18 November 2017

News Flash

राजकारणातले ‘डेरे’दार

धर्मनेते तर थेटच राजकीय दलाली करताना दिसतात.

संतोष प्रधान, हृषीकेश देशपांडे, सतीश कामत, सुहास सरदेशमुख, वसंत मुंडे, दिगंबर शिंदे | Updated: September 3, 2017 4:03 AM

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी एका धर्मनेत्याची निवड झाली. केंद्रीय मंत्रिमंडळात एक साध्वी होत्या.. राजकारण आणि धर्म यांचे नाते किती घट्टघट्ट होत चालले आहे याची ही प्रातिनिधिक उदाहरणे. पण हे संबंध आजचेच नाहीत. पूर्वीही हे घडत होते. आज मात्र राजकारणाच्या परिघावरच नव्हे, तर राजकारणाच्या केंद्रस्थानी धार्मिक नेत्यांची ऊठबस होताना दिसत आहे. काही धर्मनेते तर थेटच राजकीय दलाली करताना दिसतात. काही आपल्या भक्तसमुदायाच्या जोरावर राजकारणावर प्रभाव टाकताना दिसतात. काही आपल्या प्रभावाचा राजकारण्यांना दुरुपयोग करून देताना आढळतात..

नुकतेच डेरा सच्चा सौदाचा प्रमुख रामरहीम याला बलात्काराच्या गुन्ह्य़ाखाली तुरुंगात जावे लागले. त्या सर्व प्रकरणामुळे राजकीय नेते व धर्मनेते यांच्यातील ‘डेरे’दार काळोखाचे वर्तमान पुन्हा एकदा समाजासमोर आले. या वर्तमानातील काही धार्मिक ‘घटिता’वर ही एक नजर. येथे उल्लेखलेले सगळेच धार्मिक नेते धर्माचा स्वार्थी वापर करणारे आहेत असे नव्हे. पण त्यांच्या प्रभावाचा राजकारणी दुरुपयोग करून घेताना दिसतात आणि ते त्याला मूक संमती देतात. बाकीच्यांच्या बाबतीत वेगळे सांगायलाच नको. त्यांच्या अल्पपरिचयातून त्यांच्या धर्मकारणाची ओळख होईलच.. त्यांच्या ‘डेरे’दार काळोखाचे वर्तमान समजेलच..

चंद्रास्वामी

इंदिरा गांधी यांचे धीरेंद्र ब्रह्मचारी गुरू होते तसेच माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे वादग्रस्त तांत्रिकबाबा चंद्रास्वामी हे गुरू होते. नरसिंह राव यांच्यावर त्याचा प्रभाव होता. चंद्रास्वामी याच्या आग्रहामुळेच आफ्रिकेतील बुरकिना फासो या राष्ट्राला पंतप्रधानपदी असताना नरसिंह राव यांनी भेट दिली होती. नरसिंह राव यांची या राष्ट्राला भेट ठरली तेव्हा परराष्ट्र विभागातील अधिकाऱ्यांना हा देश आहे तरी कुठे याचा शोध घ्यावा लागला होता, असे गमतीने बोलले जाई. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटात चंद्रास्वामी याच्या सहभागाविषयी चौकशी झाली होती. हत्येसाठी पैसे पुरविल्याचा त्याच्यावर आरोप होता. ब्रुनोईचे सुलतान, आंतरराष्ट्रीय शस्त्र दलाल अदानन खगोशी, बहारीनचे शेख, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर, प्रसिद्ध अभिनेत्री एलिझाबेथ टेलर, कुख्यात दाऊद अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील चंद्रास्वामी याचा सल्ला घेत किंवा त्याच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते. विदेशी चलन कायद्यांतर्गत या वादग्रस्त बाबाला अटकही झाली होती. त्याच्या एका आश्रमावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली असता लाखो रुपयांचे डॉलरमधील चलन हस्तगत केले होते. ही रक्कम शस्त्रास्त्र दलाल खगोशीशी व्यवहाराशी संबंधित होती. मे महिन्यात चंद्रास्वामी या वादग्रस्त तांत्रिकाचा मृत्यू झाला.

