रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या बैठय़ा कार्यालयात अलीकडे माणसांची फारशी वर्दळ राहिली नाही. एके काळी, रस्त्यावरच्या आंदोलनांची आखणी या कार्यालयाच्या चार भिंतींआड झालेली असल्याने, सळसळत्या तरुणाईच्या सहवासाची सवय झालेलं हे कार्यालय कदाचित त्यामुळेच कधी कधी एकाकी, उदास वाटत राहतं.. मागे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काही इच्छुकांच्या मुलाखती या कार्यालयात झाल्या होत्या. पण नंतर फारसं काही कामकाज झाल्याचं इथल्या भिंतींना आणि केबिन्सना आठवत नाही..
मुंबईच्या ऐतिहासिक ‘आझाद मदाना’ला लगटून असलेल्या फूटपाथवर पथाऱ्या पसरलेली कुटुंबं दिसतात. यांचं सगळं जगच त्या फूटपाथवर सामावलेलं असतं. बरीचशी कुटुंबं कायमची फूटपाथवासी असली, तरी काही कुटुंबांना या परिसरापलीकडची मुंबई माहीतच नसते. त्यांना पलीकडच्या मुंबईशी काहीही देणंघेणं नसतं. पाठीमागे असलेल्या आझाद मदानावर त्यांच्या जीवनमरणाचा, जगण्याचा प्रश्न लोंबकळत असतो. कुठल्या ना कुठल्या अन्यायानं पिचलेली, गावाकडे न्याय मिळण्याची शक्यतादेखील दुरावलेली अशी ही कुटुंबं, आपलं गाऱ्हाणं सरकारच्या कानी पडावं, म्हणून आपली तुटपुंजी पुंजी गाठोडय़ात बांधतात आणि मुंबई गाठतात. त्यांच्यातला कुणी तरी एकाकी आंदोलन सुरू करतो आणि कुटुंबातली बाकीची माणसं या फूटपाथवर पथारी पसरतात..
संध्याकाळच्या वेळी महापालिकेच्या मुख्यालयावर आणि समोरच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या देखण्या इमारतीवर रोषणाईची झळाळी चढते आणि इकडे फूटपाथवरची ही माणसं वाहणारी मुंबई न्याहाळू लागतात.. बाजूला असलेली एक पाणपोयी, स्वच्छतागृह हा त्यांचा आधार. कधी कधी, एखाद्या कुटुंबासाठी मागच्या बाजूला असलेल्या एका राजकीय पक्षाच्या कार्यालयाचाही गरजेपुरता आसरा मिळतो.
हे कार्यालय म्हणजे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं राष्ट्रीय कार्यालय. पक्षाचा झेंडा घेऊन कधी काँग्रेससोबत, कधी राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिलेले आणि सध्या भाजपच्या तंबूत जाऊन रालोआच्या कोटय़ातून राज्यसभेची उमेदवारी मिळविलेले रामदास आठवले हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष. हा पक्ष राष्ट्रीय म्हणवत असला, तरी निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं त्याचं स्थान प्रादेशिक पक्षाइतकंही नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पुढे नेत्यांच्या हेव्यादाव्यातून अनेक शकले झाली. त्यापकी एक गट म्हणजे रामदास आठवलेंचा हा पक्ष.. म्हणूनच, कार्यालयाबाहेरील फलकावर संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांची नावे झळकत असतात..
महापालिका मुख्यालय आणि आझाद मदान यांच्या मधोमध असलेल्या महापालिका मार्गावरून पन्नासेक पावलं पुढे चाललं, की ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर चौक’ असा फलक दिसतो. बाजूच्या डावीकडील गेटातून आत गेलं की काही इमारती दिसतात. ‘इन्सा हटमेंट’ हा या परिसराचा ‘सरकारी पत्ता’.. समोर मुंबई मराठी पत्रकार संघाची इमारत दिसते. त्याला लागूनच प्रेस क्लब.. त्यामुळे मुंबईतील तमाम पत्रकार जमातीची इथे सातत्याने ये-जा सुरू असते. याच आवारात, समोर एक चकचकीत इमारत दिसते. ते मुंबई काँग्रेसचं कार्यालय. राजीव गांधी भवन. तेथून डावीकडे वळून थोडं आत गेलं, की काहीशी एकाकी वाटणारी जुनाट बठी इमारत दिसते. या इमारतीत रामदास आठवलेंच्या या राष्ट्रीय पक्षाचं कार्यालय.. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या प्रत्येक दिवशी हमखास बंद राहणारं.. पण इतर दिवशी उघडं असतं, तेव्हा फूटपाथवरच्या आंदोलकांपकी कुणी तरी इथे येतो. इथलं स्वच्छतागृह वापरतो. घटकाभर खुर्चीत विसावतो. चारदोन वर्तमानपत्रं चाळत थोडासा वेळ काढतो आणि पुन्हा आपल्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन बसतो..
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या बठय़ा कार्यालयात अलीकडे माणसांची फारशी वर्दळ राहिली नाही. एके काळी, रस्त्यावरच्या आंदोलनांची आखणी या कार्यालयाच्या चार िभतींआड झालेली असल्याने, सळसळत्या तरुणाईच्या सहवासाची सवय झालेलं हे कार्यालय कदाचित त्यामुळेच कधी कधी एकाकी, उदास वाटत राहतं. समोरच्या पेवर ब्लॉक्सच्या रस्त्यावर कचरा इतस्तत: पडलेला असतो. काही तरी खाऊन फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, कागदाचे चुरगाळलेले बोळे आणि रात्रीच्या वेळी कुणी तरी पेटवलेल्या शेकोटीची राख असं काही तरी आसपास पसरलेलं असतं.. बंद खिडक्यांच्या काळ्या काचांमधून आत डोकावलं, की लाल रंगाच्या प्लास्टिकच्या खुच्र्या दिसतात. कधी एकदा दरवाजे उघडतात आणि कुणी तरी येऊन बसतं, अशी वाट पाहात ताटकळल्यासारख्या..
