News Flash

पाऊस आणि पंचांग

दुष्काळी माणदेशात गावोगावी फिरून, दुष्काळानं माणसांना दिलेल्या दु:खांचा मागोवा कादंबरीकार आनंद विंगकर घेत होते. नोकरीधंदा सांभाळून त्यांनी केलेल्या या उठाठेवीतून आलेला हा लेख.. कुणा संदीप

| June 9, 2013 12:40 pm

दुष्काळी माणदेशात गावोगावी फिरून, दुष्काळानं माणसांना दिलेल्या दु:खांचा मागोवा कादंबरीकार आनंद विंगकर घेत होते. नोकरीधंदा सांभाळून त्यांनी केलेल्या या उठाठेवीतून आलेला हा लेख.. कुणा संदीप भराडेच्या आत्महत्येचा मागोवा घेताघेता ‘हाताला काम नाही’ या कारणाकडे जाणारा आणि पुढले सहाएक महिने कठीण आहेत, असं भाकीत गावोगावची परिस्थिती पाहिल्यामुळे वर्तवणारा..
दुपारी एकदीड वाजता मी वडूजला पोहोचलो. समीर चितळीहून येणार होता मोटरसायकलवरनं. बसमध्ये खिडकीतून वाऱ्याऐवजी नाक अन् डोळय़ांना झोंबणाऱ्या उन्हाच्या झळा. बाहेरचा सगळा परिसर निर्मनुष्य सामसूम. कशाला कोण बाहेर पडेल अशा उन्हाच्या रठात, खरंतर आज मी येणारच नव्हतो, कंटाळून. सकाळी तर मुंबईवरनं आलोय. पण समीर दोनतीन दिवस कुस्त्यांच्या फडामुळं मोकळा मिळणार नव्हता, मग दुखवटय़ाच्या भेटीला उशीर झाला असता.
परवाच पेपरमध्ये वाचलेली बातमी, काम न मिळाल्यानं शेतकऱ्याची आत्महत्या. आणि दुसरी एक संशयावरून पत्नीचा खातगुन या गावात खून.
गेल्या महिन्याभरातील खुनाची ही दुसरी घटना. बायकोचा संशयावरून खून, अशा घटनेच्या पाठी आर्थिक, जातीय आणि काही अंशानं नैसर्गिक कारणं असतात. दुष्काळी भागात सध्या हाताला कामं नाहीत. रोजचं जगणं म्हणजे दोरीवरील कसरत. लहान मुलं, सातत्याची उपासमार, परिस्थितीनं गांजलेल्या नवऱ्याच्या नाकत्रेपणाची अकारण चीड यातून कौटुंबिक भांडणं, पोटच्या पोरांसाठी स्त्रियांनी मातब्बराकडे केलेली मदतीची याचना, यातून धनिकांनी घेतलेला गरफायदा. शेतमजुराला संताप व्यक्त करण्यासाठी तातडीचं कोण तर पत्नी. व्यवस्थेच्या विरोधातील हा मूक आक्रोश. पण या सर्व गोष्टी उघडय़ावर येत नाहीत. विषय होतो चारित्र्याचा.
यात सरकार कुणाची म्हणून घेणार दखल? गोंदवल खुर्दमध्ये मातंग समाजातील तरुणानं असाच आपल्या पत्नीचा अलीकडेच खून केला. यामागची नेमकी कोणती कारणं याची चर्चा होत नाही.
अशा खूप गोष्टी असतात की ज्या सत्य समजले तरी व्यक्त करता येत नाहीत.
आम्हाला दिवसभरात खटाव आणि खातगुण ही दोन्ही गावं करायची होती. त्या दुपारी गाडी चालवणं तसं सर्व अर्थाने त्रासदायकच. तरीही समीर आलाच. कुस्त्यांच्या फडामुळं या भागातील गावात त्याच्या ओळखी. वडूजवरून साधारण २० किलोमीटरवर खटाव.
वाकळासारखी उन्हात वाळवायला टाकलीय अवघी पृथ्वी, रेडा सोलून टाकला तरी वाळावा असल्या उन्हात. डोळय़ांना सहन नाही तर टंचाईवरील उपाय अपुरेच ठरतील. आपली ही बाजू कमालीची लंगडी राहिलेली आहे. आजही दुष्काळात मुख्य चर्चा होते ती जास्तीत जास्त पाणी कसे मिळवता येईल याचीच. त्याचा काटकसरीने व कार्यक्षम वापर होतो का, याकडे अक्षम्य दुर्लक्षच होत आले आहे. पाण्याच्या उपलब्धतेबाबत बहुतांश लोकांच्या मनात गैरसमज आहेत. भल्याभल्यांना हे सांगायची गरज आहे. ‘शिरपूर पॅटर्न’ असेल किंवा जलसंधारणाची अनेक कामे, त्यातून अप्रत्यक्ष असाच संदेश दिला जातो, की निसर्गात पाणी भरपूर आहे. ते भरपूर साठवा आणि भरपूर वापरा! पण आता ही परिस्थिती उरलेली नाही. भरपूर पाणी असण्याचे दिवस मागे पडले आहेत. पाणी हे मर्यादितच आहे. आपल्याला हवे तेवढे पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. आपल्या भागात पडणारा पाऊस व इतर भागांतून नद्यांद्वारे जे पाणी वाहात येते तेवढेच आपल्यासाठी उपलब्ध असते. याच पाण्यामुळे भूजलाचे पुनर्भरण होते. या प्रकारांनी पाणी उपलब्ध होण्यास निसर्गाच्या आणि भौगोलिक मर्यादा आहेत. त्यामुळे आपल्यासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यामध्ये खूप मोठी वाढ होऊ शकत नाही. खोल विहिरी खणल्या किंवा विंधन विहिरींद्वारे (बोअर वेल्स) जमिनीची चाळण केली म्हणून जास्त पाणी मिळणार नाही. पाऊस, नद्या किंवा आपण केलेल्या कामांमुळे जे पाणी जमिनीत मुरेल तेवढेच पाणी विहिरी, विंधन विहिरींद्वारे मिळणार आहे. चमत्कार किंवा जादू म्हणून इतर कुठून हे पाणी येत नाही. ही अगदी साधी गोष्ट अजूनही अनेकांच्या पचनी पडलेली नाही.