श्री श्री रविशंकर

आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनचे संस्थापक श्री श्री रविशंकर हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यक्तिमत्त्व आहे. जगातील अनेक राष्ट्रांमघील संघर्ष थांबविणे किंवा शांतता घडवून आणण्यात त्यांचा सहभाग असतो, असा श्री श्री रविशंकर यांचा दावा आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेली मलाला हिला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला, पण आपल्या नावाचा विचार होत नाही याची श्री श्री रविशंकर यांना खंत आहे. ती खंत त्यांनी जाहीरपणे बोलून दाखविली आणि भविष्यात नोबेल पुरस्कार स्वीकारणार नाही, असे जाहीरही करून टाकले. रविशंकर अलीकडेच वादग्रस्त ठरले ते त्यांनी नवी दिल्लीतील यमुनेच्या पात्रात आयोजित केलेल्या मेळाव्यामुळे. नदी पात्रात बांधकाम केल्याबद्दल हरित लवादाने रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगला फटकारले. रविशंकर यांच्या हट्टापायी नदीपात्राचे ४२ कोटींचे नुकसान झाल्याचा ठपका लवादाने ठेवला. रविशंकर यांची मुजोरी एवढी की त्यांनी सारा दोष सरकारवरच ठेवला. पर्यावरणाचे नुकसान होणार होते तर सरकारने आमच्या कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी, असा अजब सवाल श्री श्री रविशंकर यांनी केला होता. भाजप सरकारच्या काळात बाबाबुवांचे अवडंबर माजल्याने रविशंकर काय किंवा रामदेव यांचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही.

भय्यू महाराज

महाराष्ट्राच्या राजकारण्यांवर ज्या काही बाबाबुवांचा प्रभाव आहे त्यात भय्यू महाराज यांचा समावेश होतो. त्यांचे मूळ नाव उदयसिंह देशमुख. माजी मंत्री रणजित देशमुख व अनिल देशमुख यांचे ते चुलते. इंदूरमध्ये त्यांचा सूर्योदय आश्रम आहे. ते स्वत:ला राष्ट्रसंत अशी बिरुदावली लावतात. विलासराव देशमुख, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांवर या महाराजांचा प्रभाव आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी मिळवून देण्यात म्हणे भय्यू महाराज महत्त्वाची कामगिरी बजावितात, असे राजकीय वर्तुळात ऐकू येते. बदल्यांसाठी अधिकाऱ्यांचा या महाराजांकडे राबता असतो. कोपर्डी दुर्घटनेनंतर निघालेल्या मराठा समाजाच्या मोच्र्यामध्ये भय्यू महाराजांची भूमिका महत्त्वाची होती, असेही बोलले जाते.

याच काळात शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रामुळे मराठा समाज शिवसेनेवर संतापला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी समाजाची दिलगिरी व्यक्त करावी म्हणून भय्यू महाराजांनीच मध्यस्थी केली होती. मध्यंतरी त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यांच्या संस्थेच्या वतीने विदर्भात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी काम केले जाते.

इमाम बुखारी

‘ईदचा चंद्र दिसला’ या घोषणेकडे देशातील सुमारे १७ कोटी मुस्लीम बांधव लक्ष ठेवून असतात. ही घोषणा करतात शाही इमाम बुखारी. दिल्लीतील जामा मशिदीचे इमाम. जामा मशिदीचे इमाम हे घराणेशाहीच्या माध्यमातून नियुक्त केले जातात. देशात अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणावर काँग्रेसने नेहमी भर दिला. तेव्हा इमाम बुखारी यांचा फतवा निवडणुकीत निर्णायक ठरे. आणीबाणीच्या काळात दिल्लीतील जुन्या वस्तीतील अतिक्रमणे हटविणे आणि पुरुषांची नसबंदी यामुळे अल्पसंख्याक समाज काँग्रेसवर चिडला होता. तत्कालीन शाही इमाम सय्यद अब्दुल बुखारी यांनी इंदिरा गांधी यांना धडा शिकविण्याचा इशारा दिला होता. सध्याचे शाही सय्यद अहमद बुखारी यांनी २०१४च्या निवडणुकीच्या काळात भाजपच्या विरोधी भूमिका घेतली होती. देशातील मुस्लिमांचे धार्मिक प्रमुख या नात्याने राजकीय पक्षांनी मतपेढीसाठी शाही इमाम बुखारी यांचे अनेक चोचले पुरविले.

धीरेंद्र ब्रह्मचारी

देशातील राजकीय दलालांच्या बाबा मंडळींमध्ये धीरेंद्र ब्रह्मचारी हे बडे प्रस्थ होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना योगाचे धडे देणारे ब्रह्मचारी घटनाबाह्य़ केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. आणीबाणीच्या काळात या ब्रह्मचारींच्या इशाऱ्यावर सारी यंत्रणा हालत होती. कोणाचा मंत्रिमंडळात प्रवेश करायचा वा कोणाला वगळायचे याची सारी सूत्रे ब्रह्मचारी हलवीत असत. त्यांच्या आश्रमाला वाढीव जागा देण्यास तत्कालीन नगरविकासमंत्री (पुढे पंतप्रधान) इंदरकुमार गुजराल यांनी नकार दिला होता. ‘एक तर जागा द्या किंवा तुमचे खाते जाईल’, असे ब्रह्मचारी यांनी गुजराल यांना बजावले. काही दिवसांतच गुजराल यांच्याकडील खाते काढून घेण्यात आले. असाच अनुभव एका तत्कालीन शिक्षणमंत्र्याला आला होता. आणीबाणीच्या काळात संजय गांधी आणि ब्रह्मचारी यांनी दिल्लीत धुडगूस घातल्याचा आरोप झाला होता. आणीबाणीनंतर सत्तेत आलेल्या जनता पक्षाच्या सरकारने नेमलेल्या शहा आयोगाने धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या प्रतापाबद्दल ताशेरे ओढले होते. इंदिरा गांधी या पंतप्रधानपदी असताना धीरेंद्र ब्रह्मचारी यांना भेटण्यासाठी राजकारणी, उद्योगपती, नोकरशहा यांची रांग लागलेली असे. १९७५ मध्ये खासगी विमान या बाबांकडे होते. अशा या भानगडबाज धीरेंद्र ब्रह्मचारी यांचा उल्लेख ‘भारतीय रासपुतिन’ (रशियात झारच्या काळात बेबंदशाही करणारा गुरू) असा केला जात असे.

