News Flash

अनाथांचा बाप

१९८०च्या सुमारास जांबुवंतराव धोटे यांनी वेश्यांच्या पुनर्वसनासाठी मोहीम सुरू केली. या मोहिमेत राम इंगोले नावाचा एक

| September 15, 2013 02:17 am

१९८०च्या सुमारास जांबुवंतराव धोटे यांनी वेश्यांच्या पुनर्वसनासाठी मोहीम सुरू केली. या मोहिमेत राम इंगोले नावाचा एक सामान्य माणूसही सामील झाला होता. निरागस मुला-मुलींचे चेहरे पाहिल्यानंतर या निरागसांनी वाईट धंद्यात का उतरावे, त्यांच्यासाठी आयुष्याचे काहीच ध्येय नाही का, हा प्रश्न त्यांना सतत छळू लागला. या देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलाबाळांसाठी आपण काहीतरी करू शकतो, हा विचार मनात आला आणि विमलाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.  गेल्या ३२-३३ वर्षांपासून सुरू असलेल्या मार्गक्रमणातील अनेक टप्प्यांवर त्यांनी अनेक कटू प्रसंगांना तोंड दिले आहे..
विमलाश्रम, नागपूर
समाजात ज्यांना मानाचे स्थान नाही अशा वेश्यांच्या मुलांना याच समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी विमलाश्रम गेल्या तीन दशकांपासून प्रयत्नरत आहे. हे प्रयत्न तोकडे पडू नयेत यासाठी मदतीचे हात पुढे यायला काहीच हरकत नाही.
विमलाश्रमाची आर्थिक स्थिती कच्ची असल्याने हे समाजकार्य चालविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पैसा लागणार आहे. जी मदत मिळते ती अत्यंत तोकडी आहे. एवढय़ा मुलांचा सांभाळ, पालनपोषण आणि शिक्षणाची जबाबदारी पेलण्याचे काम दररोज नवी आव्हाने समोर घेऊन येत आहे. महागाईच्या काळात त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचीसुद्धा सोय करणे कठीण असले तरी दानशूरांच्या मदतीतून कशीबशी त्यांची गुजराण होते.
अनाथांचा बाप होण्यासाठी लागणारे जिगर असले तरी बापाची कर्तव्य पार पाडताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची कणखर मानसिक आणि आर्थिक कुवत लागते.. बेवारस आणि निराश्रितांना आश्रय देणाऱ्या संस्था आज जगभर विखुरलेल्या आहेत. परंतु, देहविक्रयाच्या धंद्यात बदनाम झालेल्या महिलांच्या मुलांना बापाचे नाव देण्याची हिंमत त्याने केली.. आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा घेऊन आर्थिक कुवत नसतानाही आज २०० पेक्षा जास्त मुला-मुलींचा सांभाळ करण्याचे अवघड काम तो करीत आहे. वेश्यांच्या मुला-मुलींना दत्तक घेऊन त्यांना चांगल्या वातावरणाचे संस्कार देणे, त्यांच्या शिक्षणाची सोय करणे, त्यांच्या जीवनाला शिस्त लावणे, कपडेलत्ते, निवास, भोजन या जबाबदाऱ्या अंगावर घेऊन पैशाची सोय करण्यासाठी दारोदार भटकणे.. विमलाश्रमच्या राम इंगोले या पन्नाशी ओलांडलेल्या भणंग फकिराची ही कल्पनेपलीकडची कहाणी..
वेश्यांच्या मुला-मुलींचा सांभाळ करतो म्हणून समाजाने, नातेवाईकांनी, मित्रांनी बहिष्कृत केले.. ‘आमच्याशी संबंध ठेवू नको’ म्हणून वाट्टेल तसे टोमणे सहन केले.. ज्या घरात भाडय़ाने राहायला जायचे त्या घरमालकांना ही मुले वेश्यांची असल्याचे माहीत होताच घरातून हाकलून लावले जायचे.. अनेकदा मुलांना दोन वेळचे अन्न देणेदेखील कठीण झालेले.. पैशाची सोय नसल्याने कधीकधी पाण्यावरच राहण्याची वेळ कित्येकदा आली.. तरीही हा जिद्दी माणूस हिंमत हरला नाही. सुदैवाने आता दिवस बदलले आहेत. कारण ज्या समाजाने त्याला वाळीत टाकले तोच समाज आज त्याच्या कामाला सलाम करतो आहे.. पण, हा बदल सहज घडून आलेला नाही. ही वाटचाल सोपी कधीच नव्हती. अनाथांचा नाथ होणारे अनेक असले तरी वेश्यांच्या मुलांना स्वत:चे नाव देऊन त्यांना नव्या जीवनाचा मार्ग देणारे रामभाऊ अपवादानेच मिळतील.