पाण्याच्या वापराबाबत आपल्याकडे नक्कीच समाधानकारक स्थिती नाही, मग तो घरगुती पाणीवापर असो नाहीतर शेतीतील. शहरांमधील पाण्याची गळती. चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे, तर शेतीमध्ये काटकसरीने पाण्याचा वापर करण्याबाबत पाच-दहा टक्क्यांच्या पलीकडे प्रगती झालेली नाही. खरेतर यावरचे उपाय ज्ञात आहेत. १९९९ सालच्या जल व सिंचन आयोगाच्या अहवालात यासंबंधी अनेक उपाय, शिफारशी आहेत. पण त्यांच्याकडे सरकारने गांभीर्याने पाहिलेले नाही. आता दुष्काळ पडल्यावरही त्याची फारशी चर्चा झाली नाही. उसासाठी ठिबक सिंचनाची सक्ती करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्याला अनुकूलता दर्शवली आहे. आता पावसाळा सुरू झालेला असताना त्याचे काय होते हे पाहावे लागेल. ही घोषणा आताच्या पावसाळय़ात वाहून तर जाणार नाही ना? आपला इतिहास तसा आहे. दुष्काळात उपायांबाबत अनेक घोषणा केल्या जातात, पण एक चांगला पाऊस पडला, की सरकार आणि लोकही त्या विसरून जातात. म्हणून तर २००२-०३च्या मोठय़ा दुष्काळानंतर दहा वर्षांच्या आत पुन्हा आताच्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. तलावांमध्ये साचलेल्या गाळाकडे आणि न वाहणाऱ्या नद्यांकडे इतक्या वर्षांनी आता कुठे लक्ष गेले. परिस्थिती जरा बदलली की येणारी शिथिलता हे समाज आणि सरकार म्हणून आपले वैशिष्टय़ बनले आहे. पण पुढची संकटे टाळायची असतील तर आताच त्याची पूर्वतयारी करावी लागते. हेच या पावसाळय़ात आव्हान असेल.
हवामान विभागाचा अंदाज आणि मान्सूनची दमदार सुरुवात पाहता या वेळी चांगल्या पावसाचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे तलाव भरतील. नद्यांमध्ये पाणी येईल. भूजलाचे पुनर्भरण होण्यास सुरुवात होईल. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी वाढेल. याचा तात्कालिक फायद्यासाठी लगेच उपसा करायचा की शाश्वत पद्धतीने वापर करायचा हे आपल्याच हाती आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, परिसरातील नैसर्गिक व्यवस्था आणि स्रोतांचा. पावसाळय़ात तलाव, नद्या, धरणांमध्ये पाणी साठणार असेल तर त्यासोबत फारसा गाळ जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. निसर्गात गवत-झुडपांपासून ते वनांपर्यंत असलेल्या वनस्पती आवरणामुळे हे शक्य आहे. या वनस्पतींमुळे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाणही वाढेल. आता भूजलाची पातळी वाढवली तर गावोगावचे ओढे-नद्या यांचे पुनरुज्जीवन शक्य आहे. त्यांचे पुनरुज्जीवन झाले तर त्यांच्या आधारावर जगणाऱ्या आड-विहिरी-बारवांच्या स्थानिक व्यवस्था पुन्हा वापरात आणणे शक्य होईल.. अशी ही साखळी जिवंत करता येईल. गेली कित्येक वर्षे कचरा साठवण्यासाठी वापरलेल्या या व्यवस्था पुन्हा वापरताना पाण्याच्या शुद्धतेचा प्रश्न निश्चित असेल. या व्यवस्था वापरात ठेवणे हाच त्यावरचा उपाय आहे.
या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्या नाहीत तर लगेच काही फरक पडणार नाही. पुढची दोन-तीन वर्षेही कदाचित निभावून जातील. पण एखाद्या वर्षी थोडासा कमी पाऊस पडला तर आतापेक्षा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागेल. आताच्या दुष्काळात टंचाईमुळे येणारा संघर्ष आपण अनुभवलाच. नाशिक-नगरचे पाणी मराठवाडय़ातील जायकवाडीत सोडताना, पुण्याचे पाणी उजनी धरणात सोडताना झालेली खळखळ साऱ्यांनीच पाहिली. आपण कसे ज्वालामुखीच्या तोंडावर आहोत, हेच यातून दिसले. पुढच्या काळात टंचाई, राजकारण, हितसंबंध यांच्या एकत्रित गुंत्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे. आहे ते सुख आणि दु:खसुद्धा सर्वानी वाटून घेण्याचे दिवस मागे पडले आहेत. पाणीवापराबाबत शिस्त लावली व त्यावर सर्वाचाच हक्क असल्याची जागरूकता वाढवली तर या समस्यांची तीव्रता कमी करणे शक्य आहे. त्यात सरकार व प्रशासनाची महत्त्वाची भूमिका आहेच, पण समाजाचाही प्रतिसाद अपेक्षित आहे.