आसाराम

आसुमल सिरुमलानी ऊर्फ आसारामबापू सध्या १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून तुरुंगात आहे. २३ व्या वर्षी परमेश्वराच्या शोधात घर सोडल्याचा त्याचा दावा आहे. १९७० मध्ये गुजरातला त्याच्या अनुयायांनी आश्रम स्थापन केला.  २००८ मध्ये मोटेरा आश्रमात दोन मुलांचा बळी गेल्याने जनक्षोभ पसरला. काळी जादू करून बळी दिल्याचा आरोप त्या वेळी झाला. मात्र तपासात याबाबतचे पुरावे आढळले नाहीत. १९४१ मध्ये सिंध प्रांतात जन्मलेल्या आसारामचे कुटुंब फाळणीनंतर अहमदाबादला आले. नैनितालमधील कोण्या आध्यात्मिक गुरूने त्याला आसाराम हे नाव दिल्याचे सांगितले जाते. सुरुवातीपासून सर्वपक्षीय राजकारण्यांची आसारामवर कृपादृष्टी राहिली. त्यामुळेच सरकार मग ते काँग्रेसचे असो वा भाजपचे, आसारामच्या पाठिंब्यासाठी मग आश्रमासाठी जागा सहज मिळाल्या.  २०१२ मध्ये दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर आसारामच्या वक्तव्यावरून वाद होता. घटनेतील आरोपीप्रमाणे पीडितही दोषी आहे, असे आसारामने म्हटल्याने टीका झाली. तिने आरोपींना भाऊ म्हणून याचना करायला हवी होती. मात्र वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आसारामचा दावा होता. ऑगस्ट २०१३ मध्ये जोधपूरच्या आश्रमात १६ वर्षीय मुलीने आसारामवर बलात्काराचा आरोप केला. सुरुवातीला सत्ताधारी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वावर अडकविण्याचे षड्यंत्र असल्याचे आरोप त्याने केले. मग अटक टाळण्यासाठी त्याने आपण लैंगिकदृष्टय़ा असे प्रकार करू शकत नाही, असे सांगितले. मग आसारामची लैंगिक चाचणी घेण्यात आली. १ सप्टेंबर २०१३ रोजी त्याला अटक झाली. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये त्याचा मुलगा नारायण साई यालाही बलात्काराच्या आरोपाखाली बेडय़ा ठोकण्यात आल्या. सुरत येथील दोन बहिणींनी त्यात आसारामवरही आरोप केले. तसेच त्यात पत्नी व मुलीने मदत केल्याचे सांगितले. पीडित मुलीच्या साक्षीदारांना धमक्या, आसारामच्या काही जुन्या मदतनीसांचा गूढ मृत्यू अशा घटनांनी त्याची प्रतिमा आणखी काळवंडली.