नागपुरातील गंगा-जमना या वेश्यांच्या बदनाम वस्तीतील सकाळच शिवीगाळ, भांडणे, मारामाऱ्यांनी सुरू होणारी.. १९८०च्या सुमारास जांबुवंतराव धोटे यांनी वेश्यांच्या पुनर्वसनासाठी मोहीम सुरू केली. या मोहिमेत राम इंगोले नावाचा एक सामान्य माणूसही सामील झाला होता. वस्तीतील महिला अनिच्छेने, अगदीच नाइलाजाने, बळजबरीने आणि काही स्वच्छेने या व्यवसायात उतरल्या आहेत. यातून अनेक वेश्या गरोदर राहतात. त्यांना मुले होतात. मुलगी असेल तर तिला सरळ धंद्यात उतरवले जाते. मुलगा असेल तर तो एकतर दलाल बनतो नाहीतर गुन्हेगारीचे जग त्याच्यासाठी मोकळे असते. या मुला-मुलींचा शिक्षणाचा आणि चांगल्या संस्कारांचा काहीच संबंध येत नाही. या वस्तीत फिरताना राम इंगोलेंना ही समस्या जाणवली. निरागस मुला-मुलींचे चेहरे पाहिल्यानंतर या निरागसांनी वाईट धंद्यात का उतरावे, त्यांच्यासाठी आयुष्याचे काहीच ध्येय नाही का, हा प्रश्न त्यांना सतत छळू लागला. या व्यावसायिक देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलाबाळांसाठी आपण काहीतरी करू शकतो, हा विचार मनात आला आणि विमलाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. वेश्या व्यवसायाच्या दलदलीत फसलेल्या महिलांचे पुनर्वसन निव्वळ अशक्यप्राय आहे. रेड लाइट एरियातील दलाल, असामाजिक तत्त्वे, गुंड त्यांना यातून बाहेर पडू देत नाहीत आणि बाहेर पडल्या तरी समाज तिला स्वीकारत नाही, अशा कात्रीत या महिलांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे या महिलांचे समुपदेशन करण्याचे अत्यंत अवघड काम राम इंगोलेंनी अंगावर घेतले. तुम्ही शिकल्या नाहीत, तुम्हाला समाजात प्रतिष्ठा नाही म्हणून तुमची मुले त्याच परिस्थितीत का वाढावी, हे समजावून सांगताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. शेकडो महिलांशी बोलल्यानंतर त्यापैकी फक्त पाच-सहा जणी मुलांना देण्यासाठी तयार झाल्या. परंतु, या मुलांचा बाप कोण? या प्रश्नाचे उत्तर कोणाही जवळ नव्हते. राम इंगोलेंनी त्यांना बेधडकपणे स्वत:चे नाव दिले. तुमच्या मुलांनी चांगले शिकल्यास, कर्तबगारी दाखविल्यास समाजही त्यांना शाबासकी देईल, हे या महिलांच्या मनावर बिंबवणे एवढे सोपे नसल्याची जाणीव रामभाऊंना झाली. तरीही हे काम पुढे नेण्यासाठीचे प्रयत्न त्यांनी सोडले नाहीत.
साधारण १९८० नंतर सुरू झालेला हा प्रवास अत्यंत रोमांचक आहे. गेल्या ३२-३३ वर्षांपासून सुरू असलेल्या मार्गक्रमणातील अनेक टप्प्यांवर असे असे प्रसंग उद्भवले की, एखाद्याने कामच सोडून दिले असते. राम इंगोलेंच्या नातेवाईकांना तो हे काम करतो म्हणून त्याच्याशी संबंध ठेवणे लाजिरवाणे वाटत होते. एक प्रकारचा सामाजिक आणि कौटुंबिक बहिष्कार सुरू झाला. यातही पहिल्या पाच-सहा मुलांना घेऊन त्यांनी भाडय़ाचे घर घेतले. नागपुरातील मानेवाडा परिसरात विमलाश्रम सुरू केला. पण, या मुला-मुलींची ओळख समाजापुढे आणायची नव्हती. कारण, समाज त्यांच्याशी कसा व्यवहार करील, याची काहीच शाश्वती नव्हती. या मुलांचे आयुष्य एखाद्या प्रसंगाने उद्ध्वस्त होऊ शकले असते. त्यामुळे जेवढी ओळख लपवता येईल तेवढे प्रयत्न राम इंगोलेंनी चालविले होते. पण, एक दिवस बिंग फुटलेच. परिणामी भाडय़ाची घरे मिळेनासी झाली. दीनवाणे चेहरे झालेल्या मुलांना घेऊन शेकडो वस्त्यांमध्ये घरासाठी अक्षरश: भीक मागण्याची वेळ आली. पहिल्याच टप्प्यात बसलेला दणका हादरवणारा होता. मुलांच्या राहण्याची सोय नाही, त्यांना खाऊ घालण्याचे वांधे, मुलींच्या अंगावरील फाटके कपडे अशी दयनीय स्थिती आली. यात काही मित्र धावून आले. अनेकांनी आर्थिक मदतीचा हात दिला, कुणी धान्याची सोय करून दिली, कुणी कपडे गोळा करून दिले. हे का घडले याचे कारण म्हणजे जे कोणी लोक या मुला-मुलींना भेटायला येत त्यांनी या मुलांवरचे संस्कार अचूक हेरले. घरी आलेल्या पाहुण्याला वाकून नमस्कार करणारी, त्याच्यासाठी चहा-पाण्याची व्यवस्था करणारी ही बालके कोणालाही आपलेसे करून घेणारीच होती. दिवस जात होते, तशी रामभाऊंकडील मुलांचीही संख्या वाढत होती. आपला मुलगा-मुलगी रामभाऊंकडे चांगल्या संस्कारात वाढत असल्याचे समाधान या मुलांच्या आयांना होते आणि त्याच आपल्या अन्य सहकारी महिलेला तिचे मूल रामभाऊंकडे पाठविण्याचा आग्रह धरीत होत्या.. हा एक नवीनच बदल घडून येत होता.