***
‘लोकसत्ता’च्या २ सप्टेंबर २०१२ च्या लोकरंग पुरवणीत ‘येरे घना, येरे घना’ हा २०१२ साली पडलेल्या व पडणाऱ्या पावसाच्या संदर्भात माझा लेख आला होता. या लेखात पंचांगांतील पावसाच्या तारखा दिलेल्या होत्या. या संदर्भात संपादकांकडे या तारखांना पाऊस पडल्याचे बऱ्याच जणांचे फोन आले होते. आता २०१३ सालच्या पंचांगांतील पावसाच्या अंदाजे तारखा देत आहे. ये रे घना या लेखात पराशरमुनींनी पावसाचे अंदाज कसे घेतात याचे शास्त्र दिले आहे. या लेखात ‘वराहमिहिराने’ दिलेला पर्जन्यविचार देत आहे.
उपग्रहांच्या मदतीने वेधशाळांनी वर्तविलेले पावसाचे अंदाज फारच ढोबळ असतात. प्रत्येक जिल्ह्य़ात पाऊस कसा व किती पडेल हे समजले तर ते फार सोईचे होईल. परंतु अजून ही सोय झालेली दिसत नाही. आपल्याकडे पावसाचे अंदाज पंचांगांतून दिले जात होते ते कशाच्या आधारावर? याचे उत्तर मला कै. दत्तात्रेय माधव लेले यांच्याकडे मिळाले. लेले बरीच वर्षे दाते पंचांगात पावसाचे भविष्य लिहीत असत. आता ते हयात नाहीत परंतु वराहमिहिराच्या बृहत्संहितेत जे लिहिलेले आहे त्याचा अभ्यास करून त्यांच्या आधाराने ते पावसाचे अनुमान करीत असत. पावसाचे हे कोडे कसे उलगडायचे याचे त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्याच शब्दांत पुढे देत आहे.
*  रवी हा हवामान व पर्जन्य यांचा मुख्य कारक. त्याच्याशी अन्य ग्रहांच्या होणाऱ्या योगांवरून अंदाज वर्तविला जातो. सर्व ग्रहांची भ्रमणे, राश्यंतरे, नक्षत्रांतरे, उदयास्त, युत्या आणि क्रांत्या यांचा विचार केला जातो.
*  ग्रह, राशी व नक्षत्रे यांचे हवामानाच्या दृष्टिकोनातून उष्ण, शीतल, सजल व निर्जल असे विभाग केले आहेत.
*  मेष, वृषभ, मिथुन, वृश्चिक राशिप्रवेशांना अग्रक्रम आणि अश्विनी ते स्वाती या नक्षत्रांत रवीचा प्रवेश होतो त्याच्या कुंडल्यांचा विचार.
*  प्रत्येक वर्ष कोणत्या मंडलाचे आहे यावरून स्थूल अनुमान बांधता येते व ते बरोबर येते.
फलज्योतिषात हवामान व पर्जन्य यांचा कसा विचार केला जातो हे सोदाहरण पुढीलप्रमाणे सांगता येईल – बारा ग्रह, बारा राशी, व सत्तावीस नक्षत्रे यांचा विचार प्रत्येक वर्षांच्या ग्रहयोगांप्रमाणे करावा लागतो. रवीचे उत्तर गोलार्धातील भ्रमण नक्षत्रातून होत असते. तसेच रवीच्या क्रांतीचाही विचार करावा लागतो. रवीच्या उत्तर क्रांतीची सुरुवात २१ मार्च रोजी होते व ती प्रतिदिनी वाढत जाऊन २० जून रोजी परमक्रांती २३ अंश २६ कला मध्ये होते. तीन दिवस तो त्याच क्रांतीत असतो आणि २३ जून रोजी ती कमी होण्यास सुरुवात होत होत ती २२ सप्टेंबर रोजी शून्य अंश होऊन रवी दक्षिण गोलार्धाकडे वळतो. रवी हा हवामानाचा प्रधान कारक आहे. चार महिने उन्हाळा, चार महिने पावसाळा व चार महिने हिवाळा हे ऋतुचक्र सर्वाना माहिती आहे. परंतु इतर ग्रहांचे भ्रमणही चालूच असते आणि त्यांचे रवीबरोबर व एकमेकांत जे योग होतात त्यानुसार उन्हाळा, पावसाळा व हिवाळा यांचे कमी-जास्त प्रमाण व हवामानात होणारे बदल अगोदर वर्तविता येतात.
मंगळ, प्लूटो व गुरू हे ग्रह उष्णता वाढवितात, थंडी कमी करतात व पर्जन्यातही ढवळाढवळ करतात. चंद्र, शुक्र व नेपच्यून हे पूर्ण जलग्रह आहेत व त्यांचे योग पर्जन्यास कारण होतात. शनी व हर्षल हे शीतल ग्रह आहेत. बुध हा वाऱ्याचा कारक असून त्यामुळे ढग इकडून तिकडे जातात व त्यामुळे पाऊस पडतो किंवा पडत नाही. या सर्व ग्रहांचे योग तसेच नक्षत्रे, राशी, प्रत्येक ग्रहांच्या क्रांत्या, गती, वक्री, मार्गी व स्तंभी स्थिती, उदयास्त तसेच ग्रहांच्या युत्या व अन्य योग यांचा विचार करून अनुमाने करता येतात.
