळ्या वाटेवरचा आणि धाडसी निर्णय लोकांनी भरभरून उचलून धरला.

आता गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणूक निकालांमुळे देश अथवा देशातील व्यापारीवर्ग ‘जीएसटी’च्या विरोधात आहे, या विरोधकांच्या दाव्यातील हवाच निघून गेलेली आहे. विशेष हे की, काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरत या उद्योगनगरीत ‘जीएसटी’विरुद्ध अतिनकारात्मक प्रचार राहुल गांधींच्याच तोंडासमोर सपशेल उताणा पडला  व सुरत परिसरातील बहुतेक जागा भाजपला मिळालेल्या आहेत.

नरेंद्र मोदी यांचा विजयरथ २०१४ नंतर भारतभर फिरल्याचा परिणाम म्हणजे देशातील २९ पैकी १९ राज्यांतील सरकार आज भाजपने स्थापलेले आहे. दोनतृतीयांश भारतभूमीवर आज भाजपचे राज्य आहे. लोकांना नरेंद्र मोदी यांचा प्रामाणिकपणा, नरेंद मोदी यांचे हेतू आणि राष्ट्रकार्याबद्दलची मोदी यांची समर्पणवृत्ती यांबद्दल विश्वास वाटलेला आहे. मोदीयुग अत्यंत समर्थपणे सुरू झालेले आहे.

सन २०२२ पर्यंत ‘नवभारत’ घडविण्याच्या पंतप्रधानांच्या द्रष्टेपणावर लोकांचा विश्वास असताना तिकडे काँग्रेसाध्यक्ष मात्र स्वत:च्या राजकीय उद्दिष्टपूर्तीसाठी समाजात तिरस्कार आणि नकारात्मकतेची बीजे पेरत आहेत. नरेंद्र मोदी हे विकासाबद्दल बोलतात, तर राहुल गांधी हे ‘विकास गांडो थयो छे’चे तुणतुणे वाजवतात. आपला देश सर्वसमावेशक वाढ आणि सर्वतोपरी विकास यांविषयी बोलणारे नरेंद्र मोदी यांचे आगळेच राजकारण जसे पाहतो आहे, तसेच राहुल गांधी यांचे खोटेपणा आणि नकारात्मकतेवर आधारलेले राजकारणही पाहतो आहे. भारतीय लोकशाही आणि त्यातील मतदार हे, स्वत:साठी काय चांगले याचा विचार करण्यास समर्थ आहेत. आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीगणिक, लोकांचा हा कौल अधिकाधिक स्पष्ट आणि निर्णायक होतो आहे.

लेखक भारतीय जनता पक्षाच्या प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख आहेत.