News Flash

चाँदनी चौकातून : निर्बंधांचं स्वागत

राजधानीत लागू केलेल्या आठवडाभराच्या टाळेबंदीची मुदत सोमवारी पहाटे संपेल.

दिल्लीवाला

पुण्या-मुंबईत टाळेबंदीला विरोध झाला, दिल्लीत मात्र व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहकार्य करायचं ठरवलेलं दिसतंय. राजधानीत लागू केलेल्या आठवडाभराच्या टाळेबंदीची मुदत सोमवारी पहाटे संपेल. तसा आधी केजरीवाल यांचाही टाळेबंदीला विरोध होता; पण परिस्थिती इतक्या झपाट्याने हाताबाहेर गेली, की लोकांना सक्तीनं घरी बसवण्याशिवाय दिल्ली सरकारसमोर पर्याय उरला नाही. पुन्हा होणारी ही टाळेबंदी व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम करणारी असली, तरीही व्यापाऱ्यांनी टाळेबंदीची मुदत वाढवण्याची विनंती केजरीवालांकडे केली आहे. दिल्लीतल्या करोनाच्या आपत्कालीन परिस्थितीकडे बघता, आता राज्य सरकार टाळेबंदी वाढवेल अशी शक्यता दिसते. एरवी सणासुदीला बाजारात गर्दी करणाऱ्या दिल्लीकरांनी या वेळी मात्र टाळेबंदीला स्वत:हून प्रतिसाद दिलेला आहे. टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा पुरवल्या जाणार असल्यामुळे आणि पहिल्या दोन-तीन दिवसांमध्ये पोलिसांनी रस्त्यांवर नियंत्रण ठेवलं असल्यानं तुलनेत कमी लोक रस्त्यावर दिसतात. सार्वजनिक बसेसमध्येही आसनं रिकामी दिसत आहेत. जागोजागी नाकाबंदी आहे, ‘रैनबसेरा’मध्ये बसून पोलीस देखरेख ठेवत आहेत. रस्त्यांवर फारशी वाहतूक नसल्यानं पोलीस लोकांना ई-पासची विचारणा करत नाहीत. अगदी पोरंटोरं कारमधून जात असतील तरच पोलीस त्यांना अडवताना दिसतात. दिल्लीच्या रुग्णालयांमधली गंभीर परिस्थिती पाहून दिल्लीकर शहाणे होत आहेत. रस्ते निर्मनुष्य नसले तरी, दुकानं, टपऱ्या, खाण्या-पिण्याचे स्टॉल बंद असल्यानं लोकांचे घोळके कमी झालेले आहेत. कस्तुरबा गांधी मार्गावर असलेलं नवं महाराष्ट्र सदनही पूर्ण बंद करण्यात आलेलं आहे. तिथं असलेल्या पाहुण्यांची पलीकडच्या कोपर्निकस मार्गावरील जुन्या महाराष्ट्र सदनात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पाहुण्यांसाठी इथली खानावळ मात्र सुरू ठेवण्यात आली आहे. सामान्यजनांना जुन्या सदनातही प्रवेशबंदी केली आहे. दिल्लीतील करोना रुग्णांची वाढती संख्या पाहून निर्बंधही कायम राहू शकतील.

