दिल्लीवाला

रावणवध

यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी रावणाचा वध करायला द्वारकेत गेलेले होते. रामलीला मैदानावर वा लालकिल्ल्याच्या मैदानावर होणाऱ्या रामलीलेमध्ये ते यंदा सहभागी झाले नव्हते. अर्थात, ही द्वारका म्हणजे कृष्णाची द्वारका नव्हे, तर दिल्लीच्या पश्चिम भागात असलेला द्वारका नावाचा परिसर आहे. तिथं मोदींसाठी धनुष्य-बाण ठेवलेला होता. रावण तर होताच. धनुष्यदेखील वजनदार होतं. व्यावसायिक स्पर्धामध्ये वापरलं जाणारं धनुष्य लढवय्या मोदींनी हाती घेतलं आणि रावणाच्या पुतळ्यावर लक्ष्य साधलं. असत्यावर सत्याचा विजय मिळवण्यासाठी दिल्ली भाजपनं आधीपासून तयारी केलेली होती. मनमोहन सिंग वा सोनिया गांधीही रावण दहनात सहभागी होतात. यंदाही होते. त्यांनी धनुष्य हातात धरल्यासारखं केलेलं होतं. भाजपला तसं प्रतीकात्मक काही करायचं नव्हतं. रावण दहनाचं दृश्य खरंखुरं वाटलं पाहिजे यासाठी भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांनी खास पुढाकार घेतलेला होता. त्यांनी स्वत: धनुष्य-बाण चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. सुटलेला बाण लांबवर जायला पाहिजे. वर्मा यांनी बाण मारण्याचा सराव केला. बाण कुठवर जाऊ  शकेल, याचा अंदाज घेतला. बाण मारण्याचं कसब वर्माना येणं आवश्यकच होतं. कारण मोदी रंगमंचावर आले तेव्हा वर्मानीच मोदींना प्रशिक्षण दिलं. व्यावसायिकांचं धनुष्य असल्यानं ते हाताळणं आणि बाण सोडणं हे थोडं कसरतीचं काम होतं. वर्मानी मोदींना ते समजावून सांगितलं. मोदींसाठी दणकट धनुष्य वापरण्यामागे उद्देश होता की, बाण साठ मीटपर्यंत जाईल. इतका गेला नाही तरी चालेल, पण फर्लागभर अंतर तरी बाणानं कापलं पाहिजे. वर्माच्या परिश्रमानं फळ मिळवून दिलं. मोदींनी अर्जुनासारखा बाण सोडून रावणावर प्रहार केला आणि सत्याला विजय मिळवून दिला.

स्वप्न बघायला काय हरकत आहे?

