News Flash

माणदेशात पिकतोय केसर आंबा!

माणदेशातील आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावात केसर जातीच्या आंबा लागवडीचा प्रयोग एका शेतकऱ्याने यशस्वी केला आहे

(संग्रहित छायाचित्र)

दिगंबर शिंदे

माणदेश म्हटले, की डोळ्यांपुढे केवळ दुष्काळ आणि या दुष्काळाला तोंड देत कशीबशी उभी राहणारी कोरडवाहू पिके एवढेच काय ते येते. पण याच माणदेशातील आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावात केसर जातीच्या आंबा लागवडीचा प्रयोग एका शेतकऱ्याने यशस्वी केला आहे. दुसरीकडे केवळ आंबा उत्पादन एवढ्यावर न थांबता या उत्पादकाने त्याची लंडनच्या बाजारापर्यंत निर्यातही करून दाखवली आहे. माणदेशातील हीच यशोगाथा…

माणदेशातील खिलारी खोंडांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिध्द असलेल्या खरसुंडीच्या सिध्दनाथाच्या पांढरीत पिकलेला केसर लंडनच्या बाजारपेठेत आपला वेगळाच दिमाख, तोरा मिरवत आहे. अगदी कुसळालाही जन्म घेण्यासाठी मातीचा शोध घेण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची घालाव्या लागत होत्या, अशा दगड-धोंड्याच्या रानात गजानन पाटील या तरुणाने केसर आंब्याची लागवड करून सातासमुद्राबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात चव आणि गंध पोहोचवला आहे.

गजानन पाटील यांची डोंगराकडेला पाच एकर शेती, ज्या शेतीमध्ये पावसाळ्यात केवळ गवत उगवत होते. दिवाळीनंतर तेही वाढत्या उन्हाच्या झळाबरोबर करपून जात होते. तालीच्या रानात चिपट-मापटं आली तर बाजरी, मटकी ही पिके. यात केलेली मेहनत तर फायद्याची नव्हतीच, नुकसानीतच जात होती. मेंढपाळांना रान चरण्यासाठी दिवाळीपर्यंत उपयोगी असायचे. त्यानंतर मात्र रानात कोणी फिरकायचेच नाही. अशी स्थिती असताना या रानात काही तरी पिकेल आणि कुटुंबाची प्रगती होईल अशी स्थिती नसल्याने अनेक कुटुंबे जगण्यासाठी गाव सोडत होती. हा भाग प्रामुख्याने गलाई व्यवसायात स्थिरावलेला. मात्र मातीची ओढ कायम राहिली आहे. यातूनच गजानन पाटील यांचे बंधू  मुकुंद पाटील यांनी डोंगरकाठाची पाच एकर जमीन खरेदी केली.

याच जमिनीत पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विहीर खुदाई केली. मात्र पाणी जेमतेमच, यावर मात करण्यासाठी विंधन विहीर घेतली. त्यात मिळणारे पाणी विहिरीत साठवायचे आणि शेती करायची अशी मूळ कल्पना. मात्र उंचसखल असल्याने रान तयार करण्यात आले. बुलडोझरचा वापर करून जमीन समतल केली. समतल जमिनीमध्ये केलेली गुंतवणूक परत मिळवण्याबरोबरच शेती लाभदायी झाली पाहिजे यासाठी पीक कोणते घ्यावे यासाठी अभ्यास केला असता या भागात नवीनच पीक लागवड करायची आणि एक वेगळा आदर्श दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांपुढे ठेवायचा ही जिद्द घेउन मुकुंद पाटील आणि गजानन पाटील यांनी अभ्यास केला.

आटपाडी तालुक्यात र्डांळब लागवड आहे. या ठिकाणच्या र्डांळबांनी परदेशी बाजारातही चांगले स्थान मिळवले आहे. चव आणि रंग या जोरावर खडकाळ जमिनीत कमी पाण्यावर उत्पादन करता येणारे र्डांळब पीक असले तरी यापेक्षा वेगळे काही तरी करण्याचा चंग पाटील बंधूंनी बांधला. माणदेशातील कोरड्या हवामानात आंबा लागवड हा एक विनोदच होता. मात्र वेगळे काही तरी करायचे या हेतूने त्यांनी आंबा लागवड करण्याचा निर्णय घेतला.

