राम पटवर्धन यांच्या निधनाने मराठी साहित्यसृष्टीतील स्वातंत्र्योत्तर काळातील एक साक्षेपी संपादक आणि अनेक लेखकांच्या प्रतिभेला संजीवक पैलू पाडणारा शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. वय ८६ म्हणजे तसे काही अकाली जाणे झाले असे म्हणता येत नाही. कारण ‘सत्यकथा’चे प्रकाशन ८२ सालापासूनच थांबले आहे आणि त्यानंतर राम पटवर्धन लेखन, संपादन, सार्वजनिक कार्यक्रम वगैरेमध्ये फारसे सक्रिय असे नव्हतेच. त्यांचे वाचन मात्र अखंड चालूच होते आणि जागतिक साहित्याच्या नवनवीन प्रवाहांशी त्यांचे नाते कायम टिकून राहिले होते.
राम पटवर्धन यांनी ‘मौज’ बंद पडल्यावर १९६० साली सत्यकथाच्या कार्यकारी संपादकाची धुरा स्वीकारली आणि नव्या प्रतिभेचा शोध घेऊन त्यांना सत्यकथाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ललितकथा आणि कविता यांच्याचबरोबर ललितलेखन, समीक्षा, विविध कलामाध्यमे यांचाही अंतर्भाव केला. पु. ल. देशपांडे, न. र. फाटक, श्री. पु. भागवत वगैरे शिक्षकांमुळे राम पटवर्धन यांची वाङ्मयीन जाण चौफेर होत गेली. त्यांनी स्वत:देखील चेकॉव्हच्या काही कथांचे अनुवाद केले आणि ‘नाइन फिफ्टीन टू फ्रीडम’ ही कादंबरीही मराठीत आणली आहे. त्यामुळे ‘मौज’ साप्ताहिक आणि सत्यकथा हे मासिक मराठीतील सर्व नव्या लेखकांचे नव्या प्रयोगांचे केंद्र म्हणून मान्यता पावले. सत्यकथामध्ये जोपर्यंत आपले लेखन येत नाही तोपर्यंत लेखक म्हणून आपल्याला कुणी स्वीकारणार नाही, असे त्या वेळी समजले जाई.
हे जे स्थान सत्यकथाला मिळाले ते काही वाचकांना व सत्यकथामध्ये स्थान न मिळालेल्या लेखकांना खटकू लागले आणि ते सत्यकथाबाबतचा आपला विरोध लघुनियतकालिकेत किंवा अनियतकालिकांच्या माध्यमातून व्यक्त करू लागले. तो विद्रोहाचा प्रवाह आजही ओसरलेला नाही. आजही जादा खप असलेल्या आणि प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या माध्यमांच्या विरोधात अनेक अनियतकालिके निघत आहेत.एका दृष्टीने राम पटवर्धन यांनी सत्यकथाला जे कलावादी स्वरूप दिले त्याचा हा परिपाक होय.
दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य यांचे जे पेव फुटले त्याचे श्रेयही मौज व सत्यकथाकडे जाते. राम पटवर्धन हे एक संपादक म्हणून आपल्याकडे येणाऱ्या लेखनावर विविध संस्कार करण्यामध्ये चोखंदळपणा दाखवत. त्यामुळे काही वेळा त्यांची अमुक वाक्ये टोकदार नाहीत, तमुक कथा धारदार नाही अशी खिल्ली उडवण्यात ठणठणपाळ वगैरेंना धन्यता वाटत असे.