दिगंबर शिंदे

हळदीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सांगलीचा बेदाणाही यंदा करोना संकटाच्या काळात चांगलाच भाव खाऊन आहे. प्रतिकारक्षमता वाढीसाठी सुकामेव्यातील बेदाण्याला मोठी मागणी असून टाळेबंदीच्या काळात वाहतूक यंत्रणा विस्कळीत असतानाही १५० टन बेदाणा देशातील नागरिकांनी फस्त केला असून याचा बेदाणा उत्पादकांना भविष्यात निश्चितच लाभ होणार आहे.

जन्मापासून अखेरच्या प्रवासापर्यंत साथसंगत देणारी आणि अनेक कृमीसह विकारावर उपयुक्त असलेल्या हळदीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सांगलीचा बेदाणाही यंदा करोना संकटाच्या काळात चांगलाच भाव खाऊन आहे. या वर्षी करोना विकारापासून बचाव करण्यासाठी अंगभूत प्रतिकारक्षमता वाढीसाठी बुस्टर म्हणून बेदाणा वापर करण्याचा फंडा लोकप्रिय झाल्याने तासगावच्या भौगोलिक मानांकन प्राप्त बेदाण्याला मागणीही वाढली. टाळेबंदीच्या काळात वाहतूक यंत्रणा विस्कळीत असतानाही १५० टन बेदाणा बुस्टरच्या नावाखाली देशातील नागरिकांनी फस्त केला असून याचा निश्चितच लाभ बेदाणा उत्पादकांना भविष्यात होणार आहे.

गेली वीस वर्षे तासगावचा बेदाणा बाजारपेठेत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. सुक्या मेव्यामध्ये बेदाण्याचा समावेश असला तरी अन्य जसे काजू, बदाम, चारोळी, आक्रोड हे पदार्थ महागडे असल्याने बेदाण्याकडे सामान्य लोकांचे फारसे लक्ष जात नव्हते. मात्र करोना संकटाचे बुस्टर बेदाणा बाजाराला मिळाले आणि प्रतिकूल स्थिती असतानाही यंदा बेदाणा भाव खाऊन राहिला.

आयुर्वेदामध्ये बेदाण्याला महत्त्व आहेच. शरीराची रोजची झीज भरून काढण्यासाठी बेदाणा उपयुक्त तर आहेच, पण जिभेवर रेंगाळणारी चव देण्याची क्षमताही तासगावच्या बेदाण्यामध्ये आहे. च्यवनप्राशसारख्या आयुर्वेदिक औषधामध्ये बेदाण्याचा मूलभूत घटक म्हणून वापर करण्यात येतो. सुक्या मेव्यातील अन्य घटकापेक्षा बेदाणा स्वस्त असल्याने याचा भरपूर वापर यामध्ये करण्यात येतो. मात्र बाजारपेठ केवळ खाऊ ग्राहक समोर ठेवूनच दर निश्चिती होत असल्याने उप पदार्थ, औषधी वापर याकडे फारसे लक्ष जात नाही. परिणामी उत्पादकांना या दराचा लाभ मिळू शकत नाही. औषध कंपन्या मात्र अल्प दरात खरेदी करून वारेमाप उत्पन्न घेण्यात यशस्वी होतात.

बेदाण्याचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले आहेत. पोटॅशियम, लोह, कॅल्शियम यांची शारीरिक गरज बेदाणा पूर्ण करू शकतो. तसेच मूत्रपिंडाचे काम कार्यक्षम करण्यास उपयुक्त ठरतो असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. दिवसभराच्या श्रमाने शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी २४ तासांत केवळ ३० ग्रॅम बेदाणा उपयुक्त ठरू शकतो. लहान मुलांना पौष्टिक आहार म्हणून बेदाण्याचा वापर उपयुक्त ठरू शकतो. याबाबत अंगणवाडीतील मुलाबरोबरच शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश झाला तर बाजारपेठ विस्तारण्याबरोबरच उत्पादकांना चांगले उत्पन्न मिळू शकते. मात्र जाहिरातीबाजीतून रसायनयुक्त बुस्टरचा मारा केला जात असल्याने देशी बेदाण्याची मागणी वाढत नाही. करोनाकाळात सामान्यांसाठी जसे बेदाणा बुस्टर म्हणून अत्यावश्यक ठरले तसेच ते बेदाणा उत्पादकांसाठीही मदतीचे ठरले.

गेल्या हंगामात पाऊस लांबल्याने अनेक द्राक्ष बागा रोगामुळे वाया गेल्या. बाजारात माल जाण्याच्या वेळीच करोना संकट उभे ठाकल्याने तयार मालाचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे तयार द्राक्षे बेदाण्याच्या शेडवर गेली. सव्वा ते दीड लाख टन बेदाणा उत्पादन होत असताना या वर्षी हे उत्पादन दोन लाख टनांपर्यंत गेले. दिवाळीपर्यंत यापैकी दीड लाख टन बेदाणा विक्री झाली असून दरही प्रतवारीनुसार १०० रुपयांपासून २६५ रुपयांपर्यंत मिळाला. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची बेदाणा उलाढाल २ हजार कोटींच्या घरात गेली आहे.

