19 January 2020

News Flash

पूरग्रस्त उसाचे वास्तव आणि बचाव!

ऊस साखर व्यवसायाचे आगार असलेल्या दक्षिण महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि महापुराने यंदा थमान घातले

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. ज्ञानदेव गं. हापसे

सांगली-कोल्हापुरात आलेल्या महापुराने शेतीचेही मोठे नुकसान केले आहे. यामध्ये उसाची स्थिती सर्वाधिक गंभीर आहे. प्राथमिक अंदाजानुसार या दोन जिल्ह्य़ात तब्बल दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस पीक या पुराने बाधित झाले आहे. या पिकावरील ही आपत्ती आणि त्यावरील काही उपाययोजनांविषयी..

ऊस साखर व्यवसायाचे आगार असलेल्या दक्षिण महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि महापुराने यंदा थमान घातले. या व्यवसायाने या भागात प्राप्त झालेले वैभव पाहता पाहता लयाला गेले. उसाबरोबरच इतर पिके, पशुधन, डेअरी वगरेंचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्यासारखे झाले आहे. सांगली, कोल्हापूर, कराड भागातील कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा नद्यांना प्रचंड  महापूर आले. जेमतेम पंधरा दिवसांपूर्वीचे (दि. ७ ऑगस्टपूर्वी) हिरवेगार जोमदार उसाचे फड आता बघवेनासे झाले आहेत. पुराच्या पाण्याखाली ८ ते १० दिवस बुडालेल्या उसाच्या पोंग्यात व पानांवर गाळ, मातीचा थर साचला आहे. जास्त दिवस मुळांना हवा न मिळाल्याने ती अकार्यक्षम (मृतवत) झाली. परिणामी पिकाच्या शरीरक्रिया, शास्त्रीय प्रक्रियांवर अति अनिष्ट परिणाम सुरू झाला आहे. त्यामुळे पिकाच्या वाढीची अवस्था आणि सभोवतालच्या परिस्थितीनुसार पूर्णपणे बुडालेल्या पिकाचे शंभर टक्क्यापर्यंत नुकसान झाले आहे.

आता पुराचे पाणी ओसरू लागले आहे. मात्र, शेतात (विशेषत: काळ्या, तांबडय़ा, भारी जमिनीत) दलदलीचे प्रमाण जास्त असल्याने पिकांच्या मुळांना हवा (प्राणवायू) मिळणार नाही, त्यामुळे मुळे काळी पडून कुजू लागतील. मर रोग, पायनापल रोगांचा प्रादुर्भाव होऊन ऊस पोकळ पडून वाळेल. गेल्या वर्षी लावलेला आडसाली ऊस २८ ते ३० कांडीवर असेल. परंतु जो ऊस पुराच्या पाण्यात बुडला गेला असेल, त्याच्या पोंग्यात व पानांच्या देठात गाळ बसल्याने शेंडा कूज (पोक्का बोईंग) रोगाचा प्रादुर्भाव होऊन ऊस शेंड्याकडून सुकू लागेल. देठामध्ये गाळ साचल्याने पांगशा (बगल्या) फुटणे व कांडीला जोडावर मुळया येणे सुरू होईल. याचा परिणाम ऊस पोकळ होण्याकडे होईल. पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड केली जाते. अशा उसात खोडकिडीचा, हुमणीचा प्रादुर्भाव आढळतो. शेतातील दलदल स्थिती व पूर पाण्याचे पानावर बसलेले आवरण यामुळे मातीतील मर रोगाची बुरशी उसात शिरून मर रोगाचा प्रादुर्भाव होतो.

दीड लाख हेक्टर क्षेत्र बाधित

कोल्हापूर जिल्ह्यत जवळ जवळ दीड लाख हेक्टर तर सांगली जिल्ह्यत १ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक आहे. यापकी कोल्हापूर भागात ऊस लागण साधारणपणे ६० टक्के असते, तर ४० टक्के खोडवा असतो. लागणीमध्ये पूर्व हंगामी क्षेत्र २० टक्के, सुरू ३० टक्के व आडसाली १० टक्के असते. सांगली, कराड भागात आडसाली ऊस क्षेत्र १५ टक्के ,पूर्व हंगामी ३५ टक्के, तर खोडवा ३५ टक्के असतो. दोन्ही जिल्हे मिळून अंदाजे दीड लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रातील उसाला महापुराचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. बहुतांश ऊस पाण्याखाली पूर्णपणे ८ ते १० दिवस राहिल्याने उसाचे शंभर टक्के नुकसान होणार आहे. पण येणाऱ्या गळीत हंगामात अपुऱ्या व कमी प्रतीच्या ऊस उपलब्धतेने साखर कारखाने आणि गूळ व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत येतील, हे स्पष्ट दिसत आहे. या परिस्थितीचा अर्थकारणावर मोठा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. पुराचे पाणी ओसरू लागले असले तरी, अजूनही बरेच ऊस क्षेत्र पाण्याखाली आहे. या भागातील भारी, काळ्या जमिनीत चिकट मातीचे  प्रमाण जास्त असल्याने जमीन वापसावर यायला अजून काही दिवस लागू शकतात. शिवाय,ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात,तसेच सप्टेंबर मध्ये पावसाचाही संभव आहे, म्हणून शेतात काही उपाययोजना करावयाच्या ठरविल्यास तेही काम कठीणच आहे.

