News Flash

ध्वज प्रगतीचा उंच धरा रे

यांत्रिकीकरणामुळे समाजात एक उत्तम असा बदल घडत गेलेला आपण सहज पाहू शकतो.

मेघना जोशी

रांधा वाढा उष्टी काढाचे कपाळावर गोंदण राबण्याचा गांव लग्नात मिळाला आंदण…

‘खांब’ या शांता शेळकेंच्या कवितेच्या ओळी विनिताने सांगितल्या, जेव्हा आम्ही गप्पा मारत होतो प्रजासत्ताकापूर्वीच्या भारताबाबत. आज हे अगदी असं नाही असं सांगणारी विशीतली विनिता पाहून आणि तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहून मलाच हायसं वाटलं. मी म्हटलं, मग आज कसं आहे ग? त्यावर ती सहजच म्हणाली, ‘एकटी मी असेन जरी, तरी नाही मी बिचारी, अन्यायाशी लढणारी स्वयंस
?िद्धा मी खरी’ गेल्या काही दशकांमध्ये स्त्री जीवन, स्त्रियांचे शिक्षण, स्त्रीबाबतची समाजधारणा यामध्ये अगदी शंभर टक्के सकारात्मक बदल घडला नाही हे मान्य केलं तरी सकारात्मक बदलाच्या दिशेने पावलं पडायला लागली आहेत ते नक्कीच.

काही म्हणा, तिच्या या विचाराने मला एका वेगळ्याच विचारात पाडलं. काळ किती बदलला. अगदी माझ्या बालपणापासून ते आजपर्यंत काळ किती बदलला. तर मग पारतंत्र्यातला भारत, स्वातंत्र्योत्तर भारत आणि प्रजासत्ताक भारत असे जर भारताच्या जडणघडणीतले टप्पे म्हटले तर त्यातील प्रजासत्ताक भारतातच मी जगलेय. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारताबद्दल जे काही ऐकलंय, वाचलंय ते एकतर घरातील ज्येष्ठ मंडळींकडून किंवा पुस्तक, चित्रपट, मालिका अशा माध्यमातून. प्रजासत्ताक भारताची आजवरची घोडदौड मात्र वाखाणण्यासारखी आहे यावर आपलं सगळ्यांचं एकमत असायला हरकत नसावी. हो, हो घोडदौड हा शब्द मी विचारपूर्वक वापरलाय. कारण एकाच दिवशी जन्मलेल्या दोन जुळ्या भावंडांचं नशीब सारखं नसतंच हे आपण पाहतोच तसंच अगदी एका दिवशी जन्म घेतलेल्या म्हणजे स्थापन झालेल्या दोन देशांचा पुढचा प्रवासही किती वेगवेगळा असतो हे आपण याचि देही याचि डोळा बघतोय आणि अनुभतोय. त्यामुळे गर्वाने जगासमोर पापणी न लववता सांगू शकतो, ‘मी भारतीय आहे.’

हे सांगताना काय आणि किती गोष्टी आठवतात, किती वेगवेगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात ज्यामुळे आपल्या देशाभिमानात वाढच होते. अगदी परवाच दोन वेगवेगळ्या कोविड प्रतिबंधक लशी तयार करून जगातील साधारणत: दीडशे देशांना ती पुरवणाऱ्या प्रजासत्ताकाचा आपण भाग आहोत हे ऐकून आपली मान नक्कीच गर्वाने ताठ झालीच ना. का कोण जाणे, ती बातमी वाचून मला माझ्या दहावीतल्या पाठय़पुस्तकातला पाठ आठवला, ‘आणि बुद्ध हसला’. पोखरणमधला अणुस्फोट, त्या वेळचं वर्णन करणारा तो पाठ. विज्ञान तंत्रज्ञानात देशाची होणारी प्रगती ही काही एका दिवसातली गोष्ट नसते. अनेक शास्त्रज्ञ, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांच्या दूरदृष्टीने घेतलेल्या अनेक निर्णयांचा तो परिपोष असतो. अनेकदा आप्तजनांच्या किंवा शत्रूच्या प्रबळ विरोधाला टक्कर देत असे निर्णय घेतले जातात आणि जेव्हा त्याची चविष्ट फळं मिळतात तेव्हा ते सगळे कडवट प्रसंग भूतकाळ बनतात. हरितक्रांती, धवलक्रांती याबद्दल जे काही ऐकलं वाचलं पाहिलं. मिलोवर जगलेला भारतीय असो वा अनेकदा पिठात पाणी मिसळून दूध म्हणून पिणारे अश्वत्थामा असोत. या क्रांतीमुळे आज तो इतिहास झालाय आणि अगदी टाळेबंदी झाली तरीही अन्नधान्य मिळणारच, ज्यांना ते विकत घेण्याची ऐपत नाही त्यांना काही महिने मोफत मिळेल, मिळू लागेल हा सारा प्रवास या प्रजासत्ताकात झाला, हे सोन्याहून पिवळे नाही का?

