News Flash

रस्ते की अब्रुची लक्तरे?

शहरांतील मान्यवरांच्या प्रतिक्रियांद्वारे रस्त्याच्या समस्येला वाचा फोडण्याचा हा लोकसत्ताचा प्रयत्न.    

(संग्रहित छायाचित्र)

स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन, या संस्थांवरील सत्ताधारी आणि सरकारी यंत्रणा यांच्या अब्रुची वेशीवर टांगलेली लक्तरे म्हणजे खड्डेमय रस्ते. हे चाळण झालेले रस्ते म्हणजे झारीतील शुक्राचार्याच्या शौर्याच्या यशोगाथाच. म्हणून रस्त्यांवर खड्डे पडल्याचे खापर पावसावर फोडणारे आणि धरण फुटल्याचे खापर खेकडय़ांवर फोडणारे राजकारणकर्ते आपल्याकडेच निपजतात. रस्ता म्हणजे विकासाचा महामार्ग, पण कोणाच्या? तर दरवर्षी रस्तेदुरुस्तीचे कंत्राट मिळवणाऱ्या आणि ते त्यांना मिळवून देणाऱ्या राजकारण्यांच्या, असे खेदाने म्हणावे लागते. म्हणून खड्डे न पडणारे रस्ते बांधताच येणार नाहीत का? खड्डे पडल्यास कंत्राटदारास जबाबदार धरणार का?, रस्त्याच्या दुरुस्तीचा दर्जा तपासणार की नाही, आपण नागरिक म्हणून जाब विचारणार की गप्प राहणार हे कळीचे प्रश्न ठरतात. मुंबई ही देशाची उद्योगनगरी, नागपूर ही राज्याची उपराजधानी, पुणे ही सांस्कृतिक नगरी आणि विचारांच्या प्रागतिकतेचा वारसा सांगणारी करवीर नगरी.. या शहरांतील मान्यवरांच्या प्रतिक्रियांद्वारे रस्त्याच्या समस्येला वाचा फोडण्याचा हा लोकसत्ताचा प्रयत्न.

भीतीदायक प्रवास 

दादर ते सीएसटी येथील जीटी रुग्णालय असा माझा रोजचा प्रवास आहे. परेल भागातून हिंदमाताकडून जाताना, विशेषत: उड्डाणपुलाखालील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. ५० मीटरचा रस्ता पार करण्यासाठी पाऊण तास लागतो. आजूबाजूच्या दुचाकीस्वारांचा खड्डय़ांमुळे तोल जाऊन ते आपल्या गाडीखाली येण्याची भीती असते. त्यामुळे खड्डे असलेल्या रस्त्यांवर गाडी चालविताना खबरदारी घ्यावी लागते. धक्क्यांमुळे मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास होतो. मणक्याच्या हाडांची लवकर झीज होते. दुचाकी वा बसच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तींना धक्के बसल्याने अस्थिभंग झाल्याची उदाहरणे आहेत.

– डॉ. धीरज सोनावणे, अस्थिरोगतज्ज्ञ

आपण फक्त सहन करतो!

खड्डेमय रस्त्यांसाठी काही तरी करण्याची आवश्यकता आहे. साखळी पद्धतीने रोज रस्त्यावर बसून राहिल्यावर तरी प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल का, असा प्रश्न पडतो. इतक्या वर्षांत रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांवर उपाय निघू शकत नाही हे लाजिरवाणे आहे. आपण फक्त सहन करतो, याची खंत वाटते.

– मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री

रस्ते विकास आयोग स्थापन करा!

रस्तेबांधणी, त्यांची गुणवत्ता, देखभाल-दुरुस्ती याला अनन्यसाधारण महत्त्व असले पाहिजे. आपल्याकडे रस्तेबांधणीवर वारेमाप पैसा खर्च केला जातो. रस्तेबांधणी करताना गुणवत्ता नियंत्रण नावाची यंत्रणा असली, तरी ती फक्त कागदी घोडे नाचवते. अशा समितीमध्ये रस्त्यांचा अभ्यास असणाऱ्या लोकांचा समावेश केला तर त्यातील अपप्रवृत्ती, खाबुगिरीवर नियंत्रण राहील. रस्ते विकास आयोगाची स्थापना करायली हवी. मुख्य म्हणजे, लोकांनी बघ्याची भूमिका न घेता रस्ते बारमाही दर्जेदार कसे राहतील यासाठी आपला नागरी हक्क बजावयाला हवा.

– विनायक रेवणकर, सदस्य, राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा समिती

रस्तेभोग संपणार तरी केव्हा?