बाबा रामपाल

स्वयंघोषित गुरू रामपाल वादग्रस्त ठरला आहे. हरयाणातील धार्मिक व सामाजिक चळवळीत सतलोक आश्रमाचा संस्थापक. मूर्तिपूजा, देवळात जाणे, मद्यपान तसेच अस्पृश्यतेला विरोध असे त्याच्या पंथाचे तत्त्वज्ञान असल्याचे सांगितले जाते. कबीरांचा धार्मिक वारसा पुढे नेत असल्याचा रामपालचा दावा आहे. २००६ मध्ये आर्य समाजावर टीका केल्याने तो वादात अडकला. दोन्ही बाजूंच्या अनुयायांमध्ये हिंसक चकमक झाली. त्यात आर्य समाजाचे अनुयायी मारले गेले. त्याचा ठपका रामपाल याच्यावर ठेवण्यात येऊन अटक झाली. त्याला २००८ मध्ये जामीन मिळाला. मात्र न्यायालयात हजर राहण्यात वारंवार अपयश आल्याने पुन्हा नोव्हेंबर २०१४ मध्ये अटक झाली. त्या वेळी अटकेवरून अनुयायी व प्रशासन यांच्यात पाठशिवणीचा खेळ सुरू होता. त्यावरून दोन आठवडे तणाव होता. आश्रमाबाहेर अटक टाळण्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी जमले होते. पोलीस कारवाईत सहा जणांचा बळी गेला होता. अखेर १९ तारखेला अनुयायांसह रामपालला अटक झाली. त्याच्यावर देशद्रोह, खून, कट, बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. हरयाणात भाजपचे खट्टर सरकार सत्तेत आल्यानंतर हिंसाचाराची ती पहिली मोठी घटना होती. अभियांत्रिकीची पदविका घेतलेल्या रामपालने १९९५ पर्यंत नोकरी केली. पत्नी व दोन मुले असा परिवारही त्याचा आहे. स्वामी रामदेवानंद यांच्या भेटीनंतर १९९४ पासून त्याने प्रवचने सुरू केली. भजनांद्वारे हरयाणाच्या खेडय़ात लोकप्रियता मिळवल्यावर १९९९ मध्ये रोहटक जिल्ह्य़ात सतलोक आश्रमाची स्थापना केली. टीकाकार हे खोटारडे समजा, अशी त्याची अनुयायांना शिकवण आहे. नुकतीच हिस्सार न्यायालयाने रामपालची दोन खटल्यांतून मुक्तता केली. मात्र खून व देशद्रोहाच्या इतर आरोपांमुळे त्याला न्यायालयीन कोठडीतच राहावे लागणार आहे.

बाबा रामदेव

५१ वर्षीय रामकृष्ण यादव आता बाबा रामदेव म्हणून ख्यातकीर्त आहेत. पतंजलीचे मोठे साम्राज्य उभे करणारे रामदेव बाबा विविध विधानांनी प्रकाशझोतात असतात. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात काळ्या पैशाविरोधात आंदोलन करताना स्त्री वेशात उडी मारून जाण्याच्या घटनेने  रामदेव अधिक चर्चेत आले. केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना बाबांच्या शिफारशीवरून लोकसभेला उमेदवारी मिळते, त्यावरून सत्तारूढ पक्षातील उच्चपदस्थांमध्ये त्यांचे उत्तम संबंध असल्याचे उघड झाले. गायक सुप्रियो यांची विमानात योगायोगाने रामदेव यांच्याशी गाठ पडते अन् शेजारी बसलेल्या रामदेव यांचे दूरध्वनी संभाषण ते ऐकतात. त्यावरून यांची राजकारणात वजनदार व्यक्तींमध्ये ऊठबस आहे हे सुप्रियो यांना समजते. मग थेट पश्चिम बंगालमधून भाजपच्या उमेदवारीसाठी ते गळ घालतात.  विद्यमान सत्ताधाऱ्यांशी असलेल्या संबंधांचा फायदा बाबांनी उठवल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधक करतात.

पतंजली आयुर्वेद, पतंजली योगपीठ व भारत स्वाभिमान ट्रस्टचे संस्थापक असलेले रामदेव स्वत: मात्र कंपनीच्या नफ्यातून एक दमडीही घेत नसल्याचे सांगतात. हरयाणाच्या जिंद जिल्ह्य़ातील गुरुकुलमध्ये अध्ययन करताना स्वामी शंकर देव यांच्याकडून रामदेव यांनी संन्यासाची दीक्षा घेतली.१९९५ मध्ये दिव्य मंदिर ट्रस्ट स्थापन केल्यावर रामदेव यांची वाटचाल सुरू झाली. पुढे साधारण २००३ मध्ये चित्रवाणी वाहिनीवर सकाळी त्यांचे योग सुरू झाले. त्यातूनच रामदेव यांचे पाठीराखे निर्माण झाले. चित्रवाणीवरील शोमध्ये परीक्षक, वलयांकित व्यक्तींचे योगगुरू यामुळे रामदेव ख्यातकीर्त झाले.

उत्तराखंड व हरयाणात रामदेव यांचे अनुयायी मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यामुळेच काय की, हरयाणा सरकारने योग व आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देऊ केला होता. उत्तराखंड सरकारनेही रामदेव यांच्यासमवेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे दोन्ही राज्यांमध्ये भाजपच सत्तारूढ आहे. त्यामुळे एक प्रकारे दोघेही एकमेकांचा फायदा बघत आहेत. भाजपच्या सरकारांमध्ये रामदेव यांची चलती आहे हेच खरे.

संकलन : संतोष प्रधान, हृषीकेश देशपांडे, सतीश कामत, सुहास सरदेशमुख, वसंत मुंडे, दिगंबर शिंदे

First Published on September 3, 2017 4:03 am

Web Title: religion and politics in india