दिल्लीची हवा बदलायला लागलेली आहे. महिनाभरात थंडी पडायला लागेल. पण याच काळात दिल्लीत सर्वाधिक प्रदूषण असतं. पंजाब-हरयाणात शेतजमीन भाजली जाते. त्यामुळे दिल्ली धुरानं भरून जाते. कितीही काहीही केलं, तरी शेतकरी शेत जाळतातच आणि दिल्लीची हवा बिघडतेच. ते रोखणं ना केंद्र सरकारला शक्य होतं, ना राज्य सरकारला. आता चारेक महिन्यांत दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्लीतील प्रदूषण हा नेहमीप्रमाणं प्रचारातील प्रमुख मुद्दा असेल. गेल्या आठवडय़ात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन- दिल्लीतील हवा स्वच्छ करण्यासाठी काय काय केलं, याची जंत्री वाचून दाखवली आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. प्रदूषण करणारा वीजप्रकल्प कसा बंद केला, हे मोदी आणि केजरीवाल या दोघांचीही सरकारे लोकांना पटवून देत आहेत. हे कर्तृत्व त्यांचंच असल्याचं सांगताहेत. ‘दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणाचं सगळं श्रेय आप या पक्षालाच घ्यायचं आहे, विजयाची टोपी त्यांना एकटय़ालाच घालायची आहे,’ असा टोमणा मारून जावडेकरांनी केजरीवालांनाच टोपी घातली! भाजपनं जावडेकर यांच्याकडं राजस्थानप्रमाणं दिल्लीचीही जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळं सरकार आणि पक्ष यांच्या प्रतिनिधित्वाची एकत्रित भूमिका जावडेकर पार पाडत आहेत. खरं तर त्याच दिवशी ‘आरे’तील जंगलतोडीवर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती. दिल्लीची निवडणूक बाजूलाच राहिली, ‘आरे’वरूनच प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. पण जावडेकरांनी- ‘आरे’ सोडून बोला, अशी भूमिका घेतली. उत्तर न देण्याबाबतीत मात्र मोदी सरकारमधील मंत्री निश्चयी असतात. केंद्रीय पर्यावरणमंत्री या नात्याने जावडेकर यांनी ‘आरे’तील वृक्षतोडीचं समर्थन केलेलं आहे. ‘दिल्ली मेट्रो झाडं कापल्याशिवाय उभी राहिलेली नाही. दिल्ली मेट्रो महामंडळानं जितकी झाडं कापली तितकी नव्यानं लावलीही. एका झाडाच्या बदल्यात पाच झाडं लावली पाहिजेत,’ असा जावडेकरांचा युक्तिवाद होता. पण ‘आरे’तील कापलेल्या झाडामागं पाच नवी झाडं लावली जातील, असं आश्वासन मुंबई मेट्रो, पालिका वा मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं ऐकिवात नाही! जाता जाता जावडेकर यांनी शिवसेनेवर मात्र मत व्यक्त केलं. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत जावडेकर म्हणाले : ‘स्वप्न बघायला काय हरकत आहे? निकालानंतर कळेलच कोणाचा मुख्यमंत्री होईल ते!’

हरित फटाके

दिवाळीत हरित फटाके वाजवण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून केलं जाऊ  लागलेलं आहे. गेल्या आठवडय़ात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी हरित फटाके बाजारात आलेले असल्याचं वाजतगाजत जाहीर केलं. हरित फटाक्यांमुळं प्रदूषित वायूंचं उत्सर्जन ३० टक्क्यांनी कमी असेल, असा दावा केला गेला आहे. त्यामुळं या वर्षी केंद्र सरकारनं जाणीवपूर्वक हरित फटाक्यांचा प्रचार सुरू केलेला आहे. फटाक्यांच्या धुरामुळं दिवाळीच्या काळात अस्थमाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. श्वसनाचे आजार वाढतात. आजाराला आमंत्रण देण्यापेक्षा फटाकेच वाजवू नका, असा प्रचार केला जात होता. पण सणासुदीचा आनंद लोक घेणारच. त्यामुळं निदान हरित फटाके तरी वाजवा, असं आता सांगितलं जाऊ  लागलं आहे. दिल्लीतील आधीच प्रदूषित असलेली हवा आणखी खराब करण्यापेक्षा हरित फटाक्यांचा उपाय चांगलाच. पण धूर पसरवणाऱ्या नेहमीच्या फटाक्यांवर बंदी आणलेली नाही. शिवाय हरित फटाके बनवण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. देशभरात १६०० फटाके उत्पादक आहेत. त्यापैकी फक्त २८ उत्पादकांना हरित फटाके बनवण्याची परवानगी दिलेली आहे. इतक्या कमी उत्पादकांच्या साह्य़ाने देशभर हरित फटाक्यांचा पुरेसा पुरवठा होऊ  शकत नाही. हरित फटाक्यांचा प्रसार करायचा असेल, तर केंद्र सरकारला नजीकच्या भविष्यात या फटाक्यांचे उत्पादन वाढवावेच लागेल. थेट फटाक्यांच्या उद्योगातून दोन लाख लोकांना रोजगार मिळतो. तर फटाक्यांशी निगडित व्यवसायातून वीस लाख लोकांना रोजगार मिळतो. दिवाळीच्या काळात ८० लाख किरकोळ विक्रेत्यांना फटाके विक्रीचा परवाना मिळतो. फटाक्यांच्या पारंपरिक व्यवसायातून मोठी रोजगारनिर्मिती होत असते. हा रोजगार हरित फटाक्यांच्या उत्पादनातूनही निर्माण झाला तर हरित फटाक्यांचा वापर वाढू शकेल.