कोल्हापुरात अपवाद वगळता एकही चांगला रस्ता दिसत नाही. अशा रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे साक्षात अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. पूर्वी याच शहरातील रस्त्यांवरून रिक्षातून प्रवास करताना स्केच काढता येत असत. आता रिक्षा-दुचाकीवरून प्रवास करताना वाहन सांभाळणे, स्वत:ला सांभाळणे आणि आपल्याकडील साहित्य सांभाळणे अशा कसरती कराव्या लागतात. कलाकार हा सौंदर्याचा भुकेला असतो, पण सार्वजनिक बांधकाममंत्र्यांच्या शहरात कलाकारांवर रस्त्यात सौंदर्य शोधण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. आयुष्याच्या अखेरीला सर्व रस्ते पंचगंगेकडे जातात असे म्हटले जाते, पण आज करवीर नगरीत प्रवास करताना रस्त्यांची अवस्था पाहिली की पंचगंगेकडेच वाटचाल करतो आहोत, असा भास होत राहतो. जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याचे भोग संपणार तरी केव्हा?

– चंद्रकांत जोशी, चित्रपट दिग्दर्शक आणि अध्यक्ष, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी

कुणाला वेळ देण्याचे धाडसच होत नाही

दक्षिण मुंबईत माझे घर ते नेहरू सेंटर या प्रवासात फारसा त्रास होत नाही. पण पुण्याला जायचे किंवा अगदी उपनगरांमध्ये जायचे तरी विचार करावा लागतो. खड्डे, वाहतूक कोंडी यांमुळे, एखाद्या कार्यक्रमासाठी वेळ ठरवली तर निश्चित वेळी ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्याची शाश्वती नसते.

– डॉ. अरविंद परांजपे, संचालक, नेहरू तारांगण

खड्डय़ांतून प्रवास आणखी किती वर्षे?

प्रवासासाठी गेलेल्या गाडय़ांपैकी एक तरी गाडी बिघडली नाही, असा दिवसच उगवत नाही. चांगल्या रस्त्यांसाठी मोठी पथकर वसुली केली जाते; पण खराब रस्ते, खड्डे हे जणू वाहनधारकांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. पुणे-कोल्हापूर मार्गावर प्रवास करताना महागडय़ा मोटारींचे चाक खड्डय़ात जाऊन फुटले. ३५ हजार रुपयांचा भरुदड पडतो. आणखी किती वर्षे असा प्रवास करावा लागणार आहे?

– तेज घाटगे, घाटगे उद्योग समूह, कोल्हापूर

खड्डय़ांमुळे शहर बदनाम 

नागपूर शहर डांबरी रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे बदनाम होत आहे. असा एकही डांबरी मार्ग नाही, की त्यावर खड्डे नाहीत. एकच रस्ता वर्षांतून चार वेळा दुरुस्ती करून कंत्राटदार आपली झोळी भरण्याचे काम करतो. मात्र त्यानंतर त्याच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतात आणि पुन्हा नव्याने डागडुजी केली जाते. अशी स्थिती असेल, तर शहर खड्डेमुक्त होईल का, हा प्रश्नच आहे.

– डॉ. रंजन दारव्हेकर, ज्येष्ठ नाटय़ कलावंत व दिग्दर्शक, नागपूर

निकृष्ट बांधकामामुळेच खड्डे

निकृष्ट बांधकामामुळेच दरवर्षी रस्त्यावर खड्डे पडतात. भ्रष्टाचाराची मोठी साखळी यात गुंतल्याचा संशय बळावतो. नागपुरात खड्डय़ांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. पावसाळ्यात खड्डय़ांमध्ये पाणी साचते. त्यामुळे खड्डय़ांचा अंदाच वाहनचालकांना येत नाही. परिणामी अपघात होण्याची भीती असते. मात्र कुणालाच याचे काही देणेघेणे नाही.

– डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू, कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर

कंबर, मानेचे दुखणे वाढले

अनेक भागांतील रस्ते खड्डेमय आहेत. काही भागांत विविध कामांसाठी रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो. खड्डय़ांमुळे मान आणि कंबरदुखीच्या व्याधी वाढल्या आहेत. अपघातात जखमींना आणि हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेताना खड्डय़ांमुळे विलंब होतो. असाच त्रास डॉक्टरांना तातडीने रुग्णालयात पोहोचतानाही होतो.

– डॉ. प्रमोद गिरी, संचालक, न्यूरॉन्स हॉस्पिटल, नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2019 1:29 am

Web Title: reactions on bad road condition abn 97
Next Stories
1 लालकिल्ला : निवडणुकीचे ‘गणित’!
2 विश्वाचे वृत्तरंग : ग्रेटा द ग्रेट!
3 सत्पात्री दानाचे समाधान!
Just Now!
X