वाइटातील वाईट अनुभव घेतल्यानंतरही समाज हा चांगल्या माणसांचाच आहे आणि यात देवमाणसे अधिक आहेत, हा अनुभव इंगोलेंसाठी नवा होता. अचानक एक दिवस निवृत्त एअर व्हाइस मार्शल पी.के. देसाई यांच्या कुटुंबाला त्यांच्या कामाबद्दल कळले. या बडय़ा वायुदल अधिकाऱ्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळले. त्यांचे अमेरिकेत राहणारे बंधू नवीन देसाई यांनी मित्रांना सांगून पैसे गोळा केले. यातून मुलांच्या राहण्यासाठी कायम निवास असावा म्हणून नागपूरपासून १८ किमी अंतरावरील पाचगावला एक जागा दिली. झोपडी बांधून ही मुले राहू लागली. झाडाखाली शाळा भरू लागली. शाळेचे तोंडही न पाहिलेल्या याच मुलांनी आजूबाजूच्या खाण परिसरातील मजूर कुटुंबीयांच्या मुलांनाही शाळेची गोडी निर्माण केली. या मुलांची सामाजिक जाणीव प्रगल्भ होत असल्याचाच हा अनुभव होता. शाळा बांधणीच्या टप्प्यावर असतानाच दुर्दैवाने नवीन देसाईंचे अचानक अमेरिकेत निधन झाले. विमलाश्रमला बसलेला हा मोठा धक्का होता. मात्र, दैव मदतीला धावले. नवीन देसाईंच्या मित्रांनी त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी पैसा गोळा करून पाठवला. याच पैशातून पाचगावातील पडीक जागेचे नवीन देसाई निवासी शाळेत रूपांतर झाले आहे. तब्बल २०० अनाथ मुले-मुली या शाळेत शिकत असून अलीकडेच शाळेला मान्यता मिळाली. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग चालविले जात आहेत.
आज कोणाचा विश्वास बसणार नाही, पण या मुलांची शैक्षणिक प्रगती उल्लेखनीय आहे. कमी-अधिक फरकाने ही मुले काही ना काही नवे शिकत आहेत. त्यांना सांभाळताना पक्षपात करता येत नाही. एकावरच प्रेम दाखविता येत नाही. प्रत्येक मुलाला आपला बाप रामभाऊ हाच आहे, एवढेच माहीत आहे. बाप आणि आईचे प्रेम त्यांना देण्यासाठी रामभाऊंचे आयुष्य आहे. मुलांना शाळेत घालताना बापाचे नाव लावावे लागते. ते रामभाऊंनी दिले आहे. कमी बुद्धय़ांक असलेला काही मुलांना टय़ूशन लावावी लागते. दूरवर पायी पायी ही मुले जातात. त्यामुळेच त्यांना एकप्रकारची शिस्त घालून दिली आहे. टीव्ही, इंटरनेट, मोबाइलच्या जगातील तरुण पिढी पाहताना या मुला-मुलींच्याही सुप्त इच्छा जागृत होतात. वयात आलेल्या मुलींना तर फारच जपावे लागते. या मुलींवर कोणाची वाईट नजर पडू नये, यासाठी दक्ष राहावे लागते. महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना सुटी होताच सरळ घरी या, कुठे थांबू नका या सूचना रोज द्याव्या लागतात. कितीही झाली तरी ही माणसेच आहेत. त्यांनाही रात्री स्वत:चे आई-बाबा हवे असतात. काही मुलांना त्यांच्या आया भेटायला येतात. मुलांमधील बदल पाहून या आयांचे डोळे भरून येतात. आपला मुलगा चांगल्या मार्गाला लागेल, या विश्वासाने त्या परततात. वाढत्या वयाच्या मुला-मुलींना सायकली हव्या असतात. आणायच्या कुठून? मग कुणीतरी घरची जुनी सायकल देतो. ती दुरुस्त करून मुले चालवितात. वाढदिवसाची हौस भागवावी लागते. या मुलांना शिवणकाम, क्राफ्ट याचे प्रशिक्षण दिले जाते. एखादा स्टॉल लावून थोडीफार मिळकत होते. बाकी खर्च लोकांनी दिलेल्या देणग्यांमधून चालतो. काहीजण या मुलांसाठी नि:स्वार्थीपणे शिकवण्यासाठी येतात. काही डॉक्टर्स त्यांची तपासणी करून देतात. या मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य हीच राम इंगोलेंची सर्वात मोठी संपत्ती. उद्याची सकाळ कशी उगवेल याचा नेम नसलेल्या याच मुलांपैकी चौघांना चक्क बी.