समाजाकडून झालेला अन्याय, उपेक्षा, परिस्थितीची प्रतिकूलता आणि पुरुषी दृष्टिकोन यांच्याशी लढत, झगडत स्वत:बरोबरच इतर महिलांनाही जगण्याचे बळ देणाऱ्या महिलांची ओळख समाजाला व्हावी, त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशाने नवरात्रीच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’तर्फे ‘शोध नवदुर्गाचा’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यातून निवडलेल्या नऊ दुर्गाचा सत्कार शुक्रवारी मुंबईत करण्यात आला. त्या वेळी मिती क्रिएशन्सतर्फे संगीत-नृत्याचा कार्यक्रमही सादर करण्यात आला. या प्रेरणादायी सोहळ्याच्या निमित्ताने सत्कारमूर्ती नवदुर्गा आणि त्यांचा सन्मान ज्यांच्या हस्ते करण्यात आला त्या मान्यवर महिलांनी व्यक्त केलेली मनोगते..
अवघे आयुष्य सुई-दोऱ्याने जोडले
अगदी नकळत्या वयात दोन वर्षांची असतानाच पोलिओमुळे आलेले अपंगत्व. त्यात बाराव्या वर्षी वडील वारले आणि आमच्या कुटुंबाची घडीच विस्कटली. अपंगत्व आणि वैधव्य एकत्र आले, तर कुटुंबाची काय वाताहत होते हे मी माझ्याच घरात अनुभवले आहे. त्या वेळी सुई-दोऱ्याने मला आधार दिला. आता मी दरमहा ५० हजार रुपये कमवीत असले तरी पहिल्या शिलाई कामातून मिळालेले ५० पैसे हे माझ्यासाठी अजूनही अनमोल आहेत.
– मीनाक्षी निकम

ही तर नियतीची इच्छा..!
भारतीय सेनादलात दहा वर्षे नोकरी केल्यानंतर मला कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यातल्या त्यात सुदैव असे की, खूप लवकर लक्षात आल्याने व वेळीच उपचाराने रोग आटोक्यात आला, मात्र उपचारादरम्यान या रोगाविषयी जनसामान्यांना फारशी माहिती नसल्याचे लक्षात आले. मग देशभर या रोगाविषयी माहिती देण्याचा निश्चय केला.  
कॅ. डॉ. रितू बियाणी

रिक्षाने दिला मदतीचा हात
कारंज्यासारख्या छोटय़ा गावात एका महिलेने रिक्षा चालविणे सोपे नव्हते. सुरुवातीचा एक-दीड महिना मी एकटीच फिरत होते. कुणीही रिक्षात बसत नव्हते. हिने नवऱ्याला मारले आणि आता आपल्यालाही कुठे तरी जाऊन ठोकेल, अशी त्यांना भीती वाटायची; पण काहीही झाले तरी रिक्षा चालवायचीच, हा माझा निर्धार होता. मग हळूहळू लोक रिक्षात बसू लागले..
– कुसुम चौहान

स्त्रियांवरच्या अन्यायाविरोधात लढा
माझ्याकडे येणारी रुग्ण महिला, ती सात महिन्यांची गर्भवती असताना तिचा पती अपघातात मरण पावला. त्यानंतर माहेरी गेलेली असताना केवळ हातावर मेंदी काढलेली असल्याने तिच्या सासूने उकळत्या तेलात तिचा हात बुडवला. ही घटना माझ्या जिव्हारी लागली. महिला विधवा झाली, की तिच्या कपाळावरचे कुंकू पुसून टाकले जाते. या अपप्रवृत्तीविरुद्ध जाणीवपूर्वक कृती करावी म्हणून विधवा महिलांसाठी ‘हळदीकुंकू’ समारंभ आयोजित करण्यात सुरुवात केली..
– डॉ. शारदा महांडुळे

आमचा संघर्ष आत्मसन्मानासाठी
लहानपणी शाळेत जात असतानाच मी लोकांकडे धुणीभांडीही करायचे. त्याचे लोकांना कौतुक वाटायचे; पण तरीही घरमालकीण आपल्याला वेगळी वागणूक देते, हे तेव्हाच लक्षात आले होते. आता घरेलू काम करणाऱ्यांना ‘कामगार’ म्हणून दर्जा दिला जावा, इतर कामगारांना मिळणाऱ्या किमान वेतन, साप्ताहिक रजा यांसारख्या सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत..
मधु बिरमोळे

सहज पर्यटक म्हणून पूर्वाचलात गेलेल्या अहमदाबादच्या डॉ. प्रतिभा आठवलेंनी तेथील आरोग्य सुविधेचा अभाव पाहून दरवर्षी काही दिवस दंतचिकित्सा शिबीर सुरू केले. गेली १३ वर्षे त्या ऑक्टोबर महिन्यात पूर्वाचलमधील राज्यात २१ दिवस जातात. त्यांच्या प्रयत्नांनी त्या भागात आता पाच दंत चिकित्सा केंद्रे कार्यरत झाली आहेत.   
– डॉ. प्रतिभा आठवले

कामाचे आता व्यसनच लागले
काम करूनही बहुतेक महिलांचा रिमोट कंट्रोल मात्र कुणा दुसऱ्याच्याच हाती असतो. आपला रिमोट आपल्याच हाती असावा म्हणून मी रोज १६ ते १८ तास काम करते. कामाचे आता व्यसनच लागले आहे. स्वत:साठी तुम्ही अविरत काम करता तेव्हा तुम्हाला अजिबात थकवा जाणवत नाही.
विजयालक्ष्मी सुवर्णा