नुकसानीचे स्वरुप

मुळांना हवा (प्राणवायू) न मिळाल्याने ती अन्नघटक शोषून घेऊ शकत नाहीत. तर पाने, गाळ  पाण्यात बुडाल्याने व त्यांच्यावर गाळाची माती बसल्याने त्यांच्यापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. कार्बन डाय ऑक्साईड (सीओ२) वायू मिळत नसल्याने प्रकाश संश्लेषण (कर्बग्रहण) प्रक्रियेअभावी पीक आपले अन्न तयार करू शकत नाही. त्यामुळे वाढ खुंटते. ऊस हळूहळू मरु लागतो. पिकांत शरीरक्रिया शास्त्रीय व जैवरासायनिक प्रक्रिया बंद पडतात, म्हणजेच पिकाचा जैविक ऱ्हास होऊ लागतो. पाने पिवळी पडतात. वाढ मंदावते व थांबते. पोंग्यात व पानांच्या देठात गाळ साचल्याने पोंगा मर (पोक्का बोईंग), मर रोग, पांगशा फुटणे, मूळकुज, कांडी कुज वगरे रोगांचे प्रमाण वाढते व पिकाची हानी होते. पाण्याच्या प्रवाहामुळे वाढलेला ऊस लोळतो व शेतातील माती वाहून जाते.

उपाययोजना

१ कमी कालावधीपर्यंत पाण्यात ऊस बुडाला असेल, तर तो सुधारण्यासाठी पुढील गोष्टी केल्या तर फायदा होईल. कमी कालावधीपर्यंत पाण्यात बुडलेला व नदीपात्रापासून थोडा उंचीवर असलेला ऊस सुधारू शकतो. त्यासाठी पुढील उपाय करावेत. शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. उताराच्या बाजूने चर काढावेत. सुकलेले, वाळलेले, सडलेले ऊस काढून त्याचे जैविक खत करावे.

२ शेतात जाण्यासारखी स्थिती असल्यास व रुंद सरी पद्धतीने ऊस लागवड केली असल्यास त्यांच्या पानावर, शेंड्यात (पोंग्यात) बसलेला गाळ साध्या पाण्याच्या फवारणीने काढून टाकावा. याच वेळी १९:१९:१९ खताचे २ टक्के द्रावण करून फवारावे. बाधित वाळलेली, पिवळी पाने व फुटवे काढून सरीत टाकून कुजवावे. कुजविण्यासाठी पाचट कुजविणाऱ्या जीवाणूंचा छिडकाव करावा.

३ पीक सुधारण्याची खात्री असल्यास वापसा आल्याबरोबर स्कायविनचे डीप जेल एकरी १० किलोप्रमाणे आळवणी करावी. त्याचबरोबर ग्रीन हार्वेस्ट २ पोती प्रती एकर अधिक ५ किलो रीचार्ज एकत्र मिसळून पिकाच्या बुंध्याजवळ देऊन त्यावर माती टाकावी. त्यानंतर साधारण १० ते १५ दिवसांनी पी. एस. ए. पी. च्या एकरी ५ किलो प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून ३ ते ४ फवारण्या कराव्यात. मर रोग रोखण्यासाठी बाविस्टिन या बुरशी नाशकाने आळवणी करावी.

४ ५ ते ७ महिने कमी वयाच्या नुकसान झालेल्या उसासाठी पुढील कार्यक्रम राबवावा. वाळलेली, पिवळी पाने, उशिरा आलेले फुटवे (शेंडे अळी बाधित) काढून सरीमध्ये आच्छादन करावे. ऊसाची पेरे (कांड्या) व पानावर तसेच आच्छादनावर २ मि.लि./लिटर क्लोरोफायरिफसचे पाणी या प्रमाणात द्रावण करून फवारावे. पाचटावर एकरी १० किलोप्रमाणे पाचट कुजविणारे जीवाणू + (५०० किलो शेणखत उपलब्ध असल्यास) किंवा २ पोती ग्रीन हार्वेस्ट + २ किलो गूळ मिसळून छिडकावे (शिंपडावे). पी. एस. ए. पी. ५ कि./२०० लि. पाणी प्रती एकर या प्रमाणात द्रावण करून फवारावे. २० दिवसाच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात. आवश्यकतेनुसार रासायनिक खतांची मात्रा पॉकेटींग (पहारी) द्वारा द्यावी.

५ नवीन लागवड असलेल्या उसाबाबतची काळजी पुढीलप्रमाणे – रानात वापसा येण्यास अजूनही १५ ते २० दिवस लागू शकतात. त्यानंतर पूर्व मशागत करून ५ फुटांवर सऱ्या पाडून दोन रोपांतील अंतर २ फूट ठेवून रोप पद्धत किंवा तीन दिवस उगवण उपचार केलेली १ डोळा कांडी पद्धत वापरुन लागवड करावी. रोप पद्धतीने लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: रोप वाटिका तयार करावी. या पद्धती मध्ये केवळ एकरी २.५ ते ३ क्विंटल निरोगी बेणेत लागवड करता येते. आता जास्त (३ ते ४ टन प्रती एकर) बेणे वापरणे टाळावे.

First Published on September 3, 2019 1:13 am

Web Title: reality and rescue of flooded sugarcane abn 97
Next Stories
1 केळीच्या घडांना पिशव्यांचे संरक्षण
2 तत्त्वबोध : ‘गण-नायका’ची कृपा
3 वृक्षारोपणाचा फार्स
Just Now!
X