नक्कल…

सर्वोच्च नेता जे बोलतो, जसा बोलतो, जसे हातवारे करतो, एखाद्याची खिल्ली उडवतो, अपमान करतो, अचानक डोळ्यांतून भरभरून अश्रू ढाळतो, हे सगळं खुशमस्करी नेतेही करू लागतात. मग ठिकठिकाणचे ‘जोकर’ही त्यांचं अनुकरण करू धजावतात. पश्चिम बंगालमध्ये नदिया नावाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात कृष्णनगर नावाचं शहर आहे. तिथं देशाचे गृहमंत्री अमित शहा हे ‘रोड शो’ करायला येणार होते. ‘सदर रुग्णालय’ नावाच्या चौकातून भाजपचं शक्तिप्रदर्शन होणार होतं. तिथं शहा भाषण करणार नव्हते, पण मोठं व्यासपीठ उभं केलं होतं. बारा-पंधरा वर्षांच्या मुला-मुलींना गोळा करून वेगवेगळे पोशाख घालून तिथं उभं केलं होतं आणि कुठल्या कुठल्या गाण्यांवर ही मुलं नाचत होती. ऊन वाढत होतं, घामाच्या धारा लागलेल्या होत्या. मुलांचं नृत्य थांबत नव्हतं. हळूहळू चौकात गर्दी जमली. रस्ते बंद झाले. पोलिसांनी नाकाबंदी केली. ‘रोड शो’साठी रथही आले. पण शहांचा पत्ता नव्हता. काही अंतरावर असलेल्या तिहट्टा नावाच्या गावात ते गर्दीसमोर भाषण देत होते. इकडे कृष्णनगरचा चौक भाजप समर्थकांनी भरून गेलेला होता, त्यातून वाट काढून रुग्णवाहिकांची जा-ये सुरू होती. कदाचित त्यात करोनाचे रुग्ण असावेत. व्यासपीठावर एक ‘जोकर’ निवेदन करत होता. तो कधी बंगालीत, तर कधी हिंदीत घोषणाबाजी करत होता. मग त्याने मोदींचे गुणगान केले आणि एकदम सूर काढला ‘‘दीदीऽ ओऽऽ दीदीऽ’’… त्याची ‘सुरावट’ अगदी हुबेहूब मोदींसारखी होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची ज्या शब्दांमध्ये आणि ज्या पद्धतीने खिल्ली उडवली गेली होती, त्यावर प्रचंड टीका झाली आणि तरीही कृष्णनगरमधला हा ‘जोकर’ व्यासपीठावरून तेच शब्द वापरत होता. आपण काही चुकीचं करतोय, असं त्याला अजिबात वाटत नव्हतं. उलट त्यानं स्पष्टीकरण दिलं की, ती मोदींनी दीदींना कौतुकानं मारलेली हाक होती, ती काही दीदींची टिंगल नव्हे… विधिनिषेध न ठेवणाऱ्या नेत्यांचं हे ‘जोकर’ कसं अनुकरण करतात याचं हे उदाहरण!

दादा आणि दीदी

भाजप नावाचा राजकीय पक्ष कसा चालतो, हे बंगालीबाबूंना अजून नीट कळलेलं नाही. बंगाली मध्यमवर्गाला वाटतं की, भाजपकडे नेता आहे कोण? त्यांनी तर तृणमूल काँग्रेसमधले माफिया आपल्या पक्षात घेतले. या माफिया उमेदवारांना कोण मतदान करेल? पण या कथित माफियांचं काय होणार, हे निकालाच्या दिवशी- २ मे रोजी समजेल. हे मध्यमवर्गीय भाजपविरोधी मतांचे. त्यांना तृणमूल काँग्रेसविषयी तुलनेत ममत्व. तृणमूलकडे ममता, भाजपकडे कोण, असं ते विचारत असतात. वास्तविक, भाजपनं महाराष्ट्र असो वा हरियाणा, अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार न देताच निवडणुका जिंकल्या आहेत. उत्तराखंडमध्ये तर आता कोणा तीरथ नावाच्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवलंय. हे तीरथ महाशय मोदींना रामाचा अवतार मानत आहेत. इतकी सगळी उदाहरणं असताना बंगालीबाबू अजून नेत्यांच्या चेहऱ्यांकडे पाहात आहेत. बंगाली ‘दादा’ म्हणजे सौरव गांगुलीच्या वर्तुळात वावरणाऱ्यांचं म्हणणं होतं की, गेली दोन वर्षं भाजपचे नेते दादाच्या हात धुऊन मागे लागलेले होते. त्यांना दादाला काहीही करून भाजपमध्ये आणायचं होतं. दादा भाजपमध्ये आला की, दक्षिण कोलकात्यातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघात त्याला उभं करायचं. दादाचा चेहरा बघून बंगाली हिंदू त्याला मतं देतील, असा त्यांचा होरा होता. दादा जिंकला की सगळ्यांना मान्य होईल असा चेहरा म्हणून मुख्यमंत्रिपदही दादाला बहाल करता आलं असतं. पण भाजपची दोन वर्षं वाया गेली. तमिळनाडूत रजनीकांत यांनी प्रकृतीचं कारण देत निवडणुकीतून माघार घेतली, इकडे पश्चिम बंगालमध्येही दादा आजारी पडल्यानं त्याची मनधरणी करणं भाजपला अशक्य झालं. आता भाजपमध्ये दिलीप घोष, सुवेंदु अधिकारी, मुकुल राय या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू होईल असं म्हणतात. पण ही सगळी गणितं भाजपला पश्चिम बंगालमध्ये यश मिळेल असं गृहीत धरून केली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात दादाऐवजी बंगालीबाबूंनी दीदीला कौल दिला, तर सगळे ‘कष्ट’ हुगळीच्या प्रवाहात सोडून द्यावे लागतील.

