‘‘देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा जनसंहार आहे. विद्यमान नेतृत्वाने असाच कारभार चालवला तर परिस्थिती आणखी बिघडेल. देशाला करोनापासून वाचवले पाहिजे,’’ ब्राझीलचे माजी अध्यक्ष लुइस इनॅसिओ-लुल ड’सिल्वा यांची ही विधाने. त्यातून ब्राझीलचा वर्तमान कळतो आणि भविष्याची दिशाही दिसू लागते. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ती टिपण्याचा प्रयत्न केला आहे.

ब्राझीलमध्ये हाहाकार माजवणाऱ्या करोनाने एकटय़ा मार्चमध्ये तिथे ६६,५७० बळी घेतले. आतापर्यंत करोना बळींचा आकडा सव्वातीन लाखांवर गेला आहे. नवे करोनावतार डोकेदुखी ठरले असून आरोग्यव्यवस्थाच कोलमडली आहे. त्यामुळे माध्यमांनी ब्राझीलचे अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांच्या अकार्यक्षमतेवर टीका केलीच; पण त्यांचे उपद्व्यापही उघड केले. मंत्रिमंडळातील फेरबदल, लष्करी दलांच्या प्रमुखांचे राजीनामे, कोलमडलेली आरोग्यव्यवस्था, वाढती बेरोजगारी या दुष्टचक्रात ब्राझील अडकले आहे. बेरोजगारीचा दर तर १४ टक्क्यांवर गेला आहे. अशा स्थितीत आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी बोल्सोनारो यांनी आपल्या निष्ठावानांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले. मात्र, त्यातून बोल्सोनारो यांचे राजकीय भवितव्य फार बदलणार नाही, असे तज्ज्ञांचे मत असल्याचे ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या लेखात म्हटले आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या कारणांवरून जवळपास दहा-बारा वेळा बोल्सोनारो यांच्यावर महाभियोग खटला चालविण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना पुरेसा पाठिंबा मिळालेला नाही, याकडे या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे.

संरक्षणमंत्री फर्नादो अझेवेडो यांची गच्छंती झाल्यानंतर नवे संरक्षणमंत्री नेमण्यात आले. मात्र, फर्नादो यांना पायउतार का व्हावे लागले, याबाबत बोल्सोनारो काहीही बोलायला तयार नाहीत. लष्कराची बांधिलकी राज्यघटनेशी असावी की अध्यक्षांशी, या मुद्दय़ावरून बोल्सोनारो आणि फर्नादो यांच्यात मतभेद होते, असे आता उघड होऊ लागले आहे. ब्राझीलमध्ये अनेक दशकांच्या लष्करी राजवटीनंतर १९८५ मध्ये लोकशाही पुनस्र्थापित झाल्यावर देशाच्या राजकारणात लष्कराची भूमिका हा संवेदनशील मुद्दा राहिला आहे. मंत्रिमंडळात वारंवार फेरबदल केल्याने स्थर्य राखण्यात बोल्सोनारो अपयशी ठरले, ही बाब ‘बीबीसी’च्या वृत्तलेखात अधोरेखित करण्यात आली आहे.

करोना रोखण्यात अपयशी ठरलेले बोल्सोनारो आता लोकशाहीची गळचेपी करू पाहात आहेत, असे निरीक्षण ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका लेखात नोंदविण्यात आले आहे. ब्राझीलमध्ये केवळ दोन टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. करोनाशी लढण्याऐवजी बोल्सोनारो हे लोकशाहीशी लढत आहेत. महाभियोग कारवाईची टांगती तलवार, प्रतिस्पर्धी लुला हे आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता या पार्श्वभूमी वर बोल्सोनारो यांनी संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांचे राजीनामे घेतले. आगामी निवडणुकीतील संभाव्य सहा अध्यक्षीय उमेदवारांनी संयुक्त निवेदन काढून देशातील लोकशाही धोक्यात आल्याचा इशारा दिला आहे, याकडेही या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. महाभियोग खटला दाखल होऊन पायउतार होण्याची वेळ आली किंवा आगामी निवडणुकीत पराभव झाला, तर लष्कर आपल्या बाजूने असावे, अशी बोल्सोनारो यांची योजना आहे. त्यांनी अनेकदा लष्करशाहीचे उघडपणे समर्थन केले आहे. ते अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक मानले जातात. ट्रम्प यांचाच कित्ता गिरवत बोल्सोनारो यांनी आगामी निवडणुकीत गैरप्रकार होतील, अशी शक्यता वर्तवून आतापासूनच रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. अगदी अमेरिकी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या ट्रम्प यांच्या दाव्याचेही बोल्सोनारो यांनी समर्थन केले होते. या स्थितीत अमेरिकेसह अन्य लोकशाहीवादी देशांनी बोल्सोनारो यांच्यावर वचक ठेवण्याची गरज या लेखात व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात बोल्सोनारो यांनी लष्कराचा उल्लेख ‘माझे लष्कर’ असा केला होता. गेल्या शनिवारी त्यांनी देशातील नागरिकांच्या लसीकरणासाठी लष्कर तयार असल्याचे केलेले विधान ‘द रिओ टाइम्स’सह अन्य माध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय निरीक्षकांच्या भुवया पुन्हा उंचावल्या.

ब्राझीलच्या या संकटकाळात एक आशा आहे, ती म्हणजे पुढच्या निवडणुकीत बोल्सोनारो यांच्या पराभवाची. करोनास्थिती नियंत्रणात आल्याशिवाय ब्राझील दुष्टचक्रातून बाहेर पडू शकत नाही. अशा स्थितीत पुढील निवडणुकीत बोल्सोनारो यांच्या प्रतिस्पध्र्याचा विजय होईल, अशी ब्राझीलच्या नागरिकांना आशा आहे, असे ‘द गार्डियन’च्या लेखात म्हटले आहे. ब्राझीलचे माजी परराष्ट्रमंत्री सेल्सो अमोरिम यांनी हा लेख लिहिला असून, ते लुला यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदी होते. न्यायालयाने भ्रष्टाचारप्रकरणी आरोपमुक्त केल्याने लुला यांनी पुढच्या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन (७७) यांच्या यशस्वी निवडणूक प्रचारातून प्रेरणा मिळाल्याचे लुला (७५) सांगतात. त्यामुळे बोल्सोनारो आणि लुला यांच्यात निवडणुकीचा सामना रंगू शकतो. मात्र, पराभव झाल्यास बोल्सोनारो हे ‘ट्रम्पप्रयोग’ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीच भीती अधिकाधिक गडद होऊ लागली आहे.

संकलन : सुनील कांबळी