सत्तावीस नक्षत्रांपैकी अश्विनी हे पहिले नक्षत्र व बारा राशींपैकी मेष ही पहिली रास यांमध्ये रवी ज्या दिवशी व ज्या वेळी येतो तेथून हवामानाच्या विचाराला सुरुवात होते. दर वर्षी दिनांक १३-१४ एप्रिल रोजी रवीचा मेष-अश्विनी प्रवेश ज्या वेळी होतो त्यावेळची कुंडली मांडावी लागते. कुंडली ज्या स्थळाची मांडायची असेल त्या स्थळाच्या अक्षांश-रेखांशाचा विचार करावा लागतो. महाराष्ट्राचा विचार करताना महाराष्ट्राच्या मध्यावर असणारे १९ अक्षांश व ७६ रेखांश यांची कुंडली मांडली जाते व त्यावरून महाराष्ट्रापुरता विचार करता येतो. पर्जन्यासाठी मृग ते स्वाती या ११ नक्षत्रप्रवेशाच्या कुंडल्यांचा व उष्णतेसाठी (उन्हाळ्यासाठी) अश्विनी, भरणी, कृत्तिका व रोहिणी या नक्षत्रप्रवेशांच्या कुंडल्या मांडाव्या लागतात. याशिवाय एप्रिल ते ऑक्टोबपर्यंत ग्रहांचे होणारे नक्षत्रांतर, राश्यंतर व युत्या यांचाही विचार करतो. अश्विनी – मेष प्रवेश कुंडलीत लग्नी कोणते नक्षत्र येते यावर त्या त्या प्रांतातील पावसाचे भविष्य अवलंबून असते. भारतातील सर्वच ठिकाणी एकच नक्षत्र लग्नी असत नाही.
यानंतर महत्त्वाचे राशिप्रवेशयोग वृषभ व वृश्चिक या राशींचे आहेत. याचा उपयोग खास करून शेती तज्ज्ञांना होणार आहे. वृषभराशिप्रवेश १४ मे रोजी, तर वृश्चिक राशिप्रवेश १६ नोव्हेंबरला होतो. त्या वेळी रवीचे संदर्भातील ग्रहस्थिती कशी आहे हे पाहून येणाऱ्या हंगामातील पिके कशी घेता येतील याचा अंदाज करता येतो. वराहमिहिराच्या बृहत्संहितेतील ‘सस्यजातक’ या ४० व्या अध्यायात पिके चांगली केव्हा येतात किंवा खराब केव्हा येतात याबद्दल शेतीला उपयुक्त अशी बरीच माहिती आहे. वृषभ व वृश्चिक यांमध्ये रवीचा प्रवेश होतो तेव्हा रवीपासून दुसऱ्या स्थानात पापस्थानांत पापग्रह असताना व ते शुभग्रहाने दृष्ट नसताना लवकर पेरलेल्या धान्याचा नाश होतो पण उशिरा पेरलेले धान्य उत्तम येते.
उष्णतामान केव्हा वाढेल. उष्माघाताचे बळी केव्हा पडतील या गोष्टींच्याही नोंदी करता येतात. मंगळाची उत्तरक्रांती, त्याचे वक्रीत्व व त्याच्या रवी व प्लूटो आणि गुरू यांच्याशी होणाऱ्या युती व प्रतियोग यांचा विचार या संदर्भात करावा लागतो. सन २०००-२०००१ मध्ये मंगळ उत्तरक्रांतीत होता व त्यामुळे एप्रिल, मे व जून हे तीन महिने असह्य़ उन्हाळा होता. उत्तर महाराष्ट्र व विदर्भ येथे तापमान ४५ अंश से. होते. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान येथे असह्य़ उष्णता जाणवली. मे महिन्यात उष्णतेची लाटच आली. उत्तरप्रदेशात वादळे व वावटळी आल्या, आगी लागल्या. मंगळ – प्लूटो प्रतियोग असे उष्णता वाढविणारे ग्रहयोग होते व त्यांचा काल १७ मे ते १ जून असा होता.

हवामान व पर्जन्य या दृष्टीने ग्रहांचे, राशींचे व नक्षत्रांचे भाग पाडलेले आहेत ते पुढीलप्रमाणे.
* ग्रह – १) उष्ण ग्रह- रवी, मंगळ व प्लूटो. २) जलग्रह – चंद्र, शुक्र व नेपच्यून. ३) शीतग्रह – शनी व हर्षल. गुरू हा ग्रह उष्ण आहे व जलही आहे. रवी-मंगळ प्लूटोबरोबर असताना उष्णता वाढवितो. चंद्र-शुक्र नेपच्यूनबरोबर संबंधित असताना पाऊस पुष्कळ पडतो. रवी, मंगळ, शनी, हर्षल यांच्या युतीत असताना थंडी कमी करतो. हवा उबदार ठेवतो. बुध वाऱ्यांचा कारक आहे. शनी-हर्षलच्या संबंधात असताना थंड व बोचरे वारे वाहतात. रवी-मंगळ प्लूटोबरोबर गरम वारे देतो. चंद्र-शुक्र यांच्याबरोबर पाऊस देतो.
* राशी – पूर्ण जलराशी – कर्क, मकर, मीन. अर्धजलराशी – वृषभ, सिंह, कुंभ. पादजलराशी – मेष, तूळ व वृश्चिक आणि निर्जलराशी – मिथुन, कन्या, धनु.