बरे-वाईट सर्व देवाचे देणे
सर्व पृथ्वी श्रीकृष्णमय आहे. येथील बरे-वाईट सारे त्या देवाचे आहे, त्याचाच प्रसाद आहे, याच भावनेने आम्ही मनोरुग्णांचा सांभाळ अगदी स्वेच्छेने आणि आनंदाने करतो. नवऱ्याचे वेतन, शेतीतून मिळणारे उत्पन्न यातून आम्ही मनोरुग्णांचा सांभाळ करतो. सुरुवातीला मनोरुग्णांना घरी आणल्यावर शेजाऱ्यांनीही विरोध केला; पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो.
प्रज्ञा राऊत

आनंदवनने दिली कार्याची दृष्टी
माझे वडील कै. मधुकर सोनटक्के  सामाजिक कामे करायचे. त्यांच्या कार्याचा प्रभाव माझ्यावर होता.  पती कामानिमित्त वरोऱ्याला असल्याने वरचेवर ‘आनंदवन’मध्ये जाणे व्हायचे. या दोन ‘बाबां’नी मला समाजकार्याची प्रेरणा दिली. अकोल्यात परतल्यावर ‘आनंदवन’च्या धर्तीेचे काही काम करावे म्हणून मी अंध व्यक्तींना मदत करायचे ठरविले.
– मंजुश्री कुलकर्णीvv04‘नवदुर्गा’ना विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्या मान्यवरांच्या या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया

प्रेरणादायी कार्य
इतक्या साध्या साध्या महिला, त्यांची कुणाशीही ओळख नाही, त्यांच्याकडे भरपूर पैसा नाही आणि तरीही त्यांनी आपल्या कामाने अनेकांची मने जिंकून घेतली आहेत. कुठल्याही आधाराविना, मदतीविना त्यांनी उभे केलेले कार्य हे अतुलनीय आहे आणि प्रेरणादायीही आहे. त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले आहे.
– डॉ. नंदिता पालशेतकर
***
हा जागर दरवर्षी व्हावा..
‘लोकसत्ता’ने नवरात्रीच्या काळात राबविलेले नवदुर्गा अभियान अतिशय महत्त्वाचे आहे. विविध ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत महिलांनी मिळविलेले हे यश निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. विचार आणि प्रेरणांचा हा जागर दरवर्षी व्हावा..
– मीनल मोहाडीकर
***
‘नाही रे’ वर्गाचा सन्मान
बहुतेकदा ‘आहे रे’ वर्गातील कर्तृत्ववान व्यक्तींचाच गौरव होतो. ‘नाही रे’’ वर्गातील गुणवंत उपेक्षितच राहतात. सर्व अनुकूल असताना मिळविलेल्या यशापेक्षा प्रतिकूलतेशी दिलेला लढा नेहमीच श्रेष्ठ आहे. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे ‘नाही रे’ वर्गाचा सन्मान झाला..
– अनुराधा गोरे
***
‘लोकसत्ता’चे उपक्रम खूप महत्त्वाचे
‘लोकसत्ता’चे  ‘सर्वकार्येषू सर्वदा’ हा उपक्रम असेल किंवा ‘व्हिवा लाऊंज’ असेल, असे उपक्रम खूपच प्रभावी आहेत. विशेषत: महिलांसाठी राबवले जाणारे वेगवेगळे उपक्रम आजच्या काळात खूप महत्त्वाचे आहेत, असे मला वाटते. ‘लोकसत्ता नवदुर्गा’ हाही त्याच पठडीतला एक सर्वोत्तम उपक्रम आहे.
वीणा पाटील
***
समाजात आज ९५ टक्क्यांपेक्षाही लोक चांगले आहेत, मात्र त्यांच्यात आपापसात संवाद होत नाही. त्यांना कोणाला मदत करायची असेल, तर ती कोणाला आणि कशी हेही कळत नाही. ‘लोकसत्ता नवदुर्गा’ या उपक्रमातून या तळागाळात कार्य करणाऱ्या स्त्रियांना आपण समोर आणून खऱ्या अर्थाने आपण नवरात्रोत्सव साजरा केला आहे. अशीच शक्तीची पूजा आपण यापुढेही करत राहू.
अभय केळे, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, पृथ्वी
***
त्यांच्या जिद्दीला सलाम
 ‘लोकसत्ता’ने नवदुर्गा अभियानाच्या माध्यमातून  महत्त्वाचे काम करणाऱ्या, पण जगासमोर न आलेल्या कर्तृत्ववान महिलांना व्यासपीठ दिले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झगडून त्यांनी यश मिळविले, इतरांना आधार दिला. त्यामुळे त्यांच्या जिद्दीला सलाम करावासा वाटतो. ‘लोकसत्ता’ने ही रत्नपारखी मोहीम कायम सुरू ठेवावी. माझ्या शुभेच्छा आहेत.
फैय्याज (ज्येष्ठ अभिनेत्री)
***
प्रायोजक
vv03समाजातील सर्वसामान्य घटकाला आधार देणे, त्याला मदत करणे हा अभ्युदय बँकेचा उद्देश आहे. त्यामुळेच ‘लोकसत्ता नवदुर्गा’मध्ये प्रायोजक म्हणून सहभागी होण्याची संधी मिळणे, हे आम्ही आमचे भाग्य समजतो. भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमात बँक ‘लोकसत्ता’बरोबरच असेल..
– विजय मोरे, व्यवस्थापकीय संचालक, अभ्युदय बँक
संकलन – प्रशांत मोरे, रेश्मा राईकवार ल्लछाया – दिलीप कागडा