महामार्ग…

पूर्वीचा एनएच-३४ आणि आताचा एनएच-१२. या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग का म्हणायचं, हा प्रश्न पडतो. हा राष्ट्रीय महामार्ग-१२ दक्षिणेत हलदियातून निघून उत्तरेत मालदच्याही पलीकडे जातो. याच महामार्गावरून पुढे सिलिगुडीला जावं लागतं. चखदाह गावातून फाटा निघतो तो थेट बांगलादेशच्या सीमेवर. हा केवळ ३५ किमीचा प्रवास. भारतातून अनेक वस्तू बांगलादेशात निर्यात होत असल्यानं या महामार्गावर ट्रक वाहतूक जास्त. महामार्ग दुपदरी,

खड्ड्यांनी भरलेला. या महामार्गावरून जाताना शरीराची हाडं वाजायला लागतात. मधे मधे चौपदरीकरणाची कामं सुरू आहेत, तीही धिम्या गतीनं. कोणी म्हणतं की, महामार्गाचं काम तृणमूल काँग्रेसमुळे रखडलंय. तृणमूलचे लोक आणि कंत्राटदारांच्या वादात महामार्गाचं काम अपूर्ण राहिलं म्हणतात. त्याच्या अगदी उलट परिस्थिती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-दोनवर. हा महामार्ग वर्धमान जिल्ह्यातून जातो. महामार्गावरून थोडं आत गेलं की, मैलोन्मैल दुतर्फा भाताची शेती दिसते. वर्षातून दोनदा पीक घेतलं जातं. तिथंच ब्रान ऑइलचे कारखाने आहेत. सरकार पाण्याची सोय करतं आणि पंपांना सौरऊर्जेतून ऊर्जेचा पुरवठा होतो. वर्धमानचा भात पिकवणारा शेतकरी तुलनेत सधन. याच राष्ट्रीय महामार्ग-दोनवर सिंगूर लागतं. सिंगूरच्या पट्ट्यात आता काहीही नाही. जिकडं बघावं तिकडं पडीक जमीन पाहायला मिळते. सिंगूर कोलकातापासून सुमारे ४० किमी अंतरावर आहे. इथं कधीकाळी टाटांचा नॅनो प्रकल्प होता, आता त्याची कुठलीही निशाणी तिथं नाही. इथून नॅनो कार देशाच्या अन्य भागांत पाठवणं सोपं होतं. पण ज्या सिंगूरनं ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालची सत्ता मिळवून दिली, तिथं ना शेती दिसते, ना कारखाने.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 12:02 am

Web Title: restrictions are welcome akp 94
Next Stories
1 वेगळ्या वाटेनं…
2 लोक नियम का पाळत नाहीत?
3 शिक्षणाच्या दुधात पाणी किती?
Just Now!
X