* नक्षत्रे – अभिजित नक्षत्र धरून २८ नक्षत्रे होतात. त्याचे सात भाग पाडले आहेत व त्यास नाडी म्हणतात. १) चंद्र नाडी – कृत्तिका, विशाखा, अनुराधा, भरणी – अधिपती शनी – निर्जला. २) वातनाडी – रोहिणी, स्वाती, ज्येष्ठा. अश्विनी- अधिपती रवी – निर्जला. ३) अग्निनाडी – मृग, चित्रा, मूळ, रेवती – अधिपती मंगळ-निर्जला. ४) सौम्यानाडी – आद्र्रा, हस्त, पूर्वाषाढा, उत्तरा भाद्रपदा – अधिपती गुरू- सौम्य. ५) नीरनाडी – पुनर्वसू, उत्तरा, उत्तराषाढा, पूर्वाभाद्रपदा – अधिपती शुक्र – सजला. ६) जलनाडी – पुष्य, पूर्वा, अभिजित, शततारका. – अधिपती बुध. सजला. ७) अमृतनाडी – आश्लेषा, मघा, श्रावण, धनिष्ठा. – अधिपती चंद्र- सजला.
ग्रहांची भ्रमणे नक्षत्रे व राशीतून होत असताना त्यांच्या क्रांती, अस्त, उदय, वक्री, मार्गी व स्तंभी स्थिती, अमावास्या, पौर्णिमा, तिथी आणि ग्रहांचे राश्यंतर यांचाही विचार करावा लागतो.
पर्जन्यप्रतिबंधक योग
*  रवीच्या पुढे मंगळ असणे.
*  शुक्राच्या पुढे मंगळ असता – युद्ध, अनावृष्टी, उत्तरेकडील लोकांना त्रासदायक, नाशक व दिशा विद्युत, अग्नी व यांनी बिघडतात.
*  शुक्राच्या पुढे गुरू असता – गारपीट होते.
*  बुध व शुक्र यांच्यामध्ये रवी आला की पाऊस पडत नाही.
*  शनी वक्री असताना
*  गुरू व मंगळ एकमेकांपासून ३० अंशाच्या आत असताना पाऊस पडत नाही.
पर्जन्याचे विशेष योग – रवी, बुध, शुक्र नक्षत्रात जवळजवळ येत असताना. बुध शुक्राची युती. ज्या ग्रहाच्या नाडीत पौर्णिमेचा चंद्र असेल त्या ग्रहाने तो युक्त वा दुष्ट असताना वृष्टी होते, पण सजलनाडीत विशेष वृष्टी होते. वर्षांकालात मंगळ जलराशीत येतो किंवा वृश्चिकेत येतो तेव्हा पाऊस पडतो.
नक्षत्रप्रवेश कुंडल्यात सर्व ग्रहांची सहा नाडय़ात कशी विभागणी झाली हे पाहून वृष्टी किती प्रमाणात होईल याचा अंदाज घेता येतो. आश्लेषा, मघा श्रवण व धनिष्ठा ही नक्षत्रे अमृतनाडीची आहेत. तिथे चंद्र जलग्रहाने युक्त वा दुष्ट असेल तर क्रमाने १ दिवस, ३ दिवस, ७ दिवस सतत वृष्टी करतो. त्यासाठी शुक्र, बुध, गुरू व नेपच्यून यांचे योग लागतात. पुष्य, पूर्वा, अभिजित व शततारका ही नक्षत्रे जलनाडीची व बुधाच्या अमलाखाली आहेत. या नाडीत चंद्र अशा नाडीत विद्ध असताना अर्धा दिवस, साडेतीन दिवस व तीन दिवस क्रमाने वृष्टी करतो. पुनर्वसू, उत्तरा, उत्तराषाढा, पूर्वा भाद्रपदा, ही नीरनाडीची नक्षत्रे शुक्राच्या अमलाखाली आहेत. सौम्य नाडीपासून चारही नाडय़ांमध्ये सर्व ग्रहांनी चंद्र विद्ध असता क्रमाने ३-४-१२ व १८ दिवस निरंतर वृष्टी होते. कोणताही ग्रह जलनाडीत असून त्याचा उदय, अस्त, वक्री, मार्गी असे योग येतील तेव्हा अगर त्या ग्रहाचे नक्षत्रांतर वा राश्यंतर होईल तर तो वृष्टी करतो. त्यात मंगळ विशेष करून वृष्टी करतो. जसजसे बुध, शुक्र एका राशीत असून फार जवळ येत जातील तसतसे ते चांगली वृष्टी करतात परंतु त्यांच्या मध्ये रवी आला तर ‘रविमध्ययोग’ होऊन त्यामुळे वृष्टी खंडित होते.
शुक्राचा अस्त वा उदय कोणत्या नक्षत्रात होतात व त्यावेळी शुक्र त्या नक्षत्राच्या उत्तरेकडून, दक्षिणेकडून किंवा त्या नक्षत्रावरून जातो यावर पावसाचे प्रमाण अवलंबून असते. उदय वा अस्तसमयी शुक्र त्या नक्षत्राच्या उत्तरेकडून जात असेल तर पाऊस उत्तम पडतो व पिके चांगली येतात.