ई. पर्यंत शिकविण्याची करामत रामभाऊंनी करून दाखविली. खासदार दत्ता मेघेंनी या मुलांच्या मोफत शिक्षणाची सोय केली. प्रो. अडवाणी यांनी पडद्याआड राहून बराच खर्च उचलला. या कार्यात गेल्या १८ वर्षांपासून डॉ. कुंदा पाचुंडे यांनी सर्वात मोठी साथ दिली. मुलांना त्यांनीही जीव लावला आहे. शिवाय शरद रोडे, रामेश्वर भुते, प्रेमलता जाधव सावलीसारखे रामभाऊंसोबत असतात. एका मुलीचे लग्नही रामभाऊंनी अलीकडे लावून दिले. राम इंगोले सर्व मुलांसाठी सर्वेसर्वा आहेत.
संस्थेपर्यंत कसे जाल?
नागपूर-उमरेड मार्गावरील पाचगाव या ठिकाणी विमलाश्रम ही संस्था आहे. नागपूर बसस्थानकातून उमरेड येथे जाण्यासाठी बसेस मिळतात. नागपूरपासून १८ किमी अंतरावर पाचगाव आहे. पाचगावात विमलाश्रम आणि नवीन देसाई निवासी शाळा आहेत. बस, रिक्षा किंवा टमटमनेही पाचगावला जाता येते.
हे कार्य अखंड सुरूच रहावे हीच इच्छा..
विमलाश्रम आणि नवीन देसाई निवासी शाळेत देहविक्रय करणाऱ्या महिलांचीच नव्हे तर खाण कामगार, मजूर, रस्त्यावर टाकून दिलेली अनाथ मुलेदेखील येऊ लागली आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, रामभाऊंच्या मर्यादा आहेत. संख्या वाढल्याने मदतीसाठी याचकासारखे रोज धावावे लागते. अनेक सेवाभावी संस्था, जवळचे मित्र आणि दानशूरांच्या भरवशावर किती दिवस पुढे ढकलायचे हा त्यांच्यापुढील सर्वात मोठा प्रश्न आहे. विमलाश्रम गुरुकुल आणि नवीन देसाई निवासी शाळेचा वटवृक्ष झालेला त्यांना पाहायचा आहे. या मुलांची उद्याची जबाबदारी कोण घेणार, हा विचार नेहमीच त्यांना सतावतो. तरीही माझ्यानंतर एखादा निश्चितपणे हे अवघड कार्य पुढे चालवू शकेल, या विश्वासाने समाधानाची शांत झोपसुद्धा लागते. पण, समाजाने मदतीचा हात दिला तरच हे शक्य आहे..
धनादेश या नावाने काढावेत
विमलाश्रम घरकुल किंवा
आम्रपाली उत्कर्ष संघ, नागपूर
(८० जी अन्वये आयकर सवलत)
Vimalashram Gharkul OR Amrapali Utkarsh Sangh

धनादेश येथे पाठवा..
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२१४
महापे कार्यालय   
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, मआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००
ठाणे कार्यालय     
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७
पुणे कार्यालय       
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस,
प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४१०००
नाशिक कार्यालय        
संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 2:17 am

Web Title: ram ingole father of orphan children runs vimalashram an orphanage at nagpur
Next Stories
1 संगीतभास्कर तळपत राहो!
2 सोबत आणि शुश्रूषेची दिलासादायक मात्रा
3 सर्वकार्येषु सर्वदा : विशेष मुलांची ‘झेप’ उंचाविण्यासाठी..!
Just Now!
X