औद्योगिकीकरण म्हणजे काय तर यंत्रांच्या साहाय्याने केलेलं उत्पादन. पारतंत्र्याच्या काळात आपले राज्यकर्ते गोरे लोक आपल्या देशातून कच्चा माल न्यायचे आणि त्यापासून यंत्राच्या साहाय्याने पक्का माल तयार करायचे आणि आपल्यालाच विकायचे, शाळेत असताना हे अनेकदा शिकलो होतो पण पुढे आपल्याकडेच औद्योगिकीकरणात वाढ झालेली दिसत गेली आणि आज औद्योगिक क्रांती केलेल्या देशांमध्ये आपल्या देशाचं नाव जग अभिमानाने घेते आहे. आपण सारेच अनेक कामांसाठी यंत्रे वापरतो, काही वेळा लक्षातही येत नाही एवढय़ा सहजतेने.  देशासाठीची संरक्षक शस्त्रे स्वबळावर तयार करण्यापर्यंतची मजल आपण मारली आहे.

यांत्रिकीकरणामुळे समाजात एक उत्तम असा बदल घडत गेलेला आपण सहज पाहू शकतो. जातीची उतरंड जरी नाहीशी झाली नसेल तरी पराकोटीचा जातिभेद समाजातून हळूहळू नाहीसा होताना दिसतो आहे. जातीजातीमधील रोटी व्यवहार सहज झाला आहेच, पण बेटी व्यवहारही यांत्रिकदृष्टय़ा पुढारलेल्या समाजात सहज दिसू लागला आहे. समाजाची मनोवृत्ती बदलत चालली आहे तो व्यक्तिकेंद्रित होत आहे असं सहज दोषारोप करण्याच्या दृष्टीने म्हटलं जातं आणि ते मान्यही आहे, पण बरोबरच व्यक्तीचा आत्मविश्वास वाढत चाललेला दिसतो. डिजिटलायझेशनमुळे असा एक डिजिटल समाज तयार होत आहे त्यात समान मत असलेल्या, समान तत्त्व असलेल्या व्यक्ती आभासी पद्धतीने एकत्र येत अनेक समाजसुधारणेच्या किंवा संस्कृती आणि प्रगती यांना सांधणाऱ्या गोष्टी करू शकत आहेत. या सगळ्या प्रगतीचं कारण मला तरी वाटतं की, आपलं प्रजासत्ताक हे लोकशाहीमधील अधिकार आणि कर्तव्य यांच्या समतोलाची जाणीव आपल्याला नेहमी करून देत असतं. त्यामुळे भारतीय नागरिकांनी आकाशाची उंची गाठली तरी त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असतात.

फक्त एक छोटासा बदल आपल्या मनोवृत्तीत जेव्हा होईल तेव्हा हे प्रजासत्ताक अजून चमकून उठेल तो बदल म्हणजे, ब्रँडेड म्हणजे परदेशी असं मानणारी समाजाची मनोवृत्ती. ती जेव्हा बदलेल तेव्हा आपला भारत हा एक ब्रँड होईल आणि कोविड लशींच्या शोधातून त्याची सुरुवात झाली आहे असं समजायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 12:17 am

Web Title: republic day 2021 article 1 zws 70
टॅग : Republic Day
Next Stories
1 चिरायू प्रजासत्ताक
2 आठवडय़ाची मुलाखत : वातावरण बदलाचे वैज्ञानिक कारण..
3 राज्यावलोकन : अस्थिर आसन…
Just Now!
X