हर्षल व नेपच्यून हे ग्रह वराहमिहिराच्या वेळेस माहिती नव्हते. वराहमिहिराने त्यांचा उल्लेखही केलेला नाही. परंतु नवग्रहांव्यतिरिक्त आणखीही ग्रह आहेत याची जाणीव त्या लोकांना होती. तसे उल्लेखही आहेत. आता त्यांचे गुणधर्म लक्षात घेऊन त्यांच्या परिणामांचा विचार करावा, या ग्रहांची गुण किंवा फले कुणी ठरविली? पिढय़ान् पिढय़ांच्या निरीक्षणावरून ती ठरविली गेली. त्यांचे अंदाज नव्वद टक्के बरोबर येतात व हे भविष्य ते एक वर्ष अगोदर देऊ शकतात. प्रत्येक जिल्ह्य़ाचे पावसाचे अनुमानही संधी मिळाली तर देता येईल व शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. एखाद्या गावाच्या लोकांनी विनंती केली तर काही शुल्क आकारून तसे भविष्य देता येईल. १९८५ मध्ये भरलेल्या हवामान परिषदेत कै. लेले यांनी ‘वृष्टिविचार’ विषयावर निबंध वाचला. त्यावर काही जणांनी त्यांच्या विचारांवर कुतूहल व्यक्त केले परंतु एकंदरित परिषदेतील लोकांना त्यांचे विचार अगम्यच वाटले. कारण हवामानशास्त्रातील सिद्धांताची त्यांना ओळख होती परंतु लेल्यांचा किंवा त्यांच्या शास्त्राचा विचारच वेगळा होता. आकाशातील ग्रहांचे इथे काही परिणाम होतात ही कल्पनाच त्यांना खुळचटपणाची वाटत होती. पण रवी म्हणजे सूर्याचा हवामानावर परिणाम होतो हे मान्य केले तर बाकीच्या गोष्टी मान्य करण्यात काय अडचण आहे? कै. लेल्यांना एक खंत होती ती म्हणजे या शास्त्राकडे उपहासाने पाहिले जाते. ते म्हणतात की आधुनिक हवामानशास्त्राविषयी व त्यात काम केलेल्या व्यक्तींविषयी पूर्ण आदर बाळगूनही असे म्हणता येईल की शेवटी तुम्ही व्यक्त कलेले अंदाज व प्रत्यक्षात येणारा पडताळा हाच अखेरचा निकष आहे हे कुणालाही मान्य करावे लागेल. इस्रोचे काही शास्त्रज्ञही याबाबतीत लेल्यांचा सल्ला घेत असत; परंतु त्यांचाही नाव गुप्त ठेवण्याकडे कल असे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. कारण हे बुद्धिबळ नव्हे. बुद्धिबळाच्या खेळात प्रतिपक्षाला शह देणे हा हेतू असतो. इथे तो उद्देश असता कामा नये. सत्यान्वेषण हाच सर्व शास्त्रांचा उद्देश असायला हवा. ज्योतिषशास्त्रानुसार पावसाचे अंदाज बरोबर येत असतील तर त्याच्यामागचे रहस्य उलगडणे आवश्यक आहे. अर्थात कोणतीही गोष्ट काटेकोरपणाने तपासणे यात काहीही गैर नाही परंतु त्याच्यामागे काय शास्त्र आहे हे समजत नसले तरी प्रत्यक्षात पडताळ जर येत असेल तर त्यामागचे शास्त्र शोधण्यात आपणच कमी पडतो हे लक्षात घेऊन व त्यात काहीही कमीपणा न मानता पुढच्या कामाला लागणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. केवळ जुने आहे म्हणजे टाकाऊ आहे असे समजे चुकीचे आहे. शेतकऱ्यांना तर पावसाचा अंदाज वर्षभर अगोदर मिळाला तर त्यासारखी अपूर्वाईची गोष्ट नाही. वेधशाळांच्या मागे प्रचंड सरकारी यंत्रणा आहे, उपग्रहांचे साहाय्य आहे. तर पंचांगावरून अंदाज करताना या कशाचीही जरूरी लागत नाही. याचा अर्थ हवामानशास्त्राचा नाद सोडावा असे नाही. त्यालाही महत्त्व आहेच.
अशोक महादेव जोशी
संपादक – कृषिज्ञानकोश
***
पंचांगांप्रमाणे २०१३ सालात पडणाऱ्या पावसाच्या तारखांचे अंदाज
-दाते पंचांग
मे २०१३-२४ (बुध-शुक्र युती), २७ (बुध-गुरू युती), २८ (गुरू-शुक्र युती) काही ठिकाणी वळवाचे व गारांचे पाऊस.
जून २०१३ ११ ते १७, २३, २५ ते २९.
जुलै २०१३ – २ ते ५. ८ ते १३ व १६,१७. २२ ते २६ व २९, ३०. ऑगस्ट २०१३- ५ ते ९. २०, २१, २६ ते २९.
सप्टेंबर २०१३ – १ ते ५, १६ ते १९. २८ ते ३०. ऑक्टोबर २०१३ – १ ते ४, १३ ते १७. नोव्हेंबर २०१३ – १ (काही ठिकाणी जोराचा पाऊस) २६ ते ३०.
-रांजंदेकर पंचांग-
जून २०१३ – ८, ९, १२,१३, १४, २१, २२, २३, २७. जुलै २०१३- २, ३, ४, ८, ९, १०, १६, १७, १८, २०, २१, २२. ऑगस्ट २०१३- ४, ५, ६, ७, ९, १४, १५, १६, १९, २०, २३, २४, २८, ३०, ३१.  सप्टेंबर २०१३- ५, ६, ७, ११, १२, १५, १६, २०, २१, २९, ३०. ऑक्टोबर २०१३- ४, ५, १४, १५, १७, १८, २१, २६, २७, २८, ३१.