बदलही अंगवळणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिकबंदी केल्यापासून लोक स्वत:च्या खिशात कापडाची पिशवी बाळगायला लागलेले आहेत. दिल्लीत तरी प्लास्टिकचा वापर कमी झालेला आहे. भाजीवाला कागदात भाजी गुंडाळून देतो किंवा लोक कापडी पिशवी पुढं करतात. छोटी छोटी खरेदी केली की दुकानदार कागदी पिशव्यांमधून वस्तू भरून देतो. कार्यक्रमांमध्ये पाण्याच्या छोटय़ा बाटल्या हद्दपार झालेल्या आहेत. दिल्लीमध्ये वाहतूक नियमांच्या भंगाविरोधातील नवा दंड केजरीवाल सरकारनं लगेचच लागू केला. दिल्ली सरकारनं भाजप सरकारांप्रमाणे आढेवेढे घेतले नाहीत. पीयूसीची पावती नसेल, तर दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागतो. हा दंड आधी फक्त एक हजार रुपयेच होता. त्यामुळं पीयूसीची पावती घेण्याचं प्रमाण सप्टेंबर महिन्यात तीन पटींनी वाढलेलं आहे. नव्या दंडाबद्दल दिल्लीकरांनी कुरकुर केली; पण बदल स्वीकारला. भाजपनं गांधीजींची दीडशेवी जयंती साजरी केली. २ ऑक्टोबरला सुरू झालेली ‘गांधी संकल्प यात्रा’ ३१ ऑक्टोबपर्यंत सुरू राहणार आहे. प्लास्टिकबंदीचा प्रसार हा यात्रेतील प्रमुख उद्देशांपैकी एक आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना दिल्ली मुख्यालयानं कार्यक्रम आखून दिलेला आहे. दीडशे किलोमीटरच्या या यात्रेत प्राथ:कालीन प्रार्थना-नास्ता, मग ‘चाय पे चर्चा’, त्यानंतर सामाजिक सद्भावना कार्यक्रम, संध्याकाळी प्रार्थना. दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये गांधीजींच्या विचारांचा प्रसार करायचा.. असा भरगच्च कार्यक्रम भाजपनं सुरू केला आहे.

युवराजांची धुसफुस

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडून देणाऱ्या राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांची इतकी चर्चा झाली, की त्या चर्चेनं मोदींच्या परदेश दौऱ्यांबद्दलच्या चर्चेवरही मात केली. ते कुठंही गेले असोत, टीकेचे धनी मात्र झाले. शेवटी जिथं कुठं होते, तिथून राहुल गांधी दोन दिवसांत परतले आणि थेट सुरतला पोहोचले. रविवारी राहुल यांचा दिवसभर महाराष्ट्र दौरा आहे. विधानसभा निवडणूक असताना युवराज परदेशात जातातच कसे, असा सवाल प्रसारमाध्यमांनी सुरू केला होता. खरं तर राहुल यांनी पक्षीय राजकारणात लक्ष घालणं बंद केलेलं आहे. तिकीटवाटपातही त्यांनी स्वत:ला लांब ठेवलं होतं. काँग्रेसमधील थोरामोठय़ांवर ते चिडलेले होते. त्यांची धुसफुस चालू होती. बहुधा त्यांचा राग अजून गेलेला नाही असं दिसतंय. राहुल ट्विटरवर आपली राजकीय मतं व्यक्त करतात, एवढीच त्यांची सक्रियता!