राज्य शासन फळ लागवडीसाठी प्रोत्साहन देत असताना एक गुंठा क्षेत्रामध्ये एकच आंबा रोप असा नियम आहे. यामुळे झाडांची संख्या कमी बसते. पर्यायाने राबणूक होऊनही उत्पन्न कमी येण्याचा धोका राहतो. तेही कायमचाच. यामुळे याऐवजी इस्त्राायली तंत्रज्ञानाने आंबा लागवड करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कमी जागेत जादा रोप लागवड करता येऊ शकते. दोन ओळीतील अंतर बारा फूट आणि दोन रोपातील अंतर चार अथवा सहा फूट ठेवून आंबा लागवड करता येऊ शकते. मात्र या बागेमध्ये बारा बाय पंधरा फूट अशी रोपांची लागण करण्यात आली असून १ हजार १०० झाडांची लागवड केली आहे.

दरवर्षी जूनमध्ये आंब्याची छाटणी करण्यात येते. या वेळी १२ ट्रॉल्या शेणखत घालण्यात येते. छाटणीवेळी कल्टार हे औषध वापरण्यात येते. यामुळे आंब्याच्या डहाळीवर अधिक प्रमाणात फलधारणा होण्यास मदत होते. छाटणीनंतर ९० दिवसांनी मोहोर येतो. मोहोर आल्यानंतर मोहोरामध्ये असलेल्या फुलांचे परागीकरण होऊन फळधारणा होण्यासाठी बागेमध्ये मधमाश्यांची गरज भासते. यासाठी शेजारी अन्य मित्रझाडांची लागवड फायदेशीर ठरते. याचा आंबा फळधारणेसाठी चांगलाच फायदा होतो.

एकदा आंब्याला मोहोर आला की, मोहोरातून आंबा ज्वारीएवढ्या आकाराचा तयार होईपर्यंत थोडे जागरूक राहणे गरजेचे असते. या काळातच बुरशीजन्य रोगांचा हल्ला होऊ शकतो. हे टाळण्यासाठी औषध फवारणी करावी लागते. मात्र,र्डांळब अथवा द्राक्षाप्रमाणे जादा औषधाचीं गरज भासत नाही. एकदा का बागेत आंबा सेट झाला की केवळ पाणी व्यवस्थापन एवढेच काम उरते. आंबा बागेसाठी केवळ छाटणी आणि काढणीवेळी मनुष्यबळाची गरज भासते. इतरवेळी ठिबक सिंचन व्यवस्था अथवा पाटपाणी व्यवस्था केली तर पुरेसे ठरते. एका झाडाला वयोमानानुसार ४५ ते ७० लिटर पाणी दर तीन दिवसांनी द्यावे लागते.

खरसुंडीच्या आंबा बागेतील आंबा अगदी निर्यातक्षम असून दरवर्षी लंडनच्या बाजारात जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र, यासाठी प्रयोगशाळेतील तपासणी करूनच निर्यातीसाठी निवड केली जाते. एका आंब्याचे वजन २०० ग्रॅम असावे लागते. चव आणि गंध यामुळे ग्राहकच आंबा शोधत बागेत येत असल्याने र्पँकगचा खर्च करावा लागत नाही. आंब्याची चव आवडल्यानंतर अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात स्थिरावलेल्या गलाई बांधवांकडूनऑनलाईन मागणी नोंदवली जाते. विटा येथून ट्रॅव्हल्सच्या बसने हा आंबा पाठविण्यात येतो.

एकरी ४० टन आंबा उत्पादन होत असून स्थानिक पातळीवर १२० रुपये किलो दराने आंबा विक्री होते. लंडनच्या बाजारात जाणारा आंबा दोनशे रुपये दराने विकला जात असून निर्यातदार थेट बागेतूनच आंबा खरेदी करतात. मात्र यासाठी निवडक एकसारख्या वजनाचा आंबाच घेतला जातो. उरलेला आंबा स्थानिक बाजारासह सोलापूर बाजारातही विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

डोंगराळ भागात केलेली आंबा लागवड या भागातील  शेतकऱ्यांना एक नवी दिशा देणारी ठरली असून रोगाची कमी जोखीम, कमी कष्ट यामुळे र्डांळब बागेकडे वळलेला शेतकरी आता आंबा लागवडीकडे वळत आहे. या भागात आलेले टेंभू योजनेचे पाणी आणि हमखास उत्पन्न  यामुळे नाथाच्या खरसुंडीमध्ये यावर्षी ७५ हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड  झाली आहे.

– गजानन पाटील

digambar.shinde@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 12:10 am

Web Title: saffron mango is growing in the maandesh abn 97
Next Stories
1 कृषी प्रयोगशीलतेचा कारभारवाडीचा मार्ग
2 विश्वाचे वृत्तरंग : पुन्हा युक्रेनसीमा!
3 सैन्यमाघारीनंतरचे संकट..
Just Now!
X