01 March 2021

News Flash

सेमी-इंग्रजीचे त्रांगडे

राज्यात २००० मध्ये पहिलीपासून इंग्रजी भाषा शिकवण्याचा निर्णय टीकेचा विषय ठरला होता.

प्रतिनिधिक छायाचित्र

राज्यात सेमी इंग्रजी शिक्षण सुरू होऊन एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे. भविष्यात मुलांनी मोठय़ा महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमाचेच शिक्षण घ्यावे अशी स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे धाव घेण्याचे ते दिवस होते. अशा वेळी या सेमी-इंग्रजीने नवी आशा पालकांना दाखवली आणि त्याचबरोबर काही प्रमाणांत मराठी शाळाही तारल्या. पालकांचा प्रतिसाद सेमी-इंग्रजीकडे वाढू लागला. अशा वेळी आता सेमी-इंग्रजी हा प्रकार शैक्षणिकदृष्टय़ा योग्य आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या. सेमी-इंग्रजी शाळांच्या निर्णयातील अंमलबजावणीतील त्रुटींबाबत बालहक्क आयोग, मानवाधिकार आयोग यांच्याकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत. त्यातच सेमी-इंग्रजी शाळा बंद करण्याबाबत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही वेगवेगळी वक्तव्ये होऊ लागली आणि गेल्या काही काळापासून ‘चालल्या आहेत ना.. चालू देत..’ अशा परिस्थितीत असलेल्या सेमी-इंग्रजी शाळा आणि एकूणच दोन भाषांमधील या शिक्षण पद्धतीचा सार्वत्रिक ऊहापोह सुरू झाला आहे. आता त्यातून तरी हे सेमी-इंग्रजीचे त्रांगडे सुटणार का, हे पाहावे लागेल..

राज्यात २००० मध्ये पहिलीपासून इंग्रजी भाषा शिकवण्याचा निर्णय टीकेचा विषय ठरला होता. पहिलीपासून इंग्रजी भाषेची ओळख करून दिल्यानंतर त्याचाच पुढील टप्पा म्हणजे शाळांतून सेमी-इंग्रजी शिक्षणाची पद्धत सुरू करण्यात आली. विज्ञान आणि गणित इंग्रजी माध्यमातून आणि इतर सर्व विषय मराठी माध्यमातून शिकवणे असा सरधोपट अर्थ लावून या नव्या प्रयोगाची सुरुवातही झाली. याच सरधोपट व्याख्येतून या निर्णयाच्या अंमलबजावणीतील घोळ सुरू झाले. मात्र हे सगळे घोळ, मतमतांतरे ही पडद्यामागे राहिली आणि पालकवर्गाकडून सेमी-इंग्रजी शाळांना मिळणारा प्रतिसाद वाढत राहिला. आजमितीला पहिली ते दहावीपर्यंतची जवळपास ३५ लाख मुले शिक्षण घेत आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पन्नास टक्क्यांहून अधिक शाळा सेमी-इंग्रजी आहेत, असे शिक्षण विभागातील एका माजी अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई महानगरपालिकेच्या  बिगरइंग्रजी माध्यमाच्या बहुतेक शाळा या आता सेमी-इंग्रजी झाल्या आहेत. जवळपास सर्वच जिल्ह्य़ांमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे.

नेमके त्रांगडे काय?

सेमी-इंग्रजी हे सुरुवातीला बहुतेक शाळांमध्ये आठवीनंतर लागू करण्यात येत होते. त्यानंतर २००५ मध्ये सेमी-इंग्रजी पाचवीपासूनच लागू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर पहिलीपासूनच सेमी-इंग्रजी माध्यम लागू करण्यात आले. त्याचदरम्यान अभ्यासक्रमही बदलण्यात येत होता. त्यानुसार सेमी-इंग्रजीसाठी स्वतंत्र द्विभाषिक पुस्तके तयार करण्यात यावीत, शाळांनी प्रशिक्षित शिक्षक देण्यात यावेत, आहेत त्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात यावे असे नियमही करण्यात आले. मात्र ते सर्व नियम कागदावरच राहिले. या शाळांतील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञानाचे इंग्रजी माध्यमासाठी तयार केलेले पुस्तक वापरण्यात येते. अभ्यासक्रम तोच असला, तरी भाषेच्या काठिण्यपातळीत तफावत आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर पहिलीच्या इंग्रजी भाषेच्या पाठपुस्तकातील पहिला धडा हा टोमॅटो, टेबल, टॉवेल.. अशा नेहमीच्या वापरातील वस्तूंच्या माध्यमातून इंग्रजी भाषेची ओळख करून देणारा आहे. पहिलीच्याच सेमी-इंग्रजी माध्यमासाठी गणिताचे इंग्रजी माध्यमाचे पुस्तक वापरले जाते. या पुस्तकांतील पहिलाच धडा कावळा आणि चिमणीची गोष्ट आहे. त्यामुळे एकाच दिवशी पहिल्या तासाला अनोळखी भाषेतील शब्दांची ओळख करून घ्यायची आणि दुसऱ्या तासाला ओळखही न झालेल्या भाषेतून गोष्ट ऐकून गणित शिकायचे असा सेमी-इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू आहे.