-रुईकर पंचांग-
मे २०१३-२६, २८, ३०. जून २०१३- १, २, ४, ७, ८, ११, १२, १४, १७, १८, २३, २५, २६, २७, ३०.  जुलै २०१३ – १, ४, ६, ८, ९, १०, १३, १४, १६, १७, १९, २१, २२, २३, २५, २७, २८, ३०. ऑगस्ट २०१३- २, ३, ६, ७, ९, ११, १२, १४, १५, १६, १७, १८, २१, २२, २४, २६, २७, २८, ३०, ३१. सप्टेंबर  २०१३ – १, ३, ४, ७, १०, ११, १२, १४, १६, १८, २०, २१, २२, ३५, २७, २९, ३०. ऑक्टोबर २०१३ – ३, ४, ५, ७, ११, १२, १५, १७, १८, २०. नोव्हेंबर २०१३ – काही ठिकाणी वळिवासारखा पाऊस पडेल.

औंदा पाऊस पडला तरी..
होत नाही ही दाहकता. कानांवर उष्ण वाऱ्याचे सपकारे अन् आमचं तोंड आहे पश्चिमेकडे.
मोठं गाव आहे खटाव. अशा मोठय़ा गावात राहणाऱ्या गरीब दलित आणि अल्पसंख्याकांची नेहमीच कुचंबणा होत असते. वजनदार गावांचा एक आब असतो आणि गरिबांना तो आब राखावा लागतो. मूठभर श्रीमंतांची घमेंड उर्वरितांनी पोसायची असते. मोठय़ांच्या सावलीखाली सांगता येत नाही कुणाला काय हाय आपली परवड.
अधिक विश्वासार्ह म्हणून आपल्याच समाजापासून सुरुवात करावी, समाजातील लोकांना विचारून गावाचा एकूण मागोवा तरी घेता येतो. जाणाऱ्या माणसाला मी विचारतो बौद्ध समाज कुठला? तो बोटानंच दाखवतो, तो बघा त्या तिकडं. चटईभर सावली देणाऱ्या झुडपाखाली दोन मुंबईकर बसलेत. उन्हाळा आहे. सुट्टीवर गावाला येतात माणसं.
पेपरमध्ये वाचलं या गावात कुणी आत्महत्या केलेली आहे?
काय माहीत नाही. दोघांपकी एकाचं तटस्थ उत्तर.
नाही, मी दुष्काळावर लिहतोय म्हणून.. आपल्यापकीच आहे मी.
कबूल, पण आम्हाला खरंच काही माहीत नाही. गावातल्यापकीच कुणाला विचारा.
समीर म्हणतो, माझा एक मित्र हाय रामोश्याचा, त्याच्याकडं चला.
रोज लोकलनं प्रवास करणारी शहरातील माणसं ही अशी, रोजचा अपघात अणि वेळेवर नोकरीवर पोहोचण्याची घाई, संवेदनशीलता मरत असावी माणसांची.
तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या आज मी प्रत्यक्ष घरी. गावापासून दोनतीन मल दूर आहे ही भराडे वस्ती. जिथं वहिवाटीची रानं तिथं माणसांची वस्ती. संदीप मधुकर भराडे नावावरून लक्षात येतं, जास्त वय नसावं या तरुणाचं. जेमतेम तीसपस्तीस वर्ष. आईवडील, पत्नी, दोन लहान मुलं, मुलगी बालवाडीला जाते. दुसरं पोर आहे रांगत. अजून त्यानं पाऊल उचललेलं नाही या धरतीवर. पत्नी कुठं आत असावी घरात. आणि तिनं तरी कशाला यावं बाहेर, उभ्या घराला प्रदर्शनात मांडल्यासारखं?
मी बाजूच्या घरात चौकशी केली होती. मुलाचे आईवडील बाहेरच बसले होते घराच्या,  संध्याकाळच्या सावलीत. त्यांनी बसायला चटई टाकली. पाण्याच्या तांब्या दिला भरून. माझ्याअगोदर भेटण्याला कोणी येऊन गेले होते बहुधा. नंतर समजले गावाचे सरपंच, तलाठी आणि नव्यानं सुरू झालेल्या कुठल्या च्यानलची माणसं. लिहिण्यासाठी अन् दाखवण्यासाठी हा एक विषय झाला आहे. आपलं हे अतीव दु:ख बाजारात मांडण्यास माणसं सरवतात हळूहळू.
जास्त दिवस झाले नाहीत, हा चौथा. पपावन्यानं भेटावं, घरातल्यांना आडआडचणीला मदत करावी. लवकरात लवकर त्यांना या आघातामधून बाहेर काढावं असा असतो एकूण सिरस्ता. पण शेतकरी अन् शेतमजुराच्या आत्महत्येमुळं अशा कौटुंबिक घटनांना वेगळं ंआयाम आले आहे. अन् ही आपण सर्वासाठी, आपल्या ह्य़ा एकूण व्यवस्थेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.
कुठून सुरुवात करणार. संदीपची आई मळकट मातीच्या वर्णाची. पन्नाशीच्या उपरांत एक हडस कष्टाळू बाई, तसेच वडील, नाकी डोळी नीटस, मिश्या पिकलेल्या कुरवाडय़ासारखे करारी अन् कष्टानं अनुभवी. दारात खेळती नातवंडं, खरेतर आता विश्रांतीचे दिवस असायला हवेत त्यांचे.
मी त्या तान्हुल्याला जवळ घेतो. कोणतरी म्हणतं हे नेणतं. कुठला कोण हा माणूस कोरडी सहानुभूती दाखवणारा, आता माझ्या नातवंडांच्या आयुष्याला आश्रित जगणं येणार असा कदाचित विचार करून एकदम त्या आईचा गळा दाटून येतो.