तासगावच्या बेदाण्याला दोन वर्षांपूर्वी भौगोलिक मानांकन मिळाले. याचाही फायदा यंदा उत्पादकांना झाला. भविष्यात बेदाण्याकडे वळलेला ग्राहक स्वस्तातील बुस्टर म्हणून बेदाण्याकडे कायमचा आकर्षति ठेवण्यासाठी आता प्रबोधन आणि प्रसार करण्याची गरज आहे. ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ अशी जाहिरात करून पोल्ट्री उद्योगाने बस्तान बसवले तसेच ‘पळवून लावेल करोना, जो खाईल बेदाणा’ अशा स्वरूपाचे प्रचारकी वाक्य वापरून बाजारपेठेत बस्तान बसविणे अवघड नाही. करोना संकट नसून एक संधी म्हणून बेदाणा उत्पादकांनी याकडे पाहण्याची गरज आहे.

तासगाव, पंढरपूर आणि विजापूर ही बेदाणा निर्मितीची मुख्य केंद्रे आहेत. यापैकी तासगावचा बेदाणा हा अन्य ठिकाणच्या बेदाण्यापेक्षा सरस ठरतो. याचे कारण इथल्या माती, हवा आणि पाणी यामध्ये आहे. कोरडे आणि शुष्क हवामान, निचऱ्याची जमीन आणि प्रदूषणमुक्त पाणी हे मूलभूत घटक मुबलक असल्याने बेदाण्याचा दर्जा कायम ठेवण्यात येथील शेतकरी यशस्वी होतीलच, पण कष्टाळू शेतकरी प्रयोगशाळेतील संशोधनापेक्षा स्वत संशोधक असल्याने अनेक अडचणीवर मात करीत बेदाण्याचा उत्तम दर्जा राखण्यात यशस्वी ठरला असल्याने त्याला बाजारपेठेतही यश मिळविण्यात अडचण असण्याचे कारण नाही.

या परिसरात हिरवा आणि पिवळा अशा दोन पद्धतीचा बेदाणा तयार करण्यात येतो.  फळछाटणीनंतर किमान १२० दिवस झाल्यानंतर द्राक्ष मण्यामध्ये साखर निर्मिती होते. बेदाण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या द्राक्षामध्ये २२ ब्रिक्स आढळले, की माल बेदाण्यासाठी तयार झाल्याचे मानले जाते. द्राक्ष वेलीवरून काढल्यानंतर त्यातील पाण्याचा भाग लवकर निघून जावा यासाठी डिपिंग ऑइल आणि पोटॅशियम काब्रेनेटच्या द्रावणामध्ये बुडवले जाते. त्यानंतर सुकविण्यासाठी रॅकवर द्राक्षे पसरली जातात. जर तपमान ३० ते ३२ सेल्सियस असेल तर नवव्या दिवशी बेदाणा तयार होतो. जर पिवळा हवा असेल तर गंधकाची धुरी दिली जाते. ज्या बेदाण्यात गर आणि गोडी जास्त, चिकटपणा कमी एकसारखा गोल बेदाणा असेल तर तो उत्तम दर्जाचा बेदाणा मानला जातो. ज्या द्राक्ष मण्यामध्ये पाणी जादा असते गर कमी असतो, तो निम्न स्तराचा बेदाणा म्हणून प्रतवारी निश्चित करता येते. प्रतवारीनुसार बेदाण्याचे दर निश्चित होत असले, तरी आजही हा दर व्यापारी निश्चित करीत असल्याने प्रत्यक्ष बाजारातील दराचा लाभ उत्पादकांना मिळत नाही.

करोना संकटाची संधी म्हणून वापर करून देशपातळीवर बेदाणा पोहोचण्यास मदत होत असली, तरी जलद वाहतुकीसाठी नियोजित ड्रायपोर्ट उभारणी लवकर झाली तर बेदाण्याची बाजारपेठ विकसित होण्यास मदत होणार आहे. चव आणि गुणवत्ता यामुळे सुक्यामेव्यातील बेदाणा बाजाराला भविष्यात मागणी वाढेल.

– सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली</strong>

बाजारात जाऊन माल विक्री करण्यास शेतकऱ्यांना वेळ नसतो. याचा लाभ दलाल घेतात. बऱ्याचवेळा यामध्ये फसवणूक होत असल्याचे दिसून येते. बेदाणा हा शीतगृहात ठेवता येत असल्याने दर आल्यावर विक्री करण्याची मुभा उत्पादकांना मिळत असली, तरी सरकारी पातळीवरून साठवणुकीची आणि माल तारणवर अर्थसाह्य़ सुलभ रीत्या उपलब्ध करून देण्याची गरज आहे

– प्रवीण पाटील, बेदाणा उत्पादक, बोलवाड (ता. मिरज)

digambar.shinde@expressindia.com