तरीही, कार्यालयाला आता काहीसे बरे दिवस आलेत, असं इथे काम करणारे सांगतात. तीन वर्षांपूर्वी, म्हणजे, २५ फेब्रुवारी २०११ या दिवशी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि ‘शिवशक्ती-भीमशक्ती’चा नारा राजकारणात घुमला. त्या दिवसानंतर या कार्यालयाच्या झळाळीचे दिवस सुरू झाले. तोवर, एक फॅक्स यंत्र सोडलं, तर या कार्यालयात कसलीही यंत्रणा नव्हती. ठाकरे-आठवले भेटीनंतर रामदास आठवलेंच्या परिवर्तनाची वाटचाल सुरू झाली. त्यासोबत कार्यालयानेही कात टाकण्यास सुरुवात केली. १०००-१२०० चौरस फुटांच्या कार्यालयातील एका केबिनमध्ये संगणक आला. िपट्रर आला आणि स्कॅनरही बसला. साहजिकच, दैनंदिन पत्रव्यवहार आणि कॉम्प्युटरवर काही ना काही काम करण्यासाठी एका कॉम्प्युटर ऑपरेटरचीही नेमणूक झाली. झाडलोट करण्यासाठी हाऊसकीपर नेमले गेले आणि कार्यालयाच्या िभती जिवंत झाल्या.. कधीमधी राज्याच्या कुठल्या कुठल्या गावाकडून कामं घेऊन मुंबईला येणारे कार्यकत्रेही छत्रपती शिवाजी टर्मिनसला उतरल्यानंतर थोडा वेळ काढून कार्यालयात रेंगाळू लागले..
..पण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष इथे भेटतीलच अशी खात्री नसते. अलीकडे साहेब वांद्रय़ालाच बसतात. बंगल्यातच त्यांचं ऑफिसही थाटलंय. तिथंच ते लोकांना भेटतात. त्यामुळे अगदी क्वचितच साहेब इथे येतात.. असं एखादा कर्मचारी सांगून टाकतो. मग परतीच्या प्रवासाची वेळ होईपर्यंत, कुठे तरी वेळ काढायचाच असल्याने, कार्यालय उघडं असेपर्यंत इथे रेंगाळतात आणि संध्याकाळी शटर बंद करायची वेळ झाली, की सामान घेऊन बाहेर पडतात. पुन्हा कार्यालय एकटं एकटं होतं..
पूर्वी साहेब कांदिवलीला राहायचे, तेव्हा या कार्यालयात न चुकता यायचे. साहेब म्हणजे, रामदास आठवले. पण वांद्रय़ाला बंगला झाल्यानंतर तेथूनच ते पक्षाचं कामकाज चालवतात. पक्षाच्या महत्त्वाच्या बठकादेखील क्वचितच कार्यालयात होतात. त्यामुळे, आठवलेंच्या गटाचे नेतेदेखील अधूनमधूनच कार्यालयाकडे फिरकतात. गेल्या काही वर्षांत तशा फारशा बठका झाल्या नाहीतच. पण ज्या झाल्या, त्यापकी कमिटीच्या बठका कधी तरी इथे झाल्या. प्रदेशाध्यक्ष निवडीची बठक लोणावळ्यालाच झाली, स्टेट कमिटीची बठकही तिकडेच झाली. मागे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काही इच्छुकांच्या मुलाखती या कार्यालयात झाल्या होत्या. पण नंतर फारसं काही कामकाज झाल्याचं इथल्या भिंतींना आणि केबिन्सना आठवत नाही.. इथे केबिन जेमतेम तीनच. एक केबिन राष्ट्रीय अध्यक्षांची, म्हणजे आठवलेंची. ती तर फारशी उघडली जात नाही. दुसऱ्या केबिनमध्ये पक्षाचा मीडिया सेल आणि तिसरी प्रदेशाध्यक्षांची. ती अधूनमधून उघडी असते..
सुमारे ५६ वर्षांपूर्वी, ३ ऑक्टोबर १९५७ रोजी, सामुदायिक नेतृत्वाची संकल्पना स्वीकारून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष अस्तित्वात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पक्षाचे संस्थापक असले, तरी बाबासाहेबांच्या हयातीत मात्र पक्षाचा जन्म झाला नव्हता. याचे कारणदेखील नेतृत्वाचा वाद हेच होते. तेव्हापासून पुढे याच वादातून पक्षाची शकले होत गेली आणि बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टीच्या नावापुढे अनेक ‘कंस’ निर्माण होऊ लागले. हे कार्यालय म्हणजे, ‘आरपीआय (ए)’ अशी नोंदणी असलेल्या राजकीय पक्षाचे कार्यालय. कंसातील हा ‘ए’ म्हणजे, आठवले.. म्हणजे, आरपीआयच्या आठवले गटाचे हे कार्यालय..
पक्षाच्या या फाटाफुटीमुळे आंबेडकरी जनतेमध्ये खरे तर अस्वस्थता आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या अस्वस्थतेचा उद्रेकही व्हायचा. त्यातूनच, ऐक्याचे प्रयत्न वेगवान व्हायचे. १९९७ मध्ये झालेल्या ऐक्याच्या बठका आणि त्या वेळी अनुयायांमध्ये खदखदणारी नाराजी, तणाव, सारे सारे या कार्यालयाने अनुभवले आहे.
..आता मात्र, हे कार्यालय त्या आठवणींमध्ये बुडून इतिहासाच्या आठवणीत रेंगाळल्यासारखे वाटू लागते..एकटे एकटे!