‘आता या मुलांच्या आयुष्याला आमी किती दिवस पुरणार. आता आमी यांना कुणाच्या वसरीला लावायचं.’ त्यांनी सावरलं आपल्याला, डोळं पुसलं. आणि मग परत त्याचं बोलणं सुरू झाले. हे स्वगत जसं इतरांनी ऐकावं म्हणूनच असतं, तसंच स्वत:ची समजूत काढणं असतं. ‘कामच नाही कुठं. एक वर्षांचा दुष्काळ खपतो, पण हा सलग तिसऱ्या वर्षांचा दुष्काळ. माणसांनी पोटं भरायची कशी. घरचं धान्यधुन्य नाही, ना कसला रोजगार. फाटका माणूस रोजच्या संसारात कुठं कुठं पुरणार.’
महिना झाला, कुठं काम नाही. उठला की बाहेर पडायचा. पहिल्या वर्षांच्या शेवटाला खात्यापित्या घरातले तालेवार लोक रस्त्यावर येतात, आपुण तर साधी गरीब माणसं. काम करायला लाजला नाही, पेंटिंगचं, कुठं िरगवर मिळंल तिथं. घरी बसून चालण्यासारखं हाय का. बायकूला बाळांत हून जास्त दिवस झालं नाहीत. काम असलं तर धाडसाची बाय चार माणसाचं कुटुंब पासू शकते, पण घरी नेणतं, उस वाळला. गुदस्ताला पेरलेली ज्वारी पाण्याइदमानं वैरणी वारी काढली, घरात येणार कुठनं.
घरी भांडण?
काही नाही, काम बघायला जातुय येवढंच म्हणाला. घरातलं हे दुसरं, आजून दीड महिना झाला नाही, पुतण्याचा पोरगा नववी पास. सोळा वर्षांचा येरळेला कुठं वाळू उपसायला टॅक्टर आला हुता. ही पोरं बघायला गेलेली, परूस भर उपसलेल्या खोलगाटात हा उभा, आन् वरनं ढेपसा पडला, जीसीपीनं वाळू काढावी लागली. ते आजून विसरलु नाही तर हा डबरा.
राहुल विजय भराडे त्या मुलाचं नाव. दहावीला जाणार होता. आणखी एक याच गावातला आशोक केशव काटकर, वय पन्नासीतला कर्जबाजारी शेतकरी. कीटकनाशक पिवून जीव दिला त्यानं. कुठं कुठं मी जाणार? भीती वाटते आत्महत्तेचं सत्र तर सुरू होणार नाही या दुष्काळीपर्वात. आणि ते खतगुणच आहे परत. बायकोला माहेरातून पसं आण म्हणत होता होल पाडायला, आता या दुष्काळात पाणी कुठनं लागणार.. बोलताना मला हे इथंच ऐकायला मिळालं.
ती धीराची माउली म्हणतेय ‘झालं येवढं झालं, पण इथनं पुढं आसलं दु:ख दुसऱ्यांच्या घराला नग, आता तर आमी खंगतच जाणार, मावळतीची वाट आमची, आन पुढं या एकटय़ा सूनंच्या आयुष्याचं वैरान वाळवान. ते आणखी कुणाच्या नशिबाला नगं या तालुक्यात.’
घरात एक सावली वावरतेय, इथून पुढं तिला बाहेरच वावरावं लागणारं, मी पाहतो त्या उजाड कपाळ असल्या मुलीचा चेहरा, नाकेली निमगोरी, तब्येत फारशी चांगली नाही तिची. दु:खानं तर तिला चौबाजून घेरलंय. मुलांकडं बघत तिला सावरायला हवं.
बाहेर आमच्या सोबत बसलेल्या बायी त्या मुलीची आई, अशा वेळी माहेरच्या लोकांचा विधवा मुलीस आधार असतो, पण त्यांचाही संसार नाचार दुबळा. अजून तीन मुली आणि धाकटा मुलगा दहावीला.
माणसं कमालीची एकाकी पडली आहेत. अशा वेळेला सरकारापुढं बोलणार नाहीत तर त्यांनी कुणाला सांगावं. मुख्यमंत्र्यांनी या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी जालन्यात घोषणा केली होती-  ‘मागेल त्याला काम’.  असं नसते स्वताची किंमत कमी करून कुणाला विचारायचं? ‘मला काम द्या..’? काहीतरी कामं काढा, मीही त्यांच्याच भागातला की. छावण्याच बघतोयना मी, खरंच करताहेत चांगली कामं. आपला माणूस म्हणून मलाही आहे त्यांच्याविषयी गर्व. माझी नम्र विनंती सरकारला, रोजगार हमीची काहीतरी कामं काढा. मला गप बसवत नाही म्हणून फिरतोय, फार वाईट आवस्था आहे लोकांची.
संदीप आठ एकराचा मालक. त्याची जर ही शोकांतिका, तर जे गरीब आहेत, भूमिहीन, आवं करंज्या यचून पोटं भरलीत माणसांनी, तोही हंगाम सरला आता कसं जगावं त्यांनी. औंदा पाऊस पडला तरी आजून चार-सहा महिनं त्रास पडंल.. माणसं जगवून काढायला हवीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2013 12:40 pm

Web Title: rain and almanac
टॅग : Drought
Next Stories
1 पुणेरी पुण्यभूषण
2 रागदारी आणि वसंत देसाई
3 पावसाळ्याचे आव्हान!
Just Now!
X