भेट, सौजन्य –
अखेर तब्बल चार दशकांनंतर सचिन तेंडुलकर आणि सुधाकर फडके यांची भेट होण्याचा योग जुळून आला. ज्यावेळी सुधाकर फडके यांनी त्याला प्रत्यक्ष बघितले, तेव्हा तो अवघा चार महिन्यांचा होता. त्यांना गुरुस्थानी असणाऱ्या प्रा. रमेश तेंडुलकर यांच्या या धाकटय़ा मुलाचे त्यांनी अतिशय कौतुकाने आणि उत्साहाने फोटो काढले होते. भविष्यात हा लहानगा क्रिकेट जगतात विक्रमांचे एव्हरेस्ट सर करेल, याची सुतराम कल्पना तेव्हा त्यांना नसली तरी गुरूच्या मुलाची छायाचित्रे त्यांनी निगेटिव्हसकट जपून ठेवली होती. पुढे क्रिकेटच्या अवकाशात सचिन तेंडुलकरनामक तारा तळपू लागला, तेव्हा त्याला भेटून त्याची ही बालपणीची छायाचित्रे द्यावीत, असे त्यांना अनेकदा वाटले. पण प्रत्यक्षात ते घडले नाही. ती संधी त्यांना अखेर ‘लोकसत्ता’मधील बातमी आणि ‘लोकप्रभा’तील लेखामुळे मिळाली.

नोव्हेंबर महिन्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सचिन आपला अखेरचा कसोटी सामना खेळत असताना ते निमित्त साधून क्रिकेटविश्वातील या देवाविषयी बरेच काही छापून येत होते. त्याचदरम्यान ‘लोकसत्ता’च्या ठाणे कार्यालयात कळव्यातील सुधाकर फडके सचिनचे फोटो घेऊन आले. सचिन अवघ्या चार महिन्यांचा असताना, त्याच्या आजोळी डोंबिवलीत काढलेले हे फोटो यापूर्वी कुठेही प्रसिद्ध झालेले नव्हतेच. इतकेच काय दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरनेही ते कधी पाहिले नव्हते. १५ नोव्हेंबरच्या ‘लोकसत्ता’त ‘ठाणेकर फडक्यांनी जपल्या डोंबिवलीकर सचिनच्या स्मृती’ या मथळ्याखाली ही बातमी प्रसिद्ध झाली. तोंडात बोट घालून आईच्या मुखाकडे कौतुकाने बघणाऱ्या लहानग्या सचिनचा फोटोही या बातमीत प्रसिद्ध झाला होता. त्यानंतरच्या आठवडय़ात ‘छोटा सचिन’ या ‘लोकप्रभा’तील लेखात सचिनची सुधाकर फडकेंनी काढलेली अन्य दुर्मीळ छायाचित्रेही होती. सचिनला एका निकटवर्तीयाकडून या दुर्मीळ छायाचित्रांविषयी समजले. करमरकर नावाच्या त्या गृहस्थांनी सचिनला लोकप्रभेतील ती छायाचित्रे दाखवली. दरम्यान ‘लोकसत्ता’ची बातमीही फेसबुकच्या माध्यमातून बरीच ‘लाइक’ झाली होती. वडिलांचे मित्र असणाऱ्या आणि आपले सर्वात लहानपणचे फोटो काढून ते जतन करून ठेवणाऱ्या सुधाकर फडकेंना भेटण्याची इच्छा सचिनने व्यक्त केली आणि अखेर सोमवारी ९ डिसेंबरला तो योग जुळून आला.

वाचा : ठाणेकर फडक्यांनी जपल्या डोंबिवलीकर सचिनच्या स्मृती
वाचा : बाल सचिन…!

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
jayant patil praful patel
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, “त्यांना पक्षसंघटना…”
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

अतुल रानडे यांनी सुधाकर फडके यांना सचिन तुम्हाला दुपारी तीन वाजता वांद्रे-कुर्ला संकुलातील एमसीए क्लबमध्ये भेटेल असा जेव्हा निरोप दिला, तेव्हा क्षणभर त्यांना त्यावर विश्वास बसला नाही. मात्र विचार करायला त्यांना फारसा वेळ नव्हता. चटकन तयारी करून पत्नी अलका, सून नेत्रा, सचिनचा फॅन असणारा चौथीत शिकणारा नातू आरिन आणि बालवाडीत शिकणारी नात नूपुर असे फडके कुटुंब बरोबर तीन वाजता ‘एमसीए’त पोचले. तिथे त्यांना फार काळ वाट पाहावी लागली नाही. अवघ्या काही मिनिटातच सचिन त्यांना भेटला. सुधाकर फडकेंनी त्याला त्याच्या लहानपणीच्या छायाचित्रांच्या प्रती भेट दिल्या. सचिनने ती छायाचित्रे पाहिली. सुधाकर फडकेंनी छायाचित्रांच्या प्रतींवर तसेच ‘लोकप्रभा’च्या अंकावर स्वाक्षरी करण्याची केलेली विनंतीही त्याने आनंदाने मान्य केली. नातवाने आणलेल्या पुस्तकावरही त्याने सही केली.

या सर्व नाटय़पूर्ण घडामोडींमुळे अतिशय उत्तेजित झालेल्या सुधाकर फडकेंचा आनंद गगनात मावत नव्हता. ते म्हणाले, ‘‘परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहून नोकरी पत्करावी लागली. तेव्हा प्रा. रमेश तेंडुलकरांनी पुढील शिक्षणासाठी आपल्याला केवळ प्रोत्साहनच नव्हे, तर ते शिकवीत असलेल्या कीर्ती महाविद्यालयात प्रवेशही मिळवून दिला. त्यावेळी माझ्या प्रवेशअर्जावर पालक म्हणूनही त्यांनीच सही केल्याचे आठवतेय. ४० वर्षांनंतर सचिनने तो चार महिन्याचा असतानाची छायाचित्रे पाहिली, त्यावर स्वाक्षरी केली, तेव्हा एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे समाधान वाटले..’’