शासनाच्या निर्णयानुसार मराठी किंवा स्थानिक भाषेच्या माध्यमातील शाळा सेमी-इंग्रजी करायच्या असल्यास किंवा नवी सेमी-इंग्रजी शाळा सुरू करायची असल्यास त्या शाळेत किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेला असावा. शिक्षणशास्त्र विषयाची पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमातून केलेला असावा. नव्याने भरती करण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करण्याचा निकषही निश्चित करण्यात आला आहे. या शाळांना इंग्रजी माध्यमातून शिकवण्यासाठी वेगळे शिक्षकपद नाही. त्यामुळे मराठी माध्यमातील शाळा सेमी-इंग्रजी करताना आहे त्या शिक्षकांमधील एखादा शिक्षक तरी इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेला असावा, तर नवी शाळा सुरू करताना इंग्रजी माध्यमातील टीईटी उत्तीर्ण शिक्षक असावा, असा नियम आहे. राज्यात २०१३ पासून टीईटी घेण्याची सुरुवात झाली. मात्र या परीक्षेतून दरवर्षी इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या ही जेमतेम शंभरच्या आत बाहेर आहे. ही शिक्षक संख्या एका तालुक्यातील शाळांनाही पुरणारी नाही. या सगळ्या प्रशासकीय गोंधळाचे टोक इतके की सेमी-इंग्रजी शाळांना परवानगी दिल्यानंतर राज्यात अशा नेमक्या शाळा किती याची गणतीच शिक्षण विभागाने अनेक वर्षे केली नाही. सगळी धोरणेही मराठी आणि बिगरमराठी माध्यम अशा दोनच मापांत तोलून करण्यात आली. या गोंधळाचा परिणाम आता सेमी-इंग्रजी विरोधाच्या सुरात झाल्याचे दिसते.

सेमी-इंग्रजीसारखे माध्यम सुरू केल्यावर त्याला बळ देण्यात आले नाही, त्यामुळे ते कमकुवत होत गेले हे खरे असले तरीही ते पूर्णपणे बंद करण्याचा विचार कितपत व्यवहार्य याचा अदमास घेणे आवश्यक आहे. स्थानिक भाषेचे प्रेम आणि अभिमान असला तरीही इंग्रजी येण्याला पर्याय नाही हे खरे आहे. कारण उच्चशिक्षणाच्या संधी या बहुतकरून इंग्रजीतूनच आहेत. पूर्णपणे मराठी माध्यमातून शिकून महाविद्यालयाच्या वर्गात कानावर आदळणाऱ्या इंग्रजी व्याख्या समजून घेताना होणारी त्रेधा सेमी-इंग्रजीने नक्कीच कमी केली. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेतील मांडणी जाणणाऱ्या मुलांना सेमी-इंग्रजी शाळांनी नक्कीच आत्मविश्वास दिला.

राज्यातील सेमी-इंग्रजीचा प्रयोग बंद झालाच तर त्याचा सर्वात मोठा फटका मराठी शाळांना आणि खासगी इंग्रजी शाळांचा पर्याय नको असणाऱ्या पालकांना बसणारा आहे. राज्यातील मराठी शाळांकडे काही प्रमाणात पुन्हा एकदा वळलेले पालकांचे पाऊल मागे येईल. प्रतिसाद मिळणाऱ्या या प्रयोगाची प्रशासकीय पातळीवर जोपासणूक करता आली नाही म्हणून बंद करण्याच्या दिशेने विचार व्हावा की आहे त्या परिस्थितीत काही सुधारणा करून अधिक चांगले काही साध्य करता येऊ शकेल, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

* सेमी-इंग्रजीसारखे माध्यम सुरू केल्यावर त्याला बळ देण्यात आले नाही त्यामुळे ते कमकुवत होत गेले हे खरे असले तरीही ते पूर्णपणे बंद करण्याचा विचार कितपत व्यवहार्य याचा अदमास घेणे आवश्यक आहे.

* स्थानिक भाषेचे प्रेम आणि अभिमान असला तरीही इंग्रजी येण्याला पर्याय नाही हे खरे आहे. कारण उच्चशिक्षणाच्या संधी या बहुतकरून इंग्रजीतूनच आहेत.

* पूर्णपणे मराठी माध्यमातून शिकून महाविद्यालयाच्या वर्गात कानावर आदळणाऱ्या इंग्रजी व्याख्या समजून घेताना होणारी त्रेधा सेमी-इंग्रजीने नक्कीच कमी केली.

रसिका मुळ्ये rasika.mulye@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 1:03 am

Web Title: row over semi english medium school in maharashtra
Next Stories
1 पंतप्रधान : एक सुधारक
2 फणसासारखा काटेरी, पण आतून गोड माणूस
3 नकारात्मक मताधिकार घातक  
Just Now!
X