19 January 2021

News Flash

पाळीव पशू-पक्ष्यांचे पावसाळी आजार!

पावसाळ्यात जन्माला येणारी म्हशींची रेडके आणि गायींची वासरे ही सर्वात जास्त बळी पडतात.

दिगंबर शिंदे

पावसाळा सुरू झाला, की विविध आजार डोके वर काढतात. यामध्ये माणसांबरोबर पाळीव जनावरांना होणारे आजारही सर्वत्र पसरतात. आपल्याकडील पाळीव पशूपक्षिपालन हे शेतीव्यवसायाला संलग्न असे आहे. यातील काहींचा शेतीला जोडधंदा आहे, तर काहींची शेतीत मदत होते. त्यामुळे या आजारांची माहिती असणे आणि त्या विषयी काळजी घेणे जास्त आवश्यक आहे.

देशातील बदलते हवामान आणि पशुधन आरोग्य यांना आता अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. हवामान बदलासह येणारे प्रत्येक ऋतू देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. ऋतुमानानुसार प्रत्येक जण आपली स्वतची काळजी घेत असतो त्याला पशुधन देखील अपवाद ठरत नाहीत. फक्त आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागते. आज-काल पशुधन हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक झाले आहेत. गाय, म्हैस, शेळीपासून कुत्री, मांजरे आणि कोंबडय़ापर्यंत कुठे ना कुठे मानवाशी संबंधित आहेत. त्यांच्यासोबत राहताना त्याची निगा राखणे, काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे किंबहुना अत्यंत गरजेचे आहे, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. देशातील एकूणच ऋतुमान हे बदलत चाललेले आहे. त्यामध्ये एकूणच नेमकेपणा, निश्चितता राहिलेली नाही. कधी जादा पाऊस, कधी कमी, कधी मोठा महापूर तसेच उन्हाळा व हिवाळा देखील कमी-जास्त तीव्रतेचा जाणवतो. त्याप्रमाणे त्याचे परिणाम हे मानवी जीवनासह पशुधनावर होताना दिसतात. आजकाल हवामान खात्याचा अंदाजामध्ये नेमकेपणा येऊ लागल्यामुळे आपण सावध होऊ शकतो आणि होणाऱ्या परिणामास तोंड देऊ शकतो तथापि सावध असणे अत्यंत आवश्यक आहे.

एकूणच सध्याचा पावसाळा पशुधनास सुस होण्यासाठी पशुपालकांनी आपल्या पातळीवर सजग राहणे आवश्यक आहे. पावसाळ्यातील पशुधनाची काळजी घेण्यासाठी आपल्याला उन्हाळ्यापासूनच तयारी करावी लागते. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मान्सूनपूर्व लसीकरण. साधारण मे महिन्याच्या मध्यावर सर्व जनावरांना एकदा जंतनाशके देऊन घ्यावीत आणि मग पंधरा दिवसांनी घटसर्प या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. त्यानंतर फऱ्या रोगाविरुद्ध करून घ्यावे. लसीकरणापूर्वी जंतनाशक औषध दिल्यामुळे लसीकरणाचे चांगले परिणाम आढळून येतात. त्यासाठी न चुकता लसीकरण पूर्व जंतनाशकाचां डोस द्यावा. हे करत असतानाच उन्हाळ्यातच वाळलेल्या वैरणीसह मुरघासाचा योग्य साठा करून ठेवावा, जेणेकरून पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला उपयोगी येईल, कारण पावसाळ्यानंतर तत्काळ हिरवी वैरण उपलब्ध होत नाही मग कोवळे गवत, वैरण घालण्याकडे पशुपालकांचा कल राहतो त्यामुळे जनावरे ही अपचन, हगवण, नायट्रेट, नाइट्राइट विषबाधेला बळी पडतात. दुग्ध उत्पादन घटते आणि जनावरे तणावाखाली येतात. त्यासाठी मुरघास, वाळलेली वैरण साठवून ठेवावी. दरम्यानच्या काळात गोठा पाहून घ्यावा जर कुठे गळती असेल, छत खराब असेल, पावसाचे पाणी थेट जनावरांच्या अंगावर येत असेल तर ते दुरुस्त करून घ्यावे. विशेषत ज्या ठिकाणी आपण वैरण पशुखाद्य साठवणार आहोत ती जागा देखील व्यवस्थित असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा हे सर्व भिजू शकते, पशुखाद्य जर भिजले आणि पशुपालकांच्या लक्षात आले नाही तर मात्र बुरशी वाढून त्यामुळे विषबाधा आणि जनावरे आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच प्रत्यक्ष गोठय़ातील विद्युत पुरवठा त्याचे वायरिंग तपासून घ्यावे, त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना आपल्याला टाळता येतील. तसेच पावसाळ्यात वीज पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी तांब्याची पट्टी वापरून त्याचे जमिनीमध्ये अìथग करून घेतल्यास त्याच्यामुळे देखील घडणाऱ्या दुर्घटना आपल्याला टाळता येतील.

प्रत्यक्ष पावसाळ्यात परत कुठे गळती असेल कुठून पाणी येत असेल तर ते तत्काळ दुरुस्त करून घ्यावे. जनावरांच्या अंगावर थेट पाऊस येत असेल तर त्या जागा ताडपत्री, जाड प्लॅस्टिक कागदाने संरक्षित करून घ्याव्यात. ते करत असताना त्या गुंडाळून खाली-वर करता येईल अशा पद्धतीने त्याची बांधणी करावी. गोठय़ात कुठेही खाली जमिनीवर खड्डे असणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यामध्ये मलमूत्र साठून जनावरांना स्तनदाह, गर्भाशयदाह यांसारखे आजार होऊ शकतात. गोठय़ातील शेण, लघवी वारंवार जमा करून गोठय़ापासून दूर अशा ठिकाणी कमीत कमी साठ मीटर अंतरावर कंपोस्ट खड्डय़ात जमा करावे अथवा तशी सोय करावी. मुक्त संचार गोठा असेल तर पूर्ण शेण पावसाळ्यापूर्वी काढून घ्यावे, जेणेकरून चिखल, दलदल होणार नाही. गोठय़ाच्या आसपास सुद्धा कुठे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी वाट करून द्यावी अथवा शक्य नसेल तर अशा साठलेल्या पाण्यावर जळलेले इंजिन ऑइल टाकावे जेणेकरून त्या ठिकाणी डासांची पदास होणार नाही. एकंदर थंड हवामान व हवेतील आद्र्रता यामुळे गोठय़ातील जनावरे जवळजवळ थांबतात, एकत्र येतात एकमेकाला घासून उभे राहतात. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा आजार म्हणजे न्यूमोनिया याला बळी पडतात. म्हणून गोठा हवेशीर आणि उबदार राहील याकडे लक्ष द्यावे.

पावसाळ्यात जन्माला येणारी म्हशींची रेडके आणि गायींची वासरे ही सर्वात जास्त बळी पडतात. आजचे रेडकू/वासरू ही उद्याची म्हैस/गाय असते. त्यामुळे पावसाळ्यात जन्माला येणारी रेडके आणि वासरे यांची जादा विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी व्याल्यानंतर वजनाच्या एक दशांश इतका चीक पाजणे, त्यांना जंताचे औषध देणे, त्यांची नाळ कापल्यानंतर त्या जागेची काळजी घेणे, त्या ठिकाणी आयोडीनचे द्रावण लावणे, कोरडे ठेवणे इत्यादी काळजी घेणे आवश्यक आहे. त्याजागी जंतुसंसर्ग झाला तर मात्र वासराच्या जिवाला धोका पोहोचू शकतो. दुध बाटलीने पाजून त्याची भूक सांभाळून प्रतिकारशक्ती कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे. नेहमी कोरडय़ा जागेत थंड हवेपासून दूर बांधून ठेवावे. पावसाळ्यात उपलब्ध झालेली नवीन हिरवी वैरण खाऊ घालताना देखील काळजी घ्यावी. एकदम नवीन हिरवी वैरण न टाकता हळूहळू वाळलेल्या वैरणीसह टप्प्याटप्प्याने बदल करत घालावे. वाढलेल्या दलदलीमुळे,आद्र्रतेमुळे गोचीड, गोमाशा यांचे प्रमाण वाढते. हे परोपजीवी कीटक अत्यंत त्रासदायक आणि रोगप्रसारक असतात त्यामुळे त्यांच्या लपण्याच्या जागा विचारात घेऊन त्याचे निर्मूलन करणे अत्यंत आवश्यक आहे. परिसर स्वच्छतेसह गोठय़ातील भिंती, वैरण टाकायची जागा ज्याला आपण दावण म्हणतो त्यावरील चिरा, अडगळ स्वच्छ करून घ्यावी. फ्लेमगनचा वापर करून त्यांचा नायनाट कसा करता येईल याकडे लक्ष द्यावे. भिंतीना, दावणीला चुना लावून त्यांची वाढ थांबवता येईल. सातत्याने प्रयत्न करून तसेच जर एका ठिकाणी एकापेक्षा जास्त गोठे असतील तर सामुदायिक प्रयत्न करून गोचीड निर्मूलन करावे म्हणजे जास्त परिणामकारक ठरेल. त्याचबरोबर चावणाऱ्या माशांपासून सुटका होण्यासाठी सायंकाळी गोठय़ात जर कडुिनबाचा पाला आणि शेणकुट जाळून त्याचा धूर करून त्यांच्यापासून संरक्षण मिळवता येईल. त्याचबरोबर महापुराची शक्यता गृहीत धरून आपण जर त्या क्षेत्रात येत असलो तर पूर्वीच एखादी उंच जागा, निवारा पाहून ठेवावा म्हणजे तसा प्रसंग उद्भवल्यास जनावरे स्थलांतरित करणे सोपे होईल.

शेळी-मेंढी यांच्या बाबतीत देखील निवारा हा व्यवस्थित थेट पावसापासून संरक्षण करणारा असावा. त्यांची एकत्रित गर्दी टाळण्यासाठी शेळ्या, बोकड आणि करडे, कोकरे यांना वेगवेगळे कप्पे करून स्वतंत्र ठेवण्याची सोय करावी. ओला चारा थोडा कोरडा करूनच खाण्यास द्यावा. कुट्टी केल्यास चाऱ्याचे नुकसान टाळता येते. त्याचबरोबर बाजारात उपलब्ध असणारा खुराक देखील पावसाळ्यात योग्य प्रमाणात दिल्यास शेळ्यांचे आरोग्य चांगले राहते. त्यांचेही मान्सूनपूर्व घटसर्प, आंत्रविषार लसीकरण करून घ्यावे. तसेच उन्हाळ्यात लेंडय़ांची तपासणी करून पशुवैद्यकांच्या सल्ल्याने जंताच्या औषधांची योग्य मात्रा द्यावी. कोणत्याही परिस्थितीत शेळ्या-मेंढय़ांना जखमा होऊ देऊ नये. पावसाळ्यात अंगावरील केसांमुळे त्या चिघळतात व शेळ्या-मेंढय़ांना त्रास होतो. तसेच त्याच्या खुरांची देखील काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चिखलात फिरल्यामुळे खुरात जखमा होतात, त्यासाठी त्याची वेळेवर काळजी घेणे आवश्यक आहे. शेडच्या बाहेर जुनी पावडर टाकून ठेवावे जेणेकरून शेळ्या चरून बाहेरून आल्यानंतर त्यातून आत येतील व रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल. शक्यतो पावसाळ्यात नवीन शेळ्या-मेंढय़ांना खरेदी करू नये. केल्यास त्यांना कमीतकमी २१ दिवस कळपापासून दूर ठेवावे नंतर एकत्र आणावे.

कोंबडय़ा आणि कुक्कुटपालन – या बाबतीत देखील निवारा अत्यंत महत्त्वाचा आहे. पक्षिगृह हे नेहमीच पावसाळ्यापासून संरक्षित असावे. बाजूच्या भिंतीवर ताडपत्री, पडदा याचा वापर करावा गरजेनुसार तो वर-खाली करता यावा याची काळजी घ्यावी. आसपास पाणी साठू देऊ नये. योग्य गटारींच्या माध्यमातून पाणी बाहेर काढावे. कुठेही गळती राहू नये. शेडमध्ये साठलेल्या विष्ठेवर पाणी थांबणार नाही याची काळजी घ्यावी. परिसरात चुना व ब्लिचिंग पावडर याची फवारणी करावी. विद्युत पुरवठा नियमित राहण्यासाठी व दुर्घटना टाळण्यासाठी वायरिंग तपासून घ्यावे. ब्रूडिंगच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास गॅस ब्रुडर, कोळसा शेगडय़ा तयार ठेवाव्यात. पाण्याच्या टाक्या देखील नियमित स्वच्छ करून आतून चुना लावावा. पाण्यात तुरटी फिरवावी. अथवा चांगल्या दर्जाचे जंतूनाशक वापरावे. विहीर अथवा बोअरवेलचे पाणी असेल तर त्याची नियमित तपासणी करून घ्यावी.

कुत्री आणि मांजरे – यांना देखील उबदार निवारा, जागा उपलब्ध करून द्यावी. ती जागा स्वच्छ असावी, ओली होणार नाही, भिजणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच कुत्रा, मांजर भिजल्यास तत्काळ कोरडे करून घ्यावे. नियमित लसीकरण करून घ्यावे, विशेषत गॅस्ट्रो, डिस्टेंपर रोगा विरुद्धचे लसीकरण महत्त्वाचे आहे. नियमित पाय, शरीर कोरडे ठेवावे. तसेच हवेतील आद्र्रतेमुळे त्वचेचे आजार होऊ शकतात त्यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवून काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

एकंदरच जंतनिर्मूलन, लसीकरण आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळा आपल्या पशुधनासाठी कसा सुखकर राहील, यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावा आणि आपले पशुधन हे बहुमूल्य आहे हे जाणून व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याकडे लक्ष दिले तर नक्कीच पावसाळा आपल्या सर्व जनावरांना, पक्ष्यांना सुखकारक जाईल यात शंका नाही.

digambar.shinde@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 4:00 am

Web Title: rainy diseases of pet animals zws 70
Next Stories
1 ऊस दराचे गुऱ्हाळ!
2 पाळीव पशू-पक्ष्यांचे पावसाळी आजार!
3 सर्वकार्येषु सर्वदा : जीवनशाळा : लडाई, पढाई साथ